एकमेकांच्या साथीने शेती, घराला आणले पुढे !

शिंदे यांचे झाले पक्के घर रेखा यांचा शेतीतला पुढाकार व पती सतीश यांची मिळालेली साथ यातून या दांपत्याने पत्र्याच्या जागी स्लॅबचे घर बांधले. मुले इंग्रजी शाळेत जाऊ लागली. आता महिला मार्गदर्शक झाल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मार्गदर्शन केले जाते. त्यांना गटामार्फत मदत केली जाते. गेल्या तीन वर्षांत एकही आत्महत्या गावात झालेली नाही.
कमेकांची साथ असेल तरच कुटुंबाची प्रगती करता येते हेच जणू सतीश व रेखा या शिंदे दांपत्याने प्रयत्नांतून दाखवून दिले आहे.
कमेकांची साथ असेल तरच कुटुंबाची प्रगती करता येते हेच जणू सतीश व रेखा या शिंदे दांपत्याने प्रयत्नांतून दाखवून दिले आहे.

हिंग्लजवाडी (ता. जि. उस्मानाबाद) येथील सतीश व रेखा या शिंदे दांपत्याने अत्यंत श्रमपूर्वक व नियोजनपूर्वक आपल्या साडेपाच एकरांतील शेतीला फायदेशीर करण्याचा प्रयत्न केला आहे. एकेकाळी मातीच्या घरात राहणारे व हंगामी शेती करणारे हे जोडपे आता सेंद्रिय शेती, भाजीपाला शेती, कोंबडीपालनात व्यस्त झाले आहे. एकमेकांच्या साथीने घराला पुढे नेण्याची त्यांचे प्रयत्न स्तुत्य आहेत. शेतकरी आपले आई-वडील, मुलाबाळांसह बारा महिने शेतात राबतो. काळ्या आईची इमानइतबारे सेवा करतो. तरीही अनेकवेळा आर्थिक परिस्थितीत मात्र कमजोर राहतो. त्याचे महत्त्वाचे कारण हे अाहे की पिकवलेल्या मालाला बाजारात योग्य दर मिळत नाही. कष्टाचा योग्य मोबदला न मिळणे इथेच शेतकऱ्याच्या गरिबीची मुळे आहेत. तरीही परिस्थितीचा कोणताही बाऊ न करता आशावादी वृत्तीने संकटातून मार्ग काढणारी, आपली परिस्थिती सुधारणारी जोडपी पाहायला मिळतात. कष्ट, संघर्षावर आधारलेली शेती उस्मानाबाद जिल्ह्यात (हेच तालुक्‍याचे ठिकाण) दीड-दोन हजार लोकवस्तीचे हिंग्लजवाडी गाव आहे. येथील सतीश व रेखा या शिंदे या पस्तिशीतल्या जोडप्याने शेतीत कष्टायला सुरवात केली. दोघांचेही मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट. मातीच्या भिंतीला छपराचा आधार. शेती केवळ साडेपाच एकर. जमीन हलकी. चांगला पाऊस झाला तर पन्नास हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मुश्‍किलीने हाती पडायचे. खते, बियाणे, कीडनाशके हा खर्चच एवढा असायचा की फायद्याची जुळणी व्हायची नाही. रेखा हिशोबी होत्या. सगळा खर्च, हिशोबाचे आकडे त्या लिहून ठेवीत. पुढे जाण्याची मिळाली प्रेरणा संसार वाढला तसा खर्च वाढला. डोक्यावर कर्जही होतं. अशातच रेखा यांचा बचत गटांच्या महिलांशी संपर्क आला. बोलण्यात व व्यवहारात त्या तरबेज असल्याने त्यांनी संपर्क वाढवण्यास सुरवात केली. तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी तसेच स्वयंशिक्षण प्रयोग परिवारातील महिला प्रवतिकांकडून मार्गदर्शन मिळू लागले. अभ्यास सहलीच्या निमित्ताने दुग्धव्यवसाय, सेंद्रिय शेतीचे प्रयोग पाहण्यात आले. मार्ग धूसर का होईना पण दिसू लागला. रेखा यांनी पतीला विश्‍वासात घेतले. पुढे दोघे मिळून काम करू लागले. प्रयोग पाहायला जाऊ लागले. सेंद्रिय शेतीबद्दल आस्था वाटू लागली. शेतीत नवे प्रयोग करण्याविषयी विश्‍वास दुणावला. पुढे रेखा बचत गटाच्या प्रमुख व पुढे मार्गदर्शक म्हणून परिसरातील