दुष्काळातही मातीशी नाळ घट्ट जोडलेले भोरे कुटुंब

प्रतिकूलतेतही शेतीत प्रयोगशीलता जपणारे भोरे कुटुंबीय
प्रतिकूलतेतही शेतीत प्रयोगशीलता जपणारे भोरे कुटुंबीय

प्रतिकूल हवामान, दुष्काळ आदी कारणांमुळे शेती नुकसानीत जाऊ लागली. पण, ‘प्रयत्नांती परमेश्‍वर' या उक्तीने व परिवाराच्या भक्कम एकजुटीतून बोरी (जि. जालना) येथील भोरे कुटुंबाने सुमारे ७० एकरांत प्रयोगांच्या आधारे आशा फुलवल्या आहेत. हंगामी पिकांना फळपिकांची जोड, शेततळी, ठिबक, मातीची सुपिकता, दुग्ध व अन्य व्यवसाय असे हरतऱ्हेचे प्रयत्न करीत आशावादी वृत्ती सोडलेली नाही. मातीशी असलेली नाळ घट्ट ठेवली आहे.   मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत भीषणावह आहे. प्राप्त परिस्थितीत संकटांवर मात करीत मार्ग काढण्याचा येथील शेतकऱ्यांचा प्रयत्न राहिला आहे. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्‍यातील बोरी येथील भोरे कुटुंब त्यापैकीच एक म्हणावे लागेल. रामचंद्रराव भोरे हे घरातील वडीलधारे व्यक्तिमत्त्व. त्यांना वाल्मीकी, भास्कर, भागवत आणि गोवर्धन अशी चार मुले. सर्वांचे मिळून सुमारे २५ जणांचे कुटुंब गुण्यागोविंदाने एकत्र राहते. कुटुंबाची वडिलोपार्जित जवळपास ५२ एकर शेती होती. वडिलोपार्जित किराणा मालविक्रीचा व्यवसाय आहे. व्यवसाय सांभाळून पारंपरिक शेती करणारे भोरे कुटुंब कपाशी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिके घ्यायचे. रामचंद्ररावांनी १९७२ चा दुष्काळ डोळ्यांनी अनुभवला. दुष्काळात सामाजिक दायित्व जपताना गरजूंना अन्नधान्याचा पुरवठाही केला. तोच वसा जपताना सामाजिक हातभार लावण्याचे काम आम्ही प्राधान्याने करीत असल्याचेही ही भावंडे आवर्जून सांगतात. पिकांचे पद्धतशीर नियोजन वाल्मीकी सांगतात, की गेल्या दोन वर्षांपासून शेती फायद्यात नाही. पण, चिकाटी सोडलेली नाही. हंगामी पिके घेण्याबरोबच परिस्थितीनुरूप बदल स्वीकारून फळपिकांची जोडही दिली आहे. अलीकडील वर्षांत मोसंबीची दहा एकरांवर, डाळिंब पाच एकर, पेरू तीन एकर, द्राक्ष पाच एकर, तर सीताफळाची चार एकरांवर लागवड करण्याचे काम भोरे कुटुंबीयांनी केले. लवकरच फळपिकांच्या उत्पादनापासून आश्‍वासक उत्पन्न सुरू होईल. यंदा आजवर ३० ते ४० क्रेट पेरू विकले गेले. गेल्या वर्षी सात ते आठ टन उत्पादित पेरूला ३८ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. भोरे कुटुंबाच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • वडिलोपार्जित ५२ एकरांत २० एकर शेतीची भर.
  • नफा, नुकसान, ताळेबंद अभ्यासून व्यावहारिक पद्धतीची शेती
  • कुटुंबातील सर्व सदस्य शेतीत राबतात.
  • पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी शंभर टक्के ठिबक सिंचन
  • सिंचनाच्या सोयीसाठी सात विहिरी. मात्र, सध्या दोन-तीन विहिरींनाच पाणी
  • दीड किलोमीटरवरील पाण्याचा स्त्रोत शोधून, विहीर खोदून शेतात आणले पाणी.
  • एका विहिरीतून दुसऱ्या विहिरीत पाणी फिरविण्याची सोय.
  • शंभर बाय १०० बाय ३४ फूट आकारमानाच्या दोन शेततळ्यांची उभारणी. सद्यःस्थितीत ती भरलेली.
  • डाळिंब, मोसंबी, द्राक्ष, सीताफळ, पेरू असे कोणतेही फळपीक असो त्यास उन्हाळ्यात वा गरजेनुसार पाचट आच्छादनाची जोड. जोडीला ठिबक असल्याने पाण्याची मोठी बचत.
  • दुग्धव्यवसायाची जोड भोरे कुटुंबाकडे जवळपास १९९९ पासून शेतीला जोड म्हणून दुग्धव्यवसाय सुरू आहे. सध्या म्हशी सुमारे १२, देशी गायी २  असे पशुधन आहे. त्यांच्यासाठी चाराक्षेत्र ७ ते ८ एकर आहे. दर वर्षी शेणखत ६० ट्रॉलीपर्यंत उपलब्ध होते. फळबागांसाठी स्लरी उपयोगी ठरते. एक रुबाबदार घोडाही छंद म्हणून पाळला आहे. लेंडीखताची गरज ओळखून गेल्या वर्षी ८० शेळ्यांचे पालन सुरू केले. परंतु, मजुरांची टंचाई जाणवू लागल्याने हा व्यवसाय आवरता घ्यावा लागला. मात्र, लेंडीखताची गरज भागविण्यासाठी चार शेळ्या ठेवल्या आहेत. आजवरच्या दुग्धव्यवसायाच्या वाटचालीत सुमारे १५ म्हशींचे संगोपन व्हायचे. मजुरांसह चाराटंचाईमुळे त्यादेखील कमी कराव्या लागल्या. आजघडीला जवळपास साठ लिटर दूध दररोज अंबड शहरात डेअरी, तसेच रतीबाला जाते. रतिबाचे ग्राहक गेल्या अनेक वर्षांपासून कायम असल्याचे भास्कर सांगतात. कामांची विभागणी कुटुंबातील चारही भावंडांकडे कामांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. त्यामुळे एकमेकांचा भार हलका होण्यास मदत मिळते. शेतीला लागणाऱ्या निविष्ठा, त्यांचे वेळापत्रक ही जबाबदारी गोवर्धन व भागवत सांभाळतात. किराणा मालविक्रीचा व्यवसाय बंद केला असला, तरी ठिबक सिंचनाशी निगडित व्यवसायाची जबाबदारी हेच दोघे बंधू संभाळतात. वाल्मीकी यांच्याकडे शेती, तर दुग्धव्यसाय भास्कर सांभाळतात. ...असे असेल पुढचे पाऊल मागणीनुसार फळपिकांचे उत्पादन वाढविताना त्याला सेंद्रिय शेतीची जोड देण्याचे नियोजन भोरे करताहेत. हे करीत असतानाच उत्पादित माल साठविण्यासाठी शासनाच्या योजनेतून गोदामाची उभारणीही सुरू केली आहे. मालावर प्रक्रिया करण्याची गरज लक्षात घेऊन लवकरच डाळमिलही सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी लागणारी यंत्रसामग्रीही घेतली आहे.   वाल्मीकी भोरे- ९०४९६२६६२२ भास्कर भोरे-९८५०५४८९७२ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com