सांडपाण्यावर जगवणार दोन हजार झाडे

डोंगरगण (ता. नगर) : गावठाण हद्दीत सुरू केलेल्या दोन हजार वृक्षांच्या लागवडीचा प्रारंभ करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, सरपंच कैलास पटारे व ग्रामस्थ.
डोंगरगण (ता. नगर) : गावठाण हद्दीत सुरू केलेल्या दोन हजार वृक्षांच्या लागवडीचा प्रारंभ करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, सरपंच कैलास पटारे व ग्रामस्थ.

नगर : डोंगरगण (जि. नगर) येथील ग्रामस्थ दोन हजार रोपांची लागवड करून ही झाडे घराघरांतील सांडपाण्यावर जगविणार आहेत. तसा ठराव नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. गावातील तरुणांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला असून, आठशे रोपांची लागवड पूर्ण झाली आहे. सरपंच कैलास पटारे यांनी ग्रामसभेत ठराव घेऊन, ग्रामपंचायतीतर्फे दोन हजार झाडांची रोपे पुरविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर गावातील तरुणांची एक समिती स्थापन करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ स्वतःच्या घरासमोरील शोषखड्ड्याजवळ दोन रोपांची लागवड करीत आहेत. यामध्ये सीताफळ, पेरू, चिंच, लिंब, आवळा, रेन-ट्री, कांचन, लक्ष्मीतरू, बहावा, तसेच काही शोभिवंत झाडेही आहेत. पेमराज सारडा महाविद्यालय व न्यू लॉ कॉलेजचे हिवाळी शिबिर गावामध्ये सुरू असल्याने विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी झाले आहेत. ग्रामस्थांनी लोकसहभागातून गावशिवारातील रामेश्‍वर मंदिर, शरभंगऋषी आश्रम परिसर, सीता न्हाणी, हनुमान मंदिर परिसरातही वृक्षलागवड केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डोंगरगणकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. गाव परिसरात भाविक व पर्यटकांची संख्या वाढली आहे. रामेश्‍वर देवस्थान परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. डोंगरगण येथे श्रीरामेश्‍वराचे देवस्थान असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तसेच हे ठिकाण पर्यटनासाठीही चांगले असल्याने नगर शहरातील नागरिक सुटीच्या दिवशी येथे गर्दी करतात. श्रीरामेश्‍वर मंदिर, शरभंगऋषी, सीता न्हाणी, आनंद दरी, हवा महाल, दावलमालिक गड, गोरक्षनाथ गड तसेच नगर व राहुरी तालुक्‍याला जोडणारा डोंगरगण घाट आहे. येथे पर्यटक पावसाळ्यात गर्दी करतात. या परिसरात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केल्याने पुन्हा एकदा हा परिसर निसर्गरम्य झाला आहे.   ग्रामस्थांनी झाडे घेतली दत्तक  यापूर्वीच्या ग्रामपंचायतीतर्फे गावामध्ये लावलेल्या पाचशे झाडांना ग्रामस्थांनी दत्तक घेतले असून, प्रत्येकाने ती जगविली आहेत. हनुमान मंदिर परिसरात यापूर्वी लावलेल्या पाचशे झाडांची चांगली वाढ होत आहे. गावठाण हद्दीतही दोन वर्षांपूर्वी वृक्षलागवडीची मोहीम राबविली होती. त्यांतील आठशे झाडे ग्रामस्थांनी जगविली आहेत. कुटुंबातील एखाद्या व्यक्‍तीचे निधन झाल्यानंतर तिच्या स्मरणार्थ गावठाण हद्दीत एक रोप लावून त्याचे संगोपन करणे हा उपक्रम पाच वर्षांपासून डोंगरगणमध्ये सुरू आहे. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या योग्य नियोजनामुळे डोंगरगण गावठाण हद्दीत जवळपास अडीच हजार रोपांची चांगली वाढ झालेली आहे.   "पाच वर्षांपासून डोंगरगणमध्ये वृक्षलागवड सुरू आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामस्थांना संघटित करून हा उपक्रम यशस्वी झाला. डोंगरगण परिसरात आजपर्यंत सुमारे दोन हजार रोपांची चांगली वाढ झालेली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे वृक्षलागवडीचा उपक्रम यशस्वी होत आहे. '' - राधाकिसन भुतकर, रामेश्‍वर देवस्थान ट्रस्ट, डोंगरगण 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com