प्रयोगशील शेतीतून थांबविले कुटुंबांचे स्थलांतर

चारसूत्री पद्धतीने लागवड केलेल्या भातशेतीची पाहणी करताना शांताबाई धांडे
चारसूत्री पद्धतीने लागवड केलेल्या भातशेतीची पाहणी करताना शांताबाई धांडे

देवगाव, आंबेवंगण (ता. अकोले, जि. नगर) ही आदिवासी पट्ट्यातील गावे.भात हे प्रमुख पीक. बाएफ संस्थेच्या मार्गदर्शनातून देवगावच्या ममताबाई भांगरे आणि आंबेवंगण येथील शांताबाई खंडू धांडे यांनी शेतीमध्ये वेगळी ओळख तयार केली. नियोजन आणि सुधारित तंत्राने शेती करत वर्षोनुवर्ष रोजगारासाठी कुटुंबांचे होणारे स्थलांतर त्यांनी थांबविले आहे.

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचा पूर्व भाग हा जोरदार पावसाचा परिसर. यामुळे भात हेच प्रमुख पीक. देवगावच्या ममताबाई देवराम भांगरे या घरची चार एकर शेती सांभाळतात. यामध्ये रायभोग, आंबेमोहर, काळभात, घरीकोळपी, हरी कोळपी या भात जातींची लागवड करतात. त्याचबरोबरीने वरई, नागली या पिकांच्या बरोबरीने दिवा, बावा, बडधा, पाचुट कांदा, कोळूची, डाव्याची, बरकीची, कुरडूची, भोकरीची, चिचुरडा, फांदा, चाई, सुरणकंद, फवदार, करजकंद, चाईचा मोहर, बडधा कंदा, चंदन बटवास, मेंक, काळीआळू, कोयरी, चाईचा कंद, पांढरी आंबाडी, बडधा यासह सुमारे सत्तर  गावठी भाज्या तसेच देशी जातींचे संवर्धन करतात. ममताबाईंनी बायोगॅसच्या माध्यमातून इंधनाचा प्रश्नही सोडविला आहे.

भातासाठी गांडूळ खताच्या गोळ्या ममताबाई भांगरे चार एकरांपैकी साडेतीन एकरांत भात लागवड करतात. गेल्या काही वर्षांपासून बायफ संस्थेचे कार्यक्रम अधिकारी जतीन साठे यांच्या मार्गदर्शनानुसार ममताबाईंनी सुधारित पद्धतीने सेंद्रिय भात शेती सुरू केली. भात शेतीला गांडूळ खताचा वापर सुरू केला. मात्र बहूतांश जमिनी उताराच्या असल्याने दिलेले गांडूळ खत पाण्यासोबत वाहू जाई. त्यामुळे एक दिवस त्रासून ममताबाईंनी गांडूळ खत टाकताना चिखलाचा गोळा उचलला आणि जोरात आपटला. हा गोळा मातीत तसाच रुतला. यातून त्यांना मोकळे गांडूळ खत टाकण्याएवजी गांडूळ खताच्या गोळ्या करून त्या भात पिकाला वापरण्याची संकल्पना सुचली. गेल्या सहा वर्षांपासून चारसूत्री पद्धतीने भात लागवडीमध्ये ममताबाई गांडूळ खताचा गोळ्यांचा वापर करीत आहेत. भात लागवडीच्या आधी महिनाभर त्या गांडूळ खताच्या गोळ्या तयार करतात. पूर्वी त्यांना भाताचे एकरी १० क्विंटल उत्पादन मिळायचे परंतु सुधारित तंत्राने त्यांनी २२ क्विंटलपर्यंत मजल मारली आहे. गेल्यावर्षी त्यांनी दीड एकरावर एसआरटी तंत्राने भात लागवड केली होती. यंदापासून सर्वच क्षेत्रावर एसआरटी पद्धतीनुसार भात लागवडीचे नियोजन आहे. ममताबाई  थेट ग्राहकांना सेंद्रिय तांदूळाची ८० रुपये किलो दराने विक्री करतात. कमी पावसातही भाताचे चांगले उत्पादन अकोले तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यात गेल्यावर्षी फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भात पिकांचे नुकसान झाले. मात्र ममताबाई यांनी सुधारित तंत्र आणि गांडूळ खताचा वापर केल्यामुळे भात तरला. एकरी २० क्विंटल उत्पादन मिळाले. चारसूत्री भात लागवड आणि गांडूळ खताच्या गोळ्यांचा वापर करून चांगले उत्पादन मिळविणाऱ्या ममताबाई भांगरे यांचा बाएफ संस्थेने २०१५ मध्ये आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरव केला होतो.

गांडूळ खत फायदेशीर आम्ही पिकांच्या देशी जातींची जपवणूक करतो. भात शेतीमध्ये गांडूळ खत वापरतो. खत वाहून जाऊ नये, यासाठी मी गांडूळ खताच्या गोळ्या करून त्या चारसूत्री भात शेतीमध्ये वापरते. याचा चांगला फायदा दिसून आला आहे. - ममताबाई भांगरे

बायफने दिले गांडूळ खत युनिट अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना बाएफ संस्थेचे तांत्रिक सहकार्य केले आहे. संस्थेने ममताबाई भांगरे, शांताबाई धांडे यांच्यासह एक हजारापेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांना गांडूळखत तयार करणारे युनिट दिले आहे. ममताबाई आणि शांताबाई दर वर्षी प्रत्येकी पंधरा टन गांडूळ खत निर्मिती करतात. या खताचा वापर त्या स्वतःच्या शेतीत करतात.

