‘दिशा’ देतेय महिला बचत गटांना आर्थिक ताकद

हतेडी येथे करार पद्धतीने शेती करणाऱ्या बचत गटांतील सदस्या.
हतेडी येथे करार पद्धतीने शेती करणाऱ्या बचत गटांतील सदस्या.

बुलडाणा शहरातील ‘दिशा’ महिला बचत गट फेडरेशनने  बचत गटांना आर्थिक मदत केली. त्याचबरोबरोबरीने महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठही मिळवून दिली आहे. ग्रामीण महिलांना पशुपालन, प्रक्रिया उद्योग त्याचबरोबरीने करारशेती करण्यासाठी मदत करण्यात येत आहे.

राज्यात एक दशकापासून महिला बचत गटांचे काम सुरू अाहे. विविध शासकीय योजनांचे पाठबळ, उद्योगधंद्यासाठी  होणाऱ्या मदतीमुळे महिला गट काही वर्षे जोमाने चालले. मात्र, नंतरच्या काळात या चळवळीत शिथिलता येण्यास सुरुवात झाली. सध्या ठरावीक महिला बचत गट चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. महिला बचत गट ही संकल्पना अतिशय उपयुक्त आहे. त्याला गती देणे अावश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन बुलडाणा शहरातील ॲड. जयश्री सुनील शेळके यांनी ‘दिशा’ महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून पुढाकार घेतला.

‘दिशा’ची कार्ये ‘दिशा’ महिला बचत गट फेडरेशनचे जनसंपर्क अधिकारी राहुल बाजारे म्हणाले, की विविध गावांमध्ये नवीन महिला बचत गटांची स्थापना, बंद असलेल्या गटांचे पुनरुज्जीवन, बचत गटांसाठी प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल निर्मिती, लघुउद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन, उद्योग उभारण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन, उद्योगासाठी भांडवल उभारणी, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करणे या प्रमुख उद्देशांनी आम्ही काम करीत आहोत. मागील तीन वर्षांत ‘दिशा’ने विविध गावांमध्ये सुमारे तीनशे महिला बचत गटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे  बंद पडलेल्या ५० गटांना पुनरुज्जीवित करून त्यांना विविध प्रशिक्षणे दिली आहेत.

उत्पादनाची विक्री बऱ्याचदा बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, खाद्य पदार्थांना मार्केट मिळत नसल्याने आर्थिक फायदा होत नाही. ‘दिशा’ने नेमकी हीच बाब हेरून बचत गट उभा करताना महिलांनी तयार केलेल्या वस्तू,  तसेच खाद्य पदार्थांच्या विक्रीसाठी पाठबळ दिले. देशी गाईचे तूप, विविध प्रकारच्या चटण्या, हस्तकला वस्तू, पापड-खारोड्या, पूजेचे साहित्य, कापडी पर्स अशा विविध वस्तूंच्या विक्रीसाठी मदत केली जाते.  ‘दिशा’च्या मुख्यालयात या वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. दिशा बचत बाजारच्या माध्यमातून बचत गटांच्या उत्पादनांची विक्री केली जाते.

प्रशिक्षणाची सोय  बचत गट तयार झाल्यानंतर त्यातील महिलांना  ज्या व्यवसायात, लघु उद्योगात काम करायचे अाहे, त्याची संपूर्ण तांत्रिक माहिती ‘दिशा’च्या माध्यमातून पुरविली जाते. यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून दिले जातात. वेळच्या वेळी बचत गटातील महिलांच्या बैठका घेऊन त्यात येणाऱ्या अडचणी, नवीन सुधारणा व इतर विषयांवर चर्चा केली जाते.   

  अार्थिक पाठबळ विविध गावांमध्ये महिला बचत गट उभे करणे, त्यांना लघुउद्योगासाठी तयार करणे या बाबींच्या बरोबरीने गटांना लागणारे अार्थिक पाठबळ खूप महत्त्वाचे असते. महिला बचत गटांची अार्थिक चळवळ पुढे नेण्यासाठी बुलडाणा शहरात ‘दिशा’ महिला अर्बन को-अाॅप. क्रेडिट सोसायटी  सुरू करण्यात अाली. ज्या महिला बचत गटांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून अार्थिक सहकार्य मिळण्यात अडचणी येतात त्यांच्या पाठीशी ‘दिशा’ भक्कमपणे उभी राहिली आहे.

