दर्जेदार, खात्रीशीर मोसंबी रोपनिर्मितीत अग्रेसर आडूळ

मातृवृक्षांची जोपासना, शास्त्रोक्‍त पद्धत व विश्वासार्हता यामुळे आडूळ येथील मोसंबीच्या रोपवाटिकांचा विस्तार झपाट्याने झाला. शेतकऱ्यांना शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय मिळाला. -आनंद कोठेकर मंडळ कृषी अधिकारी, आडूळ
राज्यभरातील शेतकरी रोपे नेण्यासाठी आडूळ येथे येतात.
राज्यभरातील शेतकरी रोपे नेण्यासाठी आडूळ येथे येतात.

औरंगाबाद तसा अवर्षणप्रवणच जिल्हा. त्यामुळे त्या स्थितीवर मात करीत पर्याय निवडण्याचे काम येथील शेतकरी सातत्याने करीत असतात. पैठण तालुक्‍यातील आडूळ येथील शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने मोसंबी रोपवाटिकांचा व्यवसाय निवडला. रंगपूर व जंबेरीच्या रूटसटॉकवर शास्त्रीय पद्धतीने रोपनिर्मिती करीत त्याला राज्यभरात मार्केट मिळवले आहे. त्यातून अर्थकारण सक्षम केले आहे.   औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात येणारा आडूळचा परिसर कधी काळी मोसंबीचा ‘बेल्ट’ म्हणून ओळखला जायचा. आजही जवळपास ११० हेक्‍टर मोसंबी क्षेत्र या परिसरात आहे. दुष्काळामुळे लागवड घटली असली तरी शेततळ्यांच्या माध्यमातून संकटांशी दोन हात करताना शेतकऱ्यांनी पुन्हा फळबाग लागवडीकडे कल वाढविला आहे. त्यामुळे ८० च्या दशकात जवळपास पाच रोपवाटिकांपासून सुरू झालेली आडूळमधील मोसंबी रोपवाटिकेची सुरवात आता चोवीस रोपवाटिकांवर येऊन पोचली आहे. त्यातील शेतकऱ्यांकडे ५० ते २०० पर्यंत मातृवृक्ष आहेत. तीस वर्षांच्या या प्रवासात येथील शेतकऱ्यांनी मिळविलेल्या विश्वासामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यासह गुजरात, मध्य प्रदेशातूनही शेतकरी रोप नेण्यासाठी येथे येतात. काही शेतकरी शासनालाही रोपांचा पुरवठा करतात. वाघांची नर्सरी रामराव गोविंदराव वाघ म्हणजे सुरवातील ज्या पाच जणांनी रोपवाटिका सुरू केली त्यापैकी एक. आपल्याच शेतासाठी गरज म्हणून त्यांच्यासह काहींनी १९८० मध्ये रोपनिर्मितीचे प्रयत्न सुरू केले. शासकीय नर्सरीतून मातृवृक्ष आणून रोपनिर्मिती व लागवड यशस्वी केली. त्यानंतर स्वतः रोपनिर्मिती करू शकतो, याची खात्री पटली. मग इतरही शेतकऱ्यांकडून मागणी येऊ लागली. शासनाकडे नोंद केल्यानंतर काही काळ शासनालाही रोपांचा पुरवठा केला. पाच एकर शेती असलेल्या वाघ यांनी एक एकर क्षेत्र कायम रोपवाटिकेसाठी निश्चित केले. मध्यंतरी दुष्काळाने या उद्योगावरही संकट आणले. परंतु टॅंकरने पाणी देऊन रोपे जगविली. विक्री करून अर्थार्जन मिळविले. दोन हजार रोपांपासून सुरू केलेली वाघांची रोपनिर्मिती आता ७० ते ८० हजार रोपांवर जाऊन पोचली आहे. शिवाय रोपांचे दरही ४० ते ४५ रूपये प्रतिरोपांपर्यंत पोचल्याचे वाघ सांगतात. डाळिंब व आंबा रोपांचीही निर्मिती ते करतात. यंदा दहा लाखांवर निर्मिती एकट्या आडूळमध्ये झाल्याचा त्यांचा अंदाज आहे.  रोपनिर्मिती व्यवसायातील ठळक बाबी

