पुणे ः दुष्काळी स्थितीत जनांवरासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी बारामती तालुका सहकारी दूध
फूल शेती
क्षारपड जमिनीत फुलवली कार्नेशनची शेती
सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी येथील तरुण शेतकरी रत्नाकर रघुनाथ चव्हाण यांनी क्षारपड जमिनीत कार्नेशन फुलाची शेती यशस्वी केली आहे. गेल्या १४ वर्षांपासून उत्कृष्ठ व्यवस्थापन ठेवत या शेतीत सातत्य ठेवलेच. शिवाय मुंबईची शाश्वत बाजारपेठही त्यांनी हस्तगत केली आहे.
सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी येथील तरुण शेतकरी रत्नाकर रघुनाथ चव्हाण यांनी क्षारपड जमिनीत कार्नेशन फुलाची शेती यशस्वी केली आहे. गेल्या १४ वर्षांपासून उत्कृष्ठ व्यवस्थापन ठेवत या शेतीत सातत्य ठेवलेच. शिवाय मुंबईची शाश्वत बाजारपेठही त्यांनी हस्तगत केली आहे.
सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी (ता. वाळवा) हा तसा ऊस व हळदीचा हुकमी पट्टा. याच गावात रत्नाकर चव्हाण यांची वडिलोपार्जित आठ एकर जमीन आहे. तीन भावांचे हे एकत्रित कुटुंब आहे. कुटुंबातील तरुण पिढीतले रत्नाकर महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच शेतीचाही अनुभव घेत होते. सन २००४ मध्ये विज्ञान शाखेतून ते पदवीधर झाले. शेतीतील नावीन्याची ओढ त्यांना कायम होती. त्यातूनच घराशेजारील पाच गुंठ्यात त्यांनी ग्रीन हाऊस उभारण्याचे ठरवले. संपूर्ण अभ्यासाअंती त्यात कार्नेशन फुलांची लागवड करण्याचे ठरवले. सुरवातीला या शेतीतील काही माहिती नव्हती. मात्र, अनुभवी शेतकऱ्यांकडून त्याचे तंत्र जाणून घेतले. मुरुमाचा भराव व निचऱ्याची माती वापरून ग्रीनहाऊसमधील जमिनीला उंची दिली.
मुंबईत फुलविक्रीचा प्रयत्न
कार्नेशनची शेती करताना मुंबई मार्केटचा संबंध यायचा. दादर येथील फुलमार्केटमध्ये त्यांनी २००७-०८ मध्ये छोटे फुलविक्रीचे दुकान सुरू केले. भावाच्या मदतीने दोन वर्षे चालवले. त्या वेळी गावाकडील फुलशेती घरचे अन्य सदस्य पाहायचे. पुढे तांत्रिक कारणामुळे दुकान बंद करावे लागले. मात्र, तेथील बाजारपेठेचा चांगला अभ्यास मात्र झाला. रत्नाकर मग गावी परतले.
क्षारपड जमिनीत ग्रीनहाउसचा प्रयोग
गावाकडे परतल्यावर भावाने ‘टेक्स्टाईल’ कंपनीत नोकरी धरली. रत्नाकर यांनी शेतीकडे लक्ष दिले. गावाशेजारची शेतजमीन पाणथळ असल्याने क्षारपड बनली होती. त्या वीस गुंठ्यात ग्रीन हाउसची उभारणी केली. मात्र, हे करताना त्यात कृत्रिम निचरा प्रणाली बसवून घेतली. त्यानंतर मुरुम व दगडाच्या भरावाने ती भरून घेतली. ग्रीन हाउसची उभारणी केल्यावर डोंगरातील लाल माती पसररून कार्नेशनसाठी तयार केली. या ठिकाणी पीक यशस्वी होत आहे असा आत्मविश्वास येऊ लागला. टप्प्याटप्प्याने लागवड वाढवत नेली. सध्या ती ६० गुंठ्यांपर्यंत पोचली आहे.
