सेंद्रिय कर्ब जमिनीत साठवण्याच्या दिशेने...

सेंद्रिय कर्ब जमिनीत साठवण्याच्या दिशेने...
सेंद्रिय कर्ब जमिनीत साठवण्याच्या दिशेने...

कर्बाची साठवण निसर्गामध्ये विविध पदार्थांमध्ये, जमिनीमध्ये आणि सागराच्या तळाशी होत असते. कर्ब आणि सेंद्रिय कर्ब यातील नेमका फरक जाणून घेत आपल्या शेतीमध्ये पिकांना सूक्ष्मजीवांच्या सहकार्याने अन्नद्रव्यांचा पुरवठा करणाऱ्या सेंद्रिय कर्बाची पुन्हा साठवण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. हे पारंपरिक मार्गाने होताना दिसत नसल्याने नवे मार्ग धुंडाळावे लागतील. निसर्गात कर्बाचा साठा कसा, कोठे झाला आहे, या विषयीचा एक सर्वेक्षण अहवाल उपलब्ध आहे. यात कर्ब १० चा नववा घात. टन (म्हणजे १० वर ९ शून्ये) या परिमाणात दाखविला आहे. कर्बाची उपलब्धता खालीलप्रमाणे ः १) हवा ७०० x १० चा ९ वा घात २) जमिनीतील सजीव ११५०

  • पैकी जिवंत ४५०
  • मृत ७००
  • ३) खनिज तेल साठ्यात १०,००० ४) समुद्रातील पाणी ३५,०००

