शून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची शेती !

शून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची शेती!
शून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची शेती!

कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा संस्कार हजारो वर्षांपासून घट्ट रुजला आहे. बैलाची खरेदी, जपणूक करून भर उन्हाळ्यात पूर्व मशागतीच्या कष्टदायक कामात शेतकरी गढलेला दिसतो. नांगरणी, ढेकळे फोडणे, दिंड (पाळ्या) व कुळवाच्या पाळ्या मारून जमीन बारीक करणे, असे या कामाचे स्वरूप. पुढे पूर्व मशागतीतील अतिकष्टाची कामे ट्रॅक्‍टरने, तर कमी कष्टाची कामे बैलाकडून, अशी विभागणी झाली. म्हणजेच बैलजोडी पाळूनही ट्रॅक्‍टरभाडे द्यावे लागते. माझ्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्याला ट्रॅक्‍टर खरेदी शक्य नसल्याने पॉवर टिलर खरेदी केला. स्वतःच्या शेतीबरोबर अन्य लोकांचेही मशागतीचे कामे भाड्याने करून देऊ लागलो. पुढे गावात भरपूर पॉवर टिलर झाले. सतत वापरल्याने पहिला पॉवर टिलर खराब झाला होता, तो विकून घरगुती वापरासाठी नवीन घेतला. थोडक्यात, पूर्व मशागतीसाठी शेतकरी अनादी काळापासून प्रचंड आर्थिक गुंतवणूक व खर्च करीत आला आहे.

  • २००५ साली उसाच्या खोडक्यांचे सेंद्रिय खत करण्याविषयी चिंतन सुरू होते. उसानंतर भाताचे पीक घेण्यासाठी जमीन नांगरल्यास त्यातील खोडके पसरून पुढील कामांना अडथळा होईल. खोडक्यांपासून खत करायचे असल्यास ती तशीच राहिली पाहिजेत, या मतापर्यंत आलो. पूर्व मशागत बंद करून भात पिकवण्याचा प्रयोग केला.
  • पूर्व मशागत न केल्याने पेरणीची पद्धत बदलावी लागली. भात पेरणीच्या वेळी पावसावर किंवा पाट पाण्याने जमीन ओलावून टोकण पद्धतीने पेरणी केली. भात उत्तम पिकले.
  • भात कापणीनंतर त्याच जमिनीत उसाची लागवड करण्यासाठी सरीच्या तळाशी बेणे पेरण्यापुरती (एक तास नांगराचे अगर चार दात ठेवून पॉवर टिलरने) मशागत केली. नेहमीप्रमाणे ऊस लागवड केली. उसाची उगवण, फुटवे अवस्था होताच योग्य वेळी उसाची भरणी (खांदणी) केली. भरणीनंतर पुढे उसाची अत्यंत जोमदार वाढ झाली. ऊसतोडणीनंतर उसाचे उत्पादन गेल्या चार वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत २५ ते ५० टक्क्यांनी वाढले. कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय, उलट पूर्व मशागतीचे ६ ते १० हजार वाचून केवळ ३०० रु. खर्चात काम झाले. उसाच्या लागवडीआधी खोडक्‍याचे खत फुकटात मिळाल्याने उत्पादनात वाढ मिळाली होती.
  • घटणारे उत्पादन वाढवताना जमीन सुपीक करण्याचा उद्देश साध्य झाला होता. याला सूक्ष्मजीवशास्त्राची मदत, हेच एकमेव कारण.
  • या प्रयोगातून निघणारे काही निष्कर्ष ः

