द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या भुंगेऱ्याचे व्यवस्थापन

पूर्वी उडद्या किडीचा प्रादुर्भाव फक्त कोवळ्या फुटी असेपर्यंत दिसत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून उडद्या किडीचा प्रादुर्भाव कोवळ्या फुटींसोबतच, तो आता द्राक्ष घड व मण्यांवर दिसू लागला आहे. यामुळे या किडीच्या नियंत्रण व्यवस्थापनाच्या दृष्टीने संपूर्ण फळछाटणी हंगामाचे नियोजन करणे गरजेचे आहे.
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या भुंगेऱ्याचे व्यवस्थापन
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या भुंगेऱ्याचे व्यवस्थापन

द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पूर्वी उडद्या किडीचा प्रादुर्भाव फक्त कोवळ्या फुटी असेपर्यंत दिसत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून उडद्या किडीचा प्रादुर्भाव कोवळ्या फुटींसोबतच, तो आता द्राक्ष घड व मण्यांवर दिसू लागला आहे. यामुळे या किडीच्या नियंत्रण व्यवस्थापनाच्या दृष्टीने संपूर्ण फळछाटणी हंगामाचे नियोजन करणे गरजेचे आहे. जीवनचक्र ः उडद्याच्या नियंत्रणासाठी जीवनचक्र जाणून घेतले पाहिजे. त्यानुसार दोन टप्प्यांत नियंत्रणाच्या उपाययोजना राबवाव्यात. उडद्या किडीच्या चार अवस्था - अंडी, अळी, कोष आणि प्रौढ कीटक. अशा चार अवस्था असतात

  • १) त्यापैकी अंडी, अळी व कोष अवस्था या जमिनीमध्ये असतात. या अवस्थांचे नियंत्रण करण्यासाठी क्लोथियानिडीन (५० डब्ल्यूडीजी) २०० ग्रॅम प्रति एकर किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) १.५ मि.लि. प्रति झाड या प्रमाणे जमिनीत आळवणी करावी. यामुळे अळी अवस्थेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. या आळवणीमुळे भविष्यात तयार होणाऱ्या प्रौढांचे प्रमाण आपोआप नियंत्रणात राहते.
  • २) उडद्या किडीची केवळ प्रौढ अवस्थाच जमिनीबाहेर राहून द्राक्ष बागेत नुकसान करते. प्रौढ हे दिवसा उष्णतेपासून बचावासाठी द्राक्ष वेलीवर सावलीच्या बाजूस, पानांमध्ये किंवा तणांमध्ये, झाडाच्या सालीत किंवा जमिनीमध्ये मातीआड जाऊन बसतात. यामुळे या किडीसाठी दिवसा घेतलेली फवारणी फारशी फायदेशीर ठरत नाही. उडद्या कीड ही प्रामुख्याने अंधार सुरू झाल्यानंतर सक्रिय असते. त्यामुळे संध्याकाळी ७ वाजल्यानंतर म्हणजे थोड्या अंधारातच घ्यावी. द्राक्ष वेलीवर सक्रिय असलेले उडद्या किडीचे प्रौढ फवारणीच्या थेट संपर्कात आल्याने चांगले नियंत्रण मिळू शकेल.
  • उडद्याच्या नियंत्रणासाठी  पहा Video...  

    वेगवेगळ्या अवस्थेनुसार उपाययोजना ः १) फळछाटणीनंतर अवस्था ः फळछाटणीनंतर डोळे फुगण्याची अवस्था किंवा फुटी फुटत असतानाच्या अवस्थेत इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एसएल) १६० मि.लि. प्रति एकर या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी घ्यावी. या फवारणीमुळे उडद्याबतच पिठ्या ढेकूण, फुलकिडे व तुडतुडे यांच्या नियंत्रणासही मदत होते. उडद्याच्या नियंत्रणासाठी प्रभावी कीटकनाशके (डोस प्रति एकर)

