बाजारातील मागणीनुसार भाजीपाला शेतीत यशस्वी वाटचाल

मोहन काकडे
मोहन काकडे

गोमळवाडा (ता. शिरूर कासार, जि. बीड) येथील तरुण शेतकरी मोहन भाऊसाहेब काकडे यांनी विविध हंगामी पिकाचा अनुभव घेतला. मात्र सर्व प्रयोग करताना भाजीपाला शेतीचा जो अंगीकार केला तो अाजही कायम ठेवला अाहे. जवळच्या दोन बाजारपेठांचा अभ्यास करून त्यानुसार शेतीचे नियोजन करण्यावर भर देत, भाजीपाला पिकामध्ये विविधता ठेवत शेतीतील नफा वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न केला अाहे. नगर जिल्ह्याचा उत्तरेकडील अर्धा भाग सुधारित असला तरी पूर्वेला असलेले तालुके कायम दुष्काळी असतात. त्याला जोडूनच बीड जिल्हा आहे. बीड जिल्ह्याच्या बहुतांश भागात सिंचनाचा अभाव असल्याने शेती तशी तोट्यात असते. अलीकडच्या काळात मात्र तरुण शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरवात केली आहे. गोमळवाडा येथील मोहन भाऊसाहेब काकडे या तरुण शेतकऱ्याने भाजीपाल्याची शेती यशस्वी केली आहे. बाजारातील भाजीपाला पिकांच्या मागणीचा अंदाज पाहून ते पिकांची लागवड करतात. गोमळवाडा शिवारात मोहन काकडे यांची वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे. शेतीचा डोलारा मोहन भाऊ विनोद यांच्यासह सांभाळतात. मोहन यांना घरातील सदस्यांचीही शेतीकामात मोलाची साथ असते. मोहन यांचे शिक्षण बीएस्सी तर भाऊ विनोद पदवीधर आहेत. पूर्वी ते कापूस, बाजरी, ऊस अशी पिके घेत. आता मात्र त्यात बदल करत ढोबळी मिरची, काकडी, कोथिंबीर, कारली, फुलकोबी अशा भाजीपाला पिकासोबत ते खरबुजाची लागवड करतात. शेडनेटमध्ये भाजीपाल्याचा प्रयोग मोहन विविध कृषी प्रदर्शनांना भेटी देत त्यातून त्यांना शेडनेटशेती बद्दल माहिती समजली. हंगामी पिकासोबत भाजीपाल्याची शेतीकडे वळण्याचे त्यांनी ठरविले. जवळच्या मार्केटचा अभ्यास केला. त्यानूसार भाजीपाला पिकाची निवड केली अाणि सुरुवातीला २०१३ मध्ये कृषी विभागाच्या मदतीने दहा गुंठ्यात शेडनेट उभारले. त्यात ढोबळी मिरचीची लागवड केली. बारा टन उत्पादन मिळाले. सरासरी ३० ते ४० रु. प्रती किलो दर मिळाला. त्यानंतर नऊ महिन्यांनी पुन्हा ढोबळी मिरची घेतली. नऊ टन उत्पादन मिळाले. हळूहळू पीकाचे व्यवस्थापन, बाजारपेठ, दर इ. विषयी चांगला अनुभव तयार झाला. हातात ताजा पैसा येऊ लागला. त्यातून २०१६ मध्ये कारल्याची लागवड केली आणि त्यात फुलकोबीचे आंतरपीक घेतले. ९ टन कारली तर ४ टन फुलकोबी चे उत्पादन मिळाले. कारल्याला ४० ते ४५ रु. प्रती किलो दर मिळाला. शेडनेटमध्ये चांगले उत्पादन मिळत असल्याने गतवर्षी (२०१७) पुन्हा दहा गुंठ्यांचे शेडनेट उभारले. यामध्ये दोनवेळा ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले. किलोसाठी सरासरी २० ते २५ रु. दर मिळाला. सुरवातीला उभारलेल्या शेटनेटमध्ये सध्या टोमॅटोची लागवड केली असून त्यात कोथिंबिरीचे आंतरपीक घेतले आहे. लागवडीचे नियोजन दरवर्षी तिन्ही हंगामात ढोबळी मिरचीची लागवड असते. हिवाळ्यात काकडीची लागवड असते तर आंतरपीक म्हणून फुलकोबीची लागवड केली जाते. दरवर्षी उन्हाळ्यात अाणि रमजान ईद सणासाठी खरबुजाला मागणी असते. त्यानुसार लागवडीचे