संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची दुष्काळावर मात

योजनांच्या माध्यमातून शेतीचा विकास कृषी विभागाच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांसाठी शेततळे, पॉलिहाउस, जलयुक्त शिवार अभियान, ठिबक सिंचन, फळबाग लागवड अशा विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कमी पाण्यात शाश्वत उत्पादन मिळू लागले असून, उत्पन्नातही चांगली वाढ झाली आहे. - सुषमा घोगरे, सरपंच
आर्वी गावात पॉलिहाऊसची उभारणी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
आर्वी गावात पॉलिहाऊसची उभारणी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे आर्वी-तानाजीनगर (ता. हवेली, जि. पुणे) येथील शेतकऱ्यांनी संरक्षित शेतीकडे वाटचाल सुरू केली. शेतकऱ्यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पॉलिहाउसमध्ये जरबेरा, ढोबळी मिरची लागवड केली. याचबरोबरीने आंबा, चिकू, आवळा या फळपिकांच्या लागवडीवर शेतकऱ्यांचा भर आहे. संरक्षित पाण्यासाठी शेततळे, ठिबक सिंचनाची जोड दिली आहे. संरक्षित शेतीच्या माध्यमातून गावाने विकासाची दिशा पकडली आहे.

पु णे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूरजवळील कोंढणपूर फाट्यापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर आर्वी आणि तानाजीनगर ही गावे आहेत. शिवगंगा नदी खोऱ्याचा हा पट्टा. या भागातील पारंपरिक पीक म्हणजे भात. याशिवाय काही प्रमाणात भाजीपाला, गहू, ज्वारी, बाजरी या पिकांची लागवड शेतकरी करतात. दुग्धोत्पादन हा गावातील पूरक उद्योग. गावशिवारात सरासरी १२५० मिलिमीटर पाऊस पडतो. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, जानेवारी-फेब्रुवारीपासून गावात पाणीटंचाईस सुरवात होते. हे लक्षात घेऊन मागील काही वर्षांपासून गावातील शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले. परंतु, गेल्या वर्षी गावात कमी पाऊस झाल्यामुळे पुन्हा एकदा गावकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. परंतु, उपलब्ध पाण्याच्या काटेकोर वापरावर शेतकऱ्यांचा भर आहे.

पॉलिहाउस आणि शेततळ्याचे गाव   डोंगराच्या कुशीत वसलेल्या तानाजीनगर आणि आर्वी या गावांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आधुनिक शेतीची दिशा पकडली आहे. अलीकडील काही वर्षांत कृषी विभागाच्या विस्तार कार्यामुळे गावातील शेतकरी विविध योजनांच्या अंमलबजावणीस तयार झाला. पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, विभागाचे अधीक्षक कृषी अधिकारी दादाराम सप्रे, जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत भोर, तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर, सुनील लांडगे, गुलाब कडलग, तुषार मिटके, मोहन गावडे, सरपंच सुषमा घोगरे, कृषिमित्र पुष्पलता घोगरे या सर्वांच्या संपर्कातून गावामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी झाली. सुशिक्षित तरुणांनी संरक्षित शेती नियोजनात रस घेतल्याने गावाला एक नवी दिशा मिळाली. काही वर्षांपूर्वी गावातील एका शेतकऱ्यास पॉलिहाउसमधील फुलशेतीमध्ये मिलालेले आर्थिक यश पाहून इतर शेतकरीही पॉलिहाउसकडे वळाले. बघता बघता गेल्या सहा वर्षांत गावाचे रुपडे पालटले. शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी असल्याने पॉलिहाउससाठी निधी उभारण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत होत्या. यातून मार्ग काढण्यासाठी  शेतकऱ्यांनी कर्जाचा पर्याय शोधला. शेतकऱ्यांनी उत्पन्नातून मिळालेली तुटपुंजी रक्कम जमा करून ठेवली. उर्वरित रक्कम गावातील सहकारी सोसायटीतून कर्जरूपात उभारली. सध्या गावातील शेतकरी पारंपरिक भातशेतीकडून आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. पॉलिहाउसमध्ये जरबेरा, ढोबळी मिरची अशा पिकांची लागवड करून उत्पन्नात चांगली वाढ मिळविली आहे.        तानाजीनगर ही डोंगराच्या कुशीतील वाडी. या ठिकाणी ३० पॉलिहाउस आणि २३ शेततळी उभारण्यात आली आहेत. तर, आर्वी गावात १२ पॉलिहाउस आणि ९ शेततळी आहेत. या दोन्ही गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. त्यामुळे एकूण ४२ पॉलिहाउस आणि ३२ शेततळ्यांची उभारणी पूर्ण झाल्याने पॉलिहाउस आणि शेततळ्याचे गाव, अशी नवी ओळख तयार झाली. शेततळ्यांच्या संरक्षित सिंचनावर जरबेरा आणि स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यात शेतकऱ्यांना यश आलेले आहे. त्यामुळे या गावचे अर्थकारण पूर्णपणे बदलण्यास मोठी मदत झाली. फुलशेतीच्या माध्यमातून गावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे.

फळबागांकडे कल सध्या कांदा चाळींची उभारणी तसेच फळपिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत १७.५० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये हापूस, केसर, तोतापुरी या आंबा जातींची सुमारे १४ हेक्टर, आवळा १.५० हेक्टर, चिकू एक हेक्टर आणि पेरू एक हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. अलिकडे गावात स्ट्रॉबेरी हे पीक चांगले रुजले आहे. त्यामुळे फुलशेतीबरोबरच शेतकऱ्यांना एक नव्या पिकाचा आधार मिळाला आहे.

