ग्रामीण आरोग्यासोबत जपला शेतकरी प्रबोधनाचा वसा

शेतकरी प्रशिक्षण वर्गात सहभागी होऊन यवतमाळ जिल्ह्यातील विनोद मैंद यांनी सुधारित तंत्राने पीक लागवडीस सुरवात केली आहे.
शेतकरी प्रशिक्षण वर्गात सहभागी होऊन यवतमाळ जिल्ह्यातील विनोद मैंद यांनी सुधारित तंत्राने पीक लागवडीस सुरवात केली आहे.

देशात सशक्‍त आणि आरोग्यसंपन्न पिढी घडावी, या उद्देशाने स्वातंत्र्यपूर्व काळात अमरावती येथे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (एचव्हीपीएम) या संस्थेची सुरवात झाली. युवकांमध्ये व्यायामाप्रती जागरुकता वाढविण्यावर भर देणाऱ्या या संस्थेने काळाची पावले ओळखत शेतकऱ्यांचे प्रबोधन, ग्रामविकास आणि महिलांसाठी विशेष उपक्रम सुरू केले आहेत.

भारतीय व्यायाम पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने १९१४ मध्ये अंबादास कृष्ण वैद्य आणि अनंत कृष्ण वैद्य यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली. सन १९२६ साली संस्थेच्या इमारतीचे उद्‌घाटन महात्मा गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय युवा पिढी सुदृढ व आव्हाने पेलणारी व्हावी याकरिता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने पुढाकार घेतला आहे. संस्थेने या काळात युवकांसाठी नगर संरक्षक दलाची सुरवात केली. संस्थेच्या शाळेत व्यायामाचे अनेक प्रकार तसेच आहार व्यवस्थापनाविषयीदेखील माहिती दिली जात होती. देशभरातील लोक या ठिकाणी येत असत. शहीद राजगुरू यांनीदेखील या संस्थेमध्ये भारतीय व्यायाम पद्धतीचे धडे गिरविले होते, असा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा इतिहास आहे. संस्थेने सशक्‍त पिढी घडविण्याचा आपला वसा आणि वारसा आजवर कायम ठेवला असल्याची माहिती मंडळाचे सचिव प्रभाकर वैद्य यांनी दिली. २२ मार्च २००७ रोजी (कै.) खासदार निर्मलाताई देशपांडे यांच्या नेतृत्वात पंतप्रधान मनमोहनसिंग यांची `शेतकरी आत्महत्या` या विषयावर चर्चेसाठी वेळ घेण्याचे ठरले. काही शेतकरी, लोकप्रतिनिधी तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शेतकरी जागृती अभियानातील प्रतिनिधींचा यामध्ये समावेश होता. या चर्चेचा परिपाक म्हणजे तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणण्याकरिता विदर्भ दौरा ठरविला. त्याअंतर्गत यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली. समस्यांची तीव्रता जाणत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यानंतर पंतप्रधान पॅकेज जाहीर करण्यात आले, असे संस्थेचे पदाधिकारी सांगतात.

नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार पश्‍चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम तसेच पूर्व विदर्भातील वर्धा या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसाठी संस्थेने ‘विदर्भ शेतकरी जागृती अभियाना`ची सुरवात केली. यामध्ये श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती व्यवस्थापनातील तांत्रिक माहिती दिली जाते. या उपक्रमासाठी शेगाव येथील गजानन महाराज संस्थान तसेच बॅंक आॅफ महाराष्ट्र यांचे सहकार्य मिळाले आहे. दोनदिवसीय कार्यशाळेकरिता येणाऱ्या शेतकऱ्यांचे जेवण आणि राहण्याची सोय संस्थेद्वारे निशुल्क केली जाते. विदर्भ शेतकरी जागृती अभियानाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत अनेक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीपद्धतीचे धडे देण्यात आले. या प्रशिक्षणात सहभागी झालेले शेतकरी या तंत्रज्ञानाचा अवलंब स्वतःच्या शेतीमध्ये करीत आहेत.  

गावात नेमले संपर्क प्रमुख  शेतकऱ्यांचे प्रबोधन होण्यासाठी संस्थेने ‘शेतकरी हेल्पलाइन` हा उपक्रम सुरू केला. विदर्भातील सहा जिल्ह्यांतील विविध गावांमध्ये संस्थेने या उपक्रमासाठी १०० संपर्क प्रमुख नेमले आहेत. गावातील शेतकऱ्यांशी हे संपर्क प्रमुख सामूहिक संवाद साधतात. या माध्यमातून शेतकऱ्यांचे मनोबल वाढविले जाते.