बचत गटातून देशी बियाण्यांची विक्री देवगाव, आंबेवंगणसह परिसरातील महिलांनी एकत्र येऊन संतोषीमाता महिला बचतगट स्थापन केला. परसबाग संकल्पना बायफने पुढे आणल्यानंतर आतापर्यत सुमारे अडीच हजार महिलांच्या दारात परसबाग उभी झाली आहे. ममताबाई भांगरे आणि शांताबाई धांडे देशी जातींचे संवर्धन करतात. गटाच्या माध्यमातून देशी बियाणाचे किट तयार करून मागणीनुसार बायफमार्फत पुरवठा केला जातो.

भातशेेतीमध्ये केली सुधारणा

अकोले पट्ट्यातील आंबेवंगण येथील शातांबाई खंडू धांडे या प्रयोगशील शेतकरी. त्यांची सात एकर शेती. भात हे पारंपरिक पीक. मात्र भाताचे अल्प उत्पादन आणि वाढता खर्च भागवण्यासाठी कुटुंबाला नारायणगाव येथे रोजगारासाठी स्थलांतरीत व्हावे लागायचे. मात्र दरम्यानच्या काळात शांताबाई बायफ संस्थेच्या उपक्रमात सहभागी झाल्या. २०१३ मध्ये जतीन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चारसूत्री पद्धतीने भात लागवडीस सुरवात केली.  भाताला रासायनिक खताएवजी गांडूळ खताचा वापर सुरू केला. शांताबाईंनी शेतीतील नवीन तंत्रज्ञान, आरोग्य विषयक प्रशिक्षणही घेतले. शांताबाईंना पूर्वी पारंपरिक पद्धतीने भाताचे एकरी ८ ते १०क्विंटल उत्पादन मिळायचे. आता सुधारित तंत्रामुळे २३ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. भाताच्या बरोबरीने वरई, उडीद, टोमॅटो आणि भाजीपाला पिकांची लागवड सुरू केली. घोटी, राजूर, शेंडी भागात भाजीपाल्याची हात विक्री करतात.  शेतीत उमेद जागवल्यामुळे आणि नवीन तंत्रानुसार पीक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे शांताबाईच्या परिवाराचे स्थलांतर थांबले. शांताबाईंचा मोठा मुलगा रमेश पदवीधर आहे, दुसरा मुलगा एकनाथने एमएसडब्लू चे शिक्षण घेतले आहे. तिसरा मुलगा युवराज पदवीधर असून त्याचा वाहतूक व्यवसाय आहे.

परसबागेच्या गाईड बाएफ संस्थेने अकोले तालुक्यातील ३१ गावांत २,७०० महिलांच्या मदतीने परसबाग उपक्रम सुरू केला. त्याची सुरवात २०१३-१४ मध्ये शांताबाईंच्या परसबागेतून झाली. त्यांच्या परसबागेत आंबा, पपईसह चिकू, हादगा, शेवगा, लिंबू, सीताफळ आदी झाडांची लागवड आहे. याचबरोबरीने वेगवेगळ्या फळभाज्यांही त्या लागवड करतात. या भागात झाडांना वाळवी लागते. त्यामुळे झाडांना दगडाचे आच्छादन करण्याचा वेगळा प्रयोगही त्यांनी केला. उन्हाळ्यात त्यांनी डोक्यावर पाणी आणून परसबाग जगविली आहे. त्यांच्या परसबागेला राज्यभरातील शेतकरी तसेच परदेशातील तज्ज्ञही भेट देतात. शातंबाई धांडे यांनी शेतीमध्ये मधमाशी पालनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. सध्या त्यांच्याकडे मधमाशीच्या चार पेट्या आहेत. ४०० रुपये प्रति किलो दराने मधाची विक्री करतात.

थांबले स्थलांतर शेतात पुरेसे पीक उत्पादन मिळत नव्हते. त्यामुळे रोजगारासाठी स्थलांतर करावे लागायचे. बाएफच्या माध्यमातून शेतीत नवीन तंत्राचा वापर सुरू केला. त्यामुळे विविध पिकांच्या उत्पादनात वाढ झाली. स्थलांतर थांबले. परसबाग उभारली, त्याचाही चांगला फायदा होत आहे. - शांताबाई धांडे

शेतीमध्ये झाली प्रगती अकोले तालुक्यातील आदिवासी भागात कित्येक वर्षांपासून बायफ संस्था शेतकरी तसेच महिला बचत गटांना मार्गदर्शन करीत आहे.  या प्रयत्नातून कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले. सुधारित शेती तंत्रज्ञान याचबरोबरीने गांडूळ खत निर्मिती, परसबाग यासारख्या उपक्रमातून शेती विकासाने गती घेतली आहे. या प्रयत्नातूनच शांताबाई धांडे व ममताबाई भांगरे या महिलांनी शेतीमध्ये वेगळी ओळख तयार केली आहे. - जतीन साठे, ९४२३०२०१३६ (कार्यक्रम अधिकारी, बाएफ, नाशिक विभाग)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com