‘वॉटर बजेट’ कडवंचीचे वैशिष्ट्य

‘वॉटर बजेट’ कडवंचीचे वैशिष्ट्य
‘वॉटर बजेट’ कडवंचीचे वैशिष्ट्य

पाणलोट विकास, पीक बदल, पूरक उद्योगात मनापासून सहभाग आणि प्रतिकूल परिस्थिती बदलण्याची जिद्द जालना जिल्ह्यातील कडवंचीने दाखविली. एकेकाळी मजुरीला जाणारे गाव आज दर वर्षी आठ कोटींची मजुरी देते. गावातील शेती उत्पन्न सुमारे ७५ कोटींपर्यंत गेले. म्हणूनच मराठवाड्यासह कोरडवाहू शेतीला नवी दिशा देण्याची ताकद कडवंचीमध्ये आहे.

कडवंचीतील शेतकरी संवाद कार्यक्रम. खरपुडी कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांची चर्चा रंगलेली...या चर्चेदरम्यान एका शेतकऱ्याने विचार मांडला की, तुम्ही पीक उत्पादन वाढ, नवीन जाती, खतांचा कार्यक्षम वापर, आंतरपीक पद्धतीबाबत नवं तंत्रज्ञान सांगताय, आमच्या दृष्टीने ते फायदेशीर आहे. पण आमचा मूळ प्रश्न आहे, पाण्याची मर्यादा... येथे मोठे धरण नाही, कॅनॉल नाही. पाणीटंचाईचा मूळ प्रश्न सोडवला तर पीक लागवड, उत्पादन वाढ चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो...

यावर मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्‍वस्त कृषिभूषण विजयअण्णा बोराडे म्हणाले, की तुमचे म्हणणे बरोबर आहे, पाण्याशिवाय शेती विकासाला गती शक्य नाही. आम्ही संस्थेच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यातील आडगाव (पिंप्रीराजा) शिवारात जल, मृदसंधारणाचे काम केले. त्याचे चांगले परिणाम दिसताहेत. तुम्ही त्या गावात जाऊन पाणलोटाची कामे पाहा. कडवंचीमधील गावकऱ्यांची श्रमदान आणि जल, मृदसंधारणाच्या कामासाठी तयारी असेल तर पाणीप्रश्न सोडवूच, त्याचबरोबरीने शेती, पूरक उद्योगांना नवी दिशा देऊ. तत्काळ गावकऱ्यांनी सर्व संमतीने पाणलोटाच्या कामांना मान्यता दिली  आणि विकासाच्या दिशेने प्रवास सुरू झाला...

गाव बदलाबाबत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख एस. व्ही. सोनुने म्हणाले की, कडवंची हे कृषी विज्ञान केंद्राचे पहिले दत्तक गाव. कृषी विज्ञान केंद्राने १९९५-९६ मध्ये नाबार्ड पुरस्कृत इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. लोकसहभागातून १८०० हेक्‍टर पाणलोट विकासाची संकल्पना मांडली, त्यास गावकऱ्यांनी तत्काळ सहमती दर्शविली. मराठवाडा शेती साह्य मंडळाचे विश्‍वस्त कृषिभूषण विजयआण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवातीला लोकांची क्षमता बांधणी आणि नंतर प्रत्यक्ष कामास सुरवात झाली. सन १९९५ ते २००१-०२ या कालावधीत श्रमदानातून माथा ते पायथा पाणलोटाची कामे झाली. बहुतांश जमीन फळबागेस योग्य असल्यामुळे डाळिंब, सीताफळ, चिंच, द्राक्ष अशी मध्यम ते कमी पाण्यावर येणारी आणि हमखास उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या लागवडीस चालना मिळाली. हंगामी पिकाच्या नवीन जाती, भाजीपाला, फूलशेती, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय यांसारख्या पूरक उद्योगांच्या उभारणीमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. पडणारा पाऊस गावशिवारात मुरला, विहिरींचा झिरपा वाढला, गावातील नाले वाहू लागले. जमिनीत ओलावा टिकला. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल झाली. मराठवाड्यासारख्या भागात द्राक्ष बाग रुजली. याच पिकाने आर्थिक ताकद दिली.

