तुकड्यांमध्ये विभागलेल्या क्षेत्रात नफा देणारी शेती पद्धती

देशी बियाणांचा संग्रह देशी बियाणांचा संग्रह करण्याचीही नितीन यांना आवड आहे. पाकिस्तानातील कसूर प्रांतातील पिवळ्या फुलांची सुगंधी मेथी, कर्नाटकातील जवारी मिरचीचे बियाणे त्यांच्याकडे आहे. शक्‍य असेल तितक्‍या प्रमाणात हे बियाणे तयार करून त्याची विक्री करण्याचा त्यांचा भविष्यातील प्रयत्न आहे.
केवळ दीड एकर शेती असूनही नितीन काजवे व त्यांचे कुटुंब शेतीत समाधानाने राबते.
केवळ दीड एकर शेती असूनही नितीन काजवे व त्यांचे कुटुंब शेतीत समाधानाने राबते.

शेती मग ती काही गुंठ्यांत का असेना. तुमच्यात हवा केवळ प्रयोगशीलता व नावीन्यतेचा दृष्टिकोन. आणि त्याला मूर्त रूप देण्याची धडपड. कोल्हापूर जिल्ह्यातील साळवाडी (ता. पन्हाळा) येथील नितीनकुमार काजवे (वय ४०) यांची जेमतेम दीड एकर शेती आहे. पण त्यातही विविध गुंठ्यांचे वर्गीकरण करून त्यांनी भात, पालेभाज्या आदी पिकांचे उत्तम नियोजन केले आहे. वर्षभर आर्थिक घडी बसवणारी ऊसपट्ट्यातील त्यांची शेती खरोखरच प्रेरणादायी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा रस्त्यावर कळे गावापासून तीन किलोमीटरवर असणारे साळवाडी (ता. पन्हाळा) हे छोटेखानी गाव आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात व्यावसायिक शेतीला तशा मर्यादा येतात. याचे कारण म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांची मोठी संख्या. डोंगराळ भाग आणि एक गुंठ्यापासून ते दहा- पंधरा गुंठ्यांपर्यंतचे तुकडे असेच इथल्या शेतीचे स्वरूप आहे. खरीप हंगामातील भात हेच इथले प्रमुख पीक. अर्थात तरीही काही शेतकरी ऊस घेण्याचे धाडस करतात. तरही एकरी उत्पादन तसे कमीच राहते. साळवाडीच्या काजवे कुटुंबीयांचे शेतीचे स्वरूपही काहीसे असेच होते. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील नितीन यांनी शेतीची जबाबदारी स्वीकारली. शेती अर्थातच होती ती म्हणजे दीड एकरापर्यंत. तोट्याची ऊस शेती केली बंद ऊस शेती होती. मात्र, केवळ तीस हजार रुपयांपर्यंतच उत्पन्न मिळायचे. नितीन यांनी तोट्यातील शेती बंद करायचे ठरवले. परिसरातील शेतकरी ऊस शेती करीत असतानाही नितीन यांनी घेतलेला निर्णय महत्त्वाचा राहिला. मनुष्यबळ कमी होते. मग काही क्षेत्र स्वत: करायचे व व काही करवून घ्यायचे अशी पद्धत सुरू केली. भातशेतीतील प्रयोग सुरवातीला भाताचे संकरित बियाणे वापरून शेती सुरू होती. सन १९९६ च्या सुमारास नितीन यांना त्यांचे मित्र व तज्ज्ञ यांनी भाताचे काही देशी बियाणे प्रयोग करण्यास दिले. एका काडेपेटीद्वारे सुमारे ६० ग्रॅम बियाणे त्यांनी नितीन यांना दिले. भूतान व म्यानमार देशातील हे बियाणे असल्याचे त्यांनी सांगितले. यातील दाण्यांची क्षमता नितीन यांनी डब्यात लावण करून तपासून पाहिली. मग त्याचे बियाणे शेतात लावले. पुढे त्याचे आणखी बियाणे तयार झाले, मग साडेतीन गुंठ्यांत त्याची शेती सुरू झाली. भात मोठा आल्याने अंदाज आला नाही. संपूर्ण गुंठ्यातील भात पक्ष्यांनी खाल्ला. प्रचलित बियाणांपेक्षा हे वेगळे बियाणे वापरल्याने नुकसान झाल्याचे सांगत ग्रामस्थांनी नितीन यांना वेड्यात काढले. परंतु नितीन मागे हटले नाहीत. नुकसान होऊ दे पण हेच बियाणे वापरायचे असे ठरवले. आज २० गुंठ्यांत या भाताची तर अन्य गुंठ्यांत संकरित वाण अशी पद्धत ठेवली आहे. उत्पादन गायीच्या शेणीत कापूर घालायचा. त्याची राख करून कडूनिंबाचा चुरा वापरून बियाणे कापडी पिशवीत ठेवायचे. ते पुढील हंगामासाठी वापरायचे असा क्रम सुरू आहे. गुंठ्याला सव्वा ते दीड पोती या प्रमाणात त्याचे उत्पादन मिळते. काही भात घरात ठेवून बाकीचा बियाणासाठी शेतकऱ्यांना दिला जातो. शेणाचा अनोखा वापर नितीन जवळपास सर्व शेती सेंद्रिय पद्धतीने करतात. साहजिकच त्यांना शेणखतावर अवलंबून राहावे लागते. शेजारील एक शेतकरी नेहमीच शेणाचे गोळे तयार करतो. