आळिंबी, गव्हांकुर उत्पादनातून बचत गटाची प्रगती

गोद्रे (जि.पुणे) ः  सुकविलेल्या आळिंबीची पाकिटे भरताना गटातील सदस्या.
गोद्रे (जि.पुणे) ः सुकविलेल्या आळिंबीची पाकिटे भरताना गटातील सदस्या.

गोद्रे (ता. जुन्नर, जि. पुणे) गावातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शेतीमधील दैनंदिन कामे सांभाळत पूरक उद्योगातून आर्थिक स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार केला. महिलांच्या या उद्ममशिलतेला नाबार्ड आणि लुपीन फाउंडेशनने जीवनमान उद्योग विकास कार्यक्रमातून प्रोत्साहन दिले. सध्या आळिंबी उत्पादनातून महिलांना वर्षभर उत्पन्नाचे साधन गावामध्येच तयार झाले आहे.

जुन्नर (जि. पुणे ) परिसरातील आदिवासी पट्‌ट्यातील ऐतिहासिक हटकेश्‍वराच्या पायथ्याशी असलेल्या गोद्रे गावातील महिलांनी विविध बचत गटांच्या माध्यमातून आळिंबी आणि गव्हांकुर उत्पादन आणि विक्री सुरू केली आहे. बचत गटाच्या माध्यमातून शेतीमधील कामे सांभाळत पूरक उद्योगातून आर्थिक स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार महिलांना केला. महिलांच्या या उद्ममशिलतेला नाबार्ड आणि लुपीन फाउंडेशनने जीवनमान उद्योग विकास कार्यक्रमातून प्रोत्साहन दिले आहे.  

आळिंबीच्या उत्पादनासाठी अन्य पिकांच्या तुलनेत भांडवली खर्च कमी आहे. आळिंबी वाढविण्यासाठी जे बेड तयार केले जातात त्यासाठी लागणारा भाताचा पेंढा, कोंडा, गहू आणि  सोयाबीनचा भुसा हा कच्चा माल या भागात सहज उपलब्ध होतो. कमी कष्ट, जास्त उत्पादन आणि बाजारपेठेत वाढत्या मागणीमुळे आळिंबी उत्पादनाकडे महिलांनी लक्ष केंद्रीत केले. आळिंबी उत्पादनासाठी पोषक हवामान गोद्रे परिसरात असल्याने चांगल्या दर्जा, गुणवत्तापूर्ण अळिंबीचे चांगले उत्पादन मिळविणे या महिलांना शक्‍य झाले आहे. आळिंबी उत्पादनातून महिलांना चांगली मिळकत होत असल्याने त्यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादनाचा वेग वाढविण्यास सुरवात केली.

बचत गटांचा पुढाकार   गोद्रे गावातील महिला बचत गटांना लुपीन फाउंडेशनने जीवनमान उद्योग विकास कार्यक्रमातून धिंगरी आणि बटन आळिंबी उत्पादनाबाबत प्रशिक्षण दिले. याबाबत संस्थेचे बचत गट समन्वयक बाळू रेंगडे म्हणाले, की गावातील महिला बचत गट एक वर्षांपासून आळिंबी उत्पादन घेत आहेत. गावात सध्या सतरा महिला बचत गट कार्यरत आहेत. त्यापैकी ३ गट आळिंबी उत्पादन आणि १ गट गव्हांकुर उत्पादन करतो. सध्या बचत गटातील दहा महिला धिंगरी आणि बटन आळिंबीचे उत्पादन घेतात. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन दर्जेदार उत्पादन आणि चांगली चव असणाऱ्या आळिंबीचे उत्पादन घेण्यावर आमचा भर आहे. आळिंबी उत्पादनासाठी घराजवळच महिलंनी शेड तयार केली. बेड बनविल्यानंतर बटन आळिंबीचे २१ दिवसांत उत्पादन सुरू होते. तर धिंगरी आळिंबीचे ८ ते १५ दिवसात उत्पादनास सुरवात होते. बटन आळिंबीचे ४८ दिवसांपर्यंत उत्पादन मिळते. तर धिंगरी आळिंबीचे पंधरा दिवसांपर्यंत उत्पादन मिळते. धिंगरी आणि बटन आळिंबीचे उत्पादन घेतल्यानंतर उरलेले बेड हे खतनिर्मितीसाठी वापरले जातात. बेडवरून तोडल्यानंतर ताजी आळिंबी एक दिवस रहाते. तर फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस टिकू शकते. गटातील महिलांकडे फ्रिजची सुविधा नसल्यामुळे आळिंबी वाळवून पॅकबंद केली जाते. बाजारपेठेत ओली आणि वाळविलेल्या अळिंबीला गुणवत्तेनुसार वेगवेगळा दर मिळतो. सध्या वाळविलेल्या आळिंबीस चांगला दर मिळतो. महिला बचत गटातील ३६ सदस्यांपैकी १० महिला आळिंबी उत्पादन घेत आहेत. एक महिला बटन आळिंबी उत्पादनासाठी ३० बेडची बॅच लावते.  बटन आळिंबीचे २१ व्या दिवशी उत्पादन सुरू होते. या आळिंबी उत्पादनाचा कालावधी ४८ दिवसांचा आहे. एका बेडमधून सरासरी चार किलो बटन आळिंबी उत्पादन मिळते. मात्र, पाण्याची उपलब्धता आणि नियोजन यावर आळिंबीचे वजन आणि दर्जा अवलंबून असतो.

