AGROWON_AWARDS : संवर्धित शेतीचे बीज पेरणारे चिपळूणकर

AGROWON_AWARDS : संवर्धित शेतीचे बीज पेरणारे चिपळूणकर
AGROWON_AWARDS : संवर्धित शेतीचे बीज पेरणारे चिपळूणकर

अॅग्रोवन पश्चिम महाराष्ट्र स्मार्ट शेतकरी पुरस्कार - श्री. प्रताप रघुनाथ चिपळूणकर - कोल्हापूर

प्रताप चिपळूणकर यांनी भात, ऊस शेतीपद्धतीमध्ये जमिनीची सुपीकता जपत पीक व्यवस्थापन अधिक सुलभ करणे, शेती सोपी आणि कमी खर्चाची करणे आणि उत्पादनपातळी वाढवीत नेण्यावर भर दिला. नांगरणीशिवाय शेती हा त्यांच्या शेती तंत्राचा केंद्रबिंदू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रताप चिपळूणकर हे जमीन सुपीकतेचा बारकाईने अभ्यास करणारे प्रयोगशील शेतकरी. नागदेववाडी येथे त्यांची स्वतःची पावणेपाच एकर शेती आहे. चिपळूणकर हे कृषी पदवीधर असून १९७० पासून पूर्णवेळ शेती करतात. पारंपरिक पद्धतीने ऊस, भात शेती करताना त्यांनी पीक व्यवस्थापन आणि जमीन सुपीकतेबाबत अभ्यास सुरू केला. मात्र १९९० पासून चिपळूणकर यांनी जमिनीची सुपीकता हा विषय हाती घेऊन भू- सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासास सुरवात केली. पीक नियोजन, जमीन सुपीकतेसंबंधी शास्त्रीय ग्रंथ वाचणे, शेतीमध्ये प्रयोग करणे, शेती व्यवस्थापनाची तंत्रे विकसित करून प्रसारामध्ये चिपळूणकर व्यस्त असतात. कमी होत चाललेली जमिनीची सुपीकता, पीक उत्पादनातील घसरणीचा परिणाम उत्पन्नावरही होत आहे. या प्रश्नांवर स्वतःच्या शेतीमध्ये जमीन सुपीकता आणि पीक व्यवस्थापनाबाबत परंपरागत मार्गापेक्षा भू- सूक्ष्मजीवशास्त्राच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गेल्या २८ वर्षांत चिपळूणकर यांनी भात, ऊस शेतीपद्धतीमध्ये जमिनीची सुपीकता जपत व्यवस्थापन अधिक सुलभ करणे, शेती सोपी आणि कमी खर्चाची करणे, उत्पादनपातळी वाढवीत नेण्यावर भर दिला आहे. नांगरणीशिवाय शेती हा चिपळूणकरांच्या शेती तंत्राचा केंद्रबिंदू आहे.

संवर्धित शेतीवर भर चिपळूणकर यांचा भर प्रामुख्याने संवर्धित शेती म्हणजेच नांगरणीशिवाय शेतीवर आहे. सन १९९० पासून चिपळूणकर यांनी टप्याटप्याने नांगरणी कमी करत आणली आणि २००५ पासून नांगरणी पूर्णपणे बंद केली. फक्त पिकाच्या गरजेपुरती नांगरणी सुरू ठेवली. या तंत्रज्ञानाचे चांगले फायदे त्यांना दिसून आले. ऊस पिकानंतर भात, भुईमूग, सोयाबीन, गहू, सुर्यफूल, कडधान्याचे पीक शून्य मशागत तंत्राने जमीन ओलावून टोकण पद्धतीने घेण्याचे तंत्र चिपळूणकरांनी विकसित केले. पुढे हे पीक काढल्यानंतर तेच जुने सरी वरंबे पुढील ऊस पिकासाठी वापरल्याने नांगरणीची गरज राहात नाही. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे उसाच्या खोडक्या आणि मुळे जमिनीत तशीच कुजत राहिल्याने टप्याटप्याने सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होऊ लागली. चिपळूणकर भात, गहू पिकाची कापणी जमिनीलगत न करता १५ ते २० सें.मी. वरून करतात. भातानंतर फक्त सरीच्या तळाला एक तास मारून उसाची लावण केली जाते. या तंत्रामुळे भाताचे बुडखे, मुळांची जाळी जागेला कुजत राहाते. जमिनीतील उपयुक्त जिवाणू हे पीक अवशेष कुजविण्याचे काम करतात. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय घटक वाढण्यास मदत होत गेली. अशा पद्धतीमुळे भात तसेच ऊस पिकामध्ये फारसा खर्च न करताही उत्पादनात वाढ मिळू लागली. त्यांना उसाचे एकरी ६० टन आणि भाताचे २.५ टन उत्पादन मिळते.

