‘सह्याद्री’ शेतकरी कंपनीकडून ग्राहकांसाठी ‘ट्रेसेबिलिटी’ यंत्रणा

गुणवत्तापूर्ण शेतमालाचा पुरवठा व ग्राहकांना त्याची हमी ही ‘सह्याद्री फार्म’ ची तत्वनिष्ठता आहे. याच भूमिकेतून आमचे कामकाज सुरू आहे. युरोपप्रमाणेच भारतीय बाजारपेठेत रेसिड्यू फ्री व ट्रेसेबिलिटी असलेल्या फळे-भाजीपाला यांचा पुरवठा करण्याचे काम 'सह्याद्री' करत आहे. यासाठी मोठा खर्च, वेळ व मनुष्यबळ गुंतविले आहे. आज ही बाब खर्चिक असली तरी काळाची गरज आहे. देशातील ग्राहक सजग होत आहे. त्याची जीवनशैली, आहाराबाबतची मागणी बदलत आहे. या सर्व बाबींचा विचार करून आम्ही हे तंत्रज्ञान पारदर्शी कारभारासाठी देऊ केले आहे. -विलास शिंदे, चेअरमन, सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी.
शेतकरी व पीकनिहाय माहितीच्या आधारे पॅकिंगवरील बारकोड
शेतकरी व पीकनिहाय माहितीच्या आधारे पॅकिंगवरील बारकोड

नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने शेतकरी ते ग्राहक अशी शेतमाल पारदर्शकता यंत्रणा अर्थात ‘ट्रेसेबिलिटी’ कार्यान्वित केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आपण खरेदी करीत असलेल्या मालाविषयी खात्री मिळणे शक्य झाले आहे. त्यासाठी संगणकीय प्रणाली व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या कार्यान्वित असलेली पद्धती भारतीय शेतकरीदेखील ग्राहकांसाठी उपलब्ध करू लागले आहेत ही मोठी उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल.

जागतिक बाजारपेठेत अन्नसुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याबाबत परदेशी ग्राहक जागृत आहेत. प्रमाणीकरण व पारदर्शकता हे त्यातील महत्त्वाचे घटक आहेत. याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘ट्रेसेबिलिटी’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते उत्पादनाबाबत माहिती मिळवितात. शेतमाल किंवा भाजीपाला खरेदी करण्यापूर्वी त्याची चौकशी व शहानिशा करून घेऊ शकतात. भारतात अद्याप शेतमालाची विक्री पारंपरिक पद्धतीने होते. परदेशातील ‘ट्रेसेबिलिटी’ भारतात अद्याप अभावानेच आढळते. भारतीय शेतमाल निर्यातीमध्येच सध्या या प्रणालीचा अधिक अवलंब होत असल्याचे जाणवते. अनेक व्यावसायिक आपल्या शेतीमाल उत्पादनाबाबत अनेक दावे करतात. कुणी आपले उत्पादन सेंद्रिय असल्याचे सांगतो. तर कुणी ते रसायन अवशेषमुक्त (रेसीड्यू फ्री) असल्याचा दावा करतो. भारतीय बाजारपेठेत मात्र ही संकल्पना रुजविण्यासाठी काही प्रयोगशील शेतकरी प्रयत्न करताहेत. त्यामध्ये  नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे नाव घ्यावे लागेल.

      ट्रेसेबिलिटी तंत्रज्ञानाचा वापर भारतीय बाजारात शेतकऱ्यांचा शेतमाल व्यापाऱ्यांमार्फत ग्राहकांपर्यंत येतो. मात्र, या मालाबाबत तपशीलवार माहिती किंवा त्याचे उत्पादन, गुणवत्ता याबाबत अधिक माहिती ग्राहकाला अवगत होत नाही. हीच बाब ‘सह्याद्री’ कंपनीने लक्षात घेतली. त्यांनी भाजीपाला उत्पादन ते विक्री या प्रक्रियेदरम्यान पारदर्शकता आणण्यासाठी ‘ट्रेसेबिलीटी तंत्रज्ञान’ विकसित केले आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे ‘नो यूवर फूड’ (knowyourfood) ही संकल्पना अंमलात आणली आहे.  

  ग्राहकांसाठी उपयुक्त व पारदर्शक सह्याद्रीच्या या पारदर्शक यंत्रणेच्या माध्यमातून भाजीपाला उत्पादक ते ग्राहक यापर्यंत माहितीचा सारा स्रोत सहजरित्या उपलब्ध होतो. पीक लागवड व्यवस्थापन, कीडनाशकांचा वापर, काढणी, हाताळणी, पॅकिंग ते विक्रीपर्यंत सर्व माहितीचा आढावा यामध्ये मांडला जातो. ज्यामध्ये छायाचित्रांसह माहिती समाविष्ट असते. या माहितीच्या आधारे बारकोड तयार केले जातात. ज्या ग्राहकाने माल खरेदी केला आहे तो जगाच्या कुठल्याही ठिकाणी बारकोड स्कॅन करून उत्पादनाबाबत सविस्तर माहिती प्राप्त करू शकतो. कोणत्या शेतकऱ्याने कोणत्या शेतात तो पिकविला आहे याच्या नोंदी यामध्ये दिसून येतात. उत्कृष्ट शेती पद्धतींचा वापर करण्याबरोबर आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करणे या तंत्रज्ञानाद्वारे शक्य झाले आहे. ही सर्व माहिती पारदर्शक असल्याने सहजरित्या प्राप्त होते. यामध्ये लागवडीची तसेच काढणीची तारीख, कालावधी आदी माहिती बारकोड स्कॅनद्वारे उपलब्ध होते.

