agricultural stories in Marathi,nalavane Village yashkatha of water management | Agrowon

पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची सुबत्तेकडे वाटचाल
अमोल कुटे
सोमवार, 22 एप्रिल 2019

अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी नळावणे (जि. पुणे) ग्रामस्थांनी जलसंधारणाची कामे यशस्वी केली. पण, व्यावसायिक पीकपद्धती, त्यातून आर्थिक सक्षमता मिळवायची तर जलसंधारणानंतरचे पुढचे कामच अत्यंत महत्त्वाचे होते. प्रखर इच्छाशक्ती व बदल घडवायचा, या ऊर्मीतूनच नळावणे ग्रामस्थांनी त्यादृष्टीने आत्मविश्‍वासपूर्वक वाटचाल केली आहे. पाणी वितरण, वापर यांचे नियम अमलात आणून पीकपद्धतीत व शेतीत बदल घडविण्यास सुरवात केली आहे.     

अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी नळावणे (जि. पुणे) ग्रामस्थांनी जलसंधारणाची कामे यशस्वी केली. पण, व्यावसायिक पीकपद्धती, त्यातून आर्थिक सक्षमता मिळवायची तर जलसंधारणानंतरचे पुढचे कामच अत्यंत महत्त्वाचे होते. प्रखर इच्छाशक्ती व बदल घडवायचा, या ऊर्मीतूनच नळावणे ग्रामस्थांनी त्यादृष्टीने आत्मविश्‍वासपूर्वक वाटचाल केली आहे. पाणी वितरण, वापर यांचे नियम अमलात आणून पीकपद्धतीत व शेतीत बदल घडविण्यास सुरवात केली आहे.     

पु णे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील तीव्र टंचाई भासणाऱ्या पूर्व
भागातील व पठारावर असलेले गाव म्हणजे नळावणे. तीनही
बाजूंनी डोंगर. पावसाचे प्रमाण अत्यल्प. खडकाळ, मुरमाड असल्याने जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही कमी आहे. जो पाऊस पडतो तो वाहून जाण्याची शक्यता अधिक असते. अशा वाहून गेलेल्या पाण्याचा फायदा संगमनेर तालुक्यातील (जि. नगर) काही गावांना होतो. आपल्या भागात पडणारे पाणी आपणच वाचवायला हवे, तरच शेतीत काहीतरी हाती लागेल, ही भावना नळावणेच्या शेतकऱ्यांत रुजली.

 पाण्याचे महत्त्व वेळीच कळले
फक्त जागरूकता तयार होण्याचा अवकाश. पुढील कृतीला दिशा मिळायला मग कितीसा उशीर? गावकरी पाण्याच्या मुद्द्यावर एक झाले. डोंगरांवर कंपार्टमेंट बंडिंग, सलग समपातळी चर, माती नाला बांध, ओढ्यांवर सिमेंट नाला बांध आदी कामे घडली. गावात १९७८ मध्ये बांधलेला मोरशेत पाझर तलाव होता. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी पाझरून जायचे. पूर्ण क्षमतेने भरलेला पाझर तलाव महिनाभरात रिकामा व्हायचा. डिसेंबरमध्ये टॅंकर सुरू होत. पावसाच्या पाण्यावर खरिपाची आणि थोडीफार रब्बी पिके व्हायची. उन्हाळ्यात शिवार पूर्ण ओसाड पडायचे. सन २०१६-१७ मध्ये तलावात ४०० बाय २० बाय ६० फूट खोल चर खोदला. त्यात काळी माती भरून पाझर तलावाची गळती थांबविण्यात यश आले. सन २०१७ मध्ये पावसात तलाव पूर्ण भरला. मागील वर्षी पाऊस कमी होऊनही तलावात यंदा एप्रिलअखेर ४० टक्के पाणीसाठा आहे.  

   जलसंधारणानंतरचे व्यवस्थापन झाले महत्त्वाचे
जलसंधारणातून पाणी उपलब्ध झाले. त्याचा विनियोग पुढे चांगल्या प्रकारे होणे गरजेचे होते. ते व्यवस्थापन नळावणेच्या शेतकऱ्यांनी हुशारीने केले. यंदाचा दुष्काळ जास्तच तीव्र आहे. अशावेळी शेतीबरोबरच जनावरांच्या चारापिकांकडेही तेवढेच लक्ष देण्यात आले. सर्वांच्या सामंजस्यातून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मोरशेत आणि पळसठिका या दोन्ही तलावांपासून परिसरात ५०० मीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून पाणी उपसा पूर्णपणे बंद करण्यात आला.

  नवीन बोअरवेल, विहिरी खोदण्यावर बंदी
पाझर तलावाच्या परिसरात बंधाऱ्यापासून ३५ मीटर अंतरावर खालील भागात आणि १५ मीटर क्षेत्रात, तसेच पिण्याच्या पाण्यासाठीच्या सार्वजनिक विहिरीच्या परिसरात ५०० मीटर अंतरापर्यंत नवीन विहिरी खोदण्याला मनाई करण्यात आली. बोअरवेल घेणे, विहिरींचे खोलीकरण यावरही बंदी घातली. त्यामुळे भूजलसाठा उपशावर निर्बंध आले.  

  बांधकामावरही नियंत्रण
पाण्याचा साठा मर्यादित असल्याने उन्हाळ्यात घरे किंवा अन्य बांधकामे करण्यावर मर्यादा घालण्यात आल्या. पावसाळ्यानंतरच बांधकामे सुरू होऊन ती दिवाळीपर्यंत पूर्ण होतील असेच नियोजन होते. उन्हाळ्यात केवळ निवडक सार्वजनिक कामांसाठीच हा अपवाद ठेवण्यात आला.  

 पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला
नळावणे गावठाणासह परिसरातील सुरकुरवाडी, कोलदरावस्ती, तुकाईवस्ती, देशमुखवस्ती या भागांत पाणीपुरवठ्याच्या योजना राबविल्या. गावातील सुमारे साडेतीनशे कुटुंबांतील सुमारे पावणेदोन हजार लोकसंख्येला सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून पाणी उपलब्ध होत आहे. पुढील वर्षी गावातील एकाही वस्तीला टॅंकर लागणार नाही. सध्या तरी नळावणेतील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. गावात तलावाजवळील विहीर अधिग्रहण केली आहे.  

गावात पाणीसाठा शिल्लक
आहे. वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी ७० लाख रुपयांच्या विविध योजना मंजूर झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम सुटेल. तसेच शेती, जनावरांसाठी पाण्याचे व्यवस्थापन हेच आमच्यासमोरील मुख्य उद्दिष्ट असेल. त्यातूनच गावात आर्थिक सुबत्ता येईल, याची आम्हा ग्रामस्थांना खात्री आहे.
- तुषार देशमुख, सरपंच, नळावणे
७७२१८०७४६६

उन्हाळ्यात चारापिके, फळबागांना जीवदान
उपसाबंदी असलेल्या पाचशे मीटर क्षेत्राच्या बाहेर काही विहिरी आहेत. त्यात असलेल्या पाण्याद्वारे दररोज तास ते दोन तास शेतीला सिंचन केले जाते. त्यातून चारापिके, डाळिंब, सीताफळाच्या बागांना दुष्काळात जीवदान दिले जात आहे. उपलब्ध पाण्याचा प्राधान्याने ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीने वापर होत आहे. योग्य विचारविनिमय, पाण्याबाबतची गंभीरता, यामुळे पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे गावकऱ्यांना शक्य झाले. त्यामुळेच, उन्हाळ्यातही गावशिवाराचा काही भाग हिरवागार झाला आहे. पळसठिका आणि सुरकुलवाडी पाझर तलावातून गाळ काढणे, उंची वाढविणे आदी मार्गानेही पाणीसाठा वाढविण्याचे नियोजन आहे.

सुखावणारा पीक बदल
ओढ्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे भूजलाची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे लगतच्या विहिरींना पाणी वाढले. त्यावर शेती अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले. त्यानुसार पीकपद्धतीत बदल करणे त्यांना शक्य झाले. पूर्वी खरिपात ज्वारी, बाजरी किंवा कडधान्य पिके, त्यानंतर रब्बीत काही प्रमाणात   गहू, हरभरा ही पिके घेतली जायची. आता मात्र वाटाणा, टोमॅटो, कांदा, बटाटा, सोयाबीन, मिरची, फ्लॉवर, कोबी अशी विविधता नळावणेच्या भूमीत दिसू लागली आहे. हा बदल निश्‍चितच सुखावणारा आहे.

समाधानकारक उत्पादन
गावात एक हजार ते बाराशे एकर क्षेत्र लागवडीखाली आहे. यातील सुमारे २० टक्के क्षेत्र सध्या सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. रब्बीत सुमारे ५० टक्के क्षेत्रावर कांदा घेण्यात येतो. काही शेतकऱ्यांनी एकरी १२ टन उत्पादनापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे. डाळिंबाचेही चार टनांच्या पुढे उत्पादन घेण्यासाठी इथले शेतकरी प्रयत्नशील आहेत. पुढील काळात हे उत्पादन वाढणार आहे. सीताफळाचे बाजारपेठेतील महत्त्व ओळखून त्याचीही लागवड वाढली आहे. कलिंगड, खरबूज या पिकांकडेही शेतकरी वळू लागले आहेत.  

राहणीमानात बदल
कोरडवाहू शेतीत दैनंदिन खर्चाची हातमिळवणी करणे मुश्कील होते. बहुतांश शेतकरी वर्षातून एखादेच पीक घेत असल्याने त्यांना रोजंदारीवर जावे लागे. आता बांधावर पाणी आल्यापासून वर्षात दोन पिके घेणे शक्य झाले आहे. जलसंधारण ते पीकपध्दतीत बदल, पाणी व्यवस्थापन हा नळावणेतील सारा प्रवास अलिकडील आहे. नव्या पीकपध्दती उत्पादनात त्यांना भले स्थिरता आलेली नसेल. पण, पाणी व्यवस्थापन चांगले केले तर शेतीत निश्‍चित काही घडू शकते, हा परिपाठ त्यांना उमगला आहे. याच इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांची पुढची वाटचाल सुकर झाली आहे. घरात दुचाकी वाहन येऊ लागले आहे. मुलांना चांगले शिक्षण देण्याची धडपड आहे.  

 सातशे लिटर दूधसंकलन
पाण्याच्या अभावामुळे गावात दुग्ध व्यवसायावर काही वर्षांत परिणाम झाला होता. गावात दूधसंकलनासाठी डेअरी नव्हती. आता चारापिकांखालील क्षेत्र वाढले. ओला चारा मिळू लागला. जनावरे संभाळणे शक्य होऊ लागले. गायी, म्हशी, शेळ्या यांची संख्या वाढून दुग्धोत्पादनास चालना मिळाली आहे. अलिकडेच डेअरी सुरू झाली आहे, हे प्रगतीचेच लक्षण आहे. गावात सध्या दररोज ७०० लिटर दूधसंकलन होत आहे. पावसाळ्यात हे संकलन दुपटीने वाढेल.  
तुषार देशमुख, ७७२१८०७४६६
सरपंच, नळावणे

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...