बहुगुणी मधाची शुद्धता अन् उपयोग

प्राचीन वेदात ‘मध हे संपूर्ण अन्न आहे’ (अन्नम वै मधु: सर्वांम वै मधु:) असे सांगितले आहे. भारतात हजारो वर्षांपासून चरक - सुश्रुत या ऋषीनी आयुर्वेदामध्ये विविध औषधामध्ये मध सुचवला आहे.
बहुगुणी मधाची शुद्धता अन् उपयोग
बहुगुणी मधाची शुद्धता अन् उपयोग

 मधमाश्यांपासून मधासोबतच अन्य मौल्यवान पदार्थ उदा. मेण, पराग, प्रोपोलिस, रॉयल जेली आणि विष मिळतात. ती अनेक औषधामध्ये, पौष्टिक आहार व सौदर्य प्रसाधने यात वापरली जातात. मधमाश्यांनी केलेल्या परागीभवनामुळे कृषी उत्पादनामध्‍ये ८० टक्क्यांपर्यंत वाढ साध्य होऊ शकते. विकसित देशामध्ये आहारामध्येही मधाचा वापर होतो. युरोपीय देशात मध खाण्याचे प्रमाण दर वर्षी दर माणशी १ ते २ किलो आहे. भारतामध्ये ते केवळ दरमाणशी वार्षिक ४ ते ५ ग्रॅम इतके कमी आहे. जागतिक मध उत्पादनामध्ये चीनचा पहिला क्रमांक असून, भारत पाचव्या क्रमांकावर आहे. फुलातून गोळा केलेल्या मकरंद व परागामध्ये मधमाश्यांची तोंडातून पाचक द्रव मिसळला जातो. त्यातून मध तयार होतो. तो पोळ्यात मेणाच्या कोशात साठवून मेणाच्या पातळ थराने बंद केला जातो. यामुळे मध शुद्ध राहतो. तो शरीरामध्ये वेगाने शोषला जात असल्याने आयुर्वेदिक औषधे मधातून योगवाही म्हणून घेतात. मधातील अनेक जीवनसत्त्वे, क्षार, अम्ले, प्रथिने, प्रेरक इ. घटकांसोबतच त्वरित कार्यशक्ती मिळते. एक चमचा मधातून १०० कॅलरीज मिळतात. मधात प्रामुख्याने ग्लुकोज (३८%) व फ्रुक्टोज (४०%) मुबलक असतात. पण सुक्रोज साखरेचे प्रमाण नगण्य असते. तसेच ‘फॅट फ्री’ असतो. प्राचीन काळापासून आबालवृद्ध मधाचे सेवन पौष्टिक अन्न व औषध म्हणून करतात. सर्व साधारण सर्दी, खोकला, अन्नपचन, शरीरावरील दुखापत, भाजणे, कापणे इ. वर रामबाण औषध म्हणून उपयोग करतात. मध हा उत्तम अँटी ऑक्सिडेन्ट, जिवाणूविरोधी, विषाणूविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्माने परिपूर्ण आहे. मध आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यास चांगली मदत करतो. प्रमुख एकपुष्पीय मध