लागवडीतील महत्त्वाच्या बाबी
- साधारण ७० सेमी रुंद व एक फूट उंचीचे बेड
- आठ ट्रॉली शेणखत प्रतिदहा गुंठे क्षेत्रासाठी केलेला वापर
- दोन्ही बेडसमध्ये एक फुटाचे अंतर. बेडवर लोखंडी जाळी. त्यात इनलाइन ड्रीप. प्रत्येक बेडवर चार अोळी. त्यातील अंतर १५ सेंमी.
- जून- जुलैच्या हंगामात कार्नेशनची लागवड. चार महिन्यांनंतर शेंडा खुडला जातो.
- एकदा ‘प्लॅन्टेशन’ केलेली बाग दोन वर्षे राहते.
उत्पादन व उत्पन्न
- दहा १० गुंठ्यात सुमारे २० हजार रोपांची लागवड होते. त्यात पुढे पाच ते सहा टक्के मरतूक होते. प्रति रोपाला दोन वर्षांत नऊ फुले येतात. वर्षाला एकूण एक लाख ८० हजारांपर्यंत फुले मिळतात.
- नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत दर चढे राहतात. त्या काळात प्रतिफूल सहा रुपयांपर्यंत दर मिळतो. उर्वरित आठ महिन्यांत हाच दर दोन, अडीच रुपये तर काहीवेळा एक रुपयादेखील मिळतो.
- दहा गुंठे क्षेत्रात ग्रीन हाउस उभारणीसाठी किमान गुंतवणूक दहा लाख रुपयांची असते.
- मजुरी, फर्टीगेशन, खते, कीडनाशके, पॅकिंग, रोपे, अन्य सर्व खर्च १० गुंठ्यांसाठी अडीच लाख रुपयांपर्यंत असतो. त्यातून तीन लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळू शकते.
पॅकिंग
खाकी बॉक्समध्ये २० फुलांचे एक बंडल तयार केले जाते. असे ४० बंडल्स एका बॉक्समध्ये पॅकिंग केले जातात. स्थानिक मजुरांना प्रशिक्षण देऊन कामांचे स्वरूप विषद केले जाते. आता मजूर प्रशिक्षित झाले आहेत. रत्नाकर यांना पत्नी सौ. गौरी यांची मोठी मदत शेतीत मिळते.
मार्केट व विक्री
सण, उत्सव, लग्न या ठिकाणी सजावटीसाठी या फुलांना मागणी असते. रत्नाकर यांची फुले प्रामुख्याने (८० टक्के) मुंबई बाजारपेठेत जातात. उर्वरित फुले इस्लामपूर, कोल्हापूर अशा स्थानिक मार्केटला जातात. गावापासून काही किलोमीटरवरील आष्टा येथून भाजीपाला विक्री संघाची गाडी मुंबईला जाते. त्याद्वारे फुले मुंबईला पाठवली जातात. विक्रीनंतर बॅंकेच्या खात्यात रक्कम जमा केली जाते.
फुलांना मुंबईची बाजारपेठ महत्त्वाची आहे. मुंबईसह अहमदाबाद, गुजरात या ठिकाणीही माल पाठवण्याची संधी आहे. मात्र, शीतगृहांची व्यवस्था सक्षम हवी. असे झाल्यास वाढीव दर मिळू शकतात असे रत्नाकर म्हणतात.
रत्नाकर यांच्या शेतीची वैशिष्ट्ये
- क्षारपड जमिनीत लागवड यशस्वी केली.
- सलग १४ वर्षे फुलशेतीत असल्याने अनेक बारकावे आत्मसात केले.
- रत्नाकर सांगतात, की अन्य फुलांपेक्षा काढणीपश्चात या फुलांचे आयुष्य चांगले असते.
- या पिकाची लागवडही सर्वत्र फार पाहण्यास मिळत नाही. साहजिकच माल बाजारात फार येत नाही. त्यामुळे दर बऱ्यापैकी स्थिर राहतात.
- बांधीव शेततळे घेऊन त्यातील पाणी वापरले आहे.
संपकर् ः रत्नाकर चव्हाण- ९७३०३२९६७५
फोटो गॅलरी
- 1 of 2
- ››