agricultural success story in marathi, agrowon, organic farming in nashik, manikrao kasar. | Agrowon

सेंद्रिय पद्धतीने जमीन केली सुपीक

ज्ञानेश उगले
शनिवार, 7 जुलै 2018

शेवगेदारणा (ता. जि. नाशिक) येथील माणिकराव कासार यांनी रासायनिक शेतीमुळे मृतवत झालेली जमीन सेंद्रिय पद्धतीचे विविध प्रयोग राबवत जिवंत केली आहे. डाळिंब, पेरू, शेवगा व ऊस या पिकांचे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करत असून, त्यातून उत्पादनामध्ये शाश्वतता आणली आहे. गेल्या १६ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून त्यांचा चार एकरवरील ‘जयवंता ऑर्गेनिक फार्म’ नाशिकमधील सेंद्रिय शेतीचे केंद्र बनला आहे.

शेवगेदारणा (ता. जि. नाशिक) येथील माणिकराव कासार यांनी रासायनिक शेतीमुळे मृतवत झालेली जमीन सेंद्रिय पद्धतीचे विविध प्रयोग राबवत जिवंत केली आहे. डाळिंब, पेरू, शेवगा व ऊस या पिकांचे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करत असून, त्यातून उत्पादनामध्ये शाश्वतता आणली आहे. गेल्या १६ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून त्यांचा चार एकरवरील ‘जयवंता ऑर्गेनिक फार्म’ नाशिकमधील सेंद्रिय शेतीचे केंद्र बनला आहे.

दरवर्षी खर्च, पर्यायाने कर्जही वाढत चालल्याने नाईलाजानेच नाशिक जिल्ह्यातील शेवगेदारणा येथील माणिकराव कासार यांनी सेंद्रिय पद्धतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. एकदा निर्णय घेतल्यानंतर न डगमगता सलग १६ वर्षे सेंद्रिय शेतीची कास त्यांनी धरलेली आहे. यातून खर्चाला तर आळा बसलाच. पण शेतीतील जैवविविधतेसह मातीची सुपीकताही वाढली. मातीचा सेंद्रिय कर्ब -३० वरून ३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जमिनीतील सुक्ष्मजीवांची संख्या मुबलक झाली. म्हणजेच खऱ्या अर्थाने माती श्रीमंत झाली. उत्पादनामध्ये शाश्वतता आल्याचा अनुभव येत आहे.

अशी झाली सुरवात...
ऊस, द्राक्षे ही माणिकरावांची पारंपरिक पिके. लगतचा पळसे कारखाना बंद पडल्यानंतर ऊस पीक हे परवडेनासे झाले. बदलत्या हवामानाने द्राक्षशेतीतील खर्च दिवसेंदिवस वाढत होता. त्यातच माती पृथ्थकरणाचा आलेला अहवाल पाहून त्यांना धक्काच बसला. सेंद्रिय कर्ब उणे ३० इतके खाली घसरले होते. काहीतरी बदल केलाच पाहिजे, हे मनाने ठरवले. सेंद्रिय शेतीविषयी ऐकले होते. या काळात ते नाशिक जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीतील प्रयोगशील शेतकरी सदाशिव शेळके, संजय पवार यांच्या संपर्कात आले. ही मंडळी स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून `जीवो जीवस्य जीवनम' या ध्यासाने सेंद्रिय शेतीचे प्रयोग करीत होती. त्यांच्या ‘कश्‍यप ग्रुप’ मध्ये माणिकराव सहभागी झाले. पवार यांचे प्रयोग पाहून माणिकराव भारावून गेले. सन २००१ पासून त्यांनी सेंद्रिय पद्धतीचे प्रयोग शेतीत राबवण्यास सुरवात केली. सुरवातीला या प्रयोगांना कुटुंबीयांचा विरोध झाल तरी ते ठाम राहिले. १६ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर आजमितीस शेतीत झालेला आमूलाग्र बदल सर्वांनाच आनंद देणारा ठरत आहे. माणिकरावांच्या चार एकरांतील इंच न इंच जागा कोणत्या तरी उपयुक्त वनस्पतीने व्यापलेली आहे. सुक्ष्मजीव, पक्षी यांच्यासह सबंध निसर्गातील चराचराने ही शेती गजबजून गेली आहे.