वॉटर बजेटनुसारच पीक नियोजन कडवंची हे गाव संरक्षित पाण्यासाठी शेततळे आणि विस्तारणाऱ्या द्राक्ष शेतीसाठी ओळखले जाते. मात्र सरासरी पर्जन्यमानापेक्षा ५० टक्क्यांच्या आत पाऊस झाल्यासच शेततळ्यातील पाण्याचा उपयोग केला जातो. सरासरी पाऊस (६०० मिमी) झाल्यास शेततळ्यातील पाण्याची फारशी गरज पडत नाही. विहिरीतील उपलब्ध पाण्यावरच सिंचन होते. शेततळ्यातील पाणी हे बॅंकेतील ठेवीसारखे अडचणीच्या काळात वापरले जाते.

केव्हीकेतील कृषी अभियंता पंडित वासरे गावाच्या ‘वॉटर बजेट’बाबत म्हणाले की, गावशिवारात २०० मिमि (३० ते ३५ टक्के) पाऊस झाला तर फक्त द्राक्ष हंगाम घ्यायचा, बाकी शेती पडीक ठेवायची. संरक्षित पाणी जनावरे आणि कुटुंबासाठी पुरते. समजा ४०० मिमि (६० ते ६५ टक्के) पाऊस पडला तर द्राक्ष बागेसाठी शेततळे भरायचे, खरिपाचा हंगाम आणि पुढे चारा पीक घ्यायचे, त्याला एक संरक्षित पाणी द्यायचे. पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पाणी शेततळ्यात राखीव ठेवायचे. समजा ७०० मिमी (सरासरीच्या १०० टक्के) पाऊस पडला तर सर्व शेतीला पुरेल येवढे पाणी उपलब्ध होते, पण तेदेखील पुढील जुलैपर्यंत काटकसरीने वापरायचे. हे गावाने मांडलेले शेततळ्याचे वॉटर बजेट. सर्व फळबाग ठिबक सिंचनाखाली आहे. ठिबक सिंचन केल्याशिवाय रोप लागवड नाही असा ‘पण’ केलेले हे गाव आहे. सध्याच्या भीषण दुष्काळातही सुमारे ५०३ शेततळ्यांमध्ये २५० कोटी लिटर संरक्षित पाणीसाठा आहे. जल, मृद संधारण, पीक बदल, शेततळ्यातून सरंक्षित साठा करत गावाने हंगामी तसेच फळपिकातून क्रांती केली. शेतीला पूरक उद्योगांचीही जोड दिली.

पीक बदलाला सुरवात

  • एक पीक पद्धतीचा धोका लक्षात घेऊन द्राक्षाच्या बरोबरीने पेरू, सीताफळ, पपई लागवडीकडे शेतकरी वळताहेत. गावात
  • दहा पपई उत्पादकांचा गट तयार झाला आहे. उपलब्ध जमीन, पाणीसाठवण क्षमता
  • यांच्या मर्यादेचा विचार करता भविष्यात पर्यायी पीक पद्धती आणि एकात्मिक
  • शेती पद्धती शेतकऱ्यांमध्ये रुजू लागली आहे.
  •   भाजीपाला, फूलशेती, बांबू लागवडीला चालना. शेततळ्यात मत्स्यपालनास लवकरच सुरवात. शेतकरी, महिला बचत गटातून शेळीपालन, कुक्कुटपालन, फळे व भाजीपाला प्रक्रियेवर भर. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन, बेदाणा निर्मिती उद्योगाच्या दृष्टीने तयारी.
  •   स्वयंचलित हवामान केंद्र, गोदाम उभारणी, शेतकरी कंपनीचे नियोजन.
  • शेतकरी गटातून पीक नियोजन

