agricultural stories in Marathi, wild vegetables in meals | Agrowon

रानभाज्यांचे आहारातील महत्त्व

जी. एस. राऊत, डॉ. एम. डी. सोनटक्के
मंगळवार, 27 जुलै 2021

पावसाळ्याच्या दिवसात बाजारात तांदुळजा, कर्टोली, माळा, पुननवर्वा, मोरंगी, दवणा,  काटेसावर,  नारई,  वागोटी,  टाकळा,  अंबाडी,  भोकर,  खडकतेरी,  भोवरी, फांद, घोळ, म्हैसवेल, कोलार, आघाडा, चिंचू, कुर्डू, दिंडा, कपाळफोडी, भारंगी, चिवळ, कुडा या रानभाज्या परिसरात उगवलेल्या दिसतात

महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे पिकविल्या जाणाऱ्या पिके व आवडीनिवडीनुसार वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश केलेला दिसतो. उदा. कोकण किंवा किनारपट्टी भागात भात व नारळापासून बनवलेले पदार्थ, मासे इ. आणि बहुतांश महाराष्ट्रात गहू पोळी, ज्वारी भाकरीसोबत विविध पालेभाज्या, फळभाज्या, तेलबियांच्या चटण्या अशी विविधता आढळते. उत्तम आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आहारात कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, दूध, दही इ. अशा विविध पदार्थांचा समावेश आवश्यक आहे.

पावसाळ्याच्या दिवसात बाजारात तांदुळजा, कर्टोली, माळा, पुननवर्वा, मोरंगी, दवणा,  काटेसावर,  नारई,  वागोटी,  टाकळा,  अंबाडी,  भोकर,  खडकतेरी,  भोवरी, फांद, घोळ, म्हैसवेल, कोलार, आघाडा, चिंचू, कुर्डू, दिंडा, कपाळफोडी, भारंगी, चिवळ, कुडा या रानभाज्या परिसरात उगवलेल्या दिसतात. शेती किंवा विशेष निगेशिवाय निसर्गतः शेतात, माळरानावर उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. कोणत्याही रासायनिक खते, फवारण्या किंवा सिंचनाशिवाय त्यांची वाढ होते. या रानभाज्यांपासून बनवलेले विविध रुचकर पदार्थ बनवले जातात. सह्याद्री, सातपुडा या डोंगररांगा व परिसरात अधिवास करणारे बांधव या रानभाज्या पावसाळ्यात विक्रीसाठी आणतात. त्यांना या रानभाज्यांची पोषकता, औषधी गुणधर्म, विशेषतः विषारी व बिनविषारी गुणधर्माविषयी इत्यंभूत माहिती असते.

परिपूर्ण पोषण म्हणजे शरीराला आवश्यक, ऊर्जा देणारे, नवीन पेशी तयार होण्यास मदत करणारे, आवश्यक प्रमाणात खनिजे, जीवनसत्त्व व पोषकत्व शरीराला मिळणे होय. रानभाज्यांमध्ये पोषणमूल्यही उच्चदर्जाचे असते. त्यात क्लोरोफिल, अँटी ऑक्सिडंट, जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व अ आणि झिंक यांचे चांगले प्रमाण असते.

काही रानभाज्यांचे आहारातील महत्त्व :
कर्टोली :
कर्टोली ही प्रथिनांचा आणि लोहाचा उत्तम स्रोत आहे. उष्मांक मूल्य अतिशय कमी असल्यामुळे मधुमेहींसाठी उपयुक्त. तंतुमय घटक आणि प्रतिऑक्सिडीकारकांमुळे पचनक्रियेस चालना देते. कॅरेटेनॉइड आणि लुटेइन या पोषक घटकामुळे डोळे व हृद्यासंबंधित समस्या दूर ठेवण्यास मदत करते.

चिवळ : ९० ते ९३ टक्के पाण्याचे प्रमाण व कमी उष्मांक मूल्य असलेल्या या भाजीमध्ये ओमेगा- ३ मेदाम्ले आहेत. मुबलक तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व अ, ब, क आणि पचनक्रियेत उपयुक्त ठरणारी लोह, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम ही खनिजे आहेत. प्रतिऑक्सिडीकारकांमुळे हृदय आणि फुफ्फुसाच्या आरोग्यासह त्वचेसंबंधी समस्येमध्ये उपयुक्त.

घोळ : घोळ भाजी अनेक पोषक घटक, तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व आणि खनिजे असतात. कमी उष्मांक मूल्ययुक्त भाजीत कोलेस्टेरॉलचे प्रमाण शून्य टक्के असते. भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व अ, क असून, काही प्रमाणात जीवनसत्त्व ब असते. ही भाजी अन्नपचनास मदत करते. यकृताचे कार्यही सुधारते. हृदय आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त. भाजी वजन कमी करण्यासोबत हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते. वैद्यकीय तज्ज्ञ्ज्ञांनुसार घोळ भाजीत ऑक्झॅलिक ॲसिडचे प्रमाण जास्त असल्यामुळे मुतखड्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी ही भाजी खाऊ नये.

