द्राक्षातील आंतरपिकांनी केली शेतीतील जोखीम कमी

शेतीत कुटुंबाचा हातभार देवरे यांना शेतीत संपूर्ण कुटुंबाची साथ आहे. संपूर्ण कुटुंबीय पहाटेपासून कारल्याची तोडणी करतात. त्यामुळे ताजा माल केवळ काही कालावधीत मार्केटला पोचता करणे शक्य होते. ताज्या व दर्जेदार मालाला किलोमागे काही रुपये जास्तीचेही मिळतात. वेगवेगळ्या हंगामांत पिके असल्याने प्रत्येक हंगामात ताजे उत्पन्न हाती येते. बागेतून कारल्याचे भरलेले क्रेटस घेऊन जाण्यासाठी देवरे यांनी गावातील वेल्डरकडून छोटी ट्राॅली तयार करून घेतली आहे. यामुळे मेहनत कमी झाली आहे. गावातच ‘ट्रान्स्पोर्ट’ची सोय असल्याने सुरत मार्केटला वेळेत माल पोचवणे शक्य होते.
देवरे दांपत्य शेतीत राबते. त्यामुळे कष्टाचा भार हलका होतो.
देवरे दांपत्य शेतीत राबते. त्यामुळे कष्टाचा भार हलका होतो.

नोकरी मिळाली नाही म्हणून निराशा न होता वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वैभव देवरे (करंजाड, जि. नाशिक) यांनी शेतीतच करिअर सुरू केले. द्राक्ष, डाळिंब या मुख्य पिकांबरोबरच कारली, कलिंगड आदी आंतरपिकांचे प्रयोग करीत अर्थकारण सुधारण्यात सुरवात केली. जोखीम कमी करणारी पीकपद्धती, बाजारपेठांचा अभ्यास व सुधारित तंत्रज्ञानाचा वापर ही त्यांच्या शेतीची वैशिष्ट्ये सांगता येतील. नाशिक जिल्ह्यातील सटाणा हा द्राक्ष व डाळिंबासाठी महत्त्वाचा तालुका मानला जातो. अनेक प्रयोगशील शेतकरी या भागात पाहण्यास मिळतात. तालुक्यापासून सुमारे १८ किलोमीटरवरील करंजाड येथे वैभव देवरे यांची सुमारे आठ एकर शेती आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १७ वर्षांपासून त्यांनी शेतीचे धडे घेतले. वडिलांचे निधन झाले अाहे. मात्र मोठ्या जबाबदारीने वैभव व्यावसायिक दृष्टीने शेती करीत आहेत. जोखीम कमी करण्यासाठीचा प्रयोग आठ एकरांत द्राक्ष, डाळिंब ही मुख्य पिके. द्राक्ष व डाळिंबाची विक्री स्थानिक स्तरावरच केली जाते. दोन्ही पिकांचे एकरी सात ते आठ टन उत्पादन घेतले जाते. अनेक वर्षांपासून ही दोन्ही पिके बागेत असली तरी त्यांच्यापासून निसर्ग, दर यांच्या अनुषंगाने जोखीम ही असतेच. त्यामुळे अन्य एखादे पीक घेऊन मुख्य पिकांवरील जोखीमभार कमी करण्याचा प्रयत्न वैभव यांचा होता. जानेवारी २०१७ मध्ये दीड एकरात नव्या द्राक्ष लागवडीचे नियोजन केले. त्यासाठी रूटस्टॉक लावला. या वेळी आंतरपीक म्हणून उन्हाळ्यात कलिंगड घेण्याचे प्रयोजन केले. या पिकाचा पहिलाच अनुभव होता. त्याचे दीड एकरात २० टन उत्पादन मिळाले. उत्पन्नही साधारण एक लाख रुपयांपर्यंत दिले. आंतरपिकाचा हा प्रयत्न उत्साह वाढवणारा होता. कलिंगडानंतर कारले कलिंगड काढणीनंतर थॉमसन वाणाच्या द्राक्षाचे कलम करून घेतले. साधारण