मंगेशी झाली वंचितांची माय

टोमॅटो शेतीमध्ये रमलेली वसतिगृहातील मुले .
टोमॅटो शेतीमध्ये रमलेली वसतिगृहातील मुले .

उपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्याचा प्रयत्न रोठा (जि. वर्धा) येथील मंगेशी मून यांनी केला आहे. पारधी तांडा तसेच निराधार मुलांसाठी वसतिगृहाची उभारणी मंगेशी यांनी केली. मुलांच्या शिक्षणासाठी त्या प्रयत्नशील आहेत. स्वतःच्या कृषी पर्यटन केंद्रातून मंगेशी मून यांनी आर्थिक नियोजन केले आहे.

वर्धा हे मंगेशी मून यांचे मूळ गाव. सन २००० साली मंगेशी यांचे लग्न झाले. पतीच्या नोकरीच्या निमित्ताने मंगेशी मुंबई येथे स्थायिक झाल्या. मुंबई आणि आसपासच्या उपनगरात रोजगारासाठी येणाऱ्या स्थलांतरित कुटुंबीयांची मोठी संख्या आहे. या कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहतात. याची जाणीव झाल्यानंतर मंगेशी यांनी स्वतःच्या उमेद संस्थेच्या माध्यमातून कल्याणमधील आधारवाडी परिसरात ''स्थलांतरित शाळा'' ही संकल्पना राबविली. शिक्षणाची आवड असलेल्या मुलांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वाडेघर येथील शाळेत प्रवेश देण्यात आला. कल्याण पूर्व भागात मंगेशी यांनी लहान मुलांसाठी ''प्लॅटफॉर्म स्कूल'' ही संकल्पना राबविली. मंगेशी यांना या मुलांशी बोलताना स्थलांतरण होण्याची कारणे त्यांनी जाणून घेतली. यामध्ये असे दिसून आले की या भागात शिक्षण आणि रोजगार नसल्याने ही मुले तांड्यावरून थेट मुंबई तसेच इतर मोठ्या शहरात भीक मागण्यासाठी जातात.

रोठा शिवारात उभारला प्रकल्प मुंबई परिसरात वंचित कुटुंबातील लहान मुलांच्या शिक्षणाचे काम खर्चिक आणि कोणत्याही मदतीशिवाय करणे परवडणारे नसल्याचे मंगेशी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. वर्धापासून सात किलोमीटर अंतरावर रोठा शिवारात मंगेशी यांच्या माहेरची शेती आहे. या ठिकाणी जुने निवासी घर आहे. या घरात आईसोबत मंगेशी मून रहातात. मंगेशी यांचे वडील देवरावजी पुसाटे हे प्रयोगशील कपाशी उत्पादक होते. २०१८ मध्ये त्यांचे निधन झाले. घरच्या शेतीवर वंचित मुलांसाठी मंगेशी मून यांनी संकल्प वसतिगृह प्रकल्प राबविला आहे.

कर्जातून वसतिगृहाची सोय पारधी तांड्यावरील वंचित मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने झपाटलेल्या मंगेशी यांच्या संकल्पनेला त्यांचे पती रमेश आणि आई, वडिलांचे देखील सहकार्य मिळाले. मार्च २०१६ मध्ये मंगेशी यांनी या प्रकल्पाच्या उभारणीकरिता वर्धा गाठले. त्यानंतर पैशांची जुळवाजुळव कशी करावी, अशी विवंचना होती. शेतीवर केवळ पीककर्ज देता येते, असे बॅंकेने सांगितले. मंगेशी यांच्या वडिलांनी अगोदर पीककर्जाची उचल केली होती. त्यामुळे प्रकल्पासाठी पैशाची उभारणी हे आव्हान होते. परंतु, इच्छा तिथे मार्ग असतोच, त्यानुसार मंगेशी यांचे पती रमेश यांनी या प्रकल्पाला आर्थिक बळ देण्यासाठी आठ लाख रुपयांचे कर्ज काढले. रमेश मून हे विक्रमगड (जि. पालघर) येथे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्राध्यापक आहेत. मंगेशी यांनीदेखील बॅंकेमध्ये दागिने गहाण ठेवत साडेतीन लाख रुपयांची उभारणी केली. अशाप्रकारे वसतिगृह उभारणीसाठी आर्थिक सोय झाली.