पिके - क्षेत्र

 • पेरु - १ एकर
 • डाळिंब - दीड एकर
 • शेवगा - १ एकर
 • ऊस - अर्धा एकर

पीक अवशेष जागेवरच कुजवले
सेंद्रिय शेतीच्या प्रयोगांविषयी माहिती देतांना माणिकराव म्हणाले की, पूर्वी शेतातील पिकांचे अवशेष व तणे कचरा समजून शेताबाहेर काढण्याकडेच माझा कल होता. मात्र, सेंद्रिय शेती सुरू केल्यानंतर दीड दशकांत शेतातील एक काडीही बाहेर काढली नाही. द्राक्षबागेतील बोदावर वाढणारे गवत कापून जागेवरच आच्छादन केले. या शिवाय परिसरात वाढलेले, पडलेले, फेकून दिलेले तण, गवत ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीतून पुन्हा शेतात आणून त्याचे आच्छादन करत गेलो. द्राक्षबागेत शेवगा हे आंतरपीक घेतले. अगदी शेवग्याचे जाड खोड व खांबही बोदावर पुरले. खोड कुजल्यानंतर उत्तम दर्जाचे खत पिकाला मिळत असल्याचे आढळले. या शिवाय गेल्या दहा वर्षांपासून पावसाळ्याच्या तोंडावर द्राक्ष, डाळिंब बागेतील दोन ओळीतील जागेत मका, बाजरी, उडीद, कुळीद, सूर्यफूल, भुईमूग आदी सात धान्यांची पेरणी व कापणी करत आहे. त्यातून मातीला आणि पिकाला अनेक उपयुक्त अन्नघटक मिळत आहेत.

गांडुळांची संख्या वाढली
वर्ष २००० पूर्वी बागेत गांडूळ क्वचितच सापडत. मात्र, मागील बारा-तेरा वर्षांत एकही गांडूळ वावराबाहेर गेले नाही. पिकांत सेंद्रिय पदार्थ, जीवामृत, गुळाचा वापर नियमित केल्याने गांडुळांची संख्या वाढली. सर्वांत चांगली मशागत गांडुळांकडून होते. जमीन नेहमीच सच्छिद्र आणि भुसभुशीत राहते.

जीवामृत बनवण्याची व वापरण्याची पद्धत ः

 • ५०० लीटर पाण्यात एक पाटीभर शेण, २ किलो काळा गुळ, मुठभर बांधावरची माती, सोयाबीन, उडीद, हरभरा या पैकी उपलब्ध डाळीचं पीठ २ किलो घेऊन एकत्र कालवून मिश्रण ८ दिवस कुजवतो. हे मिश्रण प्रत्येक झाडाच्या मुळाच्या कक्षेत देण्यासाठी सिंगल फेज मडपंप व दोन हजार फूट एचडीपीई पाइप वापरतो.
 • गरजेनुसार पीक संरक्षणासाठी ०.१ टक्के या प्रमाणात बोर्डो मिश्रणाची फवारणी केली जाते. बोर्डो फवारणीच्या दुसऱ्या दिवशी जीवामृत दिले जाते.

चवळी, मक्‍याचा प्रयोग ः
चवळी व मका या पिकांचा आंतरपीक म्हणून वापर केला जातो. चवळीच्या मुळाशी असलेल्या गाठीतून नत्राचा पुरवठा होतो. तर मक्‍याच्या काडाचा बोदावर आच्छादनासाठी चांगला उपयोग होतो.

पिकांसाठी पोषकेही घरचीच ः

 • फळधारणेच्या काळात १०० लीटर पाण्यात १० लीटर गाईचे दूध मिसळून फवारणी करतात. यामुळे फळाला कॅल्शियम मिळून चकाकी मिळते.
 • या शिवाय गरजेनुसार ताकाचीही फवारणी केली जाते.
 • सप्तधान्यांकुरांची फवारणी - उडीद, गहू, मूग, बाजरी, चवळी आदी प्रकारची ७ धान्ये रात्रभर भिजवून त्यांना मोड आणले जातात. त्यानंतर ते दळून त्यात गोमूत्र व गूळ मिसळून फवारणी केली जाते. उत्तम टॉनिक ठरते.
 • गुळाचा वापर जास्तीत जास्त द्रावणात केला जातो. त्यामुळे उपयुक्त जीवाणूंचे बिजाणू स्पोअर्स वाढतात. ट्रायकोडर्मा, व्हर्टीसिलियम या जैविक बुरशींचाही नियमित व गरजेनुसार वापर करतो.
 • भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, ताज्या हळदीचे कंद मिक्‍सरच्या साह्याने बारीक करून त्यात ठरावीक प्रमाणात पाणी घेऊन ते फवारणीसाठी वापरतो.
 • हे प्रयोग त्यांच्या शेतीसाठी फायद्याचे ठरले असल्याचे माणिकराव यांनी सांगितले.

प्रत्येक जीव मोलाचा
शेतीत जगणारा प्रत्येक जीव मोलाचा आहे. माणिकराव म्हणाले, की अगदी वाळवीही निसर्गामध्ये जुनी व लवकर न कुजणारी खोडे बारीक करण्याचे काम करते. बारीक झाल्यानंतर कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते. सर्वांत महत्त्वाचा जीव म्हणजे गांडूळ. त्यांना जपले तर शेताची मशागत आपोआपच साधते. गोठ्यातील ३ गाईंनी तर शेतीला मोठाच आधार दिल्याचे त्यांनी सांगितले.

उत्पादनातही राहते सातत्य ः

 • माणिकरावांनी द्राक्षाचे उत्पादन २००१ ते २०११ असे दहा वर्षे घेतले. संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने द्राक्षाची सलग ८ पिके घेतली. एकरी ६ टनापर्यंत द्राक्षांचे उत्पादन मिळाले.
 • २०११ नंतर त्यांनी द्राक्षपीक काढून त्या जागेवर डाळिंब लागवड केली. आतापर्यंत त्यांनी डाळिंबाची चार पिके घेतली असून, एकरी सरासरी उत्पादन ८५ क्विंटल मिळाले आहे.
 • सेंद्रिय डाळिंबाचे बहुतांश फळ सरासरी २०० ग्रॅम वजनाचे व चकाकदार होते. हे सेंद्रिय डाळिंब गतवर्षी पंजाबमधील एका सामाजिक संस्थेने प्रतिकिलो १७५ रुपये दराने खरेदी केली.
 • सन २०१५ मध्ये एक एकर क्षेत्रात लखनौ ४९ या पेरू वाणाची मिडो ऑर्चर्ड पद्धतीने लागवड केली. पेरूचे सलग तिसरे उत्पादन घेतले आहे.

शेतकरी गट आणि कंपनीही ः
माणिकराव यांच्या पुढाकाराने शेवगेदारणा परिसरातील शेतकऱ्यांचा `शिवेश्‍वर सेंद्रिय शेती गट' स्थापन झाला आहे. मागील वर्षी त्यांनी शेतकऱ्यांसह `नाशिक हनी बी फार्मर प्रोड्युसर कंपनी' सुरू केली आहे. त्याद्वारे सेंद्रिय शेतमालाचे ब्रॅडिंग, मार्केटिंग तसेच पेरू, डाळिंब या फळांपासून प्रक्रियायुक्त उत्पादने करण्याचे नियोजन आहे.

माणिकराव कासार, ९४२३१०४३०१


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...