पेरू फळबागेने दिली शेतीला दिशा

पेरूबागेत कांद्याचे आंतरपीक.
पेरूबागेत कांद्याचे आंतरपीक.

ठाणे शहरात महावितरणमधील नोकरी सांभाळून तुषार वसंत नेहेते यांनी खडका (जि. जळगाव) येथे कुटुंबातील सदस्यांच्या साथीने दोन एकरात पेरूची फळबाग यशस्वी केली आहे. दर्जेदार उत्पादनामुळे बागेमध्येच फळांची विक्री केली. कांद्याचे आंतरपीक घेऊन बागेच्या व्यवस्थापनाचा खर्च कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

तुषार नेहेते हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील आसोदा गावचे. मात्र त्यांचे आईवडील मुंबईत नोकरीनिमित्त स्थिरस्थावर झाल्याने त्यांचे बालपण मुंबईतच गेले. तुषार यांचे वडील वसंत हे खासगी कंपनीत नोकरी करत होते. नेहेते कुटुंबीयांची आसोदा येथे दोन एकर जिरायती शेती आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शेतीची सुरवातीपासून ओढ होती. घरामध्ये शेती विकासाची चर्चा व्हायची. यामुळे तुषार यांनाही लहानपणापासून शेतीची माहिती मिळत गेली. अधूनमधून ते कुटुंबीयांसोबत आसोदा येथे यायचे. तेव्हा आवर्जून शेतीवर चक्कर मारायचे. पुढील काळात शेतीमध्ये कापूस, भाजीपाला लागवडीचा त्यांनी नियोजन केले होते. दरम्यानच्या काळात तुषार नेहेते यांनी मुंबईमध्ये इलेक्ट्रिकल विषयात पदविका पूर्ण केली. त्यानंतर त्यांना वीज वितरण कंपनीत नोकरीला सुरवात केली. सध्या ते ठाणे येथे महावितरण (एमएसईडीसीएल) कार्यालयात आहेत. त्यांच्या पत्नी सौ. कविता यादेखील डोंबिवली येथे खासगी संस्थेत नोकरी करतात. भागीदारीमध्ये शेती नियोजन शेतीच्या आवडीतून तुषार नेहेते यांनी खडका (ता. भुसावळ, जि. जळगाव) येथे चार वर्षांपूर्वी सासऱ्यांच्या सहा एकर शेती नियोजनात पन्नास टक्के भागीदारी केली. पन्नास टक्के पीक व्यवस्थापन खर्च आणि पन्नास टक्के उत्पन्नात भागीदारी ठरली. खडका हे गाव भुसावळ शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर आहे. दर शनिवार, रविवारी आणि सुट्यांच्या काळात नेहेते मुंबईहून रेल्वेने भुसावळला येतात. तेथून खडका गावशिवारातील शेतीवर जातात. गेल्या चार वर्षांपासून तुषार नेहेते शेती नियोजनात रमले आहेत. जमीन काळी कसदार आहे. सुरवातीला सासरे शांताराम भोळे यांच्या मार्गदर्शनानुसार शेतीमध्ये दोन वर्षे कापूस, ज्वारी, कांदा या पिकांची लागवड केली. शेतीमध्ये एक कूपनलिका व विहीर आहे. परंतू उन्हाळ्यात पाणी कमी पडते. त्यामुळे कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा शोध घेण्यास त्यांनी सुरवात केली. आसोदा येथील प्रयोगशील शेतकरी किशोर चौधरी तसेच परिसरातील शेतकऱ्यांशी त्यांचा नेहमी संपर्क असतो.  परिसरातील कृषी प्रदर्शनांना नेहेते आवर्जून भेट देतात. शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेतून त्यांना पेरू लागवडीबाबत चांगली माहिती मिळाली. शेतीच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी त्यांनी एका सालगड्याची नियुक्ती केली आहे. पीक व्यवस्थापनाच्या गरजेनुसार अधिकचे मजूर घेतले जातात. पेरू लागवडीला सुरवात   प्रयोगशील शेतकऱ्यांच्या चर्चेतून २०१७ मध्ये तुषार नेहेते यांनी दोन एकरात पेरू रोपांची दहा फूट बाय आठ फूट अंतरावर लागवड केली. बागेला ठिबक सिंचन केले. लागवड करताना रोपाला आधार मिळावा तसेच ओलावा राहावा यासाठी एक फूट उंच आणि दोन फूट रूंद गादीवाफे तयार केले. नेहेते यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोठ्या आकाराची फळे देणाऱ्या पेरू जातीची निवड केली.   