धोत्रे यांची शेती देते हजार रुपये रोज

आंतरपिक पद्धती ःपेरू बागेत लावलेला लिंबू.
आंतरपिक पद्धती ःपेरू बागेत लावलेला लिंबू.

फळबाग, आंतरपिके, भाजीपाला पिके यांच्या बहुविध शेतीतून केवळ चार एकरांतूनही चांगले उत्पन्न मिळवता येते, याचे उदाहरण विवरा (ता. पातूर, जि. अकोला) येथील देविदास विश्‍वनाथ धोत्रे यांच्या शेतीतून मिळते. इंच अन् इंच जागेचा नियोजनबद्ध वापर, सेंद्रिय पद्धतींच्या वापरातून उत्पादन खर्च कमी राखला असून, प्रतिदिन हजार रुपये उत्पन्नाचा हिशेब पॅटर्न मांडला आहे. सामान्यपणे एखादी फळबाग किंवा पारंपरिक पिकातून शेतीचा डोलारा चालवणे जिकिरीचे होत आहे. अशा स्थितीमध्ये क्षेत्र कमी असले, तरी अनेक पिकांची नियोजनबद्ध कास धरल्यास नियमित उत्पन्नाची शाश्वती मिळू शकते, अकोला जिल्ह्यातील विवरा (ता. पातूर) येथील देविदास धोत्रे यांनी दाखवून दिले आहे. प्रतिदिन किमान हजार रुपये उत्पन्नाचे गणित त्यांनी साधले आहे.

फळबागेत आंतरपिके

  • २००५ मध्ये सीताफळाची १० बाय १० फूट अंतरावर लागवड केली होती. त्यात २०१२ मध्ये २० बाय २० फूट अंतरावर पेरूची लागवड केली आहे. एका बाजूला ५० गुंठ्यांमध्ये, तर दुसऱ्या बाजूस २० गुंठ्यांमध्ये पेरूची लागवड आहे. २० गुंठ्यांमध्ये पेरू लागवड २० बाय १० फुटावर केली असून, त्यामध्ये चार वर्षांपूर्वी २० बाय २० फूट अंतरावर लिंबू लागवड केली आहे. पुढच्या वर्षी लिंबूतून उत्पादन मिळेल, असे ते सांगतात.
  • साधारण ऑक्‍टोबर अखेरपासून पेरू उत्पादन सुरू होते. गेल्या वर्षी सुमारे ३०० क्रेट (प्रतिक्रेट २० किलो फळे) उत्पादन मिळाले असून, अकोला येथील बाजारपेठेत ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री केली. या वर्षी ६० हजार रुपयांत त्यांनी बाग व्यापाऱ्याला दिली आहे. पेरूमध्येच आंतरपीक सीताफळाची विक्री ७० हजार रुपयांना केली आहे.
  • पेरू व लिंबू एकत्रित बागेतील झाडांच्या मध्ये प्रत्येक दोन तास भेंडी लावली होती. गावामध्ये, शेजारच्या वाडेगाव, पातूर येथे भेंडीची थेट विक्री सुमारे ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे केली. त्यातून थेट विक्रीमुळे चार हजार रुपये मिळाले.
  • रोपांची निर्मिती व विक्री उत्पन्नासाठी एकाच मार्गावर अवलंबून राहायचे नाही, हे धोत्रे यांचे धोरण. त्यांनी सीताफळाची तीन हजार, तर लिंबूची दोन हजार रोपे तयार केली. सीताफळाची रोपे २० रुपये, लिंबू रोपे ३० रुपये प्रतिनग याप्रमाणे आसपासच्या शेतकऱ्यांमध्ये विकली गेली.

    बांधावर सागवान व कढीपत्ता -शेताच्या मध्यभागी बांधालगत असलेल्या नालीमध्ये जागेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने २००५ मध्ये सागवानाची ३८ झाडे लावली होती. यातील २० झाडांच्या विक्रीतून ४० हजार रुपये मिळाले. -बांधावर प्रत्येक पाच फूट अंतरावर याप्रमाणे १०० कढीपत्त्याची झाडे लावली होती. या वर्षीपासून कढीपत्ता मिळण्यास सुरवात होईल.

