कडवंची : संघर्षातून पेललंय आव्हान

कडवंची : संघर्षातून पेललंय आव्हान
कडवंची : संघर्षातून पेललंय आव्हान

कडवंचीमधील महिलांनीदेखील द्राक्ष शेतीमध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. द्राक्ष बाग उभारणी, व्यवस्थापन, छाटणी, फवारणी, थेट विक्री असो की तंत्रज्ञान प्रसार महिला आघाडीवर आहेत. माहेर असो वा सासर द्राक्ष शेतीतून आर्थिक समृद्धी आणण्यात महिलांचा मोठा वाटा आहे.

द्राक्षनगरी कडवंचीमध्ये पुरुष शेतकऱ्यांच्या जोडीने महिला शेतकऱ्यांनीही द्राक्ष बाग उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. द्राक्षबाग लागवड, तंत्रज्ञान प्रसार ते अगदी स्टॉलवर द्राक्ष विक्रीमध्ये महिलांचा चांगला सहभाग दिसतो. वडिलांना आलेल्या अपंगत्वामुळे उमा क्षीरसागर आठवीत असतानाच द्राक्ष शेतीत रुळली. शेतीबरोबरच आईवडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आली आणि तिने ती समर्थपणे पेलली. हे ठळकपणे पुढे आलेलं उदाहरण असलं तरी तिच्यासारखे कष्ट, जिद्द आणि चिकाटीने कुटुंबाच्या एकूणच विकासात आधारवड ठरणाऱ्या अनेक महिला कडवंचीत असल्याचे खुद्द उमा सांगते.

वडिलांचे स्वप्नपूर्ती करणारी उमा कडवंचीमधील नारायण क्षीरसागर यांची लहान मुलगी उमा. मोठ्या मुलींचे विवाह झाले अन्‌ उमावर आईवडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आली. त्यातच वडिलांना अपंगत्व आले अन्‌ उमावर लहानपणीच मोठी जबाबदारी आली. संकटाला संधी मानून तिने शिक्षणाच्या बरोबरीने शेतीही तेवढ्याच क्षमतेने पेलली.  आठवीत असतानाच वडिलांच्या आजारपणामुळे उमाकडे सहा एकरातील शेतीची जबाबदारी आली. शेतीला माय मानून तिने व्यवस्थापनात झोकून दिले. जवळपास १९ वर्षापासून वडिलांनी संभाळलेल्या द्राक्ष शेतीची माहिती तिला होतीच, पण जबाबदारी येताच मागे न हटता अडीच एकर द्राक्ष शेतीला आपलसं केलं. मुलगा बनून शेतीत राबणाऱ्या उमाने जिद्दीने द्राक्ष बागेचे काटेकोर व्यवस्थापन करीत एकरी चार लाखांचे उत्पन्न मिळवून दाखविले. द्राक्ष बागेच्या व्यवस्थापनाबरोबरीने ट्रॅक्‍टर चालविणे, फवारणीदेखील स्वतः उमा करते. वडिलांनाही उमाच्या द्राक्ष शेतीतील प्रगतीचा अभिमान आहे. कडवंचीमधील ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त महिला विस्तारलेल्या द्राक्ष शेतीत कष्ट करतात. स्वयंपाकापासून ते शेतीतील दैनंदिन कामं जबाबदारीने, प्राधान्याने अन्‌ परिणामकारकरीत्या करीत असल्याचे नारायणरावांच्या वंशाचा दिवा म्हणून नावलौकिक मिळविलेली उमा गावातील महिलांच्या कर्तृत्वाविषयी अभिमानाने सांगते.

