कपाशी पिकाच्या अवशेषांपासून मूल्यवर्धित उत्पादने

मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेने कपाशीच्या काढणीपश्‍चात अवशेषांपासून नवीन मूल्यवर्धित उत्पादने निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. आजवर टाकाऊ ठरलेल्या सरकी व पऱ्हाट्यांचे मूल्यवर्धन करण्याच्या प्रक्रियेतून उद्योजकता विकासाला चालना मिळू शकते.
कपाशी पिकाच्या अवशेषांपासून मूल्यवर्धित उत्पादने
कपाशी पिकाच्या अवशेषांपासून मूल्यवर्धित उत्पादने

भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत मुंबई येथे केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था कार्यरत आहे. गेल्या नऊ दशकांपासून कपाशी पिकाच्या वेचणीपश्‍चात कामे उदा. स्वच्छ कापूस वेचणी, जिनिंग, कापूस तंतू व धाग्याची जागतिक गुणवत्ता परीक्षण सेवा व अन्य जैविक घटकांच्या मूल्यवर्धनासाठी प्रयत्नशील आहे. या प्रक्रियेमध्ये शिल्लक राहणाऱ्या सरकी व पऱ्हाट्यांचे मूल्यवर्धन करून विविध उत्पादने विकसित केली आहेत. कपाशीच्या टाकाऊ घटकांचे मूल्यवर्धन करताना कपाशी उत्पादक आणि पूरक उद्योगक्षेत्रामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न संस्था करत आहे. या माध्यमातून अक्षय ऊर्जा, मृदा आरोग्य आणि ग्रामीण उद्योजकता निर्मिती या महत्त्वाच्या मुद्द्यावर प्राधान्याने लक्ष दिले जाते. यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.  कपाशी हे देशातील महत्त्वपूर्ण नगदी पीक असून, त्यातून उपलब्ध कपाशीचा प्रामुख्याने कापडनिर्मिती उद्योगात केला जातो. वेचणी व प्रक्रिया पश्चात शिल्लक राहणारे सरकी आणि पऱ्हाट्या हे अवशेष टाकाऊ असल्याचा समज आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार देशभरात दरवर्षी सुमारे ३० दशलक्ष टन कापूस पऱ्हाट्या मिळतात. त्याचा वापर प्रामुख्याने घरगुती इंधनासाठी होतो. या व्यतिरिक्त अतिरिक्त पऱ्हाट्या पुढील पिकासाठी शेत तयार करण्यापूर्वी शेतात जाळल्या जातात. यातून वायू प्रदूषणाचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पऱ्हाट्याच्या मूल्यवर्धनावर संशोधन करून व्यावसायिकदृष्ट्या पर्यावरणपूरक उत्पादने बनवली आहेत. तंत्रज्ञान विस्तारातून होतेय रोजगारनिर्मिती कापूस वेचणी संपल्यानंतर झाडे उपटून घेतल्यानंतर श्रेडर यंत्राच्या साह्याने त्या अवशेषांचे बारीक तुकडे केले जातात. ग्राइंडर व क्रशरचा वापर करून भुस्सा केला जातो. पुढे त्याचा लगदा करून पॅलेटिंग यंत्राच्या साह्याने कांड्या किंवा विटा बनविल्या जातात. याचे संपूर्ण तंत्रज्ञान विकसित केल्यानंतर तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यात आला. ग्रामीण भागात युवक रोजगार व उद्योजकता क्षेत्रात संधी निर्माण झाल्या. विदर्भातील नागपूर व चंद्रपूर येथील ५० हून अधिक व्यावसायिकांनी उद्योग उभारले आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिटन पऱ्हाट्याला १५०० ते २००० रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. गुजरात, पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही संस्थेच्या वतीने तंत्रज्ञान विस्तार करण्यात येत असल्याचे संस्थेकडून  सांगण्यात आले. उत्पादने : विटा (ब्रिकेट्स) आणि कांडी (पॅलेट्स)  आजवर टाकाऊ म्हणून जाळणाऱ्या जाणाऱ्या पऱ्हाट्यांपासून विटा (ब्रिकेट्स) आणि कांडी (पॅलेट्स) बनविण्यात आल्या. या पॅलेट्स एलपीजी गॅसला पर्यायी इंधन म्हणून वापरणे शक्य होते. या विटांचा वापर साखर, कागद, रबर, रासायनिक आणि अन्नप्रक्रिया उद्योगांतील बॉयलरमध्ये केला जातो. ढाबे, रेस्टॉरंट्समधील भट्ट्या आणि शेगड्यांमध्ये इंधनासाठी कांड्यांचा वापर होतो. साध्या पऱ्हाट्या जाळण्याच्या तुलनेमध्ये ब्रिकेट्स किंवा पॅलेट्स यांची ज्वलन कार्यक्षमता अधिक आहे. परिणामी, एलपीजी गॅसच्या तुलनेत कांडीच्या वापरामुळे इंधन खर्चात ५० टक्क्यांहून अधिक बचत होत असल्याचे निरीक्षण आहे. याशिवाय संस्थेने पर्यावरणपूरक हरित शवदाहिनी विकसित केली असून, त्यात मृतदेह जाळण्यासाठी ब्रिकेट्स वापर केला जातो. परिणामी शवदहनाच्या खर्चात सुमारे ५५ टक्के बचत होते. कंपोस्ट खत पऱ्हाट्यांवर जैविक घटक आणि एनपीकेची मात्रा देत कुजवण्याची (कंपोस्टिंग) सुधारित व जलद प्रक्रिया विकसित केली आहे. पऱ्हाट्या नुसत्याच कंपोस्ट होण्यासाठी पारंपरिक पद्धतीमध्ये ५ ते ६ महिन्याचा कालावधी लागतो. या प्रक्रियेमुळे कंपोस्टिंग तीन महिन्यात शक्य होत असल्याने दोन महिन्यांची बचत होते. पऱ्हाट्यांच्या टाकाऊ अवशेषांपासून बनविलेले हे कंपोस्ट खत एक सेंद्रिय खतांचा एक उत्तम पर्याय ठरतो. पार्टिकल बोर्ड   कपाशी पऱ्हाट्यांपासून पार्टिकल बोर्ड आणि ॲक्टिवेटेड कार्बन तयार केले आहे. गृहअंतर्गत सजावट, भिंतीचे पॅनेलिंग, फॉल्स सिलींग, टेबल टॉप अशा फर्निचरसाठी पार्टिकल बोर्डचा वापर करता येतो. ॲक्टिवेटेड कार्बनचा वापर हवा आणि पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आणि विविध वैद्यकीय कारणांसाठी होतो.  धिंगरी अळिंबीसाठी तणस   कपाशी पऱ्हाट्यांचा बारीक भुस्सा (तणस) हा धिंगरी अळिंबी उत्पादनासाठी वापरले जाते. एका एकरातून उपलब्ध होणाऱ्या पऱ्हाट्यांवर अळिंबीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना प्रतिएकर ६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. कुक्कुट खाद्य  कापूस पिंजून वेगळा केल्यानंतर शिल्लक राहणारी सरकी ही प्रथिनांचा नैसर्गिक स्रोत आहे. याच्या पेंडीपासून पशुखाद्याची निर्मिती शक्य आहे. सरकी पेंड रवंथ करणाऱ्या गुरासाठी उपयुक्त असून, दुभत्या जनावरांसाठी वापरल्यास दुधाचे प्रमाण वाढते. त्याचा वापर शेतकरी काही प्रमाणात करतात. मात्र सरकी पेंडीमध्ये असलेल्या गॉसीपोल या विषारी द्रव्य हे रवंथ न करणाऱ्या पशुपक्ष्यासाठी घातक ठरू शकते. सरकी पेंडीतील गॉसीपोल काढून टाकण्यासाठी संस्थेने डिगॉसीपोलाइझेशन तंत्र विकसित केले आहे. अशा डिगॉसीपोलाइज्ड सरकीच्या पेंडीचा वापर कुक्कुटपालन व मत्स्यपालनात पौष्टिक खाद्य करता येतो. संस्थेच्या कौशल्य विकास आणि इनक्युबेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून नवउद्योजकांनी कुक्कुट खाद्यनिर्मितीचे लघुउद्योग सुरू केले आहेत. त्यातून चांगले उत्पन्नही मिळवत आहेत. तंत्रज्ञान विस्तारातून उद्योजकता विकासाला चालना  कपाशीच्या टाकाऊ घटकांचे मूल्यवर्धनाचे तंत्र आणि उत्पादने विकसित केल्यानंतर त्यातून ग्रामीण पातळीवर लघू उद्योग उभारणीसाठी राष्ट्रीय पातळीवर जनजागृती केली जात आहे. त्यासाठी शेतकरी, उद्योजक प्रशिक्षण, जनजागृती कार्यक्रम, तंत्रज्ञान प्रदर्शन मेळावे आणि कौशल्य विकास कार्यशाळा यांचे आयोजन केले जाते. कापूस वेचणीपश्‍चात तंत्रज्ञान आणि उत्पादन मूल्यवर्धनासाठी संस्थेने केलेल्या कामाची दखल यूनोने (UNO) घेतली आहे. ‘युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड ॲण्ड डेव्हलपमेंट’ या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत पश्‍चिम व दक्षिण आफ्रिकेत या प्रशिक्षण, कौशल्य विकास व व्यवसाय संधी निर्माण यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काढणीपश्‍चात तंत्रज्ञानावर आधारित नव-उद्योजकांच्या व्यवसायाभिमुख कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी संस्थेच्या कृषी व्यवसाय सृजनन केंद्राच्या (ॲग्री बिझनेस इनक्युबेशन सेंटर) माध्यमातून सल्ला, सेवा व अद्ययावत पायलट प्लांट सुविधा पुरविली जात आहे. डॉ. अशोक कुमार भारीमल्ला,   ९७०२८७८२४९ (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रभारी, तंत्रज्ञान हस्तांतर विभाग, केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था, मुंबई)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com