तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी द्या

आच्छादन केल्यामुळे तुतीची चांगली वाढ होते. पाणी बचत आणि तण नियंत्रण होते.
आच्छादन केल्यामुळे तुतीची चांगली वाढ होते. पाणी बचत आणि तण नियंत्रण होते.

तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन फायदेशीर ठरते. यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहतो, तणांची वाढ होत नाही. काळे पॉलिथीन आच्छादन व ठिबक सिंचन दोन्ही पद्धती एक वेळा तीन फूट पट्ट्यात वापरता येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होते. तुतीची वाढ झपाट्याने होते.

पट्टा पद्धतीने बागायती तुती लागवडीत तणाची वाढ झपाट्याने होते. यामुळे तुती वाढीवर परिणाम होतो. पानांचे उत्पादन घटल्याने कोष उत्पादनात घट येते. शेतात कामासाठी मजूर मिळत नसल्याने तण नियंत्रण अवघड झाले आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत पावसाचे दिवस कमी होत असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर जात आहे. त्याचा तुती वाढीवर परिणाम दिसत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कोष उत्पादनात घट येत आहे. पट्टा पद्धतीने लागवड केलेल्या तुती लागवडीत पाण्याचे जास्त प्रमाणात बाष्पीभवन होते आणि उर्वरित पाणी तण वाढीस कारणीभूत ठरते, त्यामुळे पर्यावरणपूरक तण नियंत्रण पद्धत विकसित होणे गरजेचे आहे.

  • तण नियंत्रण, जमिनीतील पाण्याचा ओलावा टिकवून ठेवणे आणि तुती पाने उत्पादन वाढीसाठी तुती लागवडीत आच्छादन करणे गरजेचे आहे. तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन फायदेशीर ठरले आहे. यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहतो, तणांची वाढ होत नाही.
  • तुती बागेत काळ्या रंगाचे २०० गेज जाडीचे लोडेन्सीटी पॉली इथिलीन शीट आच्छादन म्हणून वापरावे.
  • एक एकर तुती बागेत साधारणतः २०० किलो पॉलिथीन शिट आच्छादनासाठी लागते. प्रत्येक ६० ते ७० दिवसांच्या दरम्यान तुती छाटणीच्या वेळी आणि खत दिल्यानंतर, तुती लागवडीमध्ये तण काढून आच्छादन  करावे. वाऱ्याने उडू नये म्हणून त्यावर थोडी माती पसरावी.
  • तुती लागवडीत ५ x ३ x २ किंवा ६ x ३ x २ फूट अंतरावरील पट्टा पद्धतीमध्ये काळे पॉलिथीन आच्छादन कायम ठेवले तरी चालते. पण दोन पट्ट्यातील अंतर ५ किंवा ४ फुटापेक्षा कमी म्हणजेच ३ फूट असेल तर तुती छाटणी व आंतर मशागतीच्या वेळी पॉलिथीन आच्छादन काढून घ्यावे. पुन्हा पाण्याच्या पाळ्या देण्यापूर्वी पट्ट्यात आच्छादन पसरवून द्यावे.
  • काळे पॉलिथीन आच्छादन व ठिबक सिंचन दोन्ही पद्धती एक वेळा ३ फूट पट्ट्यात वापरता येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होते. तुतीची वाढ झपाट्याने होते.
  • काळे पॉलिथीन आच्छादनामुळे तण निंदणीचा खर्च वाचतो. इतर आच्छादनाच्या तुलनेत २० टक्के जास्त तण नियंत्रण काळ्या पॉलिथीन आच्छादनामुळे होते.
  • बागायती, कोरडवाहू तुती लागवडीत उन्हाळ्यात काळ्या पॉलिथीन आच्छादनाचा वापर केल्यास तुती पानाची उत्पादकता वाढते आणि कोषाचे पीक घेणे शक्‍य होते.
  • रोपवाटिकेत लहान रोप वाढीच्या काळात तण हे जागा आणि पाण्यासाठी स्पर्धा करते. खूप ठिकाणी तुती बेण्याचा डोळा फुटण्याच्या आत तण उंच वाढते. अशावेळी मजुरांच्या सहाय्याने तण नियंत्रण अडचणीचे होते. कारण लागवड केलेले बेण्यास इजा झाली तर रोप मरण्याची दाट शक्‍यता असते. त्यामुळे रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव होत नाही. रोपांची जोमदार वाढ होते.
  • आच्छादनाचे फायदे

  • काळे पॉलिथीन आच्छादनाच्या अपारदर्शकतेमुळे तण नियंत्रण होते.
  • जमिनीत पाण्याचा ओलावा टिकून राहतो.
  • मुळांच्या भागातील जमिनीचे तापमान कमी राहिल्यामुळे झाडांच्या वाढीस बळकटी मिळते. पानांच्या उत्पादनात वाढ होते.
  • प्रयोगाचे निष्कर्ष

  • एक एकर क्षेत्रासाठी काळे पॉलिथीन (२०० गेज) आच्छादन करण्यासाठी सरासरी आठ हजार रुपये खर्च येतो. बाजारपेठेतील दरनुसार खर्चात वाढ होऊ शकते. पॉलिथीनचा दर जाडीनुसार असतो. एकदा खरेदी केलेले पॉलिथीन शिट व्यवस्थित वापर केल्यास तीन वर्ष टिकते.
  • काळे पॉलिथीन आच्छादन असलेल्या बागेतून २,७२५ किलो पानाचे जास्त उत्पादन आच्छादन न केलेल्या बागेपेक्षा मिळाले आहे.
  • काळे पॉलिथीन आच्छादन केलेल्या रोपवाटिकेत १६ टक्के जास्त रोपाची वाढ आच्छादन न केल्याच्या तुलनेत आढळून आली. त्यामुळे  प्रतिएकरी १८,५५५ जास्तीची रोपे मिळाली. निंदणी खर्चात ७,५०० रुपये बचत झाली. एकरी २६,०८८ एवढा फायदा झाला.
  • तुती लागवडीमध्ये पाणी व्यवस्थापन

  • रेशीम कोषाचे एक पीक निघण्यासाठी २५ ते २८ दिवसांचा कालावधी लागतो. दर्जेदार तुती पाने उत्पादन वाढीसाठी पाण्याची प्रत व पानांच्या उत्पादनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे.
  • दर ६० ते ७० दिवसांच्या कालावधीत ६ ते ७ पाण्याच्या पाळ्या लागतात.
  • तुती छाटणीनंतर खत मात्रा व पाण्याची मात्रा दिल्यामुळे खत जमिनीत झाडाच्या मुळाशी उपलब्ध होते. वाळू मिश्रित जमिनीत ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे, तर भारी चिकट मातीच्या काळ्या जमिनीत ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • तुती बागेस एक वेळा पाण्याची पुरेशी मात्रा म्हणजे १.५ ते २ एकर इंच एवढे पाणी आवश्‍यक आहे. (१ एकर इंच = २२,६८७ गॅलन, १ गॅलन = ४.५५ लि.)
  • शेतकरी प्रत्येक वेळी भरपूर प्रमाणात पाणी देतात. त्यामुळे प्रत्येक वेळी २० ते ३० टक्के पाणी वाया जाते. याबरोबर दिलेले विद्राव्य रासायनिक खत पाण्यात विरघळून जमिनीत खोलवर निघून जाते.
  • पाणी देताना जमीन सपाट असणे आवश्‍यक आहे. जमीन उंच सखल असेल तर सर्व बागेस प्रमाणात पाण्याची मात्रा पोचत नाही. त्यासाठी पाणी देण्याची आधुनिक पद्धत वापरण्याची गरज आहे.
  • तुती बागेस मोकाट पद्धतीने किंवा दांडातून पाणी दिले तर भरपूर प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन व पाण्याचा अपव्यय होतो. ठिबक सिंचन सूक्ष्म नलिका सिंचन किंवा सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी दिले तर ४४ टक्‍क्यांपेक्षा जास्त पाण्याची बचत होते.
  • तुती बागेस द्यावयाचे पाणी खोलीवरील आणि क्षाराचे जास्त प्रमाण असलेले नसावे. पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बोनेट, बाय कार्बोनेट आणि फ्लोराइडचे प्रमाण नसावे. वेळोवेळी पाणी व मातीचे परीक्षण करून घ्यावे.
  • पावसाचे  दिवस कमी होत असल्याने पडलेले पावसाचे पाणी पूर्णतः जमिनीत मुरवणे किंवा साठवून ठेवणे गरजेचे आहे. पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तरच वर्षातील इतर महिन्यात पाण्याचा योग्य रितीने वापर करणे शक्‍य होईल. पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही. पीक वाढीच्या काळात तुती बागेस पाणी कमी पडले तर कोष उत्पादनात घट येते.
  • तुती पिकाला ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. यामुळे पाण्याची मोठी बचत होते. जमिनीची धूप थांबते. द्रवरूप खते, पाणी आवश्‍यक मात्रेत देणे सोयीचे होते. सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीमध्ये सूक्ष्म नलिकामधून पाणी दिले जाते. त्यामुळे झाडाच्या जवळील जमिनीवर ओलावा राहातो. पाणी मुळांच्या वाढीसाठी उपलब्ध होते. तुषार सिंचन पद्धतीने देखील पाण्याचे चांगले व्यवस्थापन करता येते.
  • -  डॉ. सी. बी. लटपटे, ७५८८६१२६२२  

    (प्रभारी अधिकारी, रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com