agricultural stories in Marathi,information about percolation tank | Agrowon

योग्य ठिकाणीच करा पाझर तलाव
डॉ. उमेश मुंडल्ये
बुधवार, 8 मे 2019

पाझर तलावाचा उपयोग आणि प्रयोजन हे केवळ पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता, काही काळ थांबेल आणि त्यामुळे ते जमिनीत जिरून भूजल साठा वाढेल यासाठी आहे. हा काही साठवणीचा तलाव नव्हे, हे लक्षात घ्यावे. पाझर तलाव हा जर गावाच्या वरच्या बाजूला असेल, तर पडणाऱ्या पावसाचे पाणी या पाझर तलावात काही काळ थांबेल आणि जमिनीत मुरून हळूहळू खाली येईल.

पाझर तलावाचा उपयोग आणि प्रयोजन हे केवळ पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता, काही काळ थांबेल आणि त्यामुळे ते जमिनीत जिरून भूजल साठा वाढेल यासाठी आहे. हा काही साठवणीचा तलाव नव्हे, हे लक्षात घ्यावे. पाझर तलाव हा जर गावाच्या वरच्या बाजूला असेल, तर पडणाऱ्या पावसाचे पाणी या पाझर तलावात काही काळ थांबेल आणि जमिनीत मुरून हळूहळू खाली येईल.

मागच्या लेखात आपण प्राचीन जलस्रोत असलेल्या झऱ्यांचा उपयोग जलसंधारण करायला कसा करता येतो याबद्दल माहिती घेतली. हे झरे पुढे उताराने वाहायला लागतात आणि त्यांचे रुपांतर ओढ्यांमध्ये होते. जसे झरे डोंगरात साठवलेले पाणी एका मर्यादेनंतर पुढे जाऊ देतात, तसंच त्या त्या भागातील जमीनदेखील पाणी शोषून घेते, साठवून ठेवते आणि पुढे उताराने जाऊ देते. हेच पाणी सर्व परिसरातून जमिनीत मुरते. तिथे असलेल्या मातीच्या गुणधर्मानुसार पाणी पुढे जाऊ देते. जलसंधारण करताना सध्या लोकप्रिय असलेला आणि तुलनेने सोपा असणारा उपाय आहे पाझर तलाव.

अनेक ठिकाणी जलसंधारण करताना त्या विषयातील तज्ज्ञांचा सल्ला न घेता आपल्या मनाला पटेल अशा पद्धतीने काम करण्याची पद्धत आहे. एकूणच पाणी आणि पर्यावरण क्षेत्रात काही अभ्यास करायची गरज आहे हेच खूप लोकांच्या जाणीवेत नाही. केवळ कोणीतरी कुठेतरी सांगते म्हणून, किंवा कुठेतरी वाचून फारसा विचार किंवा अभ्यास न करता कामे केली जात आहेत. त्याचे दुष्परिणामही बघायला मिळत आहेत. हे अगदी पाझर तलावासारख्या तुलनेने सोप्या उपायातही बघायला मिळते.

पाझर तलाव कुठे करावा याबद्दलही अनेक ठिकाणी गैरसमज आढळतात. पाणलोट क्षेत्र विकास करताना त्यातील प्रत्येक उपाय हा स्थलानुरूप असायला हवा ही प्राथमिक माहिती अनेक लोकांना नसते, ही सध्याची परिस्थिती आहे. मला आलेल्या एका अनुभवाबद्दल सांगतो, म्हणजे सध्याची बहुसंख्य कामे काय विचार करून केली जातात हे लक्षात येईल. एका संस्थेने घेतलेल्या जलसंधारण स्पर्धेत एका गावात एक पाझर तलाव खोदला गेला. पाझर तलाव झाला, त्यात पाणी साठले. पण ते पाणी काही जमिनीत मुरेना. पाणी गावापासून उंचावर, लांब अडवलं होतं, त्यामुळे गावाला काहीच उपयोग होत नव्हता. गंमत तर पुढे आहे. या पाझर तलावाच्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला लोकांनी विहीर खणली, तर चाळीस फुटांपर्यंत पाणी लागत नाही ही समस्या घेऊन त्या गावात काम करणारी संस्था माझ्याकडे आली होती. मी त्यांना विचारलं, कोणत्या तज्ज्ञाने पाझर तलावाची जागा निवडली त्याला आधी विचारा, कारण त्याने काही विचार करून हा उपाय आणि ती जागा निवडली असेल. त्यावर उत्तर आले की, हे गावातल्या लोकांनीच ठरवलंय. आम्ही इंटरनेटवर काही शोध घेतला आणि काही कृषी अधिकाऱ्यांशी बोललो आणि हा निर्णय घेतला. विहिरीचा निर्णय लोकांनी घेतला आणि त्याचे सोपे कारण म्हणजे त्या जमीन मालकाने तिथे विहीर करायला परवानगी दिली.