अनुभव आधारित पुस्तकांचे लिखाण   प्रताप चिपळूणकर यांनी कमी खर्चाची ऊस शेती, फायदेशीर भात शेती, जमिनीची सुपीकता,तण देई धन आणि नांगरणीशिवाय शेती या पुस्तकांचे लेखन केले.चिपळूणकर यांनी जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी केलेल्या प्रयोगांचा अवलंब राज्यभरातील शेतकरी करू लागले आहे.

तणांचे योग्य व्यवस्थापन पीक व्यवस्थापन करताना तणांचा पूर्ण नायनाट करण्यापेक्षा चिपळूणकर यांनी जमिनीची सुपीकता जपण्यासाठी तण व्यवस्थापनावरही भर दिला. पिकाच्या बरोबरीने तणाचा पट्टा करून ती वाढवून जागेवरच मारून टाकायची. याचा हळूहळू जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी फायदा होतो हे त्यांच्या लक्षात आले. जमिनीची धूप टाळण्यासाठी तणांचे पट्टे, तणांच्या मुळांकडून जमिनीची नांगरणी, तणांच्या मुळ्यांमुळे जमिनीत तयार झालेल्या पोकळ्यांचा फायदा, पाणी व्यवस्थापन अशा प्रकारचे तंत्र चिपळूणकरांनी प्रत्यक्ष अनुभवातून शेतकऱ्यांच्यासमोर मांडले. पाण्याच्या ताणाच्या काळात जिरायती शेतीसाठी हे तंत्र किफायतशीर दिसून आले आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  •  भू- सूक्ष्मजीवशास्त्राच्या माध्यमातून जमिनीची सुपीकता जपण्याचा प्रयत्न.
  •  जमिनीची सुपीकता जपत व्यवस्थापन अधिक सुलभ करणे, शेती सोपी आणि कमी खर्चाची करणे, उत्पादनपातळी वाढवीत नेण्यावर भर.
  •  नांगरणीशिवाय शेती हा चिपळूणकरांच्या शेती तंत्राचा केंद्रबिंदू.
  •  सेंद्रिय कर्ब वाढविण्यावर भर.
  •  भाताचे बुडखे, मुळांची जाळी जागेला कुजत राहाते. जमिनीतील उपयुक्त जिवाणू हे पीक अवशेष कुजविण्याचे काम करतात. त्याचा जमीन सुपिकता वाढीसाठी फायदा.
  •  जमीन सुपीकतेसाठी तणांचाही वापर.
  •  जमिनीची धूप टाळण्यासाठी तणांचे पट्टे, तणांच्या मुळांकडून जमिनीची नांगरणी, तणांच्या मुळ्यांमुळे जमिनीत तयार झालेल्या पोकळ्यांचा फायदा, पाणी व्यवस्थापन अशा प्रकारचे तंत्र चिपळूणकरांनी प्रत्यक्ष अनुभवातून शेतकऱ्यांच्यासमोर मांडले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com