एकजुटीतून ‘पांगरखेड`ने केला कायापालट

पांगरखेडचे प्रवेशद्वार
पांगरखेडचे प्रवेशद्वार

एखाद्या गावाने ठरविले तर काहीही अशक्य नाही, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातील पांगरखेड गाव. मेहकर तालुक्यातील हे गाव दोन वर्षांपूर्वी फारसे परिचित नव्हते. अाज या गावाने राज्यात अापल्या नावाची ओळख तयार केली आहे. या गावाने पंचायत समिती स्तरापासून ते राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव अशी मोठी झेप घेतली आहे. बुलडाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यात पांगरखेड हे सुमारे दोन हजार लोकवस्तीचे गाव. या गावाने ग्रामविकासात अत्यंत कमी काळात उत्तुंग झेप घेतली आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाद्वारे गावात ग्रामविकासाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. लोकसहभागाने गावाचा चेहरामोहरा बदलला. पांगरखेडला महाराष्ट्र शासनाच्या "स्मार्ट ग्राम योजने"अंतर्गत जिल्हा, तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार; तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन २०१६-२०१७ या वर्षात "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम" स्पर्धेचा जिल्हा, तालुकास्तरीय आणि विभागात प्रथम पारितोषिक पुरस्कार मिळाले. विभागातही या गावाने बाजी मारली अाहे. नुकतेच गावाचे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी मूल्यांकन झाले अाहे. गाव विकासाच्या दिशेने ः पांगरखेड गावात स्वच्छता अभियान राबवण्यासाठी गावकऱ्यांनी राज्यातील अादर्श गावे स्वतः भेटी देऊन पाहिली. यामध्ये राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, पाटोदा या गावांना भेटी देण्यात अाल्या. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह गावकरी प्रत्येक गावात गेले. तेथील कामे, लोकसहभाग व इतर माहिती घेतली. राज्यातील ही गावे अादर्श होऊ शकतात, तर अापले पांगरखेड का नाही, अशी भावना गावकऱ्यांच्या मनात तयार झाली अाणि स्वच्छतेची, स्मार्ट व्हिलेज बनण्याची ज्योत पेटली. असे आहे पांगरखेड ः गावाची लोकसंख्या १८५१ (जनगणना २०११ नुसार) आहे. गावात एकूण पुरुष ९६५ व स्रिया ८८६ आहेत. गावाचे क्षेत्रफळ ९० चौरस किलोमीटर आहे. गावाच्या सभोवताली सुमारे ६०० एकर शेतजमीन असून, त्यातील बहुतांशी जमीन बागायती आहे. गेल्या काही वर्षात पांगरखेडचा चेहरामोहरा बदलत अाहे. गावचे शेतशिवारही अाता बदलाच्या मार्गावर अाहे. या गावात जलसंधारणाची कामे झाली अाहेत. जलयुक्त शिवारमधून मातीनाला बांधाची दुरुस्ती करण्यात अाली. शेतकरी फळबागांकडे वळत अाहेत. लिंबू, कांदा या पिकांची लागवड वाढत आहे. ग्रामपंचायतीने दुग्धव्यवसायाला चालना दिली आहे. मोफत दळण योजनाः ग्रामपंचायतीने २०१६ मध्ये करवसुली, स्वच्छतेच्या दृष्टीने गावकऱ्यांचा शंभर टक्के सहभाग मिळवण्यासाठी अभिनव अशी ‘दळण’ योजना राबवली. यात लाभ मिळण्यासाठी कुटुंबाकडे शौचालय व त्याचा वापर करणे ही प्रमुख अट होती; तसेच घर आणि नळ कर शंभर टक्के भरणे, जागा नावावर नसेल तर ५०० रुपये लोकसहभाग म्हणून भरणा करावा, असेही काही नियम होते. या योजनेत प्रतिमाणशी नऊ किलो दळण मोफत दळून दिले जात होते. ३१ मार्च २०१७ पर्यंत ही योजना राबवण्यात अाली. हायटेक ग्रामपंचायत ः ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा महत्त्वाचा दुवा असतो. गावकऱ्यांचा सहभाग मिळाला तर अधिक चांगल्या पद्धतीने बदल घडून येतो हे राज्यातील काही गावांनी दाखविले. याच मार्गावर पांगरखेड निघाले अाहे. स्वच्छ ग्राम अभियानांतर्गत नव्या पिढीला; तसेच इतर गावांना प्रेरणा मिळावी, सामाजिक व विकासात्मक विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी ग्रामपंचायतीने हायटेक व्यासपीठ तयार केले अाहे. ‘पांगरखेडग्रामपंचायत.कॉम’ (www.pangarkhedgrampanchayat.com) असे संकेतस्थळ बनविले असून जगभरात कोठूनही पांगरखेड गावाची माहिती घेता येते. एसएमएस सेवेद्वारे ग्रामस्थांना निरोप ः ग्रामपंचायतीने एकापेक्षा एक असे अभिनव उपक्रम राबवले. पूर्वी खेड्यांमध्ये ग्रामपंचायत, शासनाचे संदेश देण्यासाठी दवंडी हा प्रकार होता. पांगरखेड ग्रामपंचायतीने गावाच्या प्रत्येक चौकात स्टिरीअो बसविले असून ग्रामपंचायतीमध्ये त्याची कंट्रोल रूम आहे. या ठिकाणावरून काही सेकंदात संपूर्ण ग्रामस्थांपर्यंत संदेश पोचविला जातो. प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात अाले. गावातील सर्व मोबाईल धारकांचे क्रमांक ग्रामपंचायतीकडे नोंदविलेले असून एसएमएस सेवेद्वारे ग्रामसभेबाबत निरोप दिला जातो. राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव ः पांगरखेडसारख्या छोट्याशा खेड्याने अापल्या कर्तृत्वाने मोठी झेप घेतली. स्वच्छता अभियान, स्मार्ट व्हिलेज योजनांचे पाठोपाठ पुरस्कार मिळाले. स्वच्छतेच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच अंजली सुर्वे आणि पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी राज्यपाल, मुख्यमंत्री, विविध खात्यांचे मंत्री, अधिकारी उपस्थित होते. मिळालेले पुरस्कार ः १) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम तालुकास्तरीय पुरस्कार ः एक लाख रुपये २) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार ः पाच लाख रुपये ३) तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार ः १० लाख ४) जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार ः ४० लाख   ठळक वैशिष्ट्ये ः

  • ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची बिनविरोध निवड.
  • सामूहिक प्रयत्नांतून गावाचा कायापालट.
  • अंजली सुर्वे यांनी स्वतःच्या विहिरीवरून अडीच लाख रुपये खर्च करून गावासाठी सुरू केला पाणीपुरवठा.
  • गावकऱ्यांनी वृक्ष जगविण्याची घेतली शपथ. ईको-व्हीलेजसाठी नियोजन.
  • महिलांना मोफत शिलाई आणि संगणक प्रशिक्षण, सक्षमीकरणासाठी विविध स्तरावर प्रयत्न.
  • ग्रामपंचायतीच्या पाच एकर क्षेत्रावर सीताफळ-पेरूची फळबागेचा आराखडा.
  • शासनाच्या सहकार्याने १०० मीटर बाय १०० मीटर अाकाराचे शेततळे खोदणार.
  • संपूर्ण गावकऱ्यांना मिळते अल्पदरात अारअो फिर्ल्टड पाणी, गावात सर्वत्र स्वच्छता.
  • ई-क्लास जमिनीवर असलेल्या बंधाऱ्याची जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत दुरुस्ती.
  • शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादनाला चालना, गावकऱ्यांनी खरेदी केल्या ६० म्हशी.
  • गावातील सर्व चौकांना थोर महिलांची नावे.
  • संपूर्ण कुटुंबांकडे शौचालये, बायोगॅसचा वापर.
  • शौचखड्यांची निर्मिती, भूमिगत गटार योजना, कचरा उचलण्यासाठी घंटागाडीचा प्रयोग
  • ग्रामपंचायतीचा १०० टक्के कर भरणाऱ्या कुटुंबाला वर्षभर दळण विनामूल्य.
  • शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजनाचे नियोजन.
  • लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळा डिजिटल.
  • संपूर्ण गावात एलईडी बल्ब तसेच सौरपथदिवे.
  • प्रतिक्रिया महिला सक्षमीकरणाला प्राधान्य ः विकासकामात सातत्य ठेवून महिलांना गृहोद्योगाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण बनविणार आहोत. महिलांच्या सक्षमीकरणाला अामचे प्राधान्य आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू अाहेत. सामाजिक संस्थेने किंवा शासनाने मदत केली तर अामचे संपूर्ण गाव सौर ग्राम बनविण्याचा संकल्प अाहे. -सौ. गंगा गणेश नालिंदे, (सरपंच) आदर्श गावाचा संकल्प ः गावकऱ्यांसह अाम्ही गाव अादर्श बनविण्याचा संकल्प केला आहे. सर्वांच्या सहकार्याने गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत विभागातून प्रथम अाले. स्मार्ट ग्राम योजनेत जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळवून ६६ लाख रुपयांची अाजवर बक्षिसे मिळाली अाहेत. -सौ. अंजली श्याम सुर्वे (माजी सरपंच) ः ८८०६३६१५९९   गावाचे कृषी संशोधन केंद्र उभारणार... गावकऱ्यांच्या सहकार्याने ‘इको व्हिलेज` बनविण्याचा प्रयत्न अाहे. महिला आणि विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण केंद्र उभारायचे अाहे. शेतकऱ्यांना नवे तंत्र आणि प्रशिक्षण देण्यासाठी गावामध्ये आम्ही शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे नियोजन केले आहे. - शरद वानखेडे-पाटील, (ग्रामसेवक) ः ९७६७८६०७९०  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com