ग्रामविकास,पर्यावरण संवर्धनाचा वसा जपणारी ‘बीएनएचएस'

गावातील महिलांना बांबूपासून कलात्मक वस्तूनिर्मितीचे प्रशिक्षण.
गावातील महिलांना बांबूपासून कलात्मक वस्तूनिर्मितीचे प्रशिक्षण.

राज्यातील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि प्रबोधनाचे कार्य बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेमार्फत केले जाते. संस्थेचे मुख्यालय मुंबईत असून, पर्यावरण लोकशिक्षणाचे केंद्र नागपूर शहरात आहे. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य याचबरोबरीने आदिवासी युवकांना गाव परिसरातच रोजगार मिळवून देण्यात येतो. संस्थेच्या माध्यमातून व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांनी शाश्वत विकासाची दिशा पकडली आहे. पर्यावरणसंबंधी संशोधन, संवर्धन आणि शिक्षणासंबंधी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) ही संस्था कार्यरत आहे. १८८३ साली स्थापन झालेली ही संस्था देशभरात जैवविवधतेचे संवर्धन, संशोधन आणि लोकशिक्षणासंबंधी विविध उपक्रम राबविते. या संस्थेचे मुख्यालय मुंबईत असून, पर्यावरण लोकशिक्षणाचे केंद्र नागपूर शहरात आहे. या संस्थेने संरक्षित जंगलक्षेत्राच्या परिसरातील गावांच्या शाश्वत विकासासाठी पुढाकार घेत वनसंवर्धनाची चळवळ गतिमान केली आहे. व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि शिक्षणाचे काम संस्थेद्वारे होते. त्याकरिता व्याघ्र प्रकल्पालगत गावातील शाळांमध्ये जागृती करण्याचा निर्णय संस्थेने घेतला. जंगल का वाचवावे? निसर्गातील प्रत्येक घटकाचे काय महत्त्व आहे, याविषयी माहिती देण्यास सुरवात झाली. गावकरी, विद्यार्थी, तरुण, शिक्षक, महिला अशा साऱ्या घटकांना जंगल परिसंस्थेचे महत्त्व समजावून देण्यात येऊ लागले. सुरवातीला गाव आणि त्यानंतर कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातून कुटुंबांची जंगलावरील अवलंब वाढीस लागल्याचे दिसून आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याचा मुद्दा समोर आला. जंगल राखले तर पाणी राहील, त्यातून शेती राहील आणि शेवटी आपले अस्तित्व राहण्यास मदत होणार आहे, अशा सोप्या भाषेत जंगलानजीकच्या गावातील रहिवाशांना समजावण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. प्राण्यांच्या घरात आपण अतिक्रमण करायला लागलो, जर त्याने प्रतिकार केला; तर आपण त्याला त्रास समजायला लागलो, हा विचारदेखील त्यांच्या मनावर बिंबविण्यात आला. रानडुक्‍कर, सांबर, चितळ यांची शिकार झाली तर वाघांना खाद्य कसे मिळणार? याचाही विचार करायला व्याघ्र प्रकल्पालगतच्या ग्रामस्थांना भाग पाडण्यात आल्याची माहिती संस्थेचे सहायक संचालक संजय करकरे यांनी दिली.

विविध गावांत होते प्रबोधन पेंच (मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (चंद्रपूर), बोर व्याघ्र प्रकल्प (नागपूर, वर्धा), नवेगाव नागझिरा (भंडारा, गोंदिया), उमरेड करांडला अभयारण्य (नागपूर) या अभयारण्यासोबतच व्याघ्र प्रकल्प हे संस्थेच्या दृष्टिक्षेपात आहेत. सुरवातीला अत्यल्प मनुष्यबळाच्या माध्यमातून हे काम झाले. त्यामध्ये संस्थेचे सहायक संचालक संजय करकरे त्यांच्या पत्नी संपदा करकरे, तसेच चालक या तिघांचाच समावेश होता. २०१२ पर्यंत या तिघांच्या भरवशावरच हे काम झाले. आता २० जणांचा गट तयार झाला आहे.