टाकळा : तण म्हणून शेतात, बांधावर पावसाळ्यात उगवणाऱ्या टाकळ्याच्या भाजीत चांगल्या प्रमाणात तंतुमय घटक, बीटा - कॅरेटीन, जीवनसत्त्व बी१, बी२, क आणि कॅल्शिअम, लोह, झिंक या खनिजांसोबत मुबलक प्रमाणात फायटोकेमिकल्स असतात. आयुर्वेदानुसार विविध व्याधींमध्ये ही भाजी उपयुक्त. भाजीतील विरेचन द्रव्य रक्तवाढीस पोषक आहे. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी गुणकारी ही भाजी गुणाने उष्ण असून, शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत करते.

अंबाडी : अंबाडीच्या भाजीत कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, झिंक, जीवनसत्त्व अ आणि क अशा पोषकघटकांसह खनिजांचा उत्तम स्रोत
आहे. उत्तम प्रमाणात लोह आणि फॉलिक ॲसिडच्या उपलब्धतेमुळे रक्तवर्धनासह डोळे, केस, हाडे, रक्तदाब इ. च्या आरोग्यात ही भाजी उपयुक्त आहे. अंबाडीची लाल फुलांतही (बोंड्या) पोषकघटक मुबलक असून, त्याची चटणी बनवली जाते.

भारंगी : श्वसनक्रिया उत्तम राहावी आणि दमा होऊ नये यासाठी कोकणात भारंगीच्या पानांची भाजी खाल्ली जाते. भारंगीच्या कोवळ्या पानांची भाजी रुचकर असून सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारांत लाभदायक ठरते. पचनक्रियेस उत्तेजन देते. भारंगीची मुळे, फुले यांनासुद्धा आयुर्वेदात महत्त्व आहे.

अळू : जीवनसत्त्व अ, क, बी१, बी२ आणि तंतुमय घटक अळूच्या भाजीमध्ये जास्त प्रमाणात असतात. डोळ्यांचे उत्तम आरोग्य, रोगप्रतिकारक शक्तीला चालना, वजन कमी करणे, निरोगी हृदय, पचनक्रियेची कार्यक्षमता वाढणे इ. फायदे अळू भाजीच्या सेवनाने होतात.

शेवगा : शेवग्यामध्ये दुधाच्या चौपट कॅल्शिअम, केळीच्या तीनपट पोटॅशिअम आणि मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे तसेच लोह व प्रथिने असतात. मधुमेह व उच्चरक्तदाबावर शेवगा उपयुक्त असून शेवग्याच्या शेंगा व पाने यांची भाजी बनवतात. पचनप्रक्रियेस मदत करून डोळे, केस, हाडांच्या उत्तम आरोग्यात शेवगा लाभदायक आहे.

- प्रा. जी. एस. राऊत ९८३४२२४७७९,
डॉ. एम. डी. सोनटक्के ९५११२९४०७४

(एमजीएम अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद.


इतर महिला
घरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो...सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी...
केळी प्रक्रियेतून गटाची आर्थिक प्रगतीशिंदखेडा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील ‘सरस्वती...
पौष्टिक आहारासाठी क्विनोआक्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या...
जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदेशरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः...
भरड धान्ये : पोषक तत्त्वांचे आगरभारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने २०२३ हे...
रक्तक्षय होण्याची कारणे अन् उपाययोजना...मुलांच्या वाढीच्या काळात, स्त्रियांच्या गरोदरपणात...
आहाराची पोषकता वाढविण्यासाठी प्रयत्न...सप्टेंबर महिना हा देशपातळीवर ‘राष्ट्रीय पोषण...
सुदृढ बालकांसाठी स्तनदा मातांना पोषक...ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वमहाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणानुसार, तिथे...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
शेतीला मिळाली बचत गटाची साथ शेणे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सुनंदा उदयसिंह...
शेतीला मिळाली पूरक उद्योगांची जोडमोर्डे (ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) हे डोंगराळ...
गृहोद्योगातून मिळाला उन्नतीचा मार्गज्या कुटुंबातील महिलांनी पुढाकार घेऊन शेतीपूरक...
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
दूषित अन्नापासून सावध राहा...म्यूकरमायकोसिस दुर्मीळ बुरशीजन्य संसर्ग आहे. याला...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
जवस एक सुपरफूडअलीकडच्या काळात जवस एक सुपरफूड म्हणून उदयास येत...
महिला शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनीगावपातळीवरील १० शेतकरी महिला किंवा महिला शेतकरी...
आरोग्यदायी द्राक्ष द्राक्षापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित...