हवामान बदलाचा जमिनीच्या गुणधर्मांवर होतो परिणाम

आच्छादन केल्याने जमिनीची धूप कमी होते, ओलावा टिकून राहतो.
आच्छादन केल्याने जमिनीची धूप कमी होते, ओलावा टिकून राहतो.

जमिनीची निर्मिती हजारो वर्षांमध्ये होते. ती होताना त्यावर हवामान या घटकांचा मोठा सहभाग असतो. निरनिराळ्या हवामानाच्या प्रदेशातील जमिनींचे प्रकार व सुपीकता त्यामुळेच वेगवेगळे असतात. हवामानातील पाऊस, वारा, सूर्यप्रकाश, तापमान आणि आर्द्रता इत्यादी अनेक घटकांचा जमिनीवर सतत परिणाम होत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये तापमान बदलांचा मुद्दा सातत्याने पुढे येत आहे. हवामानातील या आकस्मिक बदलांचेही जमिनींच्या गुणधर्मांवर परिणाम होत आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या विविध आपत्तींमुळे पिकाचे नुकसान होताना शेतकऱ्यांना दिसते. या बदलांमध्ये पावसाचे एकूण दिवस कमी होणे, अवर्षणाचे खंड वाढणे, तापमानातील बदल, वादळी वारे, गारपीट अशा अनेक बाबी पिकांवर, शेतीवर आणि शेतकऱ्यांवर परिणाम करतात. त्यातही कोरडवाहू शेतीमध्ये या घटकांचे तीव्र परिणाम त्वरित दिसून येतात. कारण, कोरडवाहू पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ओलावा हा केवळ पावसामुळे तयार होतो. त्यात अवर्षाणामुळे घट होते. ओलावा नसल्याने मातीतून पिकांना योग्य पोषक घटक घेता येत नाही, पर्यायाने पिकांची वाढ खुंटते. दाणे भरत नाहीत. शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे पिकांसंदर्भात त्वरित लक्षात येत असले तरी मातीवरील परिणाम जाणून घेणे आवश्यक आहेत.

जमिनीची धूप वातावरणातील बदलांमुळे कमी कालावधीत एकदम जास्त तीव्रतेने पाऊस होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशा पावसामुळे पाण्याचे प्रवाह जमिनीवरून वाहतात. पाण्यासोबत वरील थरातील सुपीक मातीचीही धूप होते. सोबतच राज्यामध्ये काही भागांमध्ये गारपीट, पाऊस आणि वारा इ. घटकांचेही प्रमाण वाढत आहे. या आकस्मिक येणाऱ्या आपत्तीमुळे शेतीचे व मातीचे प्रचंड नुकसान होते. त्यातही कोरडवाहू क्षेत्रामध्ये जमिनीवर पिके नसल्याने, बांधावर झाडांचे प्रमाण कमी असल्यामुळे मातीची धूप होण्याचे प्रमाण अधिक असते. गारपीट आणि पावसाच्या थेंबांमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील सुपीक मातीचे कण वेगळे होतात. ते वाहणाऱ्या पाण्यासोबत वाहून जातात. अशीच स्थिती उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळेही दिसून येते.

अशी खालावते जमिनीची सुपीकता सेंद्रिय कर्ब, आवश्‍यक अन्नद्रव्ये, जिवाणूंचे प्रमाण उपलब्ध ओलावा आणि योग्य सामू इत्यादी बाबींच्या योग्य प्रमाणावर मातीची सुपीकता अवलंबून असते. हवामानातील अधिक किंवा कमी पावसाचे जमिनीच्या सुपीकतेवर निरनिराळे प्रभाव पडतात. कमी पाऊस आणि अवर्षण यामुळे सेंद्रिय कर्बाचे विघटन होऊन त्याचा ऱ्हास होतो. जास्त पावसाच्या परिस्थितीत हा सेंद्रिय कर्ब मातीच्या कणांना चिकटून पाण्यासोबत वाहून जातो. जमिनीतील कर्बाच्या ऱ्हासामुळे सुपीकतेचे मोठे नुकसान होते. सततच्या अवर्षणामुळे जमिनींचा सामू वाढत जातो. परिणामी, अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होत जाते. जास्त तापमान आणि वाढते अवर्षण यामुळे जमिनीत चुनखडीचे टणक खडे वाढत जातात. त्याचप्रमाणे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. जमिनी क्षारयुक्त होत जमिनीची सुपीकता आणखी खालावत जाते. उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा जमीन सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पिके, पीक पद्धती, उतारास आडवी पेरणी, अतिरिक्त पाणी निघून जाण्यासाठी केलेली योग्य रचना, शेतांची बांधबंदिस्ती, जमिनीवर आच्छादनाचा वापर, कव्हर क्रॉप्स म्हणजे जमीन झाकून टाकणारी पिके, धूप होण्यास प्रतिबंध करणारी पिके यांचा फायदा होऊ शकतो. अशा पर्यायाचा वापर केल्यास नैसर्गिक संकटापासून होणारे मातीचे होणारे नुकसान कमी होईल. एकूणच जमिनीतील अन्नद्रव्यांचे संवर्धन आणि पुनर्भरण होईल. प्रत्येक भागातील स्थानिक परिस्थितीनुसार योग्य त्या उपाययोजना कराव्यात.                 काही  जमिनी मुळातच धुपीस संवेदनक्षम असतात तर काही जमिनींतून निचरा होत नाही; तर काही जमिनी मुळातच पाणथळ असतात. उतारावरील जमिनीस, घाटमाथ्यावरील जमिनी, खोऱ्यामधील सपाट जमिनी, गाळाच्या जमिनी अशा प्रत्येक भूपृष्ठावरील जमिनीसाठी निरनिराळ्या उपाययोजनांची गरज असते. शेती पद्धती, सिंचन, खते, मशागत, पीकपद्धती इत्यादींसोबतच नैसर्गिक आपत्तींचा परिणाम मातीच्या समस्यांवर होत असतो. मातीचे गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक गरजेनुसार संशोधन शिफारशींच्या स्वरूपात उपलब्ध असलेले सुधारित तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यानुसार वेळीच त्याची अंमलबजावणी केल्यास आपत्तीपासून होणारे नुकसान कमी होईल. आपत्ती नियोजनासाठी फवारणीद्वारे अन्नद्रव्यांचा वापर, निचरा व्यवस्थापन, पेरणीच्या वेळा, सुधारित सिंचन, गरजेनुसार बांधबंदिस्ती, खतांच्या मात्रातील बदल, बियाण्यांतील बदल, पेरणीच्या अंतरातील बदल इ. आपत्ती व्यवस्थापन शिफारशी स्थानिक गरजेनुसार वापरण्याची गरज आहे.

सुपीकता जपण्यासाठी उपाययोजना

  • स्थानिक गरजेनुसार तज्ज्ञांच्या शिफारशींची अंमलबजावणी.
  • शेताची बांधबंदिस्ती, चर खोदणे इत्यादी उपाययोजना.
  • योग्य पीक पद्धतीची निवड, फेरपालट गरजेची.
  • उतारास आडवी पेरणी.
  • रुंद वरंबा सरी पद्धतीमुळे ओलाव्याचे संवर्धन होण्यासोबतच अतिरिक्त पाण्याचा निचरा सुधारतो.
  • धूप प्रतिबंधक पिकांचा वापर.
  • सुधारित सिंचनाचा वापर.
  • भू सुधारकांचा गरजेनुसार वापर.
  • आपत्कालीन पीक व्यवस्थापन शिफारशींची अंमलबजावणी.
  • खतांच्या मात्रा, फवारणी, पेरणी इत्यादींबाबत गरजेनुसार करावयाच्या उपाययोजना.
  • वरील उपाययोजनांमुळे सुपीकता जोपासण्याबरोबरच मातीचा ऱ्हास रोखता येतो. अन्नद्रव्यांची होणारी हानी, तूट भरून निघण्यास मदत होते.

    - दीपाली मुटकुळे, ९४२३२४६२१२ (सहायक प्राध्यापक, सौ. के. एस. के. (काकू) कृषी महाविद्यालय, बीड.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com