गव्हांकुर उत्पादनाला सुरवात एक वर्षापासून आळिंबी उत्पादनाचा अनुभव घेतल्यानंतर गोद्रे गावातील एका महिला बचत गटातील दहा महिलांनी एक महिन्यापूर्वी गव्हांकूर उत्पादन सुरू केले आहे. यासाठी बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.     याबाबत माहिती देताना बचत गट समन्वयक बाळू रेंगडे म्हणाले, की गव्हाकुंर उत्पादनासाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीच्या खरेदीसाठी आर्थिक मदत लुपीन फाउंडेशनने केली. साधारणपणे २०० ट्रे तसेच गहू बियाणे, ट्रे ठेवण्यासाठी स्टॅन्ड इत्यादी साधनसामुग्रीसाठी सुमारे ६४ हजार रुपये खर्च आला. यापैकी ३२ हजार रुपये लुपीन फाउंडेशन तर ३२ हजार रुपये महिला बचत गटांनी जमा केले. गव्हांकुर उत्पादनाबरोबर खरेदीची हमी एका संस्थेने घेतली आहे. वाळविलेले गव्हांकुर प्रतीकिलो ८०० रुपये या दराने खरेदी केले जाणार आहे. एका महिला वीस ट्रेमध्ये गव्हाकुंराचे उत्पादन घेते. बचत गटातील दहा महिलांनी गव्हांकुरनिर्मितीचा उद्योग सुरू केला आहे. हा प्रयोग प्राथमिक पातळीवर असून, यामध्ये महिलांना कुशलता आल्यानंतर गव्हांकुर उत्पादनासाठी ट्रे ची संख्या वाढविली जाणार आहे. एका आठवड्यात साधारण १० किलो वाळविलेल्या गव्हाकुंराचे उत्पादन मिळते.

आहारातील महत्त्व

  • अळिंबीमधून उच्च दर्जाची प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजांची उपलब्धता.
  •  तंतुमय पदार्थ असल्याने ते एक परिपूर्ण अन्न.
  •  औषधी उपयुक्‍तता असल्याने आळिंबीला आहारात महत्त्वाचे स्थान.
  • आळिंबीतून चांगला नफा  माझ्याकडे आळिंबी उत्पादनाची तिसरी बॅच आहे. मी आतापर्यंत ४० किलो आळिंबीची विक्री केली आहे. लेण्याद्री येथे झालेल्या द्राक्ष महोत्सवात वाळविलेल्या आळिंबीची १०० ग्रॅम वजनाची पाकिटे करून विक्री केली. एक पाकीट ८० रुपयाला विकले. गेल्या वर्षभरात मला ओल्या आणि सुक्‍या आळिंबी विक्रीतून ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. ओल्या आळिंबीला प्रती किलोस ८० रुपये आणि सुक्‍या आळिंबीला ८०० रुपये प्रती किलो दर मिळाला. १० किलो ओल्या आळिंबीपासून एक किलो वाळविलेली आळिंबी तयार होते. - मिरा भालचंद्र मांडवे, सदस्या, यशवंती महिला ग्राम संघ

    गव्हांकुरनिर्मितीला संधी

    आळिंबी उत्पादनाबरोबरीने मी गव्हांकुरनिर्मिती करत आहे. लुपीन फाउंडेशनने आम्हाला पुण्यात एक दिवसाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यानुसार आम्ही कोकोपीट ट्रे मध्ये गव्हांकुर उत्पादनाला सुरवात केली. माझ्याकडे २० ट्रे असून, आठवड्याला १० किलो उत्पादनाचे नियोजन आहे. हा पहिलाच प्रयोग असल्याने उत्पादनाचा अजून अंदाज आलेला नाही. - लक्ष्मी धर्मा उतळे, महालक्ष्मी स्वयंसहायता महिला बचत गट

    -  बाळू रेंगडे, ९७३०३०४३१६ (बचत गट समन्वयक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com