वन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण संस्थेद्वारे वन विभागाचे कर्मचारी, गाइड, रोजंदारीवरील वनकर्मचारी यांना वनसंरक्षण आणि संवर्धनाकरिता पूरक विषयावर प्रशिक्षित करण्यात आले. याचबरोबरीने स्लाइड शो, वैविध्यपूर्ण स्पर्धा, निसर्ग मेळावे, जंगल भ्रमण, व्याघ्र प्रकल्पांना भेटी, निसर्ग शिबिर अशा प्रकारचे उपक्रम राबविले जातात. वनसंवर्धनविषयक प्रबोधन वनसंवर्धन प्रशिक्षणाबाबत माहिती देताना संस्थेच्या शिक्षण अधिकारी संपदा करकरे म्हणाल्या, की जंगल काय देते आणि त्यापासून आपल्याला नुकसान काय, अशी विचारणा सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना सुरवातीला केली जाते. जंगलतोड करतो; परंतु आपण परतावा काय देतो? या प्रश्‍नावर प्रशिक्षणार्थी निरुत्तर होतात. अशा प्रकारे प्रबोधन करून त्यांना जंगलाचे महत्त्व पटवून दिले जाते. दरवर्षी सुमारे ६०० महिला, तसेच तरुणांना संस्थेद्वारे प्रशिक्षण दिले जाते.  व्याघ्र प्रकल्पाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जातो. लोकांचा  जंगलाकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक आणि सकारात्मक व्हावा, असा संस्थेचा उद्देश आहे. यासाठी बॉर्न फ्री, टाटा स्टील, कॉक्‍स अँड किंग, वन विभाग, व्याघ्र प्रकल्प, वैयक्‍तिक देणगीदारांच्या आर्थिक पाठबळातून हे काम होत आहे. संस्थेचे संचालक दीपक आपटे, सहायक संचालक संजय करकरे, सल्लागार सतीश प्रधान, संपदा करकरे, सौरभ दंदे, प्रफुल्ल सावरकर, अजिंक्‍य वासकर, संजय गोहने, बबन मडावी यांचे प्रयत्न आहेत. यातून जंगल परिसरातील गावांचा शाश्वत विकास आणि संवर्धन होत आहे. ‘ताडोबा बांबू क्राफ्ट’ची सुरवात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात उपलब्ध होणाऱ्या बांबूपासून आदिवासी लोक विविध वस्तू बनवितात. संस्थेने पळसगाव येथील युवकांसाठी बांबूपासून कलात्मक वस्तूनिर्मितीसाठी पुणे येथे प्रशिक्षण दिले. गेल्या तीन वर्षांपासून ‘ताडोबा बांबू क्राफ्ट’ या नावाने पळसगाव येथे केंद्र सुरू करण्यात आले. याबाबत संजय करकरे म्हणाले, की या ठिकाणी बांबूपासून कलात्मक वस्तू तयार होतात. बफर क्षेत्रातील शेतीमध्ये उत्पादित तसेच नागपूर येथून बांबू खरेदी होते. केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याने या उपक्रमाची दखल घेत बांबू हस्तकला प्रशिक्षण वर्ग या नावाने ४५ दिवसांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. या ठिकाणी उत्पादित वस्तूंची विक्री ताडोबा परिसरातील  रिसॉर्ट, प्रदर्शनांमधून केली जाते. कला केंद्राला भेट देणारे पर्यटकदेखील विविध वस्तूंची खरेदी करतात. कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून याकरिता आर्थिक मदत मिळते. केंद्राच्या माध्यमातून जंगल क्षेत्रातील युवक, महिलांसाठी रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. बायोगॅस संयंत्र सुधारणांचे पर्व व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये स्वयंपाक व इतर कामासाठी चुलींचा वापर होत होता. त्याकरिता जंगलातूनच लाकूड फाटा आणला जात होता. जंगलाचे अस्तित्व यामुळे धोक्‍यात येत असल्याने हे रोखण्यासाठी वन विभागाने ताडोबा संरक्षित क्षेत्रातील ग्रामस्थांना बायोगॅस बांधून दिले होते. या माध्यमातून वृक्ष तोडीवर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा होती. दत्तपूर (जि. वर्धा) येथील सेंटर फॉर सायन्स फॉर व्हिलेजेस या संस्थेने बायोगॅस सयंत्रे बांधून दिली. परंतु देखभाली अभावी कालांतराने अनेक कुटुंबांकडील ही सयंत्रे बंद पडली. ' बीएनएचएस' संस्थेच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली. त्यानंतर संस्थेने बायोगॅस सयंत्राच्या दुरुस्तीसाठी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. बायोगॅस संयंत्र दुरुस्तीची प्रेरणा बायोगॅस संयंत्र दुरुस्ती उपक्रमाबाबत संजय करकरे म्हणाले, की झरी हे १०० टक्‍के आदिवासी गाव. येथील वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या ३३ घरांच्या या गावातील ३२ कुटुंबांकडे बायोगॅस होता. गावातील अंगणवाडी सेविकेच्या घरीसुद्धा बायोगॅस होता. तिच्या कुटुंबाकडे जनावरे नव्हती. परंतु गावातून जनावरांचे शेण गोळा करून तिच्या कुटुंबाने बायोगॅस सुरू ठेवला होता. या गावातील संयंत्रांची अवस्था फारशी चंागली नव्हती. बंद अवस्थेतील संयंत्रे पुन्हा सुरू होण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहन देणे गरजेचे होते. त्याकरिता बायोगॅस वापरणाऱ्या ग्रामस्थांचा कौतुक सोहळा घेण्याचे ठरविले. त्याकरिता वन विभागाची मदत घेण्यात आली. या सोहळ्यात बायोगॅस असलेल्या कुटुंबांना साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले. सेंटर फॉर सायन्स फॉर व्हिलेजेस संस्थेने हे बायोगॅस बांधले असल्याने दुरुस्तीच्या कामात त्यांची मदत घेण्यात आली. संयंत्र दुरुस्ती किंवा नवीन उभारणीची प्रेरणा मिळावी, याकरिता शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली. याचबरोबरीने ताडोबा प्रकल्पातील गावांमध्ये बायोगॅस सयंत्रांचे सर्वेक्षण आणि दुरुस्ती करण्यात आली. स्वयंपाक आणि पाणी तापविण्याकरिता सरपण मिळवण्यासाठी जंगल परिसरात वृक्षतोड होत होती. सरपण आणण्याकरिता घरातील महिलेलाच जंगलात जावे लागत होते. अशा वेळी या महिलांवर जंगली प्राण्यांकडून हल्लेदेखील झाल्याचे निरीक्षण संस्थेने नोंदविले. संस्थेच्या अभ्यासात असे दिसून आले, की  पाच जणांच्या कुटुंबाला स्वयंपाकासाठी सरासरी दरोज ६ ते ९ किलो लाकूड लागते. यानुसार वर्षाकाठी एका कुटुंबाला दोन टन लाकूड लागते. या वृक्षतोडीवर नियंत्रणासाठी संस्थेने बायोगॅसचा शाश्वत पर्याय ग्रामस्थांना दिला. इंग्लडमधील बॉर्न फ्री या संस्थेने जंगल संवर्धनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला निधी दिला. सुरवातीच्या टप्प्यात ५० संयंत्रांची दुरुस्ती झाली. या दुरुस्तीसाठी तज्ज्ञ म्हणून कारवा गावातील संजय गोहने याची नियुक्‍ती करण्यात आली. डोम उपसणे, व्हॉल, पाइप, शेगडी, बर्नर दुरुस्ती किंवा बदलून देणे, अशी कामे संस्थेने केली. मोहीम झाली व्यापक

  • संस्थेने पहिल्यांदा कोळसा वन परिक्षेत्रातील ५० बायोगॅस दुरुस्तीचे काम केले. क्षेत्रसंचालक सिन्हा यांनी संस्थेने पूर्वी केलेल्या कामाचे परिणाम पाहून निधी दिला. निधीची उपलब्धता होताच ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावातील १५० बायोगॅस संयंत्र दुरुस्त करून कार्यान्वित झाली. संयंत्र व्यवस्थित सुरू आहेत किंवा नाही हे पाहाण्यासाठी दर महिन्याला तज्ज्ञ भेटीचे नियोजन केले जाते.
  • पेंच (मध्य प्रदेश) व्याघ्र प्रकल्पातील ९६ गावांमध्ये बायोगॅस होते. संस्थेने २०११ साली या गावांचे सर्वेक्षण केले होते. त्या वेळी १,३९७ बायोगॅस या गावांमध्ये होते, त्यापैकी ९०० कायमस्वरूपी बंद होते. यापैकी ३७५ बायोगॅस दुरुस्त होण्याच्या स्थितीत होते. संस्थेने याचा अहवाल वन विभागाकडे दिला. त्यानुसार पैशाची उपलब्धता होताच बायोगॅस दुरुस्तीचे काम झाले. मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांपर्यंत संस्थेच्या कामाची चर्चा पोचली. त्यांनीदेखील या कामासाठी निमंत्रण दिले. १२३ गावातील सर्वेक्षण करण्यात आले. या भागात सुमारे १५०० बायोगॅस होते. त्यापैकी ३५० बायोगॅस दुरुस्ती होईल, असे सर्वेक्षणाअंती समोर आले.  निधी मिळताच त्यांची दुरुस्ती करण्यात आली. अरी वन परिक्षेत्रातील बंद अवस्थेतील ५० सयंत्राची दुरुस्ती करण्यात आली. बोर अभयारण्यात हा प्रकल्प राबविण्यात आला.