  • कोणत्याही वनस्पतीचा (पिकाचा) काही भाग जमिनीखाली, तर काही भाग जमिनीच्या वर वाढतो. यापैकी आपल्याला हवा असलेला भाग घेऊन कोणत्या शिल्लक भागाचे खत सर्वांत चांगले? या प्रश्‍नाचे उत्तर जमिनीखालील भागाचे उत्तम. जमिनीपासून जो जो वर वर जाते तो तो हलक्‍या हलक्‍या दर्जाचे खत होत जाते. सर्वांत हलके खत पानांचे. प्रचलित पद्धतीत जमिनीखालील भागाचे खत होऊ शकते, हेच शेतकरीवर्गाला माहीत नाही. सर्व खत शेंड्याचे व पानांचे, म्हणून हलक्‍या दर्जाचे, लवकर संपणारे, परत परत टाकावे लागणारे. जनावरांचे शेण व शेणखत कंपोस्ट म्हणजे जमिनीला अमृत याच भावनेत अजून समस्त शेतकरी समाज आहे.
  • सहज कुजणारे ते सेंद्रिय खत करण्याचे पदार्थ. खोडकी बुडखे खतात लवकर कुजत नाहीत म्हणून जळणासाठी वापरले जातात. मात्र, ती जमिनीसाठी सर्वांत उत्तम हे लक्षात ठेवा.
  • भरपूर मशागत केलेल्या जमिनीपेक्षा शून्य मशागतीची शेती जास्त चांगली पिकते, हा माझा अनुभव आहे. जमिनीची उत्तम मशागत झाली पाहिजे, पण ती कोणाकडून? बैलाने, ट्रॅक्‍टरने, पॉवर टिलरपेक्षाही सूक्ष्मजीवाकडून. सर्वांत चांगली मशागत सूक्ष्मजीवाकडून होते. याला जैविक मशागत असे म्हणतात. जमिनीत मागील पिकाचे अवशेष तसेच ठेवून मारल्यास ते कुजताना मशागतीची सर्व कामे सूक्ष्मजीवाकडून आपोआप होतात. औजाराने पेरणीपूर्वी ३-४ वेळा मशागत करीत असलो, तरी शून्य मशागत तंत्रात सूक्ष्म जीव निरंतर मशागत करीत असतात. म्हणजेच ही शून्य मशागत नसून निरंतर मशागतीची शेती आहे.
    1. शून्य मशागत शेतीवर जगभरातील १०० पेक्षा जास्त देशात संशोधन सुरू आहे. ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे व पॅराग्वे या दक्षिण अमेरिकेतील देशात ८० टक्के शेती शून्य मशागत तंत्रावर चालते. २००८ च्या सर्वेक्षणानुसार जागतिक पातळीवर एकूण १० कोटी हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर शून्य मशागत तंत्राने जाते. भारतात पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेशाचा हिमालयाकडील भाग येथे भात व गहू मोठ्या प्रमाणावर शून्य मशागतीवर घेतला जातो.
    2. मी शून्य मशागत २००५ ला सुरू केली. २००८ मध्ये नवी दिल्ली येथे भरलेल्या जागतिक शून्य मशागत तंत्र अधिवेशनातील चर्चा ऐकली. लिखित साहित्यही मिळाले. माझ्याकडील संदर्भात भर पडली. अधिवेशनात उपस्थित महाराष्ट्रातील शास्त्रज्ञांच्या मते, पंजाब, हरियानामध्ये खरिपाच्या पेरण्या जुलैमध्ये, तर कापण्या नोव्हेंबरमध्ये होतात. यामुळे रब्बी गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबर पुढे जाते. थंडी कमी मिळाल्याने उत्पादन घटते. त्याऐवजी खरीप कापणीनंतर त्वरित शून्य मशागतीवर पेरणी योग्य वेळेत होऊन गव्हाचे उत्पादन चांगले मिळते. आपल्याकडे खरिपाची कापणी सप्टेंबरमध्ये होऊन रब्बीच्या मशागतीसह पेरणीसाठी ३०-४० दिवस आरामात मिळतात. तेव्हा मशागत करूनच पेरणी करणे ठीक, असे मत मांडताना विना नांगरणी तंत्राने पेरणी करणारी यंत्रे महाग असल्याने शेतकरी घेऊ शकणार नाही. महाराष्ट्रातील खडकाळ जमिनीत ती चालणारही नाही, असा निष्कर्ष काढला. या विचारामुळे महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांत या तंत्रावर संशोधन कार्यच झाले नाही.
    3. आमच्या ऊस व भात शेतीत हे तंत्र यशस्वी झाल्यानंतर राज्यातील बहुतेक सर्व पिकांसाठी हे तंत्र शेतकऱ्यांना सुचविले. चालू वर्षी दुष्काळी स्थितीत इतर शेतकऱ्यांची पिके केव्हाच वाळून गेली असली, तरी शून्य मशागतीवरील आमचे पीक अजून हिरवेगार असल्याचे अनेक शेतक-यांनी कळवले आहे. केवळ जलद पेरणी इतक्‍या मर्यादित अर्थाने या तंत्राकडे न पाहता त्यामागील सूक्ष्मजीवशास्त्राचे विज्ञान जाणणे आवश्यक आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com