कोणत्याही तांत्रिक अभ्यासकाने अस्वस्थ व्हावे अशी मानसिकता समाजात रुजली आहे. जल निरक्षरता इतकी वाढली आणि रुजली आहे की, पाणी या विषयात काही अभ्यासाची गरज आहे, आपल्याला वाटतंय की आपल्याला कळतंय, पण तो गैरसमज आहे. योग्य तज्ज्ञाला काम करायच्या आधी विचारायची गरज आहे, हीच जाणीव सध्या हरवली आहे. केवळ तुमचं ध्येय किंवा हेतू चांगला असून पुरत नाही, तर त्या विषयातील योग्य तांत्रिक ज्ञान तुमच्याकडे आहे का हेही खूप महत्त्वाचं ठरते. नुसते जमिनीला छिद्र पाडून पाणी मिळतंच असं नाही. जिथे भूगर्भात पाणीसाठा होऊ शकतो तिथे जमिनीला छिद्र पाडले तर पाणी मिळते, ही बाब बहुसंख्य लोकांच्या कल्पनेबाहेर आहे.

पाझर तलावाची निर्मिती

  • पडणारे पावसाचे पाणी कुठेही पाझर तलाव करून त्यात अडवता किंवा साठवता येते, हे बरोबर असले तरी अशा प्रकारे साठवलेल्या पाण्याचा उपयोग आहे की नाही याचा विचार आणि अभ्यास करून पाझर तलावाची जागा निश्चित केली तर फायदा होतो.
  •  आपण पाझर तलाव करणार आहोत त्या ठिकाणी मातीचा थर किती आहे, आपण ज्या खोलीपर्यंत तलाव खणत आहोत, त्या खोलीला तळाला माती आहे, मुरूम आहे की कातळ आहे, याचा अभ्यास करून त्या तलावाचे आकारमान निश्चित करावे लागते.
  •  जर तळाला कातळ आला तर पाणी खाली जिरू शकत नाही, तर आजूबाजूच्या जमिनीत माती असेल तिथे पसरते. जर खाली माती किंवा मुरूम असेल पाणी काही काळ थांबते आणि मग हळूहळू जमिनीत जिरून उताराने मार्गक्रमण करते किंवा त्या परिसरात साठून एक भूजल साठा वाढायला मदत करते.
  • पाझर तलावाचा उपयोग आणि प्रयोजन हे केवळ पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता, काही काळ थांबेल आणि त्यामुळे ते जमिनीत जिरून भूजल साठा वाढेल यासाठी आहे. हा काही साठवणीचा तलाव नव्हे. त्यामुळे जर आपण केलेल्या पाझर तलावात पाणी साठून राहत असेल आणि आजूबाजूच्या भूगर्भात पाणी मिळत नसेल, तर आपली जागा चुकली आहे हे नक्की समजावे.
  •  पाणलोट क्षेत्र विकास करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी उपाययोजना करत आहोत त्याची योग्य जागा निवडणे. पाझर तलाव हा जर गावाच्या वरच्या बाजूला (पाण्याच्या प्रवाहाच्या) असेल, तर पडणाऱ्या पावसाचे पाणी या पाझर तलावात काही काळ थांबेल आणि जमिनीत मुरून हळूहळू खाली येईल. त्याचा फायदा म्हणजे गावामध्ये असलेल्या विहिरींना पाण्याचा अतिरिक्त पुरवठा होईल. त्यामुळे गावातील विहिरींची जलधारण क्षमता वाढेल आणि विहीर जास्त काळ आणि जास्त पाणी देईल. याचा दुसरा फायदा हा की गावाच्या वरच्या बाजूला पाणी अडवल्यामुळे उतारावरून पाण्याबरोबर वाहून येणाऱ्या मातीचे प्रमाणही कमी होईल आणि जलसंधारण करतानाच मृद संधारण होत राहील.
  •  पाझर तलावाचे आकारमान, खोली ही त्या ठिकाणी होणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर आणि प्रकृतीवर अवलंबून आहे. पाण्याचे काम करताना जास्त काम म्हणजे चांगले काम असे नसते, तर योग्य ठिकाणी योग्य काम म्हणजे चांगले काम. ही काही स्पर्धा करायची बाब नाही.
  •  स्पर्धा म्हटले की एकमेकांच्या पुढे जाणे असते, ज्यात तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त काम करता आणि कधी कधी हे जास्त केलेले काम नुकसानदायक ठरू शकते. उदाहरणार्थ, कमी पाऊस पडणाऱ्या भागात खूप मोठे पाझर तलाव केले, तर त्यात पाणी येऊन थांबेल आणि हळूहळू जिरेल ही कल्पना बरोबर. पण जर पाणी जिरण्याचा वेग कमी असेल, तर साठलेल्या पाण्यापैकी मोठा भाग बाष्पीभवन होऊन कमी होण्याची भीती असते. त्यातच पाऊस कमी असतो, तिथे एकावेळी जास्त पाऊस पडणे पण क्वचित घडते. त्यामुळे अशा ठिकाणी उत्साहाने जास्त काम करणे तिथल्या लोकांना उन्हाळ्यात खूप त्रासदायक ठरू शकते. पावसाळ्यात पाणी येऊन साठते आणि फार कमी जमिनीत मुरते, बाकी बाष्पीभवन होऊन वाफ होऊन जाते. शेवटी ज्या उन्हाळ्यासाठी म्हणून हे प्रयत्न केले असतात, त्या वेळी पाणीटंचाई समोर उभी राहते.
  •   जलसंधारण करताना लक्षात ठेवायचे की, पाणी जिरवण्याचे, वेग कमी करण्याचे उपाय हे प्रवाहाच्या आणि गावाच्या वरच्या बाजूला योजावेत आणि पाणी साठवण्याचे उपाय हे गावात आणि गावाच्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला योजावेत. म्हणजे त्या त्या भागातील पाणी परिस्थितीमध्ये सुधारणा करता येणे शक्य होते.

- डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६०

(लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)

 

फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
विना कंत्राट, विना अनुदान  शिवार रस्ते...नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या...
कन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...
लोकसहभागातून कुरण विकासाची गरजगवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत,...
मांडा जलसंधारणाच्या कामाचे गणितमागच्या भागात आपण नागरी आणि ग्रामीण भागातील...
बहुवीध पीक पद्धतीतून चांडोलीच्या...चांडोली खुर्द (जि. पुणे) हे गाव १९८५ पर्यंत...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
काटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द...खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी...
जीविधेची जाणीव करून देणारी आनंदशाळाशिक्षण गुणवत्तापूर्ण बनण्यासाठी शिक्षण...
योग्य पद्धतीने करा कूपनलिका पुनर्भरणमागच्या भागात आपण विहीर आणि कूपनलिका यांमधील फरक...
गटशेतीच्या सुलभ व्यवस्थापनासाठीशेतकरी गट स्थापन होऊन गटशेतीस सुरवात करताना पुढील...
गोष्ट तलावांचा श्वास मोकळा करण्याची...तलावांमध्ये बेशरम वनस्पतीचा पसारा वाढला तर आवश्यक...
भाजीपाला पिकातून कळवंडे झाले...रत्नागिरी जिल्ह्यातील कळवंडे (ता. चिपळूण) गाव...
कोरडवाहूमध्ये कमी खर्चात उत्पादनासह...अवर्षण स्थितीमध्ये सर्वांत अधिक फटका हा कोरडवाहू...
विहीर अन्‌ कूपनलिका नेमकी कोठे खोदावी?आपल्या जागेमध्ये विहीर करायची की कूपनलिका करायची...
गटशेतीतील जबाबदाऱ्यांचे वाटपशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
सुधारित शेती, ग्रामविकासाच्या...लहान (ता.अर्धापूर, जि. नांदेड) गावातील...
भूमिगत बंधारा वाढवेल विहिरींची पाणी...सध्या अनेक गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर...
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...