हळद लागवडीची पूर्वतयारी

हळद लागवडीची पूर्वतयारी
हळद लागवडीची पूर्वतयारी

हळद लागवडीसाठी योग्य जमिनीची, बेण्याची निवड ही अत्यंत महत्त्वाची आहे. पूर्वमशागत खोलवर करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. बेण्यांची सुप्तावस्था मोडल्यानंतर रुंद वरंबा पद्धतीने हळदीची लागवड करावी. योग्य जमिनीची निवड गरजेची :

  • हळद पिकाचा उत्पादनाचा मुख्य स्त्रोत हा हळकुंडे, बगलगड्डे, जेठेगड्डे असून, त्यांची वाढ जमिनीत होते. साधारणतः हळद लागवडीनंतर १५० दिवसांपासून हळकुंडे फुटण्यास सुरवात होते. १५० दिवसांपासून ते २७० -२८० दिवसांपर्यंत [हळद काढणीपर्यंत] हळकुंडे जमिनीतच वाढतात. त्यामुळे योग्य जमिनीची निवड करावी.
  • हळद पिकास मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्‍यक. नदीकाठच्या पोयट्याच्या जमिनीत हळदीचे उत्पादन भरपूर मिळते.
  • जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. या सामूमध्ये हळद पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक असणारी सर्वच अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होतात.
  • जमिनीची खोली सर्वसाधारणपणे २० ते २५ सें.मी. असावी.
  • भारी काळ्या, चिकण व क्षारयुक्त जमिनी या पिकांस मानवत नाहीत. अशा जमिनीमध्ये हळद पिकाची शाकीय वाढ [पाल्याची] जास्त होते, परंतु कंद योग्य प्रमाणात पोसत नाहीत, परिणामी उत्पादन कमी मिळते.
  • हलक्या जमिनीमध्ये सरासरी हळद उत्पादन घेता येणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी हिरवळीचे खते वापरावीत. उदा. ताग, धैंचा. चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरून जमिनीची सुपिकता वाढवून घ्यावी. माती परीक्षण करून कमतरता असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. चांगल्या मशागतीसह अशा पूर्वनियोजनातून हलक्या जमिनीतही हळद उत्पादन घेता येते.
  • माती परीक्षण :

  • ज्या जमिनीत अन्नांशांचे प्रमाण जास्त असते. साहजिकच तिची सुपीकता जास्त असल्याने केवळ शाकीय वाढ जोमाने होत असली, तरी कंद कमी पोसतात. कंदाचा आकार लहान राहतो.
  • हळद लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे. माती परीक्षणामुळे जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये, चुनखडीचे प्रमाण इत्यादी जमिनीचे गुणधर्म जाणून खतांचे नियोजन करावे.
  • चुनखडीयुक्त जमिनीत हळद पिकावर सतत पिवळसरपणा दिसून येतो. पिकाची वाढदेखील चांगली होत नाही, त्यामुळे शक्यतो चुनखडीयुक्त जमिनीत हळद पीक घेणे टाळावे.
  • पूर्वमशागत :

  • हळद लागवडीपूर्वी पूर्वमशागतीतील प्रामुख्याने नांगरट करणे, ढेकळे फोडणे, शेताच्या कडा कुदळीने किंवा टिकावाने खणून काढणे ही सर्व कामे करून घ्यावीत. हळद जमिनीत वाढत असल्याने जमीन जितकी भुसभुशीत तितके हळदीचे उत्पादन चांगले मिळते. पहिले पीक काढल्यानंतर जमिनीची ट्रॅक्टरच्या साह्याने १८ ते २२ सें.मी.पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी. खोल नांगरट करण्यामुळे जमिनीची चांगली चाळण होते, तणांचे अवशेष, गाठी व हानीकारक किडींच्या विविध अवस्था बाहेर पडतात.
  • जमिनीमधून बाहेर आलेले कुंदा, हराळी, लव्हाळ्याच्या गाठी यांसारखे बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत.
  • सूर्यप्रकाशाच्या तीव्र किरणांमुळे जमिनीतील हानीकारक किडींच्या अवस्था नष्ट होतात.
  • पहिल्या नांगरटीनंतर कमीत कमी १ ते २ महिन्यांनी दुसरी नांगरट आडवी करावी. दुसऱ्या नांगरटीपूर्वी शेतात मोठी ढेकळे दिसत असल्यास तव्याचा कुळव मारून घ्यावा आणि मगच नांगरट करावी. हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले आणि वाळलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.
  • जर शेणखत ओले असल्यास, त्यातून हुमणीच्या विविध अवस्था शेतात येऊ शकतात. त्याव्यतिरिक्त कंदकुज रोगाला कारणीभूत असणारी बुरशीही येते. त्यामुळे चांगले कुजलेले, वाळलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत वापरावे. त्यासाठी खड्ड्यातून किंवा उकिरड्यातून शेणखत बाहेर काढून सपाट जमिनीवर पसरावे, उन्हात चांगले वाळवावे. नंतर रोटाव्हेटर हलकेसे फिरवून बारीक करावे. आवश्यकता वाटल्यास हुमनी नियंत्रणासाठी कीडनाशकांची भुकटी मिसळावी. डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४ (प्रभारी आधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com