बचत गटांचे प्रदर्शन दिशा फेडरेशनच्या माध्यमातून तयार झालेले सुमारे ३०० पेक्षा अधिक महिला बचत गट, तसेच दिशा फेडरेशनच्या सहकार्यामुळे पुनरुज्जीवित झालेल्या गटांना प्रोत्साहन देण्यासाठी बुलडाणा किंवा इतर शहरात बचत गटांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनातून महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना थेट ग्राहक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

महिलांचे मिळाले सहकार्य ‘दिशा’च्या संस्थापिका ॲड. जयश्री शेळके म्हणाल्या, अडीअडचणींवर तोडगा काढण्याचा, परस्परांना होईल तितकी मदत करण्याचा महिलांचा स्वभाव असतो. बचत करणे हा महिलांचा स्थायीभाव अाहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांची एकजूट होण्यासाठी पोषक परिस्थिती अाहे. गेल्या काही वर्षांत स्थापन झालेले महिला बचत गट काही कारणांमुळे बंद झाले होते. परंतु ‘दिशा‘च्या माध्यमातून अाम्ही  बंद असलेले, तसेच नव्याने तयार होऊ शकणारे महिला बचत गट सक्षम करण्यासाठी काम करीत अाहोत. या गटांना हवे असलेले तांत्रिक मार्गदर्शन, गट निर्मिती, तसेच उद्योग, लघुउद्योग उभा करण्यापर्यंत आम्ही मार्गदर्शन करतो. बचत गटांनी तयार केलेले पदार्थ, तसेच विविध वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ तयार करून दिली आहे.  यासाठी महिलांचे चांगले सहकार्य मिळत आहे.

गटांनी सुरू केले विविध व्यवसाय

  • दिशा फेडरेशनच्या माध्यमातून मागील दोन-तीन वर्षांत तयार झालेल्या महिला बचत गटांनी खाद्य पदार्थांची निर्मिती, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय याचबरोबरीने सौंदर्यप्रसाधने आणि सॅनिटरी पॅड विक्री व्यवसायास सुरवात केली आहे.
  •  बुलडाणा तालुक्यातील हतेडी येथील संघर्ष महिला बचत गटातील महिलांनी या वर्षीपासून तीन वर्षांसाठी तीन एकर शेती कराराने घेतली आहे. या गटातील बहुतांश महिला मजुरी करतात. यंदाच्या खरिपात त्यांनी सोयाबीनचे चांगले उत्पादन घेतले. सध्या त्यांनी हरभरा, गव्हाची लागवड केली आहे.
  • काही महिला बचत गटांनी पीठगिरणी सुरू केली आहे. काही गट भाजीपाला विक्री, किराणा व्यवसाय करीत आहेत.
  • बुलडाणा शहरातील झाशी महिला बचत गटाने या वर्षी होळीसाठी खास नैसर्गिक रंग तयार केले होते. यासाठी बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांना गटातील महिलांना  प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन केले. या नैसर्गिक रंगांचे लहान पॅक करून शहरात विक्री करण्यात अाली. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.  
  •  गावपातळीवर विविध उद्योगांना चालना मिळाल्याने बचत गटांची अार्थिक उलाढाल वाढली आहे.
  • दिशा फेडरेशनने महिलांच्या अारोग्य विषयासंदर्भात काम सुरू केले अाहे. संस्थेने सॅनिटरी पॅडची निर्मिती सुरू केली अाली. बचत गटातील महिलांच्या माध्यमातून तयार झालेले ‘दिशा’ पॅडची विविध गावांच्यामध्ये विक्री केली जाते.
  • - राहुल बाजारे, ७६२०५३२८०१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com