  • सूर्यफूल मध : सोनेरी पिवळसर रंगाचा, गुळचट गोड चव, शरीरातील चरबी व वजन कमी करण्यास, केसांच्या आरोग्यासाठी उत्तम.
  • बरसीम फूल मध : फिक्कट केशरी रंगाचा, मधूर चव, रक्तातील हिमोग्लोबिन व प्रतिकार शक्ती वाढविण्यास उत्तम.
  • ओवा फूल मध : गडद चॉकलेटी रंगाचा, ओव्याचा सुगंधी वास, मधूर चव, सर्दी, खोकला, ॲसिडिटी व अन्नपचनास उत्तम उपाय इ.
  • बाभूळ फूल मध : फिक्कट पिवळसर रंगाचा, सुमधुर चव, शरीरातील हाडांना बळकटी देतो, तसेच पोटविकार, यकृत, मूत्र विकार व मधुमेह इ.साठी उत्तम.
  • जांभूळ फूल मध : दाट तांबड्या रंगाचा, जांभळासारखीच तुरट गोड चव, मधुमेह, रक्त शुद्धीकरण व जखमेवर इ. साठी उत्तम.
  • कारवी फूल मध : दाट तांबड्या रंगाचा, सुमधुर चव, संधिवात, मधुमेह, रोगप्रतिकार शक्ती, शरीराची सर्वांगीण वाढ इ.साठी उत्तम.
  • लिची फूल मध : फिक्कट रंगाचा, सुमधुर वास व सुगंध असलेला, अल्सर इ. पोटाच्या विकारांवर उत्तम.
  • निलगिरी फूल मध : फिक्कट रंगाचा, सुगंध व मधुर वासाचा, सर्दी, खोकला, घशाचे विकार व दमा इ.साठी उत्तम.
  • तुळस फूल मध : फिक्कट हिरवट रंगाचा, सुगंधी, सुमधुर चव, उत्तम अँटी ऑक्सिडेन्ट, अँटी बायोटिक व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उत्तम.
  • मल्टी फ्लोरा / बहूपुष्पीय मध : पिवळसर रंगाचा मधूर चव, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उत्तम.
  • शुद्धता तपासण्यासाठी... वातावरणातील बदल व साठवणीच्या स्थितीनुसार मधाच्या नैसर्गिक घटकात थोडेफार बदल होतात. उदा. मधाचे स्फटिकीकरण होऊन तो भाग तळाशी किंवा बाजूला एकत्रित होतो. द्रव मध वेगळा होतो. यालाच ग्रॅन्युलेशन म्हणतात. यामुळे मधात साखर जमा झाल्यासारखी दिसते. त्यातून मधात भेसळ किंवा अशुद्धता असल्याचा गैरसमज होतो. हीच खरी मधाच्या शुद्धतेची खात्रीशीर परीक्षा आहे. मधाच्या किण्वन प्रक्रियेमुळे त्यात ईस्टची वाढ होते. रासायनिक प्रक्रिया होऊन ॲसेटिक ॲसिड, अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड वायूचे फेसाळ बुडबुडे पृष्ठभागावर दिसतात. पाण्याचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक व तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास किणवन होते. मध आंबल्यामुळे आंबट चव होते व खराब होतो. स्फटिकीकरण व किण्वन प्रक्रिया होऊ नये, यासाठी मधावर ठरावीक तापमान व वेळेप्रमाणे उपचार करून ईस्ट नष्ट करतात. यामुळे मधाचा दर्जा टिकून राहण्यास मदत होते. मधाची गुणवत्ता परीक्षण व प्रमाणीकरण

  • भारत सरकारच्या कृषी व सहकार विभागा अंतर्गत मधाची प्रतवारी व निकष ठरवले आहेत.
  • मधात प्रामुख्याने पाण्याचे प्रमाण २०% पेक्षा कमी असल्यास ‘स्पेशल’ ग्रेड, २१ - २२% ‘ए’ ग्रेड आणि २३ - २५% ‘स्टॅंडर्ड’ ग्रेड असते. त्याप्रमाणे मधाची गुणवत्ता प्रमाण व लेबल ठरते.
  • मधाच्या प्रत्येक घटकाचे रासायनिक पृथक्करणाच्या प्रमाणित पद्धती आहेत.
  • अन्न व भेसळ कायद्यानुसार (P.F.A. १९८०) मधाची गुणवत्ता नसल्यास ते शिक्षेस पात्र ठरवले जाते.
  • मधातील भेसळीचे प्रमाण वाढल्यामुळे जुलै २०२० च्या नोटिफिकेशनद्वारे मधाला भारत सरकार ने फूड सेफटी अँड स्टँडर्ड्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया (F.S.S.A.I.) रिव्हाइज्ड स्टँडर्ड्स फॉर हनी अमेंडमेंट रेगुलेशन, २०१९ व्यवहारात आणण्यास निर्देश दिले आहेत.
  • डॉ. धनंजय वाखले, ८९२८८२१३३४ (निवृत्त शास्त्रज्ञ, केंद्रीय मधमाशा संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com