कुटुंबाचा आधारवड बकुळा सखाराम क्षीरसागर या रोपवाटिका अन्‌ शेळीपालनाची द्राक्ष शेतीला जोड देणाऱ्या सखाराम क्षीरसागर यांच्या कुटुंबाचा आधारवड म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरपुडी कृषी विज्ञान केंद्राने पाणलोटाची कामे करण्यापूर्वी गाव आणि त्यांच्या कुटुंबाची स्थिती काय होती हे सांगताना बकुळाबाई म्हणाल्या की, कष्ट किती केले काय सांगावं? काम केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. रोज मजुरीला जायचं, प्रसंगी व्याजानं पैसे काढून चरितार्थ केला, मुलांचं शिक्षण भागवलं. आताची द्राक्षाची हिरवळ अन्‌ ते दिवस आठवले की अंगावर काटा येतो. अन्न, वस्त्र आणि निवारा सारेच प्रश्न होते. पुरेशा मिळकतीसाठी दररोज मजुरीने जाण्यासोबतच इतरांची शेती बटाईने करण्याचाही पर्याय निवडला. गावात कृषी विज्ञान केंद्राने पाणलोटाची कामे केली अन्‌ लोक द्राक्षाकडे वळले. त्या वेळी कृषी विज्ञान केंद्राने द्राक्ष पट्ट्यात नेलेल्या सहलीत मी सहभागी झाले होते. तेथे बागांच्या पाहणीत द्राक्ष बागायतदारांच्या कष्टाचे मोल कळलं. सोबतच्या महिलांनी खाण्यासाठी बागेतील द्राक्ष घड तोडले, त्या वेळी माझ्या मनात इतक्‍या कष्टाने पिकविलेले द्राक्ष घड आपण सहज का तोडावेत? हा विचार आला अन्‌ मी ते घड तोडले नाहीत. आता असं वाटतं त्या वेळी तो विचार केल्यानेच आजचा दिवस चांगला दिसतोय.

उभी राहिली द्राक्षबाग आमचं जगणं तळहातावरचं. रोज मजुरीला जाण्याशिवाय गत्यंतर नाही. केवळ २९ गुंठे शेतीत परिवाराचं रोजचं जगणंच मुश्किल होतं...वर्षभरापूर्वी इचार केला, द्राक्षानं साऱ्या गावाला आधार दिलाय. मग आपल्या २९ गुंठ्यांत छोटी का होईना बाग उभी केली तर...दोन मुलांच्या शिक्षणासाठी त्यातून आधार मिळाला. त्यांना चांगलं शिकवता येईल. मनाला पटलं, ठरलं अन्‌ दोघही कामाला लागलो. हाताला मिळलं तसं काम करायचं. ठोक पैसे उचलायचे. त्यातून काम करून द्यायचं अन्‌ आलेल्या पैशातून द्राक्षबाग उभी करण्यासाठी लागणारं साहित्य आणायचं. जवळपास बारा महिने गेले. आज २९ गुंठ्यांत बाग उभी राहिली अन्‌ छोटं का होईना शेततळं तयार झालंय...     सुवर्णा केशव गिरी यांचे कष्ट भविष्यातील समृद्धीच्या तयारीची साक्ष देतात. सुवर्णाताईंनी २९ गुंठ्यांत द्राक्ष लागवड केली आहे. द्राक्षबागेच्या उभारणीत पती केशवरावांनी चांगली साथ दिलीच, याचबरोबरीने खुंटरोपांवर कलमे बांधण्यासाठी मुलांचीही चांगली मदत झाली. बागेची संपूर्ण जबाबदारी त्या सांभाळतात. यासाठी गावातील प्रयोगशील शेतकऱ्यांचे त्या सातत्याने मार्गदर्शन घेतात. आयुष्यात कष्ट आणि संकटं आहेतच, पण त्यातूनही मार्ग काढण्यासाठी पती केशव यांच्या साथीनं सुवर्णाताईंचे प्रयत्न सुरू आहेत. महिला बचत गटाच्याही त्या सदस्या आहेत. या गटाचे त्यांना द्राक्षबाग उभारणीत चांगले सहकार्य मिळाले. टप्प्याटप्प्याने द्राक्षबाग आकार घेत असताना दुष्काळ आणि पाण्याचं भीषण संकट त्यांच्यापुढे आहे. बाग उभी करण्यासाठी पतीच्या बरोबरीने शेततळे खोदताना घेतलेल्या कष्टाचं चीज  हिरव्या स्वप्नात फुलण्यावर त्यांना विश्वास आहे.