नियोजन केले जाते. साधारणतः डिसेंबर, जानेवारी महिन्यात दोन एकरावर खरबुजाची लागवड असते. २०१७ मध्ये दीड एकर खुल्या क्षेत्रावर खरबुजाची लागवड केली. २५ टन उत्पादन मिळाले. किलोसाठी २२ रु. दर मिळाला. गेल्यावर्षी दोन एकर खुल्या क्षेत्रावर काकडीची लागवड केली. त्यातून २० टन उत्पादन मिळाले. किलोसाठी सरासरी १५ रु. दर मिळाला. सध्या साडेतीन एकरावर दोन महिन्यांपूर्वी ढोबळी मिरचीची लागवड केली असून आठ दिवसांत त्याचीही तोडणी सुरू होईल. डिसेंबर, जानेवारी महिन्यात खरबूज लागवड केली तर ऐन उन्हाळ्यात मार्च, एप्रिलमध्ये मागणीच्या काळात विक्रीला येईल याचे नियोजन केले आहे. त्यासाठी मोहन काकडे यांनी दोन एकर क्षेत्र सध्या मोकळे आहे. घरीच भाजीपाला पिकाची रोपे तयार केली जातात, त्यामुळे रोपावरील खर्च वाचतो. पावसाळ्यात मात्र रोपे विकत घेतली जातात. पन्नास लाख लिटरचे शेततळे गोमळवाडा शिवारातून सिंदफणा नदी वाहते. साधारण सहा किलोमीटर अंतरावर सिंदफणा तलावही आहे. मात्र तरीही या भागात पाणीटंचाई भासते. त्यामुळे काकडे यांनी २०१५ मध्ये पन्नास लाख लिटरचे शेततळे खोदले आहे. त्यामुळे संरक्षित पाण्याची सोय झाली अाहे. शेततळे असल्यामुळे दरवर्षी मार्च ते जुलै या काळात जवळपास पाच एकर क्षेत्राला आधार मिळत आहे. दुष्काळात शेती जगवता आली आहे. नगर- बीडचे मुख्य मार्केट गोमळवाडा गाव बीड जिल्ह्यात येत असले तरी या गावापासून नगरचे मार्केट नव्वद किलोमीटर असून बीडचे मार्केट चाळीस किलोमीटरवर आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी मिळणाऱ्या दराचा अंदाज घेऊन भाजीपाल्याची विक्री केली जाते. बहुतांश वेळा नगरच्या बाजाराला प्राधान्य दिले जाते. सध्या त्यांच्याकडे दीड एकरावर ढोबळी मिरची आहे. आतापर्यंत २२ टनाचे उत्पादन निघाले आहे. नगर, बीडच्या बाजारात आठ दिवसाला प्रत्येकी दहा किलोची पॅकिंग करून विक्री करतात. सध्या सरासरी ३५ ते ४५ रुपयांचा प्रती किलो दर मिळत आहे.   कृषी पुरस्काराने गौरव मोहन काकडे यांची भाजीपाला शेतीतील प्रगती पाहता त्यांना पुसद (जि. यवतमाळ) येथील वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने २०१७ मध्ये गाैरविण्यात अाले आहे.   काकडे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • संपूर्ण दहा एकरांवर ठिबक.
  • बेवडासाठी मूग, उडदाची लागवड
  • ढोबळी मिरची, खरबुजासाठी पॉलिमल्चिंग आणि गादीवाफ्याचा वापर.
  • पाण्याचे काटेकोर नियोजन करून उत्पादन घेण्यावर भर. खतेही ठिबकद्वारे.
  • मिरची व अन्य भाजीपाला पिकांची रोपे ते स्वतः तयार करतात.
  • भाजीपाला पिकांसाठी जैविक कीडनाशकाचा वापर. विक्री करण्याआधी चार दिवस फवारणी करत नाहीत.
  • जीवामृत, सेंद्रिय खतांचा वापर, रासायनिक खतांचे प्रमाण कमी.
  • शेततळ्याचा आधार असल्याने उन्हाळ्यात पिके जगवणे शक्‍य झाले.
  • जैविक खताचा पन्नास टक्के तर रासायनिक खताचा पन्नास टक्के वापर
  • मुख्यतः बिगर हंगामात पिके घेण्याची पद्धत. त्यामुळे दर चांगले मिळण्याची शक्‍यता.
  • संपर्क : मोहन काकडे, ९७६४४२५५०७, ८९७५०६६६७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com