ठोकी, कोंडलागली, तेर, बानेवाडी, म्होतरवाडी, गोवर्धनवाडी, दूधगाव, आदी पंधरा-वीस गावांत मार्गदर्शन करू लागल्या. शेतीत केले बदल दांपत्याने पूरक व्यवसाय म्हणून चार गायींचे संगोपन सुरू केले. गटाकडून मिळालेल्या दहा कडकनाथ कोंबड्यांची संख्या ५० ते ६० पर्यंत नेली. वीस बाय २० फुटाचे शेततळे कृषी विभागाकडून घेतले. शेतीची बांधबंदिस्ती केली. बांधावर तूर लावली. दोन एकरांसाठी ठिबक सिंचन केले. तुषार संच घेतला. हिरवळीची खतं म्हणून धैंचा पेरला. फुलोऱ्यात तो गाडण्यास सुरवात केली. त्या जमिनीत ऊस लागवड केली. गाईसाठी बारमाही चारा लावला. जोडीला हायड्रोपोनीक्स पद्धतीनेही चारा घेण्यास सुरवात केली. गांडूळ खत निर्मितीचे बेड आणले. बीज प्रक्रिया करून पेरणी सुरू केली. जीवामृत, बिजामृत, व्हर्मीवॉश तयार करून पिकाला वापरण्यास सुरवात केली. रासायनिक निविष्ठांचा वापर अत्यंत कमी केल्याने खर्चात बचत झाली. आश्वासक उत्पादन, उत्पन्न घरी लागणारे अन्नधान्य, भाजीपाला दोघे मिळून पिकवू लागले. बाहेरचा खर्च वाचू लागले. एक एकर पद्धतीतील शेतीत थोड्या थोड्या क्षेत्रावरील दहा ते पंधरा भाज्यांचे उत्पादन मिळू लागले. त्यातून ताजा पैसा घरखर्चाला येऊ लागला. तीस गुंठ्यात सोयाबीन पाच क्विंटल, तूर तीन क्‍विंटल, मूग ३० किलो, तर रब्बीत ज्वारी पाच क्विंटल, दुसऱ्या दीड एकरात पंधरा क्विंटल सोयाबीन, नऊ क्विंटल तूर, कडेने उडीद तीन क्विंटल, बांधावर तूर एक क्विंटल अशी पिकं दोन ते अडीच लाख रुपये देऊ लागली. सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर दिलेल्या या मालाची कृषी प्रदर्शन, मॉल व आठवडी बाजारात विक्री होऊ लागली. ऊस दोन एकरांत शंभर टन झाला. त्याचेही उत्पन्न आधाराला आले. वर्षाला सुमारे पाच एकरांत पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न शिंदे कुटुंबाने प्रथमच पाहिले असावे. त्यातच दूध, कोंबडीपालन यातूनही महिन्याला दहा-पंधरा हजार रुपयांची भर पडू लागली. शेती झाली अनुकरणीय रेखा शिंदे यांच्यासह कमल कुंभारदेखील २० गुंठ्यात अशी शेती करीत होत्या. त्यांचे अनुकरण करणाऱ्या महिलांची संख्या पुढे शंभरहून पुढे गेली. या महिला बचत गटाला अन्य इतर शंभरजणी जोडल्या गेल्या. अशा महिलांमुळे एवढी कुटुंबे आज स्वतःच्या पायावर उभी राहिली. गहू, ज्वारी, तूर, मूग, उडीद, हरभरा, भुईमूग, जवस, कारळं, भगर, राळे, मटकी, हुलगा, तीळ, पालेभाज्या, फळभाज्या अशी विविधता त्यातून दिसू लागली. गोमूत्र, ट्रायकोडर्मा, पीएसबी, रायझोबियम आदी जैविक घटकांचा वापर सुरू झाला. मातीची सुपीकता वाढू लागली. शेतात गांडूळांची संख्या वाढली. घरचे दूध, अंडी यांमुळे घरातील मुले सशक्त होऊ लागली. शिंदे यांच्या गटाला मदत म्हणून ऐंशी हजारांचा फिरता निधी मिळाला. तो टप्प्याटप्प्याने सात लाखांपर्यंत वाढवत नेला. एकूण २६ एकरांतील २७० महिलांना निधीचा लाभ झाला. विविध बॅंकांकडून मिळणाऱ्या कर्जाची परतफेड होऊ लागली. बॅंका दारात येऊ लागल्या. चाळीस महिलांना प्रत्येकी शंभर कडकनाथ कोंबडी पिल्लांचे वाटप झाले. (लेखक लातूर कृषी विभागांतर्गत निवृत्त अधिकारी आहेत.)

संपर्कः रेखा शिंदे- ९९६०२५३३७८ सतीश शिंदे- ७२१९३२७२५७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com