  • स्पिनोसॅड (४५ टक्के एससी) १०० मि.लि.
  • स्पिनेटोराम (११.७ टक्के एससी) १२० मि.लि.
  • फिप्रोनिल (८० टक्के डब्ल्यूजी) २५ ग्रॅम
  • इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के एसएल) १६० मि.लि.
  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.९ टक्के सीएस) २०० मि.लि.
  • स्पिनोसॅड व स्पिनेटोराम (११.७ टक्के एससी) यांचा वापर सुरुवातीला म्हणजे प्राथमिक फुटीच्या व सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत करण्याऐवजी अन्य कीटकनाशकांचा वापर आधी करावा. त्यानंतरही उडद्याचे नियंत्रण मिळत नसल्यास स्पिनोसॅड व स्पिनेटोराम यांचा वापर करावा. २) सक्रिय वाढ अवस्था (१५-२० दिवस) : या अवस्थेत फुलकिडीसाठी नियंत्रणाचे उपाय केले जातात. त्यासाठी वापरली जाणारी फिप्रोनील, स्पिनोसॅड, स्पिनेटोराम यांच्या फवारणीनेही उडद्याचेही नियंत्रण मिळते. फुलकिडीसाठी वापरली जाणारी इमामेक्टीन बेंझोएट व सायॲण्ट्रानिलिप्रोल ही कीटकनाशके उडद्यासाठी प्रभावी नाहीत. तुडतुड्यांसाठी वापरल्या जाणारी फिप्रोनील, इमिडाक्लोप्रिड, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ही कीटकनाशके उडद्यासाठी उपयुक्त ठरतात. तुडतुडे नियंत्रणासाठीचे बुप्रोफेझिन हे उडद्या नियंत्रणासाठी काम करत नाही. फिप्रोनीलच्या फवारणीतून फुलकिडे, तुडतुडे, अळी व उडद्या या सगळ्या किडींवर नियंत्रण मिळते. त्याच्या क्रियेची पद्धत वेगळी असल्याने ही किडीमध्ये प्रतिरोधक क्षमताही तयार होण्याची शक्यता कमी होते. यामुळे फिप्रोनीलची एक फवारणी सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत महत्त्वाची आहे. ३) फुलोरा व मणी सेटिंग अवस्था (३१-५० दिवस) : उडद्या प्रादुर्भाव दिसत असल्यास या कालावधीत फुलकिडीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पिनोसॅड व स्पिनेटोराम या फवारणीतूनही नियंत्रण होईल. फिप्रोनीलची फवारणी फुलोरा व त्यानंतर घ्यावयाची नसेल, तर पहिल्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत एक फवारणी घ्यावी. पिठ्या ढेकणासाठी फुलोऱ्याच्या जवळपास अवस्थेमध्ये जमिनीतून आळवणी करतात. या आळवणीमुळे जमिनीत असणाऱ्या उडद्या किडीच्या अळी अवस्थेचाही बऱ्यापैकी नाश होतो. पिठ्या ढेकूणसाठी वापरणाऱ्या ब्रूप्रोफेझिनचा उडद्या नियंत्रणासाठी उपयोग होत नाही. ४) मणी वाढीची अवस्था (५०-७५ दिवस) : यामध्ये मणी सेटिंगनंतर अतिरिक्त कोवळी वाढ असते. ती वेळीच काढत राहावे. यामुळे द्राक्ष बागेत फुलकिडे, तुडतुडे, उडद्या, अळी या बहुतेक सगळ्यांच किडींचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. कारण त्यातून एकाच वेळी वेलीची वाया जाणारी अन्नद्रव्ये आणि अनेक फवारण्या वाचू शकतात. या अवस्थेमध्ये फुलकिडे, तुडतुडे, अळी यांचा प्रादुर्भाव दिसल्यास त्यावर इमामेक्टिन बेंझोएटची फवारणी प्रभावी नियंत्रण करू शकते. जर फुलकिडीसोबत उडद्या किडीचाही प्रादुर्भाव दिसत असेल तर स्पिनोसॅडची फवारणी दोन्हीवर उत्तम नियंत्रण मिळवून देईल. ५) होरायजन अवस्था (>७५ दिवस) : ७५ दिवसांनंतर मण्यांवर उडद्याचा प्रादुर्भाव दिसत नाही. परिणामी, नुकसान फारसे होत नाही. मात्र नवीन अतिरिक्त वाढ वेळोवेळी काढत राहिली पाहिजे. टीप ः निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी, अवशेष निरीक्षण कार्यक्रमाच्या ‘अनेक्श्‍चर ५’चे पालन करणे अनिवार्य आहे. डॉ. दीपेंद्र सिंह यादव, ९२७२१२२८५८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com