फूलशेतीने दिली तळेकर कुटुंबाला साथ

फूलशेतीने दिली तळेकर कुटुंबाला साथ

गांधेली (जि. औरंगाबाद) येथील तळेकर कुटुंबीयांनी पारंपरिक पिकांपेक्षा झेंडू, शेवंती, गुलाब, जास्वंद, तुळस या पिकांवर लक्ष केंद्रित केले. औरंगाबाद बाजारपेठेत दररोज स्वतः फूल आणि हार विक्री करून तळेकर बंधूंनी शेती आर्थिकदृष्ट्या सक्षम केली आहे.

औरंगाबादपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गांधेली गावातील तळेकर कुटुंबाने एकीतून शेतीला नवीन दिशा दिली. भिकाजी खंडूजी तळेकर यांना वडिलांकडून नऊ एकर शेती परंपरेने मिळाली. तरुणपणी भिकाजी तळेकर यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. काही वर्षे दुसऱ्याच्या शेतीमध्ये सालाने त्यांनी काम केले. पुढे काही वर्षे क्लीनर म्हणून काम करताना ते ट्रक चालवायला शिकले. पुढे दहा वर्षे भिकाजी तळेकर हे ट्रक चालक म्हणून काम करताना त्यांच्या पत्नी गीताबाई यांनी फूल शेती आणि हारविक्रीचा व्यवसाय नेटाने चालवून आर्थिक स्थिती सांभाळली. दहा वर्षे ट्रक चालविल्यानंतर भिकाजी तळेकर यांनी रिक्षा घेतली. जवळपास पंधरा वर्षे त्यांनी रिक्षा चालविली. सकाळी फूल विक्री त्यानंतर रिक्षाद्वारे प्रवासी वाहतूक असा त्यांचा ३० वर्षे दिनक्रम होता. या दरम्यान त्यांची दोन्ही मुले रमेश आणि सुभाष यांचीदेखील शेतीच्या नियोजनात मदत होऊ लागली. औरंगाबाद शहरातील बाजारपेठ लक्षात घेत त्यांनी फुलांच्या उत्पादनापुरते मर्यादित न राहता फुलांचे हार तयार करून स्वतः विक्रीचा पर्याय निवडला. यातून आर्थिक मिळकत वाढवत नेली.

हंगामी पिकांची लागवड फूल शेतीव्यतिरिक्‍त तळेकर कुटुंबीयांकडे साडे पाच एकर जिरायती शेती आहे. त्यामध्ये बाजरी व तूर लागवड केली जाते. फूल शेतीला लागून पाण्याची सोय असलेल्या एक एकरात गव्हाची लागवड करतात. यातून १५  क्‍विंटल गहू  उत्पादन मिळते.

झेंडूत आंतरपीक यंदाच्या वर्षी रमेश तळेकर यांनी दीड एकर झेंडू फूल शेतीत मुगाचे आंतरपीक घेतले होते. सुमारे साडेचार क्‍विंटल मूग आणि २० क्‍विंटल झेंडू फुलांचे उत्पादन मिळाले. औरंगाबाद बाजारपेठेत झेंडू फुलांना सरासरी ३० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. मागच्या वर्षी  दीड एकरांत त्यांनी झेंडू फुलशेतीत आंतरपीक म्हणून  तुरीची लागवड केली होती. यातून पाच क्‍विंटल तूर उत्पादन झाले.

तीन एकरांत फूलशेतीचे नियोजन फूलशेती नियोजनाबाबत रमेश तळेकर म्हणाले, की आमच्याकडे एकूण नऊ एकर शेती आहे. त्यापैकी तीन एकरांवर आम्ही वर्षभर फूल शेती करतो. यामध्ये दीड एकरांचे दोन टप्पे पाडले आहेत. आम्ही टप्प्याटप्याने सुरवातीला झेंडू आणि गॅलार्डियाची लागवड करतो. रोपे खासगी रोपवाटिकेतून आणतो. लागवड केलेल्या फुलझाडांचा कालावधी संपण्याआधी दुसऱ्या टप्प्यात काही क्षेत्रावर पुन्हा शेवंती, गॅलार्डियाच्या लागवडीचे नियोजन करतो. झेंडू तीन महिन्यापर्यंत चालतो. गॅलार्डिया, शेवंतीचे पीक सहा महिन्यांपर्यंत चालते.  बांधावर जास्वंद आणि गुलाबाची लागवड केली आहे. दोन गुंठ्यावर कृष्ण तुळशीची लागवड आहे. आम्ही तीन एकर फूल शेती पूर्णत: ठिबक सिंचनाखाली आणली आहे. शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी शेतात एक विहीर आणि दोन कूपनलिका आहेत. पोत चांगला राहावा म्हणून दरवर्षी शेणखत जमिनीत मिसळतो. त्यामुळे सुपीकता टिकून आहे. याचा दर्जेदार फुलांच्या उत्पादनासाठी फायदा होतो.    

तळेकर कुटुंबातील चार लोकांसह दोन मजुरांना बाराही महिने फुलांपासून हार बनविण्याचे काम करावे लागते. एका मजूर महिला दररोज फूल तोडण्याचे काम करते. सकाळी ११ वाजल्यानंतर तळेकरांची दोन मुले, त्यांच्या पत्नी आणि एक महिला मजूर दुसऱ्या दिवशी विक्रीसाठी लागणारे हार तयार करतात. उन्हाळ्यात तोडलेली फुले, हार सुकू नये यासाठी घरातील एका खोलीत एसी बसविलेला आहे.

तळेकर बंधू करतात फुले, हारांची विक्री   औरंगाबाद शहर गांधेलीपासून केवळ २० किलोमिटरवर आहे. त्यामुळे तळेकरांना फूल विक्रीसाठी चांगली बाजारपेठ मिळाली. याबाबत माहिती देताना रमेश तळेकर म्हणाले की, औरंगाबाद शहरात गुलमंडी, टी. व्ही. सेंटर चौक आणि गजानन महाराज मंदिराजवळ फूल विक्री केली जाते. मी स्वतः सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत टी व्ही सेंटर चौकामध्ये तर गुलमंडीतील सुपारी गणपती मंदिराजवळ माझा भाऊ सुभाष हा सुटी फुले तसेच हारांची विक्री करतो. बाजारपेठेत विविध फुले आणि हार गरजेनुसार पोचविण्यासाठी एक चार चाकी गाडी आम्ही घेतली आहे. फुले आणि हार वाहतुकीचे काम माझे वडील करतात.

आम्हाला दररोज ५० किलो पांढरी शेवंती, ५० किलो गॅलार्डिया, ४० किलो झेंडू, २०० गुलाब फुले, ४० जास्वंदाची फुले, दुर्वाच्या गड्ड्या, तुळशीच्या गड्ड्या विक्रीसाठी लागतात. स्वतःच्या शेतीतून फुलांची गरज भागली नाही तर  परिसरातील फूल उत्पादकांकडून विविध फुलांची खरेदी करतो. त्यामुळे त्यांनाही चांगले मार्केट मिळते. औरंगाबाद शहरात आम्ही दिवसाला दीडशे हारांची विक्री करतो. फुलांची संख्या आणि हाराचा आकार यानुसार एक हार किमान १० ते २० रुपयांना विकला जातो. गुलाब फूल तीन रुपये, जास्वंदीचे एक फूल किमान दोन रुपये, दूर्वाची एक गड्डी १० रूपये, तुळशीची एक गड्डी दहा रुपयाला विकली जाते.

फूल शेतीमध्ये कष्ट भरपूर आहेत. आम्ही जास्तीत जास्त शेणखत वापरतो. वाढीच्या टप्प्यात काही प्रमाणात रासायनिक खतांची मात्रा द्यावी लागतात. कीड, रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊनच कीडनाशकांची फवारणी करतो. आंतरमशागतीवर लक्ष द्यावे लागते. आमचे एकत्र कुटुंब असल्याने कमी मजुरांच्या उपलब्धतेत आम्ही शेतीचे नियोजन करतो. वर्षभर फुलांना मागणी असते. सणांच्या काळात फुले आणि हाराला चांगला दर मिळतो. स्वतः विक्री केल्याने उत्पन्नात वाढ होते. दरमहा आम्हाला फुलशेती व्यवस्थापन आणि विक्रीचा खर्च वजा जाता १५ ते २० हजाराचा नफा मिळतो.

 तळेकरांची फूलशेती

  • झेंडू ः एक एकर
  • पांढरी शेवंती ः एक एकर
  • गॅलार्डिया ः एक एकर
  • गुलाब  ः ५० झाडे
  • कृष्ण तुळस ः दोन गुंठे
  • जास्वंद  ः ४० झाडे
  •  संपर्क ः रमेश तळेकर, ९९२१९५२९३२    

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com