पाच गुंठ्यांतील कोकणी अळूची यशस्वी शेती, प्रभावी मार्केटिंग

माजगावे यांची पाच गुंठ्यांतील अळू शेती
माजगावे यांची पाच गुंठ्यांतील अळू शेती

अळूसारखी पालेभाजी शेती अर्थकारणात चांगली भर टाकू शकते. चिंचवाड (जि. कोल्हापूर) येथील अल्पभूधारक पद्मश्री बबन माजगावे या शेतकरी महिलेने सिद्ध केले आहे. केवळ पाच गुंठ्यांत वर्षातून दोनवेळा अळू पिकवून त्याची थेट विक्री त्या करतात. अळूपासूनच्या विविध पदार्थांच्या ‘रेसीपी’चे पत्रक तयार करून ते पेंडीसोबत देत त्यांनी ‘मार्केटिंग’चे कौशल्यही सिद्ध केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांशी उसाचे क्षेत्र आहे. उर्वरित पिकांमध्ये मग सोयाबीन, भाजीपाला पिके यांचा क्रमांक लागतो. जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये शेतीचे क्षेत्र कमी असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र त्यातही वेगवेगळे प्रयोग करण्याची इथल्या शेतकऱ्यांची धडपड दिसून येते. अगदी काही गुंठ्यांतही उल्लेखनीय उत्पन्न मिळविणारे शेतकरी जिल्ह्याच्या विविध भागांत पाहण्यास मिळतात.

माजगावे दांपत्याची अळू शेती

जिल्ह्यातील शिरोळ हादेखील शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचा तालुका समजला जातो. कोल्हापूर- सांगली महामार्गापासून चार किलोमीटर अंतरावर तालुक्यातील चिंचवाड हे लहानसे गाव आहे. ऊस व भाजीपाला पिकांसाठी ते ओळखले जाते. गावात बबन व पद्मश्री हे माजगावे दांपत्य राहते. केवळ एक एकर उसाचे क्षेत्र व घराजवळ पाच गुंठे असे अत्यंत मर्यादित असे त्यांचे क्षेत्र आहे.एकदा रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या असता त्यांना तेथे वैशिष्ट्यपूर्ण अळूचे पीक पाहण्यास मिळाले. पाने हिरवीगार, रूंद, जाड व देठ काळे असा तो अळू त्यांच्या नजरेत भरला. त्याचे १० ते १२ गड्डे त्यांनी आणले. या पिकासाठी खर्चही फारसा येत नाही असे त्यांना सांगण्यात आले. साधारण दोन गुंठे सरीत त्याची लागवड केली. त्यापासून तयार झालेले गड्डे पुढे बियाणे म्हणून वापरायचे ठरवले. मग पाच गुंठ्यांत अळू शेती वाढवली. सुरवातीला या पिकाचा फारसा अनुभव नव्हता. मात्र हळूहळू त्याविषयीची माहिती होत गेली. या भागात अळू फारसा होतही नाही. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचा माल पिकवून त्याची विक्री करण्यासही वाव होता. मग त्या अनुषंगाने बाजारपेठेचाही अभ्यास झाला.

अळू शेतीचे व्यवस्थापन

सौ. पद्मश्री आपले अनुभव सांगताना म्हणाल्या, की उसाप्रमाणेच या पिकासाठी जमीन तयार करावी लागते. साधारण दहा ट्राॅली लाल माती, दोन ट्राॅली शेणखत यांचा वापर केला आहे. तीन फुटी सरीत प्रत्येकी अर्ध्या फुटावर गड्ड्याची लागवड केली जाते. याला खते व कीडनाशके यांची फारशी गरज भासत नाही. शेणखत व गोमूत्र यांचाच वापर अधिक करून केला जातो. घरी दोन म्हशी, एक गीर, एक जर्सी गाय असे पशुधन आहे. त्यामुळे या सेंद्रिय निविष्ठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतात. ताक व म्हैस व्याल्यानंतरचे दूध यांचीही आळवणी फायदेशीर ठरते. मुलगा पशुवैद्यक असल्याने जनावरांचे व्यवस्थापन, आहार याविषयी त्याचे मार्गदर्शन लाभते.

अळूची हाताळणी

सेंद्रिय पद्धतीने पोसलेला अळू अत्यंत चवदार असतो असे सौ. पद्मश्री सांगतात. त्याची दररोज सकाळी सहा वाजता काढणी सुरू केली जाते. त्यानंतर पानांची स्वच्छता होते. प्रतिपेंडीत चार ते पाच पाने असतात. बाजारपेठेच्या हिशोबाने दररोज पन्नास पेंढ्या होतील असे काढणीचे नियोजन होते.

बाजारपेठ

चिंचवाडपासून मिरज, जयसिंगपूर, शिरोळ, सांगली आदी शहरी बाजारपेठा तशा जवळ आहेत. सौ. पद्मश्री सांगतात, की व्यापारी पेंडी अत्यंत मातीमोला दरांत म्हणजे दोन ते तीन रुपयांत मागत. ते काहीच परवडायचे नाही. मग स्वतःच मार्केटमध्ये बसून विक्री करायचे ठरवले. त्यानुसार आठवड्यातील सहा दिवस सकाळपासून दुपारपर्यंत बाजारात थेट ग्राहकांना विक्री केली जाते. आपला अळू व सोबत छत्री असा पसारा सोबत असतो. अनेकवेळा त्रास होतो. नफा होतो, तसे नुकसानही होते. पण शेती करायची म्हटल्यावर हे आलंच असं सौ. पद्मश्री म्हणतात.

विक्री

साधारण पाच रुपये ते दहा रुपये प्रतिपेंडी असा दर असतो. दररोज सुमारे चारशे ते पाचशे रुपयांच्या अळूची विक्री होते. गौरी, पितृ पंधरवडा, कृषी भूमिपूजन आदी सणांवेळी अळूच्या पानांना वाढती मागणी असते. या वेळी सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही वेळेस बाजारात अळूची विक्री करावी लागते. या काळात दिवसाला शंभर पेंढ्यांची काढणी होते. अन्य दिवसांपेक्षा या काळात दीडपट ते दुप्पट उत्पन्नाची शक्‍यता वाढते. वर्षातून साधारण दोनवेळा हे पीक घेतले जाते. त्यामुळे वर्षभर हे पीक ताजा पैसा देत राहते.

मार्केटिंग कौशल्य वापरले

अळूची शेती फार मोठ्या क्षेत्रावर वा व्यावसायिक स्वरूपात फारशी केल्याचे ऐकीवात नाही. शक्यतो घरच्या परड्यातच अळू फुललेला दिसतो. त्याचे वेगळे मार्केटिंगही त्यामुळेच फारसे होत नाही. परंतुु सौ. पद्मश्री यांनी त्यासाठी आपले कौशल्य वापरले. त्या अळूच्या पेंडीसोबत त्यापासून होणाऱ्या विविध पदार्थांच्या रेसीपीबाबत माहिती असलेले पत्रक ग्राहकांना देतात. त्यातील औषधी उपयोगांची माहितीदेखील त्यात असते.

अळूचा प्रत्येक भाग उपयोगात

सौ. पद्मश्री सांगतात, की अळूच्या पानांची वडी, भाजी या बाबी सर्वांना माहीत आहेतच. मात्र त्याचे देठ आमटीत वापरतात. अळूची भजीही चांगली होतात. गड्ड्यांचीही भाजी चांगली होते. एकूण काय तर अळूचा कोणताच भाग वाया जात नाही. अगदी जनावरांनाह काही भाग खाण्यास उपयुक्त ठरतात. हीच माहिती मी ग्राहकांना देत असल्याने माझे विश्‍वासाचे ग्राहक तयार झाले आहेत.

कोकणी अळूचे वैशिष्ट्य

  • चव अत्यंत चांगली आहे.
  • घशाला त्रास देत नाही.
  • पाने रूंद, जाड, हिरवीगार आहेत.
  • पाने तोडल्यानंतर साधारण दोन दिवस ती चांगल्याप्रकारे राहू शकतात. अन्य अळूंची प्रत मात्र या कालावधीत खालावत असते.
  • ग्राहकच घेतात शोध

    दररोज वेगवेगळ्या बाजारात जाणे असल्याने तेथील ग्राहकाला बाजारात अळूची पाने मिळणारच अशी शंभर टक्के खात्री असते. ग्राहक सौ. पद्मश्री यांना शोधत येतात व अळू घेऊन जातात. अनेकांनी त्यांचा संपर्क क्रमांकही घेतला आहे.

    अळूने दिला आत्मविश्‍वास

    अळूच्या शेती निमित्ताने सौ. पद्मश्री यांचा शेती व बाजारपेठ विक्री याबाबतचा आत्मविश्‍वास वाढला आहे. ग्राहकांच्या अपेक्षा त्यांच्या लक्षात येऊ लागल्या. त्या सांगतात की कोकणी अळू घशाला त्रास देत नाही. बिनधास्त घेऊन जा असे पूर्वी ग्राहकांना सतत सांगावे लागे. ग्राहक त्यावर सहज विश्‍वास ठेवत नसत. मात्र पुढे पुढे ग्राहकांना त्याचे अनुभव येऊ लागल्यानंतर मात्र खप वाढला. अळूच्या उत्पन्नाची मदत जनावरे घेण्यास झाली. गृहोपयोगी वस्तू, शेतीसाठी पाइपलाइनसाठीही यातील रकमेचा हातभार लागला. संपूर्ण शेती आम्ही पती-पत्नीच करतो. त्यामुळे मजुरांची गरज घ्यावी लागत नाही. पती बबन यांचे सतत प्रोत्साहन असल्याचे सौ. पद्मश्री सांगतात. मुलगा प्रमोद व सून सुदेशना यांचीही घरकामात मोठी मदत होते.

    पद्मश्री माजगावे- ८८८८४३५३७८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com