  • सजीव ३०१०
  • पैकी जिवंत १०
  • मृत ३०००
  • तळातील गाळ २०,००,०००
  • सेंद्रिय स्वरुपात १४,१६०
  • रासायनिक स्वरुपात २०,०३५७००
  • वरील अहवालाचा अभ्यास केल्यास एक गोष्ट सहज लक्षात येते, की खनिज तेले व त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त कर्बाचा साठा समुद्राच्या पाण्यात व तळातील गाळात आहे. मानवाने मोठ्या प्रमाणात कर्बचक्र तोडले असून, हवेतील कर्बाची टक्केवारी वाढत आहे. मात्र, तिच्या वाढीचा वेग हा तुलनेने कमी भासतो. कारण मुक्त कर्बवायू खूप मोठ्या प्रमाणात समुद्राच्या पाण्यात शोषला जातो. पुढे सागराच्या तळातील गाळात साठून रहातो. निसर्गात ही यंत्रणा नसती जागतिक तापमान वाढीचा वेग प्रचंड राहिला असता. या तापमानवाढीमुळे पृथ्वीतलावरील सजीवांचे जीवनच धोक्‍यात आले असते. हे खरे असले तरी आपण सध्या केवळ शेती संबंधातील कर्बाचा प्रामुख्याने विचार करत आहोत. त्यातही हवा व जमिनीतील कर्बाचे अस्तित्त्व अभ्यासणार आहोत. वरील अहवालानुसार, हवेपेक्षा जमिनीत जास्त प्रमाणात कर्बाचा साठा आहे. जमिनीतील साठ्याचा विचार केल्यास जिवंत वनस्पतीतील साठ्याच्या तुलनेत मृत सेंद्रिय पदार्थातील साठा जवळपास दुपटीने जास्त आहे. हे सर्वेक्षण जुने (२०-२५ वर्षांपूर्वीचे) आहे. पुढे जमिनीतील कर्बाचा साठा कमी कमी होत चालला असून, हवेतील साठ्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे जागतिक तापमान वाढीबरोबरच जमिनीची सुपीकता व उत्पादकता यांचे प्रश्‍न शेतीपुढे उभे राहिले आहेत. याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. याची शास्त्रज्ञांच्या पातळीवर काही प्रमाणात चर्चा असली तरीही शेतकरी व शास्त्रज्ञ दोघेही याबाबत गंभीर असल्याचे जाणवत नाही. काही शास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे, की हवेच्या तुलनेत जमिनीत कर्बाचा साठा तिप्पट असला पाहिजे. जमिनीत कर्बाचा साठा सेंद्रिय कर्ब या स्वरुपात साठविला जातो. अनेकांना कर्ब व सेंद्रिय कर्ब यातील फरक लक्षात येत नाही. तो प्रथम समजून घेऊ. सेंद्रिय कर्ब म्हणजे कर्बाला जोडून वनस्पतीची वेगवेगळी अन्नद्रव्ये असतात. हा वनस्पतीच्या अन्नद्रव्यांचा साठा असतो. जो उपलब्ध अवस्थेत नसतो. परंतु, त्यातील अन्नद्रव्ये सूक्ष्मजीवांकडून गरजेप्रमाणे उपलब्ध अवस्थेत येऊ शकतात. सूक्ष्मजीवांची त्यावर प्रक्रिया होऊ शकते. सेंद्रिय कर्ब सजीवाकडून सजीवांसाठी तयार झालेला असतो. या उलट शुद्ध कर्बावर सूक्ष्मजीवांकडून कोणतीही प्रक्रिया होऊ शकत नाही. वनस्पतीपासून तयार झालेले लाकूड हा सेंद्रिय पदार्थ आहे, त्याचे सेंद्रिय खत होऊ शकते. परंतु, हेच लाकूड जाळून कोळसा तयार केला तर त्याचे सेंद्रियपण संपते. असा कोळसा सालोसाल तसाच पडून राहू शकतो. आपल्या हातातील गोष्ट करता येईल... जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत घटकांत प्रामुख्याने खनिज तेले व कोळशाच्या ज्वलनाचा सर्वांधिक विचार केला जातो. एका पर्यावरणवाद्याच्या मतानुसार, वरील दोन स्रोताच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त कर्ब वायू जंगले तोडून त्या जमिनी शेतीखाली आणल्याने झाला आहे. या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा साठा विघटन करून संपुष्टात आणला हे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. खनिज तेले व कोळसा जाळून आपण कर्ब वायूचे फक्त उत्सर्जनच करतो. हा कर्ब वायू कमी करण्याचा काही मार्ग आपल्या हाती नाही. समुद्र त्यावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवतो. शेतजमिनीतून उत्सर्जन होणाऱ्या कर्बवायूला आपण कर्बचक्र पूर्ण करून परत जमिनीत आणू शकतो. ही आपल्या हातातील गोष्ट आहे. शेतीत एखादे पीक घेत असताना, किती सेंद्रिय कर्ब वापरला जातो? व पिकाअखेर पुढील पिकाचे पेरणीपूर्वी त्यातील किती भाग आपण त्या जमिनीत परत आणला, पुनर्भरण केले याचा जमाखर्च होणे गरजेचे आहे. शेतीत नेमका हा सेंद्रिय कर्ब कसा वापरला जातो, पिकाचे उत्पादनात नेमके याचे काय महत्त्व आहे, याचे ज्ञान शेतकऱ्यांना असण्याची शक्‍यता नाही. शेतकऱ्यांना फक्त जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर (शेणखत, कंपोष्ट) केला पाहिजे इतके माहीत आहे. परंतु, जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या केलेल्या वापराइतका किंवा त्यापेक्षा जास्त जमा करण्याचे महत्त्व कोणीही सांगत नाही. अपवाद वगळता सर्वत्र सेंद्रिय घटकांच्या शेतीतील वापराकडे दुर्लक्ष आहे. शास्त्रज्ञांच्या पातळीवरही त्याबाबत आनंदीआनंदच दिसतो. त्यांचा भर केवळ वनस्पती विकृती शास्त्राशी संबंधीत सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास इतकाच आहे. या सूक्ष्मजीवांचा उपयोग जमिनीची सुपीकता, उत्पादकता पिकाच्या अन्नपोषणासाठी होऊ शकतो, याकडे संपूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसते. जमिनीत पुन्हा सेंद्रिय कर्ब साठवणे हाच उपाय ः १९६५-७० मध्ये जगभर हरितक्रांतीला सुरवात झाला पाहिली. १५-२० वर्षे सर्वत्र भरघोस पिकाचे उत्पादन मिळाले. याकाळात मर्यादित संसाधनात कमी खर्चात भरघोस उत्पादन मिळाले. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. पुढे उत्पादन पातळी घटत गेली. किडी रोग यांचे प्रमाण वाढत गेले. संसाधनांचा वापर वाढत जाताना त्यावरील खर्चाचे प्रमाण वाढत गेले. शेतीतील निव्वळ नफ्याचे प्रमाण घटत चालले आहे. थोड्याशा संकटानेही ती आतबट्ट्याची होते. पहिली २० वर्षे उत्तम उत्पादन का मिळाले आणि आता का मिळत नाही, या प्रश्‍नाचे उत्तर डॉ. एफ. जे. स्टिव्हन्सन यांच्या "ह्यूमस केमिस्ट्री' या पुस्तकातील एका संदर्भात मिळते. ते म्हणतात, निसर्गाने जमिनीत सुरवातीला जी सेंद्रिय कर्बाची साठवण करून ठेवली होती, त्या जीवांवर ती जमीन आपल्याला १५-२० वर्षे समाधानकारक उत्पादन देईल. त्यानंतर उत्पादन पातळी घटत जाईल. हरितक्रांती ज्या-ज्या ठिकाणी राबविली गेली, तेथे सर्वत्र हाच अनुभव आहे. यावर उपाय फक्त जमिनीत सेंद्रिय कर्ब पुन्हा साठवणे हाच आहे. पारंपरिक मार्गाने हे कधीच साध्य होणार नाही. यासाठी नवीन मार्गाचा शोध घ्यावा लागेल. इंग्रजीमध्ये याला "कार्बन सिक्वेस्ट्रेशन'' असे म्हणतात. याविषयी पुढील भागात जाणून घेऊ.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com