पुदिना शेतीतून मिळाला वर्षभर रोजगार

मेदनकलूर (जि. नांदेड) येथील शेख रफियाबी यांच्या पुदिना लागवडीमध्ये भांगलण करताना बचत गटातील महिला.
मेदनकलूर (जि. नांदेड) येथील शेख रफियाबी यांच्या पुदिना लागवडीमध्ये भांगलण करताना बचत गटातील महिला.

मेदनकलूर (जि. नांदेड) येथील शेख रफियाबी शेख आरिफ यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेत महिला बचत गटाच्या साथीने पुदिना आणि भाजीपाला लागवड क्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. या लागवडीमुळे गावातील महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध झाला. पुदिना शेतीमुळे गावचे अर्थकारणही बदलू लागले आहे.

मेदनकलूर (ता. देगलूर, जि. नांदेड) येथील शेख रफियाबी शेख आरिफ यांचे कुटुंब पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. गेल्या काही वर्षांत बाजारपेठेचा अभ्यास करत शेख कुटुंबीयांनी पुदिना लागवडीस सुरवात केली. शेतीसुधारणेसाठी महिला स्वयंसहाय्यता बचत गटातून भांडवल उपलब्ध झाले. या भांडवलामुळे शेख रफियाबी यांनी कुटूंबातील सदस्यांच्या सहकार्याने पुदिना आणि भाजीपाला लागवडीमध्ये सुधारणा केली. दररोज पुदिना विक्री होत असल्यामुळे वर्षभर चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

महिला बचत गटांची स्थापना मेदनकलूर हे नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेलगतचे गाव. मांजरा आणि लेंडी या दोन नद्यांच्या पट्ट्यामध्ये हे गाव येत असल्याने पाण्याची चांगली उपलब्धता आहे. त्यामुळे  केळी, भाजीपाला पिकांची लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. या शेतकऱ्यांच्यापैकीच एक आहेत शेख रफियाबी. गावातील मदिना महिला स्वयंसहाय्यता बचत गटामध्ये कार्यरत आहेत.    नांदेड येथील महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक चंदनसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर येथील यशोदिप लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापिका पार्वती जाधव, सहयोगीनी आम्रपाली काळे यांनी मेदनकलूर येथील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी महिला स्वयंसहाय्यता बचत गटांची स्थापना केली.

  • गावामध्ये १० ते १२ महिला सदस्य असलेले तेरा स्वयंसहाय्यता गट. गावातील १५६ महिलांचा महिला गटांत सहभाग.
  •  महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या तमलूर येथील शाखेत स्वयंसहाय्यता बचतगटांची खाती.  
  • सुरवातीला प्रतिसदस्य दरमहा १०० रुपये बचत, आता २०० रुपये बचत.
  • स्वयंसहाय्यता बचत गटांना एका खासगी बॅंकेकडून १९ लाख ९५ हजार रुपये कर्ज पुरवठा.
  • शेतीविकासाबरोबरीने पीठगिरणी, कपडे विक्री आदी पूरक व्यवसायाला मदत. येत्या काळात भात गिरणी, डाळ मिल, पशुपालनाला चालना.
  •  गावात बारमाही पुदिना शेतीचा विस्तार झाल्यामुळे महिलांना वर्षभर रोजगार.
  • पुदिना पीक ठरले फायद्याचे  शेख रफियाबी या मदिना महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या कुटुंबाची दहा एकर शेती आहे. गेल्या काही वर्षांपासून शेख कुटुंबीय टप्प्याटप्प्याने पुदिना लागवड करत आहेत. मजूर टंचाईमुळे त्यांना केवळ एक एकरवर पुदिना लागवड करणे शक्य होत होते. परंतू दोन वर्षांपूर्वी त्यांना महिला बचत गटाकडून अर्थसाह्य मिळाले. शेतीकामांसाठी बचत गटांच्या महिलांचेही सहकार्य मिळाल्यामुळे शेख रफियाबी यांनी सहा एकरापर्यंत पुदिना लागवड वाढवली आहे. लागवड क्षेत्र मोठे असले तरी पुदिना लागवड ते काढणीपर्यंतची सर्व कामे बचत गटातील महिला सदस्यच करतात. पुदिना काढणी केल्यानंतर २५० ग्रॅम वजनाच्या जुड्या बांधल्या जातात. जुड्या बांधण्यासाठी केळीच्या धाग्याचा वापर केला जातो. दररोज दोन क्विंटल पुदिना काढणी होते. शेख रफियाबी यांच्या कुटूंबातील पुरुष मंडळी पुदिना विक्रीसाठी मदत करतात. पुदिन्याला वर्षभर मागणी असते. पावसाळ्यात उत्पादन कमी निघते. या वेळी सरासरी ५० ते ८० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळतो. हिवाळा, उन्हाळ्यात जास्त उत्पादन मिळते. या काळात तेलगंणा तसेच देगलूर येथील भाजीमार्केटमध्ये सरासरी १५ ते २० रुपये प्रति किलो दर मिळतो. आठवडे बाजारात स्वतः विक्री केल्यास ५० रुपये किलोपर्यंत दर मिळत असल्याचे शेख रफियाबी सांगतात. दररोज किमान दोन क्विंटल पुदिन्याची काढणी केली जाते. सरासरी २० रुपये प्रति किलो दर मिळतो. मजुरी, वाहतूक खर्च, बॅंकेच्या कर्जाची परतफेड करून महिन्याकाठी खर्च वजा करता चांगला नफा पुदिना पिकातून मिळतो.

