पीक संरक्षणासाठी ट्रायकोडर्माचा वापर

जैविक पद्धतीने केलेले पीक संरक्षण निसर्गासाठीही पूरक ठरते. विषारी रासायनिक घटकांच्या वापरामुळे होणारे प्रदूषण कमी पातळीवर राखता येते. निसर्गातील शेतीच्या दृष्टीने मित्र कीटक व बुरशींचे प्रमाण वाढते.
पीक संरक्षणासाठी ट्रायकोडर्माचा वापर
पीक संरक्षणासाठी ट्रायकोडर्माचा वापर

निसर्गामध्ये असंख्य परोपजीवी बुरशी असतात. त्यांची वाढ दुसऱ्या प्रकारच्या बुरशीवर होत असल्याने पिकांसाठी हानिकारक ठरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी त्या उपयुक्त ठरतात. अशाच बुरशींची निवड करून जमिनीत त्यांचे प्रमाण वाढविल्यास शेतीसाठी फायदा होतो. तसेच पानावर येणाऱ्या विविध रोग व किडीच्या नियंत्रणासाठीही काही बुरशी उपयुक्त ठरतात. जैविक पद्धतीने केलेले पीक संरक्षण निसर्गासाठीही पूरक ठरते. विषारी रासायनिक घटकांच्या वापरामुळे होणारे प्रदूषण कमी पातळीवर राखता येते. निसर्गातील शेतीच्या दृष्टीने मित्र कीटक व बुरशींचे प्रमाण वाढते. ट्रायकोडर्मा : जमिनीतून फ्युजारिअम, रायझोक्टोनिया, स्केलरोशिअम व पिथिअम अशा रोगकारक बुरशीमुळे पिकांवर उद्भवणाऱ्या मर, मूळकूज यांसारख्या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोडर्मा बुरशी मदत करते. ट्रायकोडर्माच्या दोन प्रजाती ः ट्रायकोडर्मा हरजियानम, ट्रायकोडर्मा व्हिरिडी. हे संवर्धक २५० ग्रॅम आणि एक किलो पाकिटाच्या स्वरूपात बाजारात उपलब्ध. कार्यपद्धती :

  • ट्रायकोडर्मा ही बुरशी हानिकारक बुरशीच्या धाग्यांमध्ये वाढून विळखा घालते. त्यातील पोषक द्रव्ये शोषून फस्त करते. परिणामी, अपायकारक बुरशीचा बंदोबस्त होतो.
  • ट्रायकोडर्मा बुरशी वेगाने वाढत असल्याने अन्य बुरशींसोबत अन्नद्रव्य शोषणासाठी स्पर्धा करते. हानिकारक बुरशींच्या वाढीसाठी आवश्यक कर्ब, नत्र, जीवनसत्त्वे उपलब्ध होत नाहीत. परिणामी, हानिकारक बुरशीची वाढ खुंटते.
  • ट्रायकोडर्मा बुरशी तयार करत असलेली ग्लायोटॉक्झीन व व्हिरिडीन नावाची प्रतिजैविके हानिकारक बुरशींच्या वाढीला मारक ठरतात.
  •  ट्रायकोडर्मा बुरशीचे कवकतंतू रोपाच्या मुळावर पातळ थरात वाढून रोगकारक बुरशीच्या कवकतंतूंना मुळामध्ये प्रवेश करण्यास रोखतात.
  • वापरण्याची पद्धती : १. बीज प्रक्रिया ः पेरणीआधी प्रति किलो बियाणांस ५ ते १० ग्रॅम या प्रमाणात ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखा थर बसल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून पेरणी करावी. २. माती प्रक्रिया ः जमिनीमार्फत होणाऱ्या बुरशींच्या नियंत्रणासाठी हेक्टरी १ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा भुकटी २५ ते ३० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून मातीत मिसळावी. शक्य असल्यास हलके पाणी द्यावे. फळ बागेमध्ये झाडांच्या वयानुसार प्रति झाड २०० ते ५०० ग्रॅम ट्रायकोडर्मा बुरशी एक किलो शेणखतात मिसळून झाडाची सावली पडलेल्या गोलाकार ठिकाणी रिंग करून द्यावी. ३. द्रावणात रोपे बुडविणे ः रोपवाटिकेत तयार केलेल्या रोपांची मुळे ट्रायकोडर्मा १०० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणात ३ मिनिटे बुडवून नंतर त्यांची लागवड करावी. ट्रायकोडर्माचे फायदे : नैसर्गिक घटक असल्यामुळे या बुरशीचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही. प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याची शक्यता कमी. बीज प्रक्रियेमुळे बियाणांची उगवण शक्ती वाढून अंकुरण जोमात होते. पिकाच्या वाढीच्या अवस्थेपर्यंत हानिकारक बुरशीचा संहार करून संरक्षण पुरवते. खर्च कमी. ट्रायकोडर्माची कार्यक्षमता वाढविण्यासाठी,