भौगोलिक स्थिती

  • एकूण भौगोलिक क्षेत्र सुमारे ११४३.१९ हेक्टर, त्यापैकी ७१०.८३ हेक्टर क्षेत्र हे लागवड योग्य
  • गावठाण ४.७० हेक्टर, वनक्षेत्र तर २७७.७१ हेक्टर
  • खरिपाचे क्षेत्र सुमारे ३६२ हेक्टर, रब्बी क्षेत्र १६४ हेक्टर क्षेत्र
  • लोकसंख्या ११३६, कुटुंबाची संख्या ३१०, खातेदार ४५९.
  • शेततळ्यावर भर पावसाळ्यात पाण्याची उपलब्धता जास्त असली; तरी गावात जानेवारी, फेब्रुवारीपासून पाण्याची पातळी कमी होण्यास सुरवात होते. त्यामुळे उन्हाळ्यात पिकांना शाश्वत पाण्याची सुविधा व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेत सहभागी होऊन शेततळ्याचा लाभ घेण्यास सुरवात केली. सुरवातीला कमी प्रतिसाद मिळाला असला, तरी उन्हाळ्यात शेततळ्यातील संरक्षित पाण्याचे झालेले फायदे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे गावात टप्प्याटप्प्याने शेततळ्यांची उभारणी सुरू झाली.

    ठिबक सिंचनाचा अवलंब पॉलिहाउसमधील पीक उत्पादन तसेच ठिबक सिंचनाचेही महत्त्व शेतकऱ्यांना कळाले. त्यामुळे पॉलिहाउसमध्ये शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा अवलंब केला. ठिबक सिंचनामुळे कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळू लागले. गावातील शेतकऱ्यांनी पपई, काकडी, टरबूज या पिकांचीदेखील लागवड सुरू केली आहे. या सर्व पिकांना ठिबक सिंचनाने पाणी दिले जाते.

    आच्छादनाचा वापर कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहेत. ठिबक सिंचन, पॉलिहाउस, शेततळे याचबरोबर पिकांना आच्छादनाची जोड शेतकऱ्यांनी दिली आहे. यामुळे पाण्याच्या वापरात चांगली बचत होत आहे. काकडी, स्ट्रॉबेरी, पपई, काकडी, टरबूज अशा विविध पिकांसाठी प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर शेतकरी करू लागले आहेत.

    जलयुक्त शिवार योजनेत सहभाग गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २०१५-१६ मध्ये गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानाकरिता करण्यात आली होती. अभियानाअंतर्गत सलग समतल चर १२, मजगी ७, माती नाला बांध २, माती नाला बांध दुरुस्ती ३, नाला खोलीकरण संख्या एक, गाळ काढणे पाच आणि मागेल त्याला शेततळे ३० तसेच २ सिंमेट नाला बांध दुरुस्ती आणि एक सिंमेट नाला बांध, अशी कामे करण्यात आली. जलसंधारणाच्या कामामुळे  पावसाचे पाणी चांगल्या प्रकारे मुरले. भूजलपातळीत वाढ झाली. पूर्वीच्या काळी ३७७.८४ टीसीएम पावसाचे पाणी अडविले जायचे. परंतु, जलयुक्त शिवार योजनेतील कामामुळे ४५२.५० टीसीएम एवढे पाणी अडले. भूजलपातळीत वाढ झाली. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याची ७० टक्क्यांपर्यंतची गरज भागविण्यात गावकऱ्यांना यश आले.

    संरक्षित शेतीतून उत्पन्नात वाढ गावातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्याच्या उद्देशाने कृषी विभागाच्या योजनेतून पॉलिहाउस शेतीला चालना दिली. यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पॉलिहाउस उभे राहिले आहेत. संरक्षित शेतीसंबधी आवश्यक योजनाही आम्ही या गावात राबविल्या आहेत. बाजारपेठेचा अभ्यास करून पिकांची लागवड आणि सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ होत आहे. - बाळासाहेब पलघडमल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

    शेतकऱ्यांच्या सहभागातून प्रगती गावात मी कृषिमित्र म्हणून काम पाहते.  शासनाच्या माध्यमातून ज्या नवीन योजना येतात; त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम मी करते. गावातील शेतकऱ्यांनी पॉलिहाउस, शेततळे, कांदा चाळ, फळबाग, जलयुक्त शिवार अभियान अशा विविध योजना राबविल्या आहेत. सर्वांच्या सहकार्याने गावाने शेतीमध्ये चांगली प्रगती केली आहे. सुधारित तंत्राचा अवलंब केल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे.  - पुष्पलता घोगरे, ८८०५४८६३१६

    सुधारित तंत्रातून फायदा माझ्याकडे सात एकर शेती आहे. मी प्रामुख्याने काकडी, पपई आणि पॉलिहाउसमध्ये जरबेरा लागवड आहे. संरक्षित पाण्यासाठी शेततळे केले आहे. पिकांना ठिबक सिंचनाने पाणी देतो. सुधारित तंत्राचा अवलंब केल्याने उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. - मोरेश्वर तावरे, शेतकरी, ९९२२४९३६४७

    माझ्याकडे दोन एकर शेती आहे. यामध्ये दीड एकरावर पॉलिहाउस असून, त्यामध्ये जरबेरा लागवड आहे. संरक्षित पाण्यासाठी दोन शेततळी व एक विहीर आहे. पिकासाठी ठिबक सिंचन आणि आच्छादनाचा वापर केला आहे. त्यामुळे पीक उत्पादनात चांगली वाढ मिळाली आहे. - विठ्ठल भोईटे,शेतकरी, ९०११९२६९२४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com