    पुदिना लागवडीचे नियोजन पुदिना लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन लागते. पुदिन्यास अन्य पिकांच्या तुलनेत जास्तीचे पाणी लागते. लागवड क्षेत्रामध्ये वाफे तयार करून त्यामध्ये पाणी सोडून पुदिना तुकड्यांची लागवड केली जाते. लागवडीनंतर दोन महिन्यांनी पुदिना कापणीस येतो. वर्षातून तीन वेळा कापणी करता येते. अन्य पिकांच्या तुलनेत पुदिन्यावर कीड, रोगांचे प्रमाण कमी आहे.  लागवड केल्यानंतर किमान तीन वर्षे उत्पादन सुरू रहाते. बाजारपेठेत सतत पुदिना विक्री करायची असल्याने टप्प्याटप्प्याने लागवडीचे नियोजन येथील शेतकरी करतात.   नवीन शेती खरेदी पुदिना लागवडीमुळे शेख रफियाबी यांची वर्षभर आर्थिक उत्पन्नाची सोय झाली. दररोज किमान दोन क्विंटल पुदिनाची विक्री होते. लागवड, मजुरी खर्च, वाहतूक खर्च, घर खर्च, बचतगटाच्या कर्जाचा हप्ता आदी खर्च जाता शिल्लक राहिलेल्या रक्कमेची बचत करत शेख कुटूंबीयांनी मेदनकलूर गावाजवळील सावंगी शिवारात अडीच एकर शेती खरेदी केली. या ठिकाणी शेडनेटमध्ये पुदिना लागवड करण्याचे त्यांचे नियोजन आहे.

    बाजारपेठेत चांगली मागणी दररोजच्या जेवणामध्ये पुदिन्याचा वापर होतो. त्याचबरोबरीने बिर्याणी, तहारी, चिकन करी, मटन करी आदी मांसाहरी अन्नपदार्थामध्ये पाचक गुणधर्म असलेल्या पुदिन्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केलाजातो. काही भागात केवळ भाजी म्हणून  पुदिन्याला मागणी आहे.

    बाजारपेठा तेलगंणा राज्यातील निझामाबाद, अदिलाबाद, बोधन या ठिकाणी तसेच देगलूर  बाजारपेठांमध्ये पुदिना मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतो. या शिवाय परिसरातील छोट्या मोठ्या गावातील आठवडे बाजारात देखील पुदिन्याची चांगली विक्री होते.

    गटातून शेती विकासाला चालना दोन वर्षांपूर्वी मेदनकलूर येथील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सदस्य असलेल्या आणि समान व्यवसाय करू पाहणाऱ्या महिलांना एकत्र करुन सूक्ष्म व्यवसाय आराखडा (एमएलपी) तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार तीन महिला स्वयंसहाय्यता गटातील एकूण २४ महिलांनी पुदिना लागवड आणि विक्री या व्यवसायाची निवड केली. आराखड्यामध्ये स्वतःची शेती असणाऱ्या १३ महिला असून त्यांची एकूण ३६ एकर शेती आहे. शेती नसणाऱ्या सात महिलांनी भाडे तत्त्वावर १४ एकर शेती घेतली आहे. सध्या तीन महिला बचत गटांच्या माध्यमातून २४ एकरावर पुदिना तसेच विविध भाजीपाला पिकांच्या लागवडीला चालना मिळाली आहे. 

      -  शेख रफियाबी, ९९८९३१६८११  -  चंदनसिंह राठोड, ९८८१४१७४२७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com