आॅगस्टच्या महिन्याचा हा कालावधी होता. त्याच वेळी या नव्या बागेत कारल्याचे आंतरपीक घेण्याचे अभ्यासाअंती ठरवले. या पिकाचादेखील हा पहिलाच प्रयोग होता. बागेत मंडप तयार होता. तसेच ठिबक सिंचनाचीही सोय केलेली होती. द्राक्षबाग नऊ बाय पाच फूट अंतरावरील आहे. त्याच्याच पाच फुटांच्या मधल्या जागेत कारले लावले. तत्पूर्वी खड्ड्यात निंबोळी पेंड, शेणखतांचा वापर केला. आंतरपिकांनी दिली ऊर्जा कारल्याच्या नाजूक वेलींचे अतिशय उत्तम प्रकारे व्यवस्थापन केले. वाढ होणाऱ्या वेली सुतळीच्या साह्याने मंडपाच्या तारेला बांधल्या. त्यामुळे तारेवर वेल पसरण्यास चालना दिली. साधारण साठ दिवसांनंतर कारल्याचा पहिला तोडा घेतला. आत्तापर्यंत दीड एकरातून सुमारे १८ ते २० टन मालाचे उत्पादन मिळाले आहे. अजून सुमारे पाच टन उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत कलिंगड व कारले या दोन्ही पिकांनी मिळून तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. मुख्य पिकातील तेवढा खर्च कमी झाल्याचे समाधान मिळाल्याचे देवरे म्हणाले. फायदेशीर मार्केट देवरे म्हणाले की कारले पिकासाठी वाहतुकीच्या दृष्टीने नाशिकच्या तुलनेत सुरत मार्केट अधिक सोयीचे आहे. आत्तापर्यंत सरासरी कारले पिकाला २० ते २२ रुपये दर मिळाला आहे. तेथील व्यापाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याचा फायदा मिळतो. अर्थात द्राक्ष व डाळिंबाला सुरत बरोबरच नाशिक, स्थानिक व्यापाऱ्यांकडूनही चांगला उठाव असतो. आगाप द्राक्षांना फायदा देवरे म्हणाले की आमच्याकडील द्राक्ष छाटण्या आगाप असल्याचा फायदा दरांमध्ये होतो. आॅक्टोबर छाटणीच्या द्राक्षांना किलोला ४० ते ४५ रुपये दर मिळतो, तर आगाप द्राक्षांना हाच दर ६० ते ८० रुपये मिळवणे शक्य होते. पाण्याचे नियोजन धरण व नदी हे स्रोत असल्याने पाण्याची तेवढी गंभीर समस्या नाही. स्वतंत्र विहीर खोदली आहे. मात्र उन्हाळ्यात या भागात पाणीटंचाईची दाहकता निर्माण होते. त्यासाठी तीस गुंठ्यांत शेततळे तयार केले आहे. सध्याच्या परिस्थितीत विहिरीत पाणी अाहे. पाण्याची शाश्वती झाल्याने विविध पिकांचा विचार करणे शक्य झाले. सर्व क्षेत्र ठिबकखाली आहे. उन्हाळ्यात व दुष्काळातही देवरे यांची शेती बहरलेली असते. बहुतेक सर्व पिकांना ठिबकद्वारेच खते दिली जातात. कीडनाशक फवारणीसाठी आता आधुनिक ट्रॅक्टर व पंप यांचा वापर केला जातो. सुधारित तंत्राद्वारे शेतीतील खर्च कमी करणे शक्य झाले आहे. भागातील अनुभवी प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन देवरे घेतातच. शिवाय काही युुवा शेतकरी देवरे यांचेही मार्गदर्शन घेत असतात.  संपर्क : वैभव देवरे- ९४०४७९६६५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com