शेणखत आणि माती मिश्रण खड्ड्यात भरून रोपांची लागवड केली. ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांची मात्रा दिली जाते. तसेच दर आठवड्याला ठिबक सिंचनातून जिवामृत सोडले जाते.   फळांच्या वजनाने रोपे वाकू नये म्हणून रोपाजवळ प्लॅस्टीकचे मजबूत पाईप लावून त्यामध्ये सिमेंट भरले. याचा वाढीच्या टप्यात आणि फळे असताना रोपांना चांगला आधार मिळाला आहे.   प्रयोगशील शेतकरी तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कीड, रोग नियंत्रणासाठी उपाययोजना केली जाते. त्यामुळे फळांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळविणे सोपे झाले. दर सहा महिन्यांनी रोपाच्या आळ्यात शेणखत मिसळून दिल्याने जमीन भुसभुशीत राहिली, ओलावा टिकून राहातो.  रोपांच्या गरजेनुसार ठिबक सिंचनाने काटेकोर पाणी दिले जाते. झाडांवर फळांचे जास्तीचे वजन वाढू नये यासाठी काही लहान फळांची विरळणी केली. याचबरोबरीने रोपांना योग्य वळण मिळण्यासाठी हलकी छाटणी केली जाते.   साधारणपणे आॅक्टोबर ते डिसेंबर फळांचा हंगाम असतो. या काळात फळांना डाग पडू नयेत, दर्जा टिकून राहावा यासाठी फोमनेट लावले. सरासरी एका फळांचे वजन ७५० ग्रॅम मिळाले.   दोन एकरातून तीन टन पेरू फळांचे उत्पादन आले. फळांची गुणवत्ता चांगली असल्याने व्यापाऱ्यांनी बागेमध्ये प्रति किलो ४० रुपये दराने खरेदी केली. याचबरोबरीने गाव परिसरातही फळांची थेट ग्राहकांना विक्री केली. पेरू बागेतून खर्च वजा जाता ८० हजारांचा नफा मिळाला. येत्या काळात आणखी दोन एकर पेरू लागवडीचे नियोजन केले आहे. कापूस, कांदा, ऊस लागवड   नेहेते यांनी दोन एकर पेरू बागेच्या सोबत उर्वरित चार एकरात कांदा आणि कापूस लागवडीचे नियोजन ठेवले आहे. कापसाची लागवड ठिबक सिंचनावर असते. एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रणावर भर असतो. किडीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा नेहेते वापर करतात. कापसाचे एकरी १० क्विंटलचे उत्पादन मिळते. गावामध्ये व्यापाऱ्याला कापसाची विक्री करतात. कापसाच्या फरदडीचे उत्पादन ते टाळतात.     डिसेंबरमध्ये कापूस काढणीनंतर रान तयार करून त्यामध्ये कांदा लागवड केली जाते. या कांद्याला जास्तीत जास्त शेणखतात वापर केला जातो. त्याचबरोबरीने दर आठवड्याला जीवामृत दिले जाते. पाट पद्धतीने पाणी दिले जाते. दर्जेदार उत्पादनावर भर आहे.   गेल्या आॅक्टोबरमध्ये दोन एकरावर उसाची लागवड केली आहे. या क्षेत्रातही पुरेसे शेणखत मिसळून लागवड केली. उसाला पाट पद्धतीने पाणी आणि जिवामृत दिले जाते.

कांद्याचे आंतरपीक   दोन एकर पेरू बागेतील पट्ट्यात मागील वर्षी तसेच यंदाच्या हंगामात लाल कांद्याचे आंतरपीक घेतले आहे. कांदा पिकादेखील ठिबकचा वापर केला. कमी पाणी लागावे यासाठी फेब्रुवारीपर्यंत काढणी होईल, या दृष्टीने कांदा रोपांची लागवड केली. कांदा पिकासाठी जास्तीत जास्त शेणखताचा वापर आणि कमी पाण्याचा वापर करून उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पिकाला ठराविक दिवसांच्या अंतराने जीवामृत दिले जाते.   कांद्याचे एकरी १०० क्विंटल उत्पादन मिळाले. मागील हंगामात प्रतिकिलो १५ रुपये दर मिळाला. कांदा काढणीनंतर जमिनीची मशागत न करता अवशेष तसेच फळबागेत कुजू देतात. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होत आहे. यंदाच्या हंगामात दर कमी असल्याने कांदा साठवून ठेवला आहे. अधिक दर मिळाल्यानंतर विक्रीचे नियोजन आहे.

-  तुषार नेहते, ९९६७४१२०२२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com