वसतिगृहाची सोय मंगेशी मून यांनी उभारलेल्या संकल्प प्रकल्पामध्ये सध्या २४ मुले आणि २१ मुली आहेत. पारधी वस्तीवरून मुला, मुलींना प्रकल्पावर आणणे सोपे नव्हते. पालक मुला-मुलींना सोडण्यास तयार नव्हते. परंतु मुला, मुलींचे शैक्षणिक भविष्य घडविण्यासाठी हा प्रकल्प कसा फायदेशीर ठरेल याबाबत मंगेशी यांनी पालकांना पटवून दिले.

स्वावलंबनाचे धडे भीक मागून जगणाऱ्या या मुलांना आर्थिक शिस्त किंवा स्वावलंबन माहीतच नव्हते. त्यांना ते कळावे याकरिता भाजीपाला शेतीमधील काही कामे वसतिगृहातील मुलांना देण्यात आली. आज भाजीपाला लागवड ते काढणीपर्यंतची सर्व कामे ही मुले आनंदाने करतात.

शाळेत मिळाला प्रवेश

वंचित कुटुंबातील मुलांकरिता वसतिगृहाची सोय केल्यानंतर ते मुख्य प्रवाहात यावेत याकरिता शाळा प्रवेश गरजेचा होता. परंतु भटक्‍या, निरश्रीतांकडे आधार कार्ड किंवा कोणतेही निवासी, जन्माचे दस्तऐवज नव्हते. ते दस्तऐवज तयार करून त्यांना रोठा गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश मिळवून देण्यात आला. सध्या अंगणवाडी ते आठवीपर्यंत ही मुले शिकत आहेत.

शेती प्रकल्पातून निधीची उभारणी    संकल्प प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी दरमहा आर्थिक सोय होण्यासाठी मंगेशी यांनी अकरा एकरांमध्ये कृषी पर्यटनास टप्‍प्याटप्‍प्याने सुरवात केली. परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मंगेशी यांनी पहिल्या टप्प्यात अडीच एकर क्षेत्रावर वर्षभर भाजीपाला लागवडीचे नियोजन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने मिरची, गवार, टोमॅटो, चवळी, पालक, मेथी, कारली या पिकांच्या लागवडीवर भर दिला आहे.  निवासी मुलांच्या जेवणामध्ये शेतीमधील भाजीपाला, धान्य वापरले जाते. वर्धा बाजारपेठेत देखील शेतीवरील भाजीपाला विक्रीसाठी जातो. स्वतः मंगेशी मून भाजीपाला विक्रीसाठी जातात. वंचित मुलांच्या प्रकल्पाकरिता मदत होणार असल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून तात्काळ भाजीपाल्याचा लिलाव करून लगेच रोख रक्कम मंगेशी मून यांना दिली जाते. प्रकल्पासाठी निधीकरिता इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी  स्वबळावर पैशाची उभारणी करण्यावर मंगेशी यांनी भर दिला आहे.

फळझाडांची लागवड मंगेशी मून यांनी शेतीला जिवंत कुंपण तसेच आर्थिक मिळकतीसाठी करवंदाची लागवड केली आहे. त्यासोबतच निसर्ग संवर्धनाच्या उद्देशाने वृक्ष लागवड मोहिमेला देखील गती दिली. मुलांच्या हस्ते १८४  झाडांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये शेवग्यासह आंबा, लिंबू, मोसंबी, पेरू, चंदन यांचा समावेश आहे.

कृषी पर्यटनातून शेती विकास

सुधारित तंत्राने भाजीपाला लागवड, कपाशी, तूर, गहू तसेच फळबाग लागवडीवर मंगेशी मून यांनी भर दिला. दरवर्षी चार एकरावर तूर, कापूस, अडीच एकरावर भाजीपाला आणि पाच एकरावर गहू लागवड असते. मंगेशी मून यांनी प्रकल्पाच्या प्रसाराकरिता सोशल मीडियाची चांगली मदत घेतली. फेसबुक आणि व्हॉटसअॅपच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. कृषी पर्यटनाविषयी लोकांपर्यंत माहिती पोचल्याने पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागांतील पर्यटक मून यांच्या प्रकल्पाला भेट देतात. शेतावरच पर्यटकांच्या जेवणाची सोय केली जाते. या ठिकाणचे आल्हाददायक वातावरण पाहता पर्यटक शेतावर मुक्‍कामी राहण्यास पसंती देतात. सावंगी मेघे येथील वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्‍टर परिवारासह विरंगुळा म्हणून रविवारी या ठिकाणी येतात. या डॉक्टरांच्या गटातर्फे मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. कृषी पर्यटनातून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग वसतिगृह, मुलांच्या शिक्षणासाठी केला जातो.

-  मंगेशी मून ः  ८७७९५९५२८३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com