कडवंची : बागेला मिळाली यंत्रांची जोड

कडवंची : बागेला मिळाली यंत्रांची जोड
कडवंची : बागेला मिळाली यंत्रांची जोड

प्रयोगशील द्राक्ष बागायतदार सुरेश दगडू पाटील क्षीरसागर यांनी द्राक्षशेतीला ईएसएस यंत्राने फवारणी उद्योगाची जोड दिली. या यंत्रणेमुळे गावशिवारातील द्राक्ष बागायतदारांचा पैसा, वेळ आणि श्रम वाचले. दर्जेदार द्राक्ष उत्पादन मिळू लागले. यांत्रिकीकरणातून गावातील शेतीला गती मिळाली आहे.

कडवंचीतील शेती ठिबकवर आली. शेतकऱ्यांनी प्रयोगशीलता जपत पीकबदल केला. याचबरोबरीने यांत्रिकीकरणावरही जोर दिला. कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेतून फवारणी यंत्र, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, ट्रॅक्‍टरचलित मशागत यंत्रणा, ट्रॅक्‍टरचलित ब्लोअर, कपाशी उपटण्याचे श्रेडर, कडबा कुट्‌टी यंत्र अशा प्रकारच्या यंत्रणा शेतकऱ्यांनी घेतल्या. ब्लोअर यंत्र बनविण्याचा उद्योगदेखील गावात सुरू झाला. परंतु, या सर्वात महत्त्वपूर्ण ठरले ते इलेक्‍ट्रोस्टॅटीक स्प्रेइंग मशिन (ईएसएस). अमेरिकेत विकसित झालेल्या या यंत्राने कडवंचीसह जालना जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचविला. सुमारे २५ लाख रुपये किमतीचे हे यंत्र कडवंचीमधील दोन बागायतदारांकडे आहे. सुरेश क्षीरसागर यांच्या द्राक्षशेतीला ईएसएस यंत्राने फवारणी उद्योगाची जोड मिळाली आहे.

कडवंचीत पहिल्यांदा ईएसएस यंत्र आणणारे प्रयोगशील द्राक्ष बागायतदार सुरेश दगडू पाटील क्षीरसागर म्हणाले की, हे यंत्र येण्यापूर्वी एक एकर द्राक्षबागेत डिपिंग करण्यासाठी सुमारे २५ मजूर लागायचे. वेळही खूप जायचा. काम उत्तम दर्जाचे होत नव्हते. मात्र, ईएसएस यंत्रामुळे एक एकरातील फवारणीचे काम अर्ध्या तासात होते. मजुरांनी हाताने केलेल्या डिपिंगपेक्षा इलेक्‍ट्रो स्टॅटीक फवारणीचे प्रत्येक मण्यावर योग्य परिणाम मिळतात. यामुळे चांगले मणी, द्राक्षघड तयार होतात. दर्जेदार उत्पादन मिळण्याचा मार्ग यंत्रामुळे मिळाला. मी नाशिकमधील द्राक्ष बागायतदारांकडून यंत्राची माहिती घेतली. २०१७-१८ मध्ये मी यंत्र घेतले. तीन महिन्यांच्या कालावधीत द्राक्ष बागायतदाराला साधारणत: चार वेळा डिपिंग करावे लागते. या यंत्रामुळे एका दिवसात साधारणत: बारा एकरावर फवारणी होते. माझ्याकडील २५ एकर द्राक्षबागेत तसेच परिसरातील जवळपास आठशे हेक्‍टरवरील बागांमध्ये या यंत्राने फवारणी केली आहे. या यंत्राच्या वापराने द्राक्ष बागायतदारांचे श्रम आणि पैसे वाचतात. केवळ दोन हजार रुपयांत फवारणी होते. माझ्या घरातील सर्वजण हे यंत्र चालवितात. यंत्राच्या वाहतुकीसाठी मालवाहू गाडीदेखील घेतली आहे. याचबरोबरीने माझ्याकडे गोबर गॅस स्लरी द्राक्षबागेत पसरण्यासाठी ट्रॅक्‍टरचलित यंत्रणा, ट्रॅक्‍टरचलित मशागत तसेच पेरणी यंत्रणा आहे.

दगडू पाटील क्षीरसागरांची' कडवंची कडवंची गावाला पूर्वी दगडू पाटील क्षीरसागरांची कडवंची म्हणून ओळखले जायचे. गावाकडे नाही, तर गावाकडून शेताकडे चलण्याचा संदेश पहिल्यांदा स्व. दगडू पाटील क्षीरसागरांनी ९० च्या दशकात दिला होता, असे गावकरी सांगतात. केवळ संदेश देऊन ते थांबले नाहीत, तर स्वतः गावात न राहता शेतावर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावातील शेतकरीदेखील शेतावर जाऊन राहू लागले. आजघडीला गावातील ९० टक्‍के कुटुंबे शेतात राहायला गेले आहेत. गावात आता कोणी भेटत नाही अशी परिस्थिती आहे. शेतात राहायला गेल्याशिवाय शेती विकास नाही, हे शेतकऱ्यांना कळून चुकले आहे.

- सुरेश पाटील क्षीरसागर ९६३७६१५७२६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com