  • रोपनिर्मितीसाठी बी टोचणी जुलै, ऑगस्टमध्ये
  • साधारणत: २१ दिवसांनी उगवण
  • साधारणत: एक वर्षाने रोप बांधणीसाठी तयार
  • अडीच ते तीन फुटाचे झाल्यानंतर छाटणी
  • ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये डोळे भरणे
  • सुमारे २१ दिवसांनी शेंडा कट करणे
  • जून, जुलैमध्ये रोपे विक्रीला उपलब्ध
  •  विक्रीची पद्धत बऱ्याच वर्षांपासून नावलौकिक झाल्याने रोपांना आगाऊ मागणी असते. त्यानुसार अंदाज घेऊन मेमध्ये बुकिंग घेतले जाते. त्यानंतरच विक्रीचे नियोजन होते.आमच्या भागात मोसंबीची लागणारी रोपं बहुतांश शेतकऱ्यांनी इथूनच नेली. आम्हीही खात्रीशीर रोपं मिळत असल्याने याच भागाला पसंती देतो, अशी प्रतिक्रिया जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्‍यांतर्गत बांब्रुड (प्रा.ब.) येथून आडूळ येथील किरण परदेशी, मोहन परदेशी, राहुल पाटील, भिकन परदेशी, जयसिंग परदेशी यांनी दिली. पाच किलोमीटरवरून आणले पाणी आडूळ येथील सुनील पिवळ जवळपास दहा वर्षांपासून मोसंबीची रोपवाटिका चालवितात. यात दोन भावांची त्यांना मोठी मदत लाभते. दहा हजार रोपांपासून सुरू केलेली रोपवाटिका आता जवळपास ५५ हजार रोपांची निर्मिती करण्यापर्यंत पोचली आहे. यंदा जवळपास ३५ हजार रोपांची विक्री त्यांनी केली. रोपे जगवण्यासाठी पाच किलोमीटरवरून पाइपने पाणी आणले. शिवाय ३०० बाय ३०० फूट आकाराचे शेततळेही उभारले आहे. पाच रुपये प्रतिरोपांपासून सुरू केलेली विक्री आता परिस्थितीनुरूप ३५ ते ४० रुपयांपर्यंत पोचली आहे. पाटोळे चालवितात वडिलांचा वारसा सन १९८५ मध्ये दीपक पाटोळे यांचे वडील नाथा पाटोळे यांनी रोपवाटिका सुरू केली. त्याचा वारसा आता जवळपास पंधरा वर्षांपासून आपण सांभाळत असल्याचे दीपक म्हणाले. दोन एकर शेतीपैकी अर्धा एकर क्षेत्र रोपवाटिकेसाठी कायम राखीव असते. यंदा त्यांनी जवळपास वीस हजार मोसंबीच्या रोपांची निर्मीती केली. ती जवळपास पन्नास हजारांपर्यंत गेली होती. परंतु दुष्काळाच्या संकटानं त्यांना रोपवाटिकेचा विस्तार करता आला नसल्याचे ते सांगतात. प्रतिक्रिया   जवळपास तीस वर्षांपासून आडूळ गावात रंगपूर खुंटावरील मोसंबीच्या रोपनिर्मितीचे काम केले जाते. खात्रीशीर रोप देण्याचे काम इथले शेतकरी करतात. बॅगमध्ये रोपांची निर्मिती केल्यास मागणी आणखी वाढेल व शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल. -डॉ. एम. बी. पाटील प्रमुख, फळसंशोधन केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद सुमारे ११० हेक्‍टर फळबाग असलेल्या आडूळमध्ये सुमारे २४ रोपवाटिका आहेत. शास्त्रोक्‍त पद्धतीने रोपनिर्मिती करण्यात येथील शेतकऱ्याचा हातखंडा अाहे. त्यामुळे मराठवाड्यातूनच नव्हे, तर महाराष्ट्राच्या अन्य भागातूंनही शेतकरी रोपखरेदीसाठी आडूळला येतात. -मच्छिंद्र घाटोळे कृषी सहायक, आडूळ, ता. पैठण, जि. औरंगाबाद. संपर्क- ९४२१४१३७५६   पूर्वीपासूनच सुमारे साडेपाचशे मोसंबीची झाडे माझ्या शेतात आहेत. आणखी तीन एकर क्षेत्र वाढवायचे आहे. मजूर मिळत नसल्याने फळबागेकडे वळतो आहे. आडूळ हे मोसंबीची खात्रीशीर रोपे मिळण्याचे गाव आहे. याआधीची रोपं इथूनच नेली. ती यशस्वी झाल्यानं रोप नेण्यासाठी नेहमी येथे येतो. -श्‍यामराव नाईकवाडे शेंद्रा, ता. जी. औरंगाबाद. संपर्क- रामराव वाघ- ९४२१६५२५८५ सुनील पिवळ- ९७६३८३५२७२ दीपक पाटोळे- ९९२१८३५२२९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com