     शेतकऱ्यांकडून माहितीचे संकलन ‘सह्याद्री’ने या अनुषंगाने आपल्याशी संलग्न हजारो शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे. त्या आधारे अन्न सुरक्षिततेविषयी जागृती करण्याचे काम भारतीय बाजारपेठेत केले जात आहे. त्यामुळे शेतकरी, ग्राहक, पुरवठादार, विक्रेते व कर्मचारी या सर्वांमध्ये उत्पादनाविषयी विश्वासार्हता निर्माण झाली आहे.

 ‘ सह्याद्री ऑन फूड सेफ्टी मिशन’ ‘सह्याद्री’ ही कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी शेतकरी उत्पादक कंपनी आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला गुणवत्तापूर्ण माल थेट ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी विविध धोरणे कंपनीने अंमलात आणली आहेत. ट्रेसेबिलिटी हे त्यातीलच तंत्रज्ञान आहे. मात्र युरोपिय मानकांप्रमाणे भारतीय ग्राहकांमध्येही अन्न सुरक्षितता रूजविण्यासाठी सह्याद्रीने पुढाकार घेतला आहे. 

  ‘ब्लॉकचेन सिस्‍टिम’द्वारे मार्ग सुकर जागतिक व्यवहार प्रणाली बदलत असून ‘ऑनलाइन’च्या माध्यमातून व्यवहार सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत या संबंधित माहितीबाबत सुरक्षितता असणे गरजेचे झाले आहे. त्यातूनच ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाची निर्मिती होत आहे. याचा फायदा सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला आगामी काळात होईल यात शंका नाही. पुरवठादार, आयातदार, ग्राहक, शेतकरी हे सर्व ‘ब्लॉकचेन’ पद्धतीतून एका व्यासपीठावर जोडले जातात. या यंत्रणेत मालाची सविस्तर माहिती, उत्पादनाविषयी विविध तपासण्या, शेतमाल काढणीच्या तारखा, गुगल मॅपद्वारे थेट शेतांची छायाचित्रे आणि प्रक्षेत्र नोंदी, निर्यातविषयक विविध शासनमान्य परवानग्या व प्रमाणपत्रे, फवारणीसाठी वापरलेल्या सर्व रसायनांचा तपशील या पद्धतीत असल्याने ही पुढील प्रक्रिया सह्याद्रीसाठी सुकर होणार आहे.

अशी राबविली जाते कार्यपद्धती

  • सह्याद्री कंपनीचा शेतमाल खरेदी विभाग प्राथमिक पातळीवर हे काम पाहतो.
  • या विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन ‘ऑनलाइन’ नोंदी करतात.
  • या प्रणालीद्वारे कंपनीशी नोंदणीकृत असलेल्या शेतकऱ्यांचीच नोंदणी केली जाते.
  • त्यानुसार शेतकऱ्यांचा परिचय (KYC) झाल्यानंतर त्यांची सविस्तर माहिती ‘स्मार्टफार्म’ (smartfarm) प्रणालीमध्ये नोंदविली जाते.
  • यानंतर शेतकऱ्याला विशिष्ट नोंदणी क्रमांक मिळतो. या क्रमांकाशी प्लॉटसंदर्भात जिओ टॅगिंगद्वारे गुगल मॅपमध्ये क्षेत्र निश्चिती केली जाते.
  • यानंतर पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या सर्व नोंदी टप्प्याटप्प्याने समाविष्ट करण्यात येतात.
  • लागवडीचा दिनांक, क्षेत्र, लागवडीचे ठिकाण, पीक प्रकार व वाण, काढणीचा दिनांक या नोंदी ठेवल्या जातात.
  • यासह पिकांची छायाचित्रे वाढीनुसार ‘अपलोड’ केली जातात.
  • शेतकऱ्याचा नोंदणी क्रमांक कायमस्वरूपी असतो. केवळ बदललेले क्षेत्र, पीक यांच्या सुधारित नोंदी त्यात समाविष्ट केल्या जातात.
  • ट्रेसेबिलिटी’ प्रणालीची वैशिष्ट्ये

  • सुरक्षित आणि अचूक प्रणाली
  • काटेकोर अंदाजपत्रक
  • जबाबदार आणि कार्यक्षम पद्धती
  • पीक संरक्षण व्यवस्थापन
  • उपग्रह आणि हवामानावर आधारित सल्ले
  • पीक अहवाल प्राप्ती
  • भौगोलिक क्षेत्रनिश्चितीसाठी जिओ टॅगिंग व त्यानुसार अचूक कामकाज
  • प्रमाणीकरण
  • प्रणालीचे व्यवस्थापन

  • ट्रेसेबिलिटी’ प्रणालीचे व्यवस्थापन कंपनीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारे होते.
  • खरेदी विभाग ऑनलाइन स्वरूपात पिकांच्या बदलांप्रमाणे माहिती अद्ययावत (अपडेट) करतो.यात वापरलेले बियाणे, कीडनाशके, त्यांचे प्रमाण यांचा आढावा असतो.
  • त्याद्वारे अचूक नोंदी कंपनीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला प्राप्त होत असतात. याआधारे संपूर्ण संगणकीकृत कामकाज पार पडते. नोंदणीकृत शेतकऱ्याचा माल काढणीनंतर थेट कंपनीमध्ये आवक विभागात प्राप्त होतो.
  • त्यानुसार त्याची एकूण नोंद होते.
  • या मालाची संपूर्ण माहिती संगणकीय प्रणालीत समाविष्ट असते. यानुसार शेतकरी, उत्पादन, प्लॉट आदी माहितीच्या आधारे बारकोड तयार केले जातात. ते संबंधित भाजीपाला, फळे यांच्या पॅकिंग बॉक्सवर चिटकवले जातात.
  • - गणेश चौरे,७०३०९१५०३८(सहाय्यक व्यवस्थापक, सह्याद्री फार्म)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com