    वेलवर्गीय पिकांचे नियोजन

  • एक शेत रस्त्यामुळे विभागले गेले असून, एका बाजूला ८० गुंठे, तर दुसऱ्या बाजूला २० गुंठे क्षेत्र आहे.
  • या २० गुंठे क्षेत्रामध्ये मांडव केला असून, कारली घेतली जातात. या वर्षीच्या हंगामात कारल्याच्या गावपातळीवर आणि अकोला बाजारपेठेत घाऊक विक्रीतून सुमारे २५ रुपये किलो सरासरी दराप्रमाणे ८० हजार रुपये मिळाले.
  • कारली निघण्याच्या एक महिनाआधी त्याच तार, बांबूच्या मंडपावर गावरान वालाची लागवड केली. त्यामुळे येत्या पंधरवड्यात त्यापासून शेंगा सुरू होतील.
  • १० गुंठे क्षेत्रात कांदा व त्याच बेडवर मुळा लावला असून, मोकळ्या जागेत मुळ्याच्या शेंगा, दोडका लावला आहे. २ गुंठे जागेमध्ये कोबी लागवड केली आहे.
  • टोमॅटो, अॅपल बोर लागवड ८० गुंठे क्षेत्र पत्नी वंदना यांच्या नावे असून, त्यातील अर्धा- अर्धा एकरमध्ये टोमॅटो आणि अॅपल बोर लावले आहे. अॅपल बोराच्या बागेमध्ये सुरवातीला बरबटी, त्यानंतर कोथिंबिरीचे आंतरपीक घेतले होते, तर टोमॅटोमध्ये कोबी व अन्य भाजीपाला पिके घेतली. या वर्षीपासून अॅपल बोराचे उत्पादन सुरू होत असून, सरासरी तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. या शेतीतील १५ गुंठे क्षेत्रांमध्ये उडीद लागवड केली होती. त्यातून दोन क्‍विंटल उडीद उत्पादन मिळाले. उडीदनंतर नव्याने भेंडी लागली आहे. अशा प्रकारे सर्व शेतातून भाजीपाला व फळांच्या विक्रीतून सरासरी एक हजार रुपये रोज मिळायलाच हवा, असे नियोजन केले आहे.

    बायोडायनामिक शेतीतून सेंद्रिय प्रमाणीकरणापर्यंत

  • इंच, इंच शेतजागेचा नियोजनबद्ध वापर करणाऱ्या देविदास व वंदना धोत्रे यांनी बायोडायनॅमिक पद्धतीच्या वापरातून व्यवस्थापनावरील खर्चही कमी केला आहे. एस-९ कल्चर, बायोडायनॅमिक कीटकरोधक, तरलखत, बायोडायनॅमिक कंपोस्ट (पऱ्हाटी व शेणखतापासून), बायोडायनामिक घटकांचा नियमित वापर करतात. त्यातून जमिनी भुसभुसीत होऊन जमिनीचा पोत राखला गेला. सेंद्रिय कर्ब ०.८८ इतका झाला आहे.
  • तणनियंत्रणासाठी मिनी पॉवर टिलर खरेदी केले आहे. तणांची वाढ रोखण्यासोबतच आर्द्रता टिकून राहण्यासाठी आच्छादनाचा वापर केला जातो. १९९८ पासून गावात प्रथमच देविदास यांनी ठिबक वापर सुरू केला. त्यामुळे पाण्यासोबतच मजुरीही वाचली.
  • - शेतामध्ये रासायनिक कीटकनाशकाचा वापर केला जात नाही. सलग तीन वर्षांच्या पडताळणीनंतर धोत्रे यांना सेंद्रिय प्रमाणीकरणाचे प्रमाणपत्रही मिळाले आहे.
  • संपूर्ण शेतमाल सेंद्रिय असल्याने या दाम्पत्याने शेतमालाच्या विक्रीकरिता थेट विक्रीचा पर्याय निवडला आहे.
  • गेल्या चार वर्षांत बाजारातून एक रुपयांची निविष्ठाही खरेदी न केल्याचे देविदास सांगतात.
  • बायोडायनॅमिक शेतीतील अडचणीसाठी कुंवरसिंह मोहने यांची मदत होते.
  • २०१७ मध्ये वर्ल्ड ऑर्गेनिक कॉंग्रेसमध्ये आंतरराष्ट्रीय जनसमुदायासमोर देविदास यांनी बायोडायनॅमिक मॉडेलचे सादरीकरण केले. कमी क्षेत्रात राबवलेल्या प्रयोगशीलतेचे जगभरातील तज्ज्ञांनी भरभरून कौतुक केले.
  • कमी क्षेत्रात बहुविध पीकपद्धतीतून आर्थिक सक्षमता साधल्याने देविदास धोत्रे यांचे शिवार शेतकऱ्यांना आकर्षित करीत आहे. आजवर सुमारे साडेचार हजार सेंद्रिय शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. फोनवरूनही अनेक जण त्यांच्या संपर्कात असतात.
  • शेततळे व विहिरी पुनर्भरण सिंचनासाठी दोन विहिरी असून, त्यांचे पुनर्भरण केले आहे. पाणी गाळून जाण्यासाठी सहा फूट खोलीच्या हौदामध्ये दगड टाकून फिल्टर टॅंक केले आहे. विहिरीला बारमाही पाणी उपलब्ध होत असल्याचे देविदास यांनी सांगितले. केवळ चार एकर क्षेत्र असूनही धोत्रे यांनी २० बाय २० मीटर आकाराचे शेततळे खोदले आहे. तळ्याला अस्तरीकरण करण्यात येणार आहे. संरक्षित पाण्यासाठी त्याचा उपयोग होईल. मुलांना केले उच्चशिक्षित पत्नी वंदना धोत्रे यांची अकोला येथीर कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकरी सल्लागारपदावर नियुक्ती झाली आहे. मुलगी प्रिया ही एम.एस्सी (कॉम्प्युटर) झाली असून, पातूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. धीरज हा कृषी पदवीला, तर विवेक हा बी.एस्सी (कॉम्प्युटर) शिक्षण घेत आहे. संपर्क ः देविदास धोत्रे, ९४२३८४९७३१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com