  • पेंच, कान्हा कॉरिडोअरमधील अरी वन परिक्षेत्रात कॉक्‍स अँड किंग्ज यांच्या सहकार्याने पाच गावांत ७२ नवीन प्लॅस्टिक बायोगॅस बसविण्यात आले.
  • संस्थेच्या प्रयत्नातून एकूण एक हजारावर संयंत्राची दुरुस्ती करण्यात आली. त्यापैकी ८०० संयंत्र सुरू आहेत.  बायोगॅसमुळे वृक्षतोड थांबल्याने दरवर्षी मध्यम आकाराच्या सरासरी ६००झाडांचे संवर्धन शक्‍य झाले. चुलीमुळे होणारे प्रदूषण, श्‍वसनाचे आजार, जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेलेल्या व्यक्‍तींवर होणारे हल्ले नियंत्रणात आले. बायोगॅसच्या माध्यमातून शाश्‍वत इंधनाचा स्रोत उपलब्ध झाला. काही कुटुंबांना वन विभागाने एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा केला आहे. परंतु अनेक कुटुंबे बायोगॅस वापरण्यावर भर देतात. त्यामुळे एक गॅस सिलेंडर त्यांना सहा महिने पुरतो.
  • गावातील इतरांप्रमाणेच आम्हीदेखील चुलीवर स्वयंपाक करीत होते. चुलीसाठी जळण जंगलातून आणावे लागत होते. चुलीच्या धुरामुळे आरोग्यविषयक समस्या जाणवू लागल्या. परंतु आता बायोगॅसच्या माध्यमातून उपाय मिळाला. ‘बीएनएचएस' संस्थेने बायोगॅसची दुरुस्ती करून इंधनाचा शाश्वत स्रोत उपलब्ध करून दिला आहे.- मनीषा निळकंठ बोरकर जैवविविधता पार्क चार वर्षांपूर्वी नागपूर शहरातील राजभवन येथे जैवविविधता पार्कची सुरवात झाली. वनविकास महामंडळाने यासाठी पुढाकार घेतला. चार वर्षांपासून बीएनएचएस या ठिकाणी पर्यावरण शिक्षणाचे काम करते. हे पार्क पाहण्यासाठी विद्यार्थी भेटी देतात. त्यांना फुले, निसर्गातील विविध जीव, जैवविविधता याविषयी मार्गदर्शन केले जाते. चार वर्षांच्या काळात दहा हजारावर विद्यार्थ्यांनी या पार्कला भेट दिली आहे. सुधारित चुलींचा प्रकल्प संस्थेने ‘आययूसीएन’अंतर्गत बोर व्याघ्र प्रकल्प ते उमरेड दरम्यानच्या कॉरिडोअर क्षेत्रातील पाचशे कुटुंबांना सुधारित चुली दिल्या. या चुलींमुळे धूर कमी होतो, ऊर्जा अधिक मिळते. सोलर कुंपणाकरिता प्रोत्साहन जंगलागतच्या गावांमध्ये शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होते. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सौर कुंपण बसविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता संस्थेद्वारे जागृती करण्यात आली. अतिसंरक्षित क्षेत्राबाहेरील (बफर) शेतकऱ्यांसाठी वन विभागाने १५ हजार रुपयांत सौरऊर्जा कुंपण योजना राबविली आहे. पंधरा हजार रुपयांतील २५ टक्‍के वाटा शेतकऱ्याला भरावा लागतो. निसर्ग शिक्षण केंद्र ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी गावात निसर्ग शिक्षण केंद्राची उभारणी केली आहे. या ठिकाणी गेल्या वर्षी विद्यार्थ्यांसाठी ३२ प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ९५४ विद्यार्थी तर ८९ शिक्षक सहभागी झाले होते. पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावातील युवकांनाच व्याघ्र प्रकल्पात मार्गदर्शक (गाइड) म्हणून नेमण्याचा निर्णय वन विभागाने घेतला. या युवकांना पर्यटकांना जंगलाची माहिती कशी द्यावी, संवाद कौशल्य, व्याघ्र प्रकल्पाची वैशिष्ट्ये, जैवविविधता, प्राणिशास्त्र, पक्षिशास्त्र, निसर्गातील विविध घटक या सर्वांविषयी तंत्रशुद्ध माहिती संस्थेद्वारे दिली जाते. तीन दिवस ते एक आठवड्याचे निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. वन विभागाने महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळ स्थापन केले आहे. त्यांच्या मदतीने संस्था हे प्रशिक्षण देते. संजय करकरे, ९५५२५९५९६२  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com