  • हलकी जमीन, मध्यम जमीन आणि भारी जमिनीतील द्राक्ष लागवडीनुसार शेतकऱ्यांचे पीक निहाय गट.
  •    नाशिक, सोलापूर भागातील द्राक्ष बागायतदार, द्राक्ष बागायतदार संघ आणि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून दर्जेदार उत्पादनासाठी बाग व्यवस्थापनात गरजेनुसार बदल.
  •  दर महिन्याच्या पाच तारखेला खरपुडीला चर्चासत्र. गावात हंगामानुसार विविध पिकांच्या चर्चासत्रांचे आयोजन.
  • ग्रामपंचायतीचादेखील तंत्रज्ञान प्रसारामध्ये सहभाग.
  • गावामध्येच विदर्भ, परराज्यातील व्यापारी द्राक्ष खरेदी करतात. जागेवर प्रति किलो ३० ते ३५ रुपये दर, शेतकऱ्यांच्या नफ्यात चांगली वाढ.
  •  १९९५ च्या दरम्यान गावाचे शेतीतील उत्पन्न होते ७७ लाख ते आज सुमारे ७५ कोटींच्याही पुढे.
  •  गाव दरवर्षी सुमारे आठ कोटी रुपयांची देते मजुरी.
  • शेतीमध्येच गुंतवणूक गावातील शेतकऱ्यांनी गेल्या दहा, पंधरा वर्षांत द्राक्षातून मिळालेला पैसा हा शेती विकासातच गुंतवला आहे. गावातील ९५ टक्के शेतकरी शेतावरच राहतात. गावात फारसे कोणी दिसत नाही. पाइपलाइन, द्राक्ष बाग उभारणी, ठिबक सिंचन, शेततळे, फवारणी यंत्रणा, विहिरीवर पंप, ट्रॅक्टर आणि वाहतुकीसाठी गाड्या, मुलांच्या शिक्षणामध्येच बहुतांश गुंतवणूक आहे. गेल्या दोन, चार वर्षांत शेतात बंगले उभे राहू लागले आहेत.

    शिक्षण, पूरक उद्योगांची उभारणी

  • आरोग्य आणि शिक्षण सुविधांमध्ये सुधारणा. काही मुले, मुली इंग्रजी माध्यम शाळेत.
  •  दहावी, बारावीनंतर मुला, मुलींचा कृषी, अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, एमबीएकडे कल.
  • युवा पिढी शेतीबरोबरीने नव्या बाजारपेठांच्या शोधात. प्रक्रिया उद्योग, रोपवाटिका,
  • यंत्रे-अवजारे उद्योग, पशुपालनाचे नियोजन.
  • शेतकऱ्यांचे व्हॉटसॲप ग्रुप, तंत्रज्ञान प्रसार, मोबाईलवर कृषी सल्ला सेवा. वेबसाईट लवकरच.
  •  ‘कडवंची ग्रेप्स' हा ब्रॅंड बाजारपेठेत उतरवण्याची तयारी सुरू.
  • सासरी अन् माहेरी द्राक्ष बागेतून समृद्धी द्राक्ष बाग उभारणी, व्यवस्थापन, फवारणी, थेट विक्री असो की तंत्रज्ञान प्रसार गावातील महिला आघाडीवर आहेत. याबाबत पंडित वासरे म्हणाले, की गेल्या दहा वर्षांत जालना जिल्ह्यात द्राक्ष बाग वाढण्यामागचे कारण आहे कडवंची गावातील मुली. लहानपणापासून द्राक्ष बागेच्या व्यवस्थापनात असल्याने त्यांना चांगला अनुभव आहे. गावातून सासरी गेलेल्या मुलींनी तेथे द्राक्ष बाग उभारली. तर कडवंचीमध्ये ज्या मुली सासरी आल्या त्यांनी द्राक्ष व्यवस्थापनाचे तंत्र आत्मसात करत त्यांच्या माहेरी द्राक्ष बाग उभारली. कडवंची परिसरातील नंदापूर, बोरखेडी, वरूड, नाव्हा, धार कल्याण, पीर कल्याण, वखारी, वडगाव, गवळी पोखरीमध्ये द्राक्ष बागा वाढल्या. शेततळे, जल, मृद संधारणाचे तंत्रही रुजलं आहे.

    ग्रामगीता महिला ग्रामसंघ

  •  गावात सव्वीस महिला बचत गट, सुमारे २८८ महिलांचे संघटन.
  •  गटाच्या एकत्रीकरणातून ग्रामगीता महिला ग्रामसंघ.
  •  आर्थिक बचतीबरोबरीने पशुपालन, शेळी-कुक्कुटपालन, ठिबक सिंचन, शेततळे खोदाई, द्राक्ष बाग उभारणीत गुंतवणूक.
  • - पंडित वासरे, ९४२२७०१०६५, ७३५००१३१५१, (०२४८२) २३५५८६ (कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जि. जालना)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com