बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजन

माती सुपिकतेचे महत्त्व केळीची लागवड करावयाच्या क्षेत्रात जूनमध्ये धैंचा घेतला जातो. रोटाव्हेटरद्वारे बारीक करून जमिनीत गाडला जातो. कांदेबाग केळीची कापणी रब्बीच्या तोंडावर संपते. केळीच्या जमिनीचा पोत चांगला राहावा यासाठी कापणीनंतर हरभरा व ज्वारीची पेरणी होते.
निर्यातक्षम केळीचे उत्पादन
निर्यातक्षम केळीचे उत्पादन

कठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व त्यांचे पुत्र पुरुषोत्तम आणि श्रीकांत हे बाजारपेठेचा अभ्यास करून आपल्या केळी बागेचे नियोजन मागील अनेक वर्षे चांगल्या प्रकारे करीत आहेत. दरवर्षी केळीसाठी बेवड म्हणून हरभरा, ज्वारी घेतली जाते. जमीन सुपीकता टिकविण्यासाठी पीक अवशेष, धैंचा यांचाही वापर केला जातो. जळगाव जिल्ह्यात कठोरा हे गाव तापी नदीच्या काठावर आहे. येथे प्रामुख्याने केळीची शेती आहे. कापूस तसे दुय्यम पीक म्हणावे लागेल. गावात पांडुरंग पाटील व त्यांची मुले पुरुषोत्तम आणि श्रीकांत आपली ७५ एकर शेती करतात. त्यांचेही मुख्य पीक केळी हेच आहे. दोन टप्प्यांत त्याची लागवड होते. पाटील यांच्या शेतीविषयी पुरुषोत्तम यांनी डेअरी विषयात पदविका तर श्रीकांत यांनी गुजरातमधून कृषी विषयातील पदव्युत्तर पदवी घेतली आहे. पांडुरंग यांना तीन बंधू आहेत. त्या वेळी एकत्रितरीत्या शेतीचे व्यवस्थापन सांभाळण्यात यायचे. सन २००२ मध्ये कुटुंब विभक्त झाले तेव्हा पांडुरंग यांच्या वाट्याला ३० एकर शेती आली. सिंचनासाठी दोन कूपनलिका होत्या. मजुरांची समस्या होती. मग कापसाची शेतीच न करण्याचा निर्णय घेतला. केळीला मुख्य पीक बनविले. त्याचे दर्जेदार उत्पादन ते घेऊ लागले. सुरवातीला दिल्ली येथे एका प्रसिद्ध कंपनीला केळीचा पुरवठा करायचे. पण बाजारात मंदी आली की कापणी रखडायची. मग चोपडा, जळगाव येथील व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. विक्रीची पद्धत तेजी असली की केळीला क्विंटलमागे १५० ते २०० रुपये अधिक दर (ऑन) देण्याची पद्धत आहे. अनेक व्यापारी तेजीच्या काळात असा दर देतात. पण मंदीच्या वेळेस जे दर जाहीर होतात त्यापेक्षा कमी दरात खरेदी करतात. परंतु आपल्या शंभर टक्के केळीची खरेदी जो व्यापारी मंदीतही करील त्यालाच केळी देण्याचे पाटील यांचे नियोजन असते. व्यापारी गावात येऊन कापणी करून नेतात  

शक्यतो फसवणूक नाही शेती कठोरासह नजीकच्या भोकर, भादली खुर्द व जामोद शिवारात आहे. जेथे रस्ते चांगले नव्हते तेथे खडी, मुरूम टाकून ते चांगले तयार केले. केळी उत्पादकासह व्यापारीदेखील असलेल्या व्यावसायिकाला विक्री करण्यावर पाटील यांचा अधिक भर राहतो. कारण अशा व्यक्तीला शेतकऱ्याच्या अडचणी, गरजाही माहीत असतात. त्यामुळेच व्यवहारात फसवणुकीचा अनुभव शक्यतो आलेला नाही. व्यापाऱ्याला केळीच्या बागा दाखविल्या जातात. रस्त्यांची माहिती दिली जाते. मग विक्रीचा करार केला जातो. कापणी करताना कट्टी (घट लावणे) व इतर प्रकार नसतात. तसे करार करतानाच निश्चित केले जाते. अर्ली कांदेबागेला प्राधान्य अर्ली कांदेबाग केळीला सुरवातीला चांगला उठाव असतो. म्हणूनच काही वर्षांपासून याच हंगामाची निवड होते. एकाच वेळी पूर्ण एकरात लागवड न करता क्षेत्राचे योग्य नियोजन केले जाते. दरवर्षी सुमारे ४० हजार कंदांची लागवड असते. उत्तम प्रकारचे वाण रावेर, जामनेर येथून आणले जाते. निर्यातक्षम उत्पादनाच्या दृष्टीने काटेकोर नियोजन असते. साधारण २४ किलोची रास ते घेतात. सध्या अर्ली कांदेबागेतील केळीची कापणी सुरू आहे. आपल्या गावानजीकच्या व्यापाऱ्यासोबत करार केला आहे. पांडुरंग यांच्यासह त्यांच्या बंधूंचेही केळीचे क्षेत्र अधिक असल्याने स्वतः खरेदीचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर अनेकदा आला. परंतु खरेदीच्या व्यवसायात प्रत्यक्ष उतरण्यापेक्षा आपण मदत करू यावर त्यांची श्रद्धा आहे. नियोजनात काटेकोरपणा नियोजन यशस्वी होत गेल्याने शेतीही वाढली. त्यातूनच आजघडीला शेती ७५ एकरांवर नेली. आठ कूपनलिका, चार सालगडी, दोन बैलजोड्या, तीन म्हशी आहेत. गावानजीक गोठा आहे. गावानजीकच्या शेतात सालगड्यांच्या निवासाची व्यवस्था आहे. मोठे व छोटे ट्रॅक्‍टर्स आहेत. बेवड व पीक अवशेषांचे महत्त्व जाणले केळीची लागवड करावयाच्या क्षेत्रात जूनमध्ये धैंचा घेतला जातो. रोटाव्हेटरद्वारे बारीक करून जमिनीत गाडला जातो. कांदेबाग केळीची कापणी रब्बीच्या तोंडावर संपते. केळीच्या जमिनीचा पोत चांगला राहावा यासाठी कापणीनंतर हरभरा व ज्वारीची पेरणी होते. त्यासाठी मध्य प्रदेशातून यंत्र तयार करून घेतले अाहे. ते कांदा, हरभरा, गहू, मका, धैंचा आदींची पेरणी करते. छोट्या व मोठ्या ट्रॅक्‍टरद्वारे ते सरीच्या आकारानुसार चालू शकते. धान्य विक्रीबरोबरच पशुधनाला चांगला चारा ज्वारीतून मिळतो. केळी व रब्बी पिकांचे अवशेष जमिनीतच गाडले जातात. केळीचे खांब डिस्क हॅरोने बारीक करून गाडले जातात. ठळक बाबी

  • खतांचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करून त्याचा वापर.
  • सुरवातीच्या दोन बेसल डोसमध्ये सेंद्रिय खतांचा व त्यानंतर विद्राव्य खतांचा वापर.
  • निर्यातक्षम केळीचे उत्पादक म्हणून भागात ओळख.
  • आंतरपिके घेण्यावर भर.
  • सन १९९५ पासून आजगायत ठिबकचा वापर. ठिबक संचाची हाताळणी अत्यंत काटेकोर.
  • लग्न करायचे तर ग्रामीण मुलीशीच पांडुरंग यांचा धाकटा मुलगा श्रीकांत यांच्यासाठी एका कुटुंबाकडून लग्नासाठी प्रस्ताव आला. मुलगी उच्चशिक्षित होती. त्यांना नोकरी करणारा जावई हवा होता. श्रीकांत यांनी मात्र शेतीशी निष्ठा असलेल्या, ग्रामीण भागाशी नाळ असलेल्या मुलीशीच लग्न करायची अट टाकून प्रस्ताव नाकारला होता. नोकरीमुळे कुटुंब विखुरते, विभक्त होते. मात्र शेतीमुळे कुटुंब एकत्र नांदते, अशी पाटील बंधूंची विचारसरणी आहे.

    संपर्क- श्रीकांत पाटील- ९९२३४१५४०२  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com