शारीरिक शिक्षणाचे दिले धडे देशभरातील खेड्यांमध्ये राहणाऱ्या युवकांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ जपले जावे, असा संस्थेचा हेतू आहे. त्यानुसार स्वातंत्र्यानंतर संस्थेने शारीरिक शिक्षणविषयक तीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये संस्थेने व्यायाम प्रवेश, व्यायामपटू आणि व्यायाम विशारद या अभ्यासक्रमांना सुरवात केली. उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाना, पंजाबसह देशाच्या विविध राज्यांतून युवक या ठिकाणी शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमाकरिता येत होते. त्याकाळी व्यायाम विशारद अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अनेक युवकांना शारीरिक शिक्षक म्हणून शाळांमध्ये नोकरीसुद्धा मिळाली. या उपक्रमातून पुढे बीपीई (बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन) महाविद्यालय सुरू करण्यात आले. ग्वाल्हेरनंतर देशातील या विषयासंबंधीचे हे दुसरे महाविद्यालय होते. १९४६ साली अखिल भारतीय शारीरिक शिक्षण परिषद व्हीएमव्ही मैदानावर झाली. तंत्रशुद्ध व्यायाम पद्धतीचा प्रसार होण्याच्या उद्देशाने अमरावती जिल्ह्यातील सर्वच खेड्यांमध्ये संस्थेने आपले प्रशिक्षक पाठवून त्यांच्या माध्यमातूनदेखील तंत्रशुद्ध व्यायामाचे धडे देण्यावर भर दिला आहे. कुस्त्यांची दंगल, तंत्रशुद्ध कुस्तीविषयक प्रशिक्षण संस्थेतर्फे दिले जाते. गेल्या काही वर्षांत संस्थेचे अनेक खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत.

ग्रामीण युवकांना प्रशिक्षण

शेतकरी कुटुंबातील एक व्यक्‍ती नोकरीत असावा, कुटुंबाची शेतीवरील अवलंबिता कमी व्हावी, या उद्देशाने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निशुल्क शारीरिक प्रशिक्षणाचे काम संस्थेने हाती घेतले. संस्थेतर्फे सैनिकी प्रशिक्षणही दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून या उपक्रमात सातत्य आहे. शेतकरी कुटुंबातील मुले शासकीय सेवा किंवा सैन्यात दाखल व्हावीत, असा यामागचा उद्देश आहे. सैन्य भरतीसाठी खास पंधरा दिवसांचे निशुल्क प्रशिक्षण घेतले जाते. संस्थेतर्फे एक लाख युवकांच्या प्रशिक्षणाचा प्रस्ताव आहे. आजपर्यंत ५० हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांनी दिली.

महिला आणि मुलांसाठी हेल्पलाइन महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर नियंत्रण आणण्यासाठी मंडळाने हेल्पलाइन उपक्रम राबविला आहे. पती-पत्नीमधील कौटुंबिक कलहदेखील दोघांना एकत्रित बोलावून सामंजस्याने सोडविले जातात. मंडळाने लहान मुलांकरितादेखील मदत केंद्र उभारले आहे.

जातीय सलोखा हेल्पलाइन गावांमध्ये जातीय सलोखा जपला जावा याकरिता मंडळाची हेल्पलाइन आहे. पोलिस खात्याच्या सहयोगाने संवेदनशील चौदा गावांमध्ये सर्व समाजबांधवांचा समावेश असलेली समिती तयार केली. शेगाव, खामगाव, अकोला, अचलपूर, चांदूरबाजार, नांदगावपेठ यांसह इतर गावांचा या उपक्रमामध्ये समावेश आहे. या समितीत अध्यक्ष, सचिवांसह दोन्ही समाजाचे प्रत्येकी वीस सदस्य अाहेत. गावामधील जातीय तणावाच्या प्रसंगी बैठक घेऊन सामंजस्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविले जाते.

मंडळाचे उपक्रम

  •    ग्रामीण युवकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ प्रशिक्षण.
  •     संस्थेचे अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर.
  •     शेतकऱ्यांसाठी तांत्रिक कार्यशाळा.
  •     महिला अत्याचार आणि जातीय सलोख्यासाठी हेल्पलाइन.
  •     शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निवासी व निशुल्क शारीरिक प्रशिक्षण.
  •     ग्रामीण भागातील व्यायामशाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे धडे.
  • -  सुरेश देशपांडे, ९४२२८५५२३३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com