शेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली ओळख

शेंगा लाडू तयार करताना सारिका कळसकर
शेंगा लाडू तयार करताना सारिका कळसकर

शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात करून गुणवत्तेच्या जोरावर मोडनिंब (ता. माढा, जि. सोलापूर) येथील सौ. सारिका किरण कळसकर यांनी बाजारपेठेत स्वतंत्र ओळख तयार केली आहे. सारिका कळसकर या शेंगा लाडू तसेच विविध चटण्याची ‘सन्मती‘ या ब्रॅण्डनेमने विक्री करतात.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोडनिंब हे बाजारपेठेचे मोठे केंद्र. बाजारपेठेची गरज आणि आपली आवड यांची सांगड घालून सौ. सारिका किरण कळसकर यांनी शेंगालाडू निर्मिती व्यवसायाची निवड केली. अर्थात, या व्यवसायाची सुरवात तशी फारशी सोपी नव्हती. त्यासाठी बराचसा खटाटोप त्यांना करावा लागला. सारिकाताईंचे शिक्षण जेमतेम बारावी झालेले, पण पहिल्यापासूनच व्यवसायिक होण्याची विशेषतः स्वतःचा प्रक्रिया उद्योग उभारण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. मार्ग सापडत नव्हता. त्यातच त्या एकत्र कुटुंबात होत्या. साधारण आठ वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंब विभक्त झाले. पती खासगी नोकरी करत होते. संसाराला आपलाही आर्थिक हातभार लागावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी धडपड केली. गावातील विजय खेलबुडे यांच्या बेकरीपदार्थांच्या एजन्सीत हिशोबनीस म्हणून त्यांनी नोकरी स्वीकारली. तिथे प्रक्रिया व्यवसायातील बारकावे जाणून घेतले. श्री. खेलबुडे यांनीही त्यांची धडपड पाहून स्वतंत्र प्रक्रिया उद्योगासाठी प्रोत्साहन दिले. त्यातूनच शेंगाच्या लाडूनिर्मितीचा व्यवसाय त्यांना सूचला. दोन वर्षांपूर्वी या व्यवसायात त्या उतरल्या. पती किरण आणि मुलगी अर्पिता, मुलगा पार्थ अशा सगळ्यांची मदत त्यांना मिळते. अवघ्या दोन वर्षांत त्यांनी दोन महिलांना काम देत, स्वतःही या व्यवसायात प्रगती केली आहे.

अशी होते शेंगा लाडूनिर्मिती  सध्या शेंगालाडू निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची मोठी यंत्रणा सारिकाताईंकडे नाही. मिक्सरवर शेंगादाणे बारीक करून त्यात गुळाचे मिश्रण करून त्या लाडू तयार करतात, परंतु लाडूसाठी दर्जेदार शेंगदाणे खरेदी, त्यानंतर त्याचे भाजणे आणि योग्य प्रमाणत गूळ घालणे, ही प्रक्रिया मात्र या सगळ्यात महत्त्वाची आहे, जी सारिकाताईंना जमली आहे. शेंगालाडूसाठी भट्टीमध्ये भाजलेले शेंगदाणे चांगले चवदार लागतात, त्यासाठी त्या भट्टीतून शेंगदाणे भाजून आणतात. प्रतिकिलो आठ रुपयेप्रमाणे शेंगदाणे भाजून मिळतात. त्यानंतर मिक्सरमध्ये शेंगदाणे टाकून त्याचे कुट तयार केले जाते, प्रतिएक किलो शेंगदाणेकुटामध्ये पाऊण किलो गूळ मिसळून विशिष्ठ आकाराचे लाडू बनवले जातात.

लाडूचे पॅकिंग, ब्रँडिंग शेंगालाडूचे आहाराच्या दृष्टीने महत्त्व आहे. हा लाडू चवीष्ठ तर असतोच, तसेच तो भरपूर पौष्ठिकही आहे. त्यामुळे रोजच्या रोज शेंगालाडू खाणारे काही ग्राहक आहेतच. पण त्याशिवाय उपवासासाठीही शेंगा लाडूला चांगली मागणी असते. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन लाडूचे पॅकिंग, ब्रँडिंगला सारिकाताईंनी सुरवातीपासूनच भर दिला. शेंगा लाडूच्या सहा नगाचे (१८० ग्रॅम) एक पाकीट आणि त्याशिवाय प्रत्येकी २८ ग्रॅमच्या ३० लाडवांची बरणी असे पॅकिंग त्या करतात. सहा लाडूचे एक पाकीट २२ रुपये आणि बरणी १२० रुपये असा दर त्यांनी ठेवला आहे. एवढ्यावरच न थांबता बाजारपेठेत लाडवांना वेगळी ओळख मिळण्यासाठी त्यांनी ‘सन्मती‘ हा ब्रॅडही तयार केला आहे.

तीळ, जवस, कारळा चटणीनिर्मिती शेंगालाडूबरोबर सारिकाताईंनी अलीकडे शेंगादाणा चटणी, तीळ, जवस, कारळा चटणीचे उत्पादन सुरू केले आहे. या चटण्यांनादेखील बाजारपेठेत मागणी वाढते आहे. केवळ गुणवत्ता आणि दर्जा या बळावर चटण्यांचा स्वतंत्र ग्राहक तयार झाला आहे. शेंगादाणा चटणीला प्रतिकिलो १५० रुपये, तीळ, कारळे आणि जवस चटणीला  १६० रुपये असा दर त्यांनी ठेवला आहे. शिवाय पाव किलो, अर्धा किलो ते एक किलो या प्रमाणात त्याचे पॅकिंगही केले आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार चटण्यांची विक्री होते.

दिवसाला २५ किलो लाडू विक्री सारिकाताई सुरवातीला पाच-दहा किलो लाडू तयार करत होत्या, पण त्यानंतर जसजशी मागणी वाढू लागली, तसे उत्पादनही वाढवले. आज मोडनिंबसह परिसरातील शहर आणि ग्रामीण भागातूनही लाडूला मागणी वाढली आहे. आज दिवसाला २० ते २५ किलो लाडू तयार केले जातात. पूर्वी ग्राहकांच्या मागणीप्रमाणे त्या लाडू तयार करून देत होत्या. आज ग्राहकांनाच त्यांच्याकडे आगाऊ मागणी नोंदवावी लागते. सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब ही मोठी बाजारपेठ आहे, पण आज त्यांच्या लाडूच्या चवीची माहिती परिसरातील किरकोळ विक्रेते, ग्राहकांपर्यंत पोचल्याने मागणी वाढली आहे. साहजिकच मोडनिंबसह नजीकच्या टेंभूर्णी, अकलूज, पंढरपूर, मोहोळ आणि सोलापूर शहरातूनही मागणी वाढली आहे. लाडवांची सर्वाधिक विक्री परिसरातील ग्रामीण भागासह अकलूज, पंढरपूर बाजारपेठेत  होते. आज सारिकाताईंकडे शेंगालाडू निर्मितीसाठी दोन महिला कामगार आहेत. त्यांना प्रतिमहिना प्रत्येकी तीन हजार पगार दिला जातो. शेंगदाणे खरेदी, भाजणी, कुट करणे, लाडू तयार करणे ही कामे त्या करतात. या सगळ्या कामात शेंगदाणे-गुळाची खरेदी, महिला कामगारांचा पगार असा सर्व खर्च वगळता महिन्याकाठी सारिकाताईंना सरासरी पंधरा हजारांचा निव्वळ नफा मिळतो.

- सौ. सारिका कळसकर,९५६१४३०३६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com