मका, हळद, हरभरा किमतीत वाढ

मका, हळद, हरभरा किमतीत वाढ
मका, हळद, हरभरा किमतीत वाढ

मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी भावापेक्षा अधिक आहेत. हळदीच्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ९.४ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाच्या गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाचे उत्पादन कमी आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम किमतींवर होत आहे.   

यंदा मॉन्सून उशिरा येत आहे. ११ जून पर्यंत झालेला पाऊस हा सरासरीपेक्षा ४६ टक्क्यांनी कमी आहे. मात्र, आता केरळमध्ये मॉन्सून आलेला आहे, त्याची पुढील प्रगती अजून तरी समाधानकारक आहे. या वर्षी सर्व साधारण पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. जागतिक पातळीवर अमेरिका व चीन यांचे व्यापारी युद्ध सुरू आहे. त्याचा परिणाम भारतावर तर होणार आहेच; पण तो आंतरराष्ट्रीय व्यापारावर होणार असल्याने जागतिक मंदीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांनी पुढील वर्षाचे हमीभाव लक्षात घेऊन फ्युचर्समध्ये हेजिंग करण्याचे निर्णय घेणे कदाचित योग्य ठरावे. या संबंधी पुढे आपण चर्चा करणार आहोत. या सप्ताहात सर्व पिकांचे भाव घसरले. (आलेख १).  पुढील काही महिन्यांत सोयाबीन व कापूस वगळता इतर सर्व पिकांचे भाव वाढतील (आलेख २). पुढील वर्षासाठी खरीप पिकांचे हमीभाव येत्या काळात जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स आणि एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका (रब्बी) रब्बी मक्याच्या (जुलै २०१९) किमती मे महिन्यात २३ तारखेपर्यंत वाढत रु. १,९९४ पर्यंत गेल्या. नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या ४.१ टक्क्यांनी घसरून रु. १,८१० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाबबाग) रु. १,७३० वर आल्या आहेत. हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. सप्टेंबर डिलिवरीचे भाव रु. १,८६२ आहेत.

साखर   मेमध्ये व्यवहार नसल्याने साखरेच्या (जुलै २०१९) किमती रु. ३,११९ वर स्थिर होत्या. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१६४ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे.

सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (जुलै २०१९) किमती  १५ मे पर्यंत वाढत रु. ३,८२५ पर्यंत गेल्या. नंतर त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या रु. ३,६४० वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती १.२ टक्क्यांनी घसरून रु. ३,७६३ वर आल्या आहेत. ११ जून रोजी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी डिलिवरीसाठी अनुक्रमे रु. ३,६५९, ३,६७८, ३,४८५, ३,५२५, ३,५३५ व ३,५२५ भाव होते.  

हळद हळदीच्या फ्युचर्स (जुलै २०१९) किमती मे महिन्यात वाढत २१ तारखेपर्यंत रु. ७,३७२ पर्यंत गेल्या होत्या. नंतर त्या घसरल्या. या सप्ताहात त्या ३.६ टक्क्यांनी घसरून रु. ६,७०६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,५६३ वर  आल्या आहेत.  सप्टेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ९.४ टक्क्यांनी अधिक आहेत  (रु. ७,१७८).  या वर्षी उत्पादन वाढलेले असेल.

गवार बी   गवार बीच्या फ्युचर्स (जुलै २०१९) किमती मे महिन्यात घसरत होत्या (रु. ४,५६८ ते रु. ४,३३०). या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,२१० वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती  रु. ४,३०० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा सप्टेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती १.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३५२).  

हरभरा   हरभऱ्याच्या फ्युचर्स (जुलै २०१९) किमती २० मे पर्यंत वाढत रु. ४,७९३ पर्यंत गेल्या. नंतर त्या घसरल्या. या सप्ताहात त्या ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,४२१ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,३४८ वर आल्या  आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा सप्टेंबर २०१९ मधील फ्युचर्स किमती २.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४७६).  शासनाकडे पुरेसा साठा आहे. आवक वाढू लागली आहे. नवीन हमी भाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता).

कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (जुलै २०१९) किमती १३ मे पर्यंत घसरत होत्या. नंतर त्या वाढत आहेत. या सप्ताहात त्या ३.६ टक्क्यांनी घसरून रु. २१,३२० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २१,८७२ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २०,७२० वर आल्या आहेत. त्या सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.३ टक्क्यांनी कमी आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाचे उत्पादन कमी आहे.  पण आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम किमतींवर होत आहे. (टीप ः सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किंमत प्रती १७० किलोची गाठी.)

ईमेल -  arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com