ग्रामविकासासह सुधारीत शेतीपद्धती साकारलेले बोरगाव अर्ज

सोमनाथ बलांडे व त्याच्या वडिलांना कामगंध सापळ्याचे महत्त्व सांगताना डॉ. किशोर झाडे अाणि शेतीला शेळीपालनाची जोड देणारे दादाराव बलांडे.
सोमनाथ बलांडे व त्याच्या वडिलांना कामगंध सापळ्याचे महत्त्व सांगताना डॉ. किशोर झाडे अाणि शेतीला शेळीपालनाची जोड देणारे दादाराव बलांडे.

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्‍यातील बोरगाव अर्ज (गणपती) येथील ग्रामस्थांच्या दिवसाची सुरवात गावालगत असलेल्या भव्य मंदिरातील आराध्य गणरायाच्या दर्शनाने होते. व्यसनमुक्‍ती, तंटामुक्‍ती, हागणदारीमुक्‍ती याद्वारे गावाने विकासाच्या दिशेने वाटचाल केली आहे. ग्रामविकासाला सुधारीत शेतीची जोड व पूरक उद्योगांची कास धरल्याने गावशिवार खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यास मदत होत आहे. अौरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यात जवळपास सव्वाचारशे उंबऱ्याच्या बोरगाव अर्ज गावाची लोकसंख्या सुमारे २३९० आहे. सन २००६-७ मध्ये तंटामुक्‍त गाव म्हणून लौकीक मिळविलेल्या या गावाने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. त्या वेळी तंटामुक्‍ती समितीचे अध्यक्ष असलेले रमेश लक्ष्मणराव बलांडे गावाचे बिनविरोध सरपंच आहेत. व्यसनमुक्‍ती, हागणदारीमुक्‍ती, घर तिथे वृक्ष, प्रत्येक रस्त्याचे मजबुतीकरण, नांदेड पॅटर्नच्या शोषखड्ड्यांची निर्मिती, शाळेचे ‘डिजिटलायझेशन’, पारंपरिक पीक पद्धतीत बदल, आंतरपीक, बहुपीक पद्धतीचा अवलंब, ठिबकद्वारे पिकांना पाणी देणे, पूरक उद्योगांची कास, जमीन सुपीकतेसाठी गांडूळ खत निर्मिती, गोबर गॅसचा वापर, गावातच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात मिळविलेले यश अशा अनेक गोष्टी गावाच्या विकासातील ठळक सांगता येतील. शाळा केली डिजिटल पटसंख्येअभावी जवळपास बंद पडायला आलेली शाळा आता डिजिटल करण्यात यश आले आहे. यात शिक्षकांचा पुढाकार, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह सर्व गावकऱ्यांचे सहकार्य राहिले आहे. तीन वस्तीशाळा व व एक शाळा मिळून १३० पटसंख्या शाळेचा आहे. ग्रामपंचायतीचे सचिव बी. ए. गायकवाड व शिक्षक बाबूलाल राठोड व आजिनाथ सोनवणे यांचे गावकऱ्यांना सहकार्य मिळते. पाण्याची सोय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घराच्या दारासमोर वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात आला आहे. झाडांना पाण्याची सोय होण्यासाठी नांदेड पॅटर्नच्या शोषखड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. दुग्धोत्पादनातून खेळता पैसा हाती गावातील जवळपास ७० ते ८० शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. त्यामुळे कुटुंबांकडे दररोज हाती खेळता पैसा राहतो. तीन संकलन केंद्राच्या माध्यमातून गावात दूध संकलन केले जाते. सुमारे पाचशे लिटर दूध एकावेळी संकलित केले जात असल्याचे दत्तू ठोंबरे यांनी सांगितले. सत्तर कुटुंबांकडे गोबरगॅस गावातील ७० ते ७५ कुटुंबांनी गोबरगॅस प्रकल्पाची उभारणी केली आहे. त्यामुळे इंधनाचा प्रश्न बऱ्याच अंशी मार्गी लागला आहे. गोबर गॅसमधून मिळणाऱ्या स्लरीचा वापर गांडूळ खत निर्मिती व पिकांसाठी केला जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासह मदत होत असल्याचे अनिल बलांडे यांनी सांगितले. कृषी विज्ञान केंद्राने पोचविले तंत्रज्ञान अौरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्राने गावातील शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोचविले. त्यानुसार शेतकऱ्यांना पीकपद्धतीत बदल करता आला. सन २०१६ पूर्वी ६५ टक्‍क्‍यांपर्यंत कपाशी, २० टक्‍क्‍यांपर्यंत मका घेणारे शेतकरी आता भाजीपाला व आंतरपीक पद्धतीचा अवलंब करीत आहेत. तीस ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत असलेले ठिबक सिंचन जवळपास ९० टक्क्यापर्यंत पोचले आहे. सुमारे १०० शेतकरी गादीवाफा, मल्चिंग यांच्या साह्याने मिरची, टोमॅटो, कारले, दोडके आदी भाजीपाला पिके घेतात. गावशिवारातील काही महत्त्वाचे बदल

  • ठिबकच्या वापरामुळे कोरडवाहू असलेले मका पीक बागायती झाले.
  • पीक फेरपालट करताना कपाशी घेतलेल्या क्षेत्रात पुढील वर्षी मका व हरभरा घेण्याचे तंत्र शेतकरी अवलंबितात.
  • विद्राव्य खतांचा वापर वाढला आहे.
  • बीडीएन ७११ तूर व मुगाच्या सुधारीत जातींची लागवड शेतकरी करू लागले.
  • कपाशीत निव्वळ तुरीचे पीक न घेता मूग, चवळी, भूईमूग, उडीद आदी पिकांना प्राधान्य दिले.
  • आंतरपिकांमुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यासह मूलस्थानी जलसंधारण, नत्र स्थिरीकरण व अतिरिक्‍त उत्पन्न मिळण्यास मदत
  • आंतरपिकांमुळे शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न २५ टक्‍क्‍यांनी वाढण्यास हातभार
  • पीक बदलाला प्राधान्य देणाऱ्या गावातील २५ ते ३० शेतकऱ्यांनी यंदा पहिल्यांदाच सोयाबीन घेतले.
  • उल्लेखनीय प्रयत्न

  • कृषी पदवीधारक अमोल बलांडे यांनी गांडूळ खत प्रकल्प उभा केला असून ४०० टन प्रति वर्ष प्रमाणे उत्पादन सुरू केले आहे.
  • परसातील कुक्‍कुटपालनात ३२ शेतकऱ्यांचा सहभाग.
  • शेळीपालनात १५ ते २० शेतकऱ्यांचा सहभाग.
  • मुरघास उत्पादन तंत्रज्ञान ७० टक्‍के शेतकऱ्यांनी स्वीकारले.
  • डीएचएन-6 या सुधारीत चारा पिकाचे बेणे जवळपास सर्व शेतकऱ्यांनी स्वीकारले.
  • यंदा तुती लागवडीसाठी ७० एकरांवर ७० शेतकऱ्यांचा सहभाग.
  • 35 शेतकऱ्यांकडे प्रत्येकी दोन प्रमाणे गांडूळ खत उत्पादन युनिट सुरू.
  • जवळपास सर्वच शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप.
  • कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून तंत्रज्ञान, जनावरांचे आरोग्य, पूरक उद्योग प्रशिक्षणात शेतकऱ्यांचा सहभाग.
  • तुरीच्या बीडीएन ७११ या कृषी विद्यापीठाच्या वाणातून गेल्या वर्षी एकरी १६ क्‍विंटलपर्यंत उत्पादन घेण्यात गावातील विद्यमान सरपंच रमेश बलांडे यांनी यश मिळविले.
  • बीबीएफ तंत्रज्ञानावर आधारीत सोयाबीन, हरभरा व गव्हाची लागण.
  • गावशिवारात काही शेतकऱ्यांनी शेततळी उभारली.
  • सुमारे ३५ शेतकऱ्यांकडून ३५ एकरांवर सेंद्रिय शेतीची कास. यात तूर, मूग, हरभरा आदी पिके शेतकरी घेतात. सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण त्यांना मिळत आहे.
  • प्रतिक्रिया गावकऱ्यांच्या समर्थ साथीमुळे अंतर्गत रस्ते, स्वच्छता, शाळेची सुधारणा, शिवारातील प्रयोग व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुधारीत शेतीची कास धरणे शक्‍य झाले आहे. पूरक उद्योगाने अनेकांना रोजगार मिळाला असून पुढील काळात गावातील जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. रमेशराव बलांडे, ९४०३६८८१८७ सरपंच, बोरगाव अर्ज, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद गावातच दूध संकलन केंद्र सुरू झाल्याने गायी-म्हशींच्या संख्येत वाढ केली. शेळ्याही वाढवल्या. दहा एकर शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिल्याने कुटुंबाच्या चरितार्थासाठी हातभार मिळतो. आदिनाथ म्हस्के दुग्ध उत्पादक कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मिळालेल्या १० कोंबड्या आता 2२२ पर्यंत वाढविल्या. किमान ५० ते ६० रुपये उत्पन्न अंड्यांच्या विक्रीतून रोज मिळणे सुरू झाले. घरच्या शेतीला चार एकर करार शेतीची जोड दिली आहे. गणेश म्हस्के, ९५५२२००८२१ केवळ तंटामुक्‍तीच नाही तर गावात व्यसनमुक्‍तीही झाली आहे. किरकोळ वादाचे प्रश्न जागेवरच मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. दादाराव शेजूळ, ९४२०४०४२२१ तंटामुक्‍ती अध्यक्ष, बोरगाव अर्ज बोरगाव अर्जच्या शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठातील तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यात फेरपालट, आंतरपीक पद्धती, ठिबकचा वापर, पूरक उद्योगाची कास या बाबी ठळकपणे नमूद करता येतील. डॉ. किशोर झाडे, ८२७५३८८०४९ विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद तीन वर्षांपासून गांडूळ खत युनिट चालवितो. घरच्या सतरा एकरांसाठी दोन ते तीन ट्रॉली गांडूळ खत उपलब्ध होते. विजय बलांडे, ९४२१२५२८९६

    गावातील शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचे बदल स्वीकारून शेतीची कास धरली आहे. दहा ते बारा शेततळी गावात झाली आहेत. त्यामध्ये वाढ करून शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे. राजेंद्र ठोंबरे, ९४२३६७९९९७ उपसरपंच  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com