  • जमिनीत सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात टाकावेत.
  • ट्रायकोडर्मा बुरशीचे पाकीट किंवा द्रावण थंड जागेत
  • सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे.
  • रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेल्या बियाण्यांस ट्रायकोडर्माची मात्रा दुप्पट करावी.
  • ट्रायकोडर्मा सोबत रायझोबिअम किंवा ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरीलम आणि स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणू खतांचीही बीजप्रक्रिया प्रक्रिया करता येते.
  • बुरशीजन्य कीटकनाशके : एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या संकल्पनेमध्ये जैविक नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे. माणसाप्रमाणेच कीटकांनाही वेगवेगळे रोग होत असतात. हे रोग मुख्यत: बुरशी, सूक्ष्म जिवाणू व विषाणूंमुळे होतात. अशा किडीसाठी रोग पसरविण्याचे, परंतु अन्य सजीवांसाठी, माणसांसाठी अजिबात धोकादायक नसलेल्या सूक्ष्म घटकांचा वापर पीक संरक्षणासाठी करता येतो. अशाच किडीमध्ये रोग पसरवणाऱ्या व पर्यायाने शेतीसाठी उपयुक्त बुरशीची माहिती पुढील प्रमाणे - १) मेटाऱ्हायझीम : ही हिरवट रंगाची असल्यामुळे ‘ग्रीन मस्कारडाइन’ बुरशी म्हणूनही ओळखली जाते. मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, बोंड अळी, हुमणी, भातावरील हिरवे तपकिरी तुडतुडे इ. किडींवर हिरवट बुरशीची वाढ होऊन त्यांना नष्ट करते. याच्या विविध प्रजाती असून, मेटाऱ्हायझीम अॅनिसोप्ली ही प्रजाती कीडनियंत्रणासाठी प्रभावी आढळली आहे. २) बिव्हेरिया : या बुरशीमुळे ‘व्हाइट मस्कारडाइन’ रोग होतो. प्रयोगशाळा आणि प्रत्यक्ष शेतातही या बुरशीची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. बिव्हेरिया बॅसियाना ही बुरशी बोंड अळ्या, तंबाखूची पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, ज्वारीवरील खोड किडा, मावा, भातावरील काटेरी भुंगे यांचे प्रभावी नियंत्रण करते. ३) नोम्युरिया : या बुरशीमुळे किडीना ‘ग्रीन मस्कारडाइन’ रोग होतो. ही बुरशीमुळे पसरणाऱ्या साथीच्या रोगामुळे मुख्यत: पतंगवर्गीय किडी बळी पडतात. कापसाची बोंड अळी, उंट अळी, तंबाखूची पाने खाणारी अळी, केसाळ अळी इ.चा समूळ नायनाट करते. ही बुरशीचा पिकावर फवारणीद्वारे वापरता येते. ४. व्हर्टिसिलिअम : व्हर्टिसिलिअम लेकॅनी ही बुरशी रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी फायदेशीर आहे. रसशोषक किडी उदा. मावा, तुडतुडे, पांढरी माशी इ. तसेच काही पाने खाणाऱ्या अळ्यांचेही नियंत्रण करते. वरील सर्व बुरशीजन्य कीटकनाशके ४ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे संध्याकाळी किंवा सकाळी हवेत आर्द्रता असताना फवारणीद्वारे वापरावीत. प्रवीण देशपांडे, ९४२१८३०४३९ (विषय विशेषज्ञ -पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com