गरज सांडपाणी व्यवस्थापनाची...

गरज सांडपाणी व्यवस्थापनाची...
गरज सांडपाणी व्यवस्थापनाची...

जिथे लोकसंख्या एकत्रित झालेली असते, तिथे निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावणे हीसुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे नागरी भागातील निवासी भागांमध्ये जल व्यवस्थापनामध्ये जलसंधारणाबरोबरच सांडपाणी प्रक्रिया आणि दुय्यम कामांसाठी पुनर्वापर ही अत्यंत उपयोगी आणि परिणामकारक पायरी आहे. मागच्या काही भागांमध्ये आपण नागरी आणि ग्रामीण भागातील पर्जन्यजल संधारणाबद्दल माहिती घेतली. प्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचे बळकटीकरण करणे किती आवश्यक आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. त्याचप्रमाणे आपण पर्जन्यजल संधारण करताना पाण्याचे गणित कसे मांडायचे हेही पाहिले. लोकसंख्या जिथे केंद्रित झाली असते, त्या सर्व ठिकाणी पाण्याचे व्यवस्थापन ही एक अत्यावश्यक बाब होते, कारण त्या ठिकाणी पुरेसा पाणीपुरवठा करणे एवढेच करून प्रश्न समाधानकारकपणे संपत नाही. जिथे लोकसंख्या एकत्रित झाली असते, तिथे निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावणे हीसुद्धा खूप महत्त्वाची आणि कौशल्याची गोष्ट असते. त्यामुळे शहरी किंवा नागरी भागांतील निवासी भागांमध्ये जल व्यवस्थापनामध्ये जलसंधारणाबरोबरच सांडपाणी प्रक्रिया आणि दुय्यम कामांसाठी पुनर्वापर (म्हणजेच व्यवस्थापन) ही अत्यंत उपयोगी आणि परिणामकारक पायरी आहे. पावसाचे पाणी आपल्याला वर्षामधील साधारण १०० दिवस उपलब्ध असते, आणि तेव्हाच ते अडवून, साठवून, जिरवून वगैरे उपाय करून बाकी दिवसांसाठी उपलब्ध होईल या पद्धतीने राखून ठेवायला उपाय योजायला लागतात आणि हे प्रत्येक ठिकाणी पुरेशा प्रमाणात शक्य होते असेही नाही आणि त्यामुळे जिथे लोकसंख्या केंद्रित होते आणि पाणी साठवायला पुरेशी जागा किंवा अन्य सोय नसते तिथे योग्य नियोजनाभावी पाण्याची टंचाई हा एक नित्याचा अनुभव होऊन बसतो. हे १०० दिवस मिळणारे पाणी साठवण्यावर सर्व वेळ आणि पैसा खर्च करायचा की त्यातील थोडा खर्च वर्षभर उपलब्ध असलेल्या सांडपाण्याच्या प्रक्रियेवर खर्च करायचा आणि दुय्यम वापरासाठी लागणारे पाणी आपल्याजवळ मिळवायचं हे आता प्रत्येकाने ठरवायची वेळ आली आहे. निवासी भागांमध्ये आपण वापरत असलेल्या पाण्यातील सुमारे ६०-७० टक्के पाणी हे आपण दुय्यम वापरासाठी खर्च करत असतो. म्हणजेच, आपल्या मागणीच्या अंदाजे ७० टक्के चांगल्या दर्जाचे पाणी आपण दुय्यम वापरासाठी खर्चून टाकत असतो. हे करताना आपली रोजची पाण्याची मागणी आपण वाढवत असतो. त्यामुळे एकीकडे पाण्याची मर्यादित उपलब्धता आणि दुसरीकडे सांडपाण्याची विल्हेवाट तिथेच न लावल्याने उत्पन्न होणारे प्रश्न अशा कात्रीत लोक, प्रशासन आणि सरकार सापडलेले आहे. निवासी भागात असलेल्या लोकांनी जर त्यांच्या रोज तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करायचे ठरवले आणि ते प्रत्यक्षात आणले, तर आपल्याकडे लोकांना सहन करावा लागणारा पाण्याचा तुटवडा कमी व्हायला, कदाचित पूर्णपणे बंद व्हायला नक्की मदत होऊ शकते. निवासी भागातील सांडपाणी दोन प्रकारचे असते, एक स्वयंपाकघर, स्नानगृहातील आणि दुसरे शौचालयांमधील. यातील शौचालयांमधील सांडपाणी प्रक्रिया करायला जरा क्लिष्ट असते, त्यामुळे त्याला खर्च जास्त लागू शकतो आणि त्यामुळे अनेक लोक याकडे आणि यामुळे एकूणच सांडपाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करतात; प, आपण जर स्वयंपाकघर आणि स्नानगृहातील सांडपाणी एकत्र करून, त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करायचे ठरवले तर ते निश्चित फायद्याचे ठरते. हा स्वतंत्र विचार न केल्यामुळे, किंवा याबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे सांडपाणी व्यवस्थापन या बाबीकडे बरेचदा गरज असूनही दुर्लक्ष होते, असे एक निरीक्षण आहे. त्यातच, चांगले पाणी मिळण्याचा दर आणि प्रक्रिया करण्याचा होणारा खर्च याची तुलना करूनही बरेच लोक प्रक्रिया करून पुनर्वापर या पर्यायाचा विचार करत नाहीत असे दिसून येते. सांडपाण्यावर प्रक्रिया ः एकदा आपण सांडपाणी प्रक्रिया आणि दुय्यम वापरासाठी पुनर्वापर, हा उपाय करायचे नक्की केले की मग प्रश्न येतो तो प्रक्रिया पद्धतीचा. हे रोजचे काम असल्याने, देखभाल आणि चालवण्याचा खर्च जेवढा कमी, तेवढा हा उपाय प्रत्यक्षात येण्याची शक्यता हे गणित बहुतांश ठिकाणी असते. त्यामुळे, लोक किफायतशीर मार्ग शोधायच्या प्रयत्नात असतात. त्यातच आपण पाण्याला आजही द्यायला हवी ती किंमत देत नसल्याने, या कामामध्ये लक्ष द्यायला आजही लोक फारसे उत्सुक नसतात, अगदी पाण्याची भीषण टंचाई असूनही. एकदा प्रक्रिया आणि पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला की मग यानंतरचा टप्पा येतो स्थलानुरूप प्रक्रिया योजनेची आखणी. सांडपाणी प्रक्रिया करण्याच्या पद्धतींमध्ये दोन प्रकारे काम करणाऱ्या पद्धती वापरता येतात. एक तंत्रज्ञान वापरून प्रक्रिया करणे आणि दुसरे म्हणजे तंत्र वापरून प्रक्रिया करणे. तंत्रज्ञानाच्या आधारे प्रक्रिया ः

  • तंत्रज्ञान वापरून उपाययोजना केली, तर त्यामध्ये कमी जागेमध्ये काम करता येते. यात काही यांत्रिक प्रक्रिया करणारी साधने वापरून सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. यामध्ये यंत्र आणि तंत्रज्ञान वापरले जात असल्याने याच्या वापरासाठी होणारा भांडवली खर्च आणि रोजचा हा उपाय चालवण्याचा खर्च या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात.
  • त्याचप्रमाणे, हा उपाय करायचा असेल त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज लागते. अर्थात, यासाठी कमी जागा पुरत असल्याने, जिथे जागा हा महत्त्वाचा घटक आहे आणि प्रक्रीयेसाठी खर्च करायची लोकांची तयारी आहे, तिथे तंत्रज्ञान वापरून सांडपाणी प्रक्रिया करणे हा सहजशक्य उपाय आहे.
  • तांत्रिक उपायांच्या आधारे प्रक्रिया ः

  • जिथे जागा उपलब्ध आहे, सांडपाणी प्रक्रिया करायची इच्छा आहे, पण खर्च जास्त करणे शक्य नाही, अशा ठिकाणीही एक दुसरा उपाय करून सांडपाणी प्रक्रिया कमी खर्चात करता येते. हे विशेषतः निवासी शाळा, महाविद्यालये, जिथे मोकळी जागा उपलब्ध आहे अशी निवासी संकुले, व्यापारी संकुले, इत्यादी ठिकाणी करणे फायद्याचे ठरते.
  • यामध्ये काही निवडक, विशिष्ट प्रकारे वाढवलेली वैशिष्ट्यपूर्ण झाडे आणि पाण्याच्या दर्जाप्रमाणे अभ्यास करून तयार केलेले जिवाणू कल्चर या गोष्टींचा वापर करून पाण्यावर प्रक्रिया केली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारची यंत्रे किंवा यंत्रणा वापरली जात नसल्याने यामध्ये एकदा ही उपाययोजना कार्यान्वित झाली की नंतर चालवणे आणि देखभाल यावर फारसा खर्च करण्याची आवश्यकता भासत नाही.
  • या प्रक्रियेसाठी जोपर्यंत कामामध्ये रोजच्या वापरासाठी पाणी मिळवताना कोणत्याही प्रकारची ऊर्जा वापरावी लागत नाही, तोपर्यंत ती सर्व कामे सुरळीत चालतात असा अनेक ठिकाणचा अनुभव आहे. मात्र, हे करताना योग्य आणि अनुभवी तज्ज्ञाचा सल्ला आणि मार्गदर्शन दूरगामी यशासाठी अनिवार्य आहे. काय काम करायचे, कुठे करायचे, किती प्रमाणात करायचे इत्यादी तांत्रिक बाबींमध्ये तज्ज्ञाचा सल्ला आणि मत हे अत्यावश्यक आहे.
  • ही कमी खर्चाची, नैसर्गिक पद्धतीने सांडपाणी प्रक्रिया करून देणारी पद्धत कोणती आणि त्या पद्धतीबद्दल सविस्तर माहिती उदाहरणासकट पुढील भागामध्ये पहाणार आहोत.
  • संपर्क ः डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६० (वेळः सकाळी ९.३० ते १०.३० , संध्याकाळी ७.३० ते ८.३०) ( लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयातील अभ्यासक आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com