पेललं संकटाचे शिवधनुष्य... पतीचं अपघाती निधन झालं, एक मुलगा आणि मुलीसोबत पुढचं आयुष्य जगण्याची जबबादारी चंद्रकला रामदास क्षीरसागर यांच्यावर आली. प्रश्न अनेक होते, पण मार्ग काढण्याशिवाय पर्याय नव्हता. हाताला मिळेल ते काम करून संकटाचे शिवधनुष्य चंद्रकलाबाईंनी पेललं. पस्तीस वर्षांपासून सुरू असलेला हा संघर्ष मुलाच्या आयुष्यात काही तरी आधार देण्यापर्यंत येऊन ठेपल्याचं त्या सांगतात. कष्टाच्या काळातच मुलीचा विवाह केला. सव्वादोन एकरांची द्राक्षबाग चंद्रकलाबाई आणि त्यांच्या मुलाच्या कष्टाला आधार देण्याचे काम करते आहे. संपूर्ण बागेची जबाबदारी त्या मुलगा नागेशच्या मदतीने सांभाळतात. गेल्या वर्षी या बागेने त्यांना पाच लाखाचं उत्पन्न दिलं. सारं आयुष्यच कष्ट उपसण्यात गेलेल्या चंद्रकलाबाईंना आता मुलासाठी चांगलं घर बांधायचंय. त्यासाठी पुरेशा पैशाची जुळणी त्या करताहेत. चंद्रकलाबाईंना दिवसभर सतत काम करत राहण्याची सवयच लागली आहे. स्वतःच्या बागेत काम नसले की त्या दुसऱ्याच्या बागेत रोजंदारीला जातात. बागेला पाणी मिळावे म्हणून विहीर, संपूर्ण बाग ठिबकवर आणि संरक्षित पाण्यासाठी शेततळ्याची जोड कृषी विभागाच्या मदतीने देता आल्याचं त्या आवर्जून सांगतात. संघर्षातून समृद्धीकडे त्यांचा प्रवास सुरू आहे.

बचत गटातून तंत्रज्ञान प्रसार शकुंतला दत्तात्रय वाहूळ या गावातील बचत गट ग्रामसंघाच्या अध्यक्षा. त्यांची निवड महिलांनी एकमताने केली. शकुंतलाबाईंच्या कुटुंबाकडे चार एकर शेती. त्यापैकी दोन एकर द्राक्ष. या द्राक्ष शेतीचं संपूर्ण व्यवस्थापन शकुंतलाबाई सांभाळतात. या कामी त्यांच्या मुलीचीही मोठी मदत होते. द्राक्ष वेल फुटण्यापासून ते अगदी फेलफूट काढणे, शेंडे मारणे, घडांची काळजी, कोणता प्रादुर्भाव दिसतोय याची कल्पना पती दत्तात्रय वाहूळ यांना देणे आणि तज्ज्ञांनी सांगितलेली फवारणी बागेत करून घेण्याचे नियोजन त्या काटेकोरपणे करतात.     ग्रामसंघाच्या अध्यक्षा असल्याने बचत गटातील महिलांचे प्रश्न, सामाजिक प्रश्नांची मांडणी करण्याची जबाबदारी त्या गाव व सर्कल स्तरावर करतात. याचबरोबरीने बचत गटातील महिलांना द्राक्षबाग व्यवस्थापनाची माहितीही देतात. बचत गटाच्या माध्यमातून स्वयंनिर्भर होणाऱ्या महिलांना पाठबळ देण्याचे कामही त्या करतात. बचत गटाचे काम करताना पारदर्शकता व सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यामुळेच आपण हे करू शकत असल्याचे त्या सांगतात.  परराज्यातील बचत गटांचे कामकाज पाहण्यासाठी त्यांनी अभ्यास दौराही केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com