महाराष्ट्रात मॉन्सून आगमनासाठी अनुकूल स्थिती

महाराष्ट्रात मॉन्सून आगमनासाठी अनुकूल स्थिती
महाराष्ट्रात मॉन्सून आगमनासाठी अनुकूल स्थिती

महाराष्ट्रातील हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल इतका कमी होत असून, कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. केरळमध्ये ८ जून दरम्यान माॅन्सून दाखल होऊन पुढील प्रवास वेगाने होण्यास हवेचे दाब अत्यंत अनुकूल बनत आहे. ९ जून रोजी महाराष्ट्राचे पूर्व, पश्‍चिम व मध्यभागावरही १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. माॅन्सून वेगाने पुढे सरकेल. दिनांक ८ व ९ जून रोजी कर्नाटक किनारपट्टी पार करून माॅन्सून उत्तर दिशेने कोकण किनारपट्टी व्यापून दिनांक ११ रोजी मुंबईसह कोकणात व दक्षिण महाराष्ट्राच्‍या भागात पाऊस सुरू होईल. दिनांक १२ जून रोजी व १३ जून रोजी दक्षिणेकडून उत्तर दिशेने त्याची वाटचाल सुरूच राहील.

  • दिनांक ११ जून रोजी अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीपासून १५० किलोमीटर अंतरावर जोरदार चक्राकार वारे वाहतील. त्याचे रूपांतर लहान चक्रीवादळात होईल. ते वेगाने पुढे सरकेल.
  • दिनांक १२ जून रोजी कर्नाटक व महाराष्ट्रातील कोकणच्या दिशेने चक्राकार वेगाने समुद्र किनारपट्टीचे दिशेने ढगांचा मोठा समूह वाहून आणतील. कोकण किनारपट्टीत जोरदार पावसाला सुरवात होईल.
  • दिनांक १३ जून रोजी ते उत्तरेचे दिशेने अरबी समुद्रातून पुढे सरकेल. संपूर्ण किनारपट्टीत कोकणात पाऊस सुरूच राहील. तसेच गुजरातचे दिशेने हे वादळ सरकेल. त्या वेळी महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००२ हेप्टापास्कल इतके कमी होतील आणि माॅन्सून पावसाचा जोर कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रात सुरू होईल.
  • त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातही दिनांक १४ व १५ जून पर्यंत माॅन्सून पोचेल. पाऊस सुरू होईल.
  • दिनांक १६ जून रोजी महाराष्ट्राचा संपूर्ण भाग मान्सून व्यापेल. गुजरात भागात तो पोचेल. अशाप्रकारे माॅन्सूनच्‍या वाटचालीसाठी या आठवड्यातील हवामान घटक अनुकूल राहतील.
  • १. कोकण ः कमाल तापमान ठाणे ३८ अंश, सिंधुदुर्ग व रायगड ३५ ते ३६ अंश, रत्नागिरी ३२ अंश सेल्सिअस राहिल. किमान तापमान सिंधुदुर्ग २६ अंश, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ८८ टक्के, रायगड व ठाणे ८६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६१ टक्के, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात ५२ ते ५६ टक्के व ठाणे जिल्ह्यात ४७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० किलोमीटर, दिशा नैर्ऋत्येकडून राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ मिलीमीटर पावसाची शक्‍यता असून, इतर जिल्ह्यातही पाऊस सुरू होईल. २. उत्तर महाराष्ट्र ः कमाल तापमान नाशिक ३८ अंश, नंदुरबार ४० अंश, धुळे व जळगाव ४५ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान नाशिक २५ अंश, धुळे, नंदुरबार व जळगाव येथे २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक व नंदुरबार ७५ टक्के, धुळे ६९ टक्के, जळगाव ४९ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात २३ टक्के, धुळे, नंदुरबार व जळगाव येथे १२ ते १४ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा कमाल ताशी वेग वाढून २१ ते २८ कि.मी. व दिशा नैर्ऋत्येकडून राहील. पावसास या आठवड्यात सुरवात होईल. ३. मराठवाडा ः कमाल तापमान औरंगाबाद ४३ अंश, जालना व बीड ४५ अंश, उस्मानाबाद, लातूर, नांदेड येथे ४६ अंश, परभणी व हिंगोली ४७ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान २५ ते २९ अंश सेल्सिअस राहिल. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत ४२ ते ४७ टक्के, लातूर, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३० ते ३८ टक्के, नांदेड जिल्ह्यात २५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते १६ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. उस्मानाबाद व जालना जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता आहे.

    ४. उत्तर विदर्भ ः कमाल तापमान बुलढाणा व वाशीम जिल्ह्यांत ४४ अंश, अकोला व अमरावती ४५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २८ ते ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची आर्द्रता वाशीम २५ टक्के, अमरावती ४२ टक्के, तर अकोला व बुलढाणा ४५ ते ५० टक्के राहील. दुपारची आर्द्रता वाशीम, अकोला ३२ टक्के, बुलढाणा व अमरावती जिल्ह्यांत २० ते २४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ कि.मी. व दिशा वायव्येकडून राहील. ५. मध्य विदर्भ ः येथे कमाल तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ २९ टक्के, वर्धा व नागपूर येथे ४५ ते ५० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ २१ टक्के, नागपूर ३२ टक्के व वर्धा २४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी व दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

    ६. पूर्व विदर्भ ः येथे कमाल तापमान ४४ ते ४६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर २५ टक्के, गडचिरोली ५५ टक्के, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली ४२ टक्के व उर्वरित जिल्ह्यात १५ ते २४ टक्के राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. ७. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र ः येथे कमाल तापमान सोलापूर ४५ अंश, नगर ४१ अंश व उर्वरित जिल्ह्यात ३४ ते ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ टक्के, पुणे ६५ टक्के, सांगली व सातारा जिल्ह्यांत ७६ टक्के, नगर जिल्ह्यात ६० टक्के व सोलापूर जिल्ह्यात ५० टक्के राहील. कोल्हापूर जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील, तर सोलापूर व नगर जिल्ह्यांत २१ ते २४ टक्के आणि पुणे, सांगली व सातारा जिल्ह्यांत ३१ ते ३८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते २४ कि.मी. राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून तर उर्वरित जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. कृषीसल्ला ः १. या आठवड्यात महाराष्ट्रात माॅन्सूनचे आगमन होईल. त्यानंतर जमिनीत ६५ मिलीमीटर ओलावा झाल्यानंतर पेरणी सुरू करावी. धूळ वाफ पेरणी टाळावी. अन्यथा पावसात मोठी उघडीप झाल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येते. २. कोरडवाहू भागात उताराला आडवे सारे पाडावेत, त्यामुळे जल व मृदसंधारण होईल. ३. शक्‍यतो कडधान्याच्या पेरण्या प्रथम कराव्यात. ४. कमी कालावधीची व कमी पाणी लागणारी पिके व त्यांच्या कमी कालावधीच्या जातींची पेरणी करावी.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com