हर्षाताईंनी घेतलाय गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादनाचा वसा

नवेगाव रेठी (जि. नागपूर) ः  शेवग्याच्या झाडाची वाढ दाखविताना हर्षा कळंबे.
नवेगाव रेठी (जि. नागपूर) ः शेवग्याच्या झाडाची वाढ दाखविताना हर्षा कळंबे.

दिल्लीतील वातावरण मानवत नसल्याने नरखेड (जि. नागपूर) गावी परतलेल्या हर्षा लीलाधर कळंबे यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून दर्जेदार धान्य आणि फळांच्या उत्पादनावर भर दिला आहे. याचबरोबरीने त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणीदेखील केली आहे. हर्षा कळंबे यांचे पती लीलाधर हे दिल्लीतील एका खासगी वाहन कंपनीत नोकरीला आहेत. हर्षा यांचे शिक्षण एम.एससी. (सूक्ष्मजीवशास्त्र)पर्यंत झाले आहे. पती व मुलासोबत हर्षादेखील दिल्ली शहरात वास्तव्याला होत्या. दिल्लीतील प्रदूषित हवामानामुळे त्या आजारी पडत होत्या, तसेच त्यांचा मुलगा धैर्यदेखील (वय सात वर्ष) याच कारणामुळे आजारी असायचा. वैद्यकीय खर्च वाढत होता. त्यामुळे हर्षा कळंबे यांनी दिल्ली सोडून गावी येण्याचा निर्णय घेतला. तब्बल नऊ वर्षे दिल्लीत वास्तव्य करून त्या नरखेड (जि. नागपूर) या गावी परतल्या. सुरू झाले शेतीचे नियोजन   नरखेड गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील नवेगाव रेठी या गावात कळंबे कुटुंबीयांची १३ एकर शेती आहे. हर्षाताई यांचे सासरे नामदेव कळंबे या शेतीचे व्यवस्थापन करतात. गावी आल्यावर हर्षा यांनी शेती करण्याचा निर्णय सासऱ्यांना सांगितला. सुनेचा उत्साह पाहता सासरे नामदेव कळंबे यांनीदेखील या निर्णयाला पाठबळ दिले. कुटुंबाच्या तेरा एकर शेतीपैकी साडेतीन एकर शेतीचे व्यवस्थापन त्यांनी हर्षाताईंकडे पहिल्या टप्प्यात दिले. दरम्यान, पीक लागवड, व्यवस्थापन याविषयी माहिती नसल्याने   त्यांनी शेतीविषयक माहितीसाठी यू ट्युबचा आधार घेतला. त्या माध्यमातून नैसर्गिक शेती व्यवस्थापनाचे बारकावे जाणून घेतले. दररोज सासऱ्यांकडून देखील  शेतीवर जाऊन पीकनियोजनाची प्रत्यक्ष माहिती करून घेतली. याच महितीच्या बळावर त्यांनी या वर्षी पहिल्यांदा एक एकर डाळिंब बागेत हरभरा लागवड केली. नैसर्गिक   शेतीपद्धतीने या संपूर्ण क्षेत्राचे व्यवस्थापन केले. त्यांना  १० क्‍विंटल हरभऱ्याचे उत्पादन मिळाले. हरभऱ्याच्या बरोबरीने त्यांनी धने लागवडही केली होती. धन्याचे ३० ते ३५ किलो उत्पादन मिळाले. असे आहे दैनंदिन नियोजन हर्षा कळंबे सकाळी साडेदहा वाजता शेतात पोचतात. मजुरांना दैनंदिन कामे विभागून दिल्यानंतर त्यादेखील शेती पीक व्यवस्थापनामध्ये रमतात. दिवसभर शेतीची कामे करून सायंकाळी घरी परततात. घरची कामे करण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्य असल्याने शेती नियोजन करणे त्यांना सोपे जात आहे. कुटुंबातील सदस्यांकडून हर्षाताईंना प्रोत्साहन मिळाल्यामुळे यापुढील काळात आणखी जोमाने काम करणार असल्याचे त्या सांगतात. यापुढील काळात आणखी दोन एकरांवर क्षेत्रावर संत्रा, पपई लागवडीचे त्यांनी नियोजन केले आहे. प्रयोगशील शेतकरी, अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन नैसर्गिक पद्धतीने शेतीनियोजन करायचे असल्याने हर्षाताईंनी परिसरातील प्रयोगशील शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्यास सुरवात केली.

परिसरात आयोजित होणाऱ्या शेतीविषयक शिबिरातून माहिती घेतली. या शिबिरात कृषी अधिकारी हेमंतसिंह चव्हाण यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्याकडून नैसर्गिक शेतीपद्धतीचे बारकावे जाणून घेतले. शेतीला पुरेसे शेणखत उपलब्ध होण्यासाठी हर्षा कळंबे यांनी दोन बैल आणि दोन गाईंचा सांभाळ केला आहे. जनावरांना पुरेशा चाऱ्याची उपलब्धता व्हावी याकरिता हायड्रोपोनिक्‍स पद्धतीने चारा उत्पादनाचा प्रकल्प त्यांनी उभारला आहे. शेतकरी कंपनीची केली नोंदणी हर्षा कळंबे यांनी विदर्भ बळिराजा फार्मर प्रोड्युसर कंपनी नोंदणीचा प्रस्ताव दाखल केला आहे. सध्या  पाच संचालकांचा या कंपनीत समावेश आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतमालाची खरेदी करणे, त्यावर प्रक्रिया आणि पॅकिंग, ब्रॅंडिंग करून विक्री असा या कंपनीचा उद्देश आहे.

डाळिंबात शेवग्याचे आंतरपीक हर्षा कळंबे यांनी जुलै, १७ मध्ये साडेतीन एकर क्षेत्रावर १२ फूट बाय १२ फूट अंतरावर झिगझॅग पद्धतीने डाळिंबाच्या भगवा जातीची लागवड केली. रांगेतील दोन डाळिंब झाडाच्या मध्ये एक शेवग्याचे झाड लावले. फळबागेला ठिबक सिंचन केले आहे. फळझाडांची लागवड करताना खड्यात मातीमध्ये घन जिवामृत दिले. दर पंधरा दिवसांच्या अंतराने जीवामृत आणि दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते, तसेच दर सहा महिन्यांनी आळ्यामध्ये घनजीवामृत मिसळून दिले जाते. सध्या शेवग्याच्या शेंगांचे उत्पादन सुरू झाले आहे. प्रतिझाड आठ किलो शेंगांचे उत्पादन मिळत आहे. शेंगा विक्रीपेक्षा बियाणे विक्रीचे त्यांनी नियोजन केले आहे. डाळिंब व शेवगा बागेचे व्यवस्थापन नैसर्गिक पद्धतीने केले जाते.

संपकर् ः हर्षा कळंबे, ७९७२१२६७५६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com