मिळवले ताजे उत्पन्न, जोखीम केली कमी

शेतीत स्वतः राबल्याशिवाय यश मिळत नाही. कोलकता झेंडूचे बारमाही उत्पादन घेण्याच्या विचारात आहे. गावातील शेतकऱ्यांना या झेंडूची लागवड केली आहे. सर्वजण एकत्रितरित्या पुणे येथे फुले पाठवत आहोत. येत्या काळात शेततळ्यामध्ये मत्स्यपालन तसेच शेळीपालन सुरू करणार आहे. -भगवानराव मुंढे
वांगी पिकात बीटरुट
वांगी पिकात बीटरुट

खरीप व उन्हाळी अशा दोन हंगामात किंवा बहुविध बारमाही भाजीपाला, बाजारातील मागणी अोळखून त्यांची निवड, जोडीला झेंडूची फुलशेती अशी पीकपद्धती व त्यातून ताजे उत्पन्न करडगांव (जि. परभणी) येथील भगवानराव मुंढे यांनी तयार केली आहे. अत्यंत कष्ट व शेतीचे नेटके नियोजन करीत उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांनी तीन एकरांवरून सात एकर जमिनीपर्यंत शेतीचा विस्तार केला आहे .   परभणीपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या करडगांव येथील भगवानराव किशनराव मुंढे सन १९८४ पासून शेती करीत आहेत. वडिलोपार्जित जमिनीपैकी त्यांच्या वाट्याला तीन एकर जमीन आली होती. दुधना नदी काठी असलेली ही काळी कसदार जमीन आहे. बारमाही भाजीपाला उत्पादन गावापासून परभणी शहर मार्केटजवळ असण्याची संधी भगवानरावांनी अोळखली. त्यानुसार भाजीपाला शेतीवर भर दिला. त्याची सुरवात २० गुंठे क्षेत्रावर वांगे लागवडीतून झाली. परभणी बाजारात चांगले दर मिळाले. त्यानंतर बाजारातील मागणी लक्षात घेत पिकांची योग्य घडी बसविली. साधारण दोन एकर क्षेत्र भाजीपाला पिकांसाठी ठेवले. त्यात प्रत्येकी वीस गुंठे क्षेत्रात चार पिके असे नियोजन केले. जोखीम कमी करणारी शेती खरिपातील भाजीपाला पिकांची काढणी झाली की उन्हाळी पिकांकडे वळायचे असा कल राहिला. म्हणजे बारमाही पिके उपलब्ध होऊ लागली. ताज्या उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला. सध्या त्यांच्याकडे दहा एकर क्षेत्र आहे. दरवर्षी त्यातील दोन एकरांत प्रत्येकी २० गुंठ्यात टोमॅटो, वांगी, कांदा, मिरची, भेंडी, कोथिंबीर आदी भाजीपाला पिकांची आलटून पालटून लागवड होते. एखाद्या पिकाचे दर घसरले किंवा काही नुकसान झाले तरी अन्य पिकांतून मंदी वा नुकसान भरून निघू शकते. उर्वरित आठ एकर क्षेत्रांत सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, ज्वारी, गहू आदी पिके घेतली जातात. ताजे उत्पन्न वांगी पिकातून २० गुंठ्यात सुमारे नऊ टन, टोमॅटोचे १२ टन, मिरचीचे सहा टन असे उत्पादन मिळते. दररोज साधारण एक क्विंटल माल बाजारात विक्रीसाठी नेला जातो. त्यातून उत्पन्नाचा ताजा स्त्रोत मिळतो. यंदा भाजीपाला पिकात दोन झाडांमध्ये बीटरुटची लागवड केली आहे. यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. भोपळ्याचा प्रयोग यंदा भोपळ्याचीही १० गुंठे क्षेत्रात लागवड केली अाहे. त्याचे १५ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. सांबार निर्मितीत त्याचा वापर मोठ्या शहरात होतो. ही संधी अोळखून तो पुणे येथे पाठविण्यात येत आहे. त्यास १५ रुपये प्रति किलो दर आहे. भाजीपाला शेतीस फुलशेतीची जोड भगवानराव यांचा मुलगा विशाल यांचा पुण्यात फूल सजावटीचा व्यवसाय आहे. त्यात चांगला अनुभव तयार झाला असल्याने बाजारातील मागणी लक्षात त्यांनी वडिलांना कोलकता झेंडूची लागवड करण्यास सांगितले. सुरवातीच्या वर्षी खासगी बसद्वारे पुणे येथे फुले पाठवली जात. पहिल्या वर्षी सव्वा एकरांतून सुमारे ५० क्विंटल उत्पादन मिळाले. त्या वेळी दिवाळीचा काळ असल्याने सरासरी ७० रुपये प्रति किलोचे दर मिळाले. त्यानंतर पुढील हंगाम निवडताना अडीच एकरांत नोव्हेंबरमध्ये लागवड केली. त्यास २५ ते ३० रुपये प्रति किलो दर मिळाले. जानेवारीत दोन एकरांवर झेंडूची लागवड केले असून त्याचा तोडा सुरु झाला आहे. यंदा अर्धा एकर शेवंतीची लागवड केली आहे. इतर शेतकऱ्यांना मिळाली प्रेरणा भगवानराव यांच्या अनुभवातून गावातील अन्य शेतकऱ्यांनाही कोलकता झेंडू लागवडीची प्रेरणा मिळाली आहे. यंदा त्यातून एकूण सुमारे १० एकरांवर लागवड झाली आहे. हे सर्व शेतकरी मिळून वाहनाद्वारे पुणे येथे फुले पाठवत आहेत. पीक फेरपालटीवर भर फेरपालटीमुळे पीक उत्पादनात वाढ होते. किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. बैलजोडी, तीन सालगडी यांच्यासह शेती करताना भगवानरावांना पत्नी सीताबाई यांची शेतीत समर्थ साथ मिळते. सिंचनासाठी शेततळे सिंचनासाठी विहिरीची सुविधा आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडत असे. त्यामुळे भाजीपाला उत्पादनात खंड पडत असे. कृषी विभागाच्या योजनेतून एक कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्याची उभारणी केली. त्यामुळे उन्हाळ्यातील सिंचनासाठी संरक्षित पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पाण्याचा काटेकोर वापर करण्यावर भगवानराव यांचा भर असतो. शेतीला ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. शेतीतील यश पहाटे चार वाजता उठून रात्री दहा वाजेपर्यंत भगवानराव यांचे काम सुरू असते. त्या कष्टातूनच केवळ शेतीतील उत्पन्नातून गावशिवारात सात एकर जमीन खरेदी करणे त्यांना शक्य झाले. सर्व मुलांना चांगले शिक्षण दिले. एका मुलीचे लग्न चांगल्या प्रकारे केले. दोन मुलांपैकी मोठा गोपाल बॅंकेत कृषी अधिकारी तर धाकटा विशाल यांचा पुणे येथे फूल सजावटीचा व्यवसाय आहे.

संपर्क- भगवानराव मुंढे-८३२९८८८५०८  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com