योग्य जागा, उपाय अन् लोकसहभाग महत्त्वाचा

योग्य ठिकाणी झऱ्याचा शोध घेऊन बांधलेले कुंड
योग्य ठिकाणी झऱ्याचा शोध घेऊन बांधलेले कुंड

गाव कुठे वसलं आहे, लोकसंख्येनुसार पाण्याची मागणी, पाण्याचे स्रोत किती आणि कोणते, त्यांची क्षमता किती, पिकांसाठी लागणारे पाणी किती, गावाची भौगोलिक रचना यांचा अभ्यास करावा. त्यानुसार जल, मृदसंधारण योजना आखली आणि प्रत्यक्षात आणली तर यश नक्की मिळते.

जलसंधारण करताना काम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. गावाला लागणारे पाणी त्याच परिसरात अडविणे, जिरविणे आणि पावसाळ्यानंतरच्या काळात वापरासाठी साठवून ठेवणे, या कामांमधून गावाला लागणाऱ्या पाण्याच्या गरजेची पूर्तता सहज होऊ शकते. यामध्ये लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची बाब म्हणजे केवळ पिण्यासाठी पुरेल इतकेच काम न करता, घरगुती वापर, जनावरांसाठी, इतर उपक्रमांसाठी आणि मुख्यत: दुसरं पीक घेण्यासाठी पुरेल एवढे पाणी उपलब्ध करता येईल याप्रकारे जल, मृदसंधारणाचे काम करणे आवश्यक आहे. गाव कुठे वसलं आहे, लोकसंख्या किती, पाण्याची मागणी किती, पाण्याचे स्रोत किती आणि कोणते, त्यांची क्षमता किती, पिकांसाठी लागणारे पाणी किती, गावाची भौगोलिक रचना याचा अभ्यास करावा. त्यानुसार जल, मृद संधारण योजना आखली आणि प्रत्यक्षात आणली तर यश नक्की मिळते.

स्थलानुरूप उपाययोजना जलसंधारण उपायांमध्ये आपण स्थलानुरूप उपाय कोणते आणि ते कशासाठी आणि कुठे करावेत हे आपण या आणि पुढच्या लेखांमध्ये बघणार आहोत. हे उपाय पृष्ठभागावरील पाणी कसे वापरावे, स्रोतांचे पुनर्भरण कसे करावे, भूजल वाढवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, पाण्याचे साठे कुठे आणि काय उपायांनी करता येतात, गाळमुक्त बंधारे कुठे आणि कसे बांधावेत, उपाय योजताना ते शाश्वत असावेत यासाठी काय काय करावे इत्यादी मुद्द्यांवर आपण माहिती घेणार आहोत.     कोणत्याही ठिकाणी जलसंधारण उपाय करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यामध्ये सर्वप्रथम पाण्याचे ऑडिट करून उपलब्धता आणि मागणी यातील नक्की अंतर किती याचं गणित मांडले पाहिजे. त्यानंतर प्रत्यक्ष काम करताना पहिल्यांदा अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांवर काम करून त्यांची क्षमता वाढविणे हा सर्वात कमी खर्चाचा आणि कमी वेळात होणारा उपाय आहे. यामुळे असलेले स्रोत जास्त कालावधीसाठी वापरात राहतात. त्यानंतर नादुरुस्त किंवा पडझड झालेल्या स्रोतांची दुरुस्ती किंवा बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे योग्य आहे. हे सर्व करूनही जर पाण्याची कमतरता राहत असेल तर नवीन स्रोतांची निर्मिती करणे या उपायाकडे वळता येऊ शकते.

झऱ्यांचे व्यवस्थापन   माणूस अगदी अश्मयुगापासून वापरत असलेला स्रोत, जो वस्तीजवळ असतो, काही वर्षभर पाणी देतात, तर काही सहा महिने. हा पाण्याचा स्रोत आहे “झरे”. भूगर्भातील पाणी साठवून ठेवायची जागा संपली की पाणी जिथे मार्ग मिळेल तिथे बाहेर पृष्ठभागावर येऊन उताराने वाहायला लागते, त्याला आपण “झरा” असं म्हणतो. झरे वापरून आपण पाणी कसं वाचवू, वाढवू आणि वापरू शकतो हे आपण बघूयात.

झऱ्यासमोर कुंड बांधणे पाण्याच्या योग्य वापरासाठी झऱ्याच्या समोर एक कुंड बांधावे. कॉंक्रीटचा वापर करून सुयोग्य ठिकाणी कुंडाची निर्मिती केली जाते. डोंगर ही पाणी साठवण्याची टाकी आहे असं म्हटले तर झरा म्हणजे या टाकीचा नळ असतो. हा नळ पूर्ण क्षमतेने कायम वाहत असतो. जेव्हा आपण त्याच्यासमोर एक कुंड बांधून अडथळा तयार करतो, तेव्हा झऱ्याचा वाहण्याचा वेग कमी होतो. त्याचा परिणाम म्हणजे त्या झऱ्याचा पाणी पुरवण्याचा कालावधी वाढतो. फक्त हे करताना झऱ्याची क्षमता, साठवणूक करण्यासाठी उपलब्ध योग्य जागा आणि प्रवाहाचा वेग यावर कुंडाचा आकार ठरवला जातो. यात जर चूक झाली तर झरा दिशा बदलून वाहायला लागू शकतो आणि त्यामुळे केलेला खर्च वाया जाऊ शकतो. त्यामुळे हा उपाय करण्यापूर्वी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

  झऱ्यावरील पाणीपुरवठ्याचे उदाहरण

  • या उपायाबद्दल माहिती देण्यासाठी निवडलेलं गाव पुणे जिल्ह्यात आहे. पवनानगर धरणापासून जेमतेम २-३ किमीवर डोंगरात वसलेल्या सात वाड्या आणि गावठाण अशी आठ भागांत विखुरलेली वस्ती. काही वाड्या तर ३०० ते ५०० फूट उंचीवर वसलेल्या. धरणाचे पाणी गावापर्यंत आणायचा खर्च महिन्याला अंदाजे २२ ते २५ हजार रुपये. ग्रामपंचायतीचे उत्पन्न खूपच कमी आणि त्यामुळे पूर्वी या पद्धतीने चालू केलेली योजना बंद. त्यामुळे पाणी दिसतंय, पण मिळत नाही, अशी लोकांची परिस्थिती. 
  •       डोंगराच्या उतारावर वसलेलं गाव. सगळा उतार धरणाकडे जाणारा. धरणाच्या पलीकडे एक विहीर, ज्यातून पाणीपुरवठा नळपाणी योजना चालू होती. विहीर ते गाव अंतर जास्त आणि चढ बराच, त्यामुळे विजेची गरज जास्त. येणारं शुल्क भरलं नाही म्हणून वीजपुरवठा बंद झाला आणि पाण्याचा प्रश्न कायम राहिला. गावातून वाहणारा एक ओढा. पण खोली आणि रुंदी फारशी नाही, प्रवाहाचा वेग प्रचंड, त्यामुळे बंधारे गाळाने भरलेले. अशा अडचणी भरपूर आणि गावकरी निराश आणि हताश. अशा ठिकाणी मी पहिली गोष्ट केली ती म्हणजे त्या परिसराचं सर्वेक्षण.
  • सर्वेक्षणात असे दिसून आले की, गावात पाण्याचे फारसे स्रोत नसले किंवा कमी क्षमतेचे असले, तरी गाव एकूण सुदैवी म्हणायला हवं. कारण गावाच्या मागे असलेल्या डोंगरातून १२ ते १३ ठिकाणी झरे वाहत होते आणि जवळपास आठ महिने पाणी देत होते.
  • सर्वेक्षणात असं लक्षात आलं की, वाड्या एकमेकांपासून खूप लांब आहेत आणि पाणीपुरवठा योजना करताना प्रत्येक वाडीसाठी स्वतंत्र योजना राबविणे आवश्यक आहे. प्रत्येक वाडीला किमान १ ते ३ झरे पाणी पुरवू शकतात असे लक्षात आले. या झऱ्यांच्या उगमाजवळ कुंड बांधून पाणी साठवलं आणि पाइप टाकून ते त्या त्या वाडीजवळ उताराचा उपयोग करून घेऊन आणून दिलं तर गावाला त्याचा फायदा होऊ शकतो हे समजावून सांगितल्यावर गावकरी आणि स्वयंसेवी संस्था यांना ते पटले.
  • डिसेंबरमध्ये झऱ्यांच्या उगमाजवळ कुंड बांधली गेली. झऱ्याच्या ताकदीचा अभ्यास करून प्रत्येक ठिकाणी कुंड कुठे बांधायचे, किती आकाराचे बांधायचे हे ठरवले आणि लोकसहभागातून त्या त्या ठिकाणी कुंड बांधली. यातल्या वाड्या ३०० ते ६०० फूट उंचीवर होत्या, पण प्रत्येक वाडीसाठी स्वतंत्र योजना असल्याने हे काम सोपं आणि अत्यंत कमी खर्चात झाले.
  • दर वर्षी जे झरे जानेवारीमध्ये कोरडे होत होते ते कुंडाचे काम केल्यानंतर जवळपास पुढचा पाऊस येईपर्यंत पाणी द्यायला लागले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पाणीपुरवठ्यासाठी कोणत्याही प्रकारची ऊर्जा वापरावी लागत नाही. प्रत्येक झरा दररोज अंदाजे १५ ते २० हजार लिटर्स पाणी पुरवतो.
  • पूर्वी या गावात धरणाजवळ विहीर बांधून गावापर्यंत पाणी आणण्याची योजना आखली होती जिचा खर्च होता ५० लाख रुपये आणि योजना चालवण्याचा खर्च होता महिना २५ हजार रुपये. झऱ्यांच्या उगमाजवळ कुंड बांधली आणि पाणी प्रत्येक वाडीत आणलं, त्याला खर्च आला साधारण १२ लाख रुपये आणि योजना चालवण्याचा खर्च काहीच नाही, कारण उताराचा वापर करून ही योजना राबवली आहे.
  • झरा या नैसर्गिक स्रोताचा योग्य वापर करून जल साधारण योजना आखली आणि त्याचा वापर केला तर अत्यंत कमी खर्चात, कमी जागेत जलसाठा करता येतो आणि पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत उपाय करता येतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. पाण्याचं काम करताना एकाच ठिकाणी सर्व पाणी अडवू किंवा जिरवू असा हट्ट न धरता भौगोलिक परिस्थिती, स्रोताची ताकद, लोकांची मागणी याचा अभ्यास करून योग्य उपाय करणं हे यशाचं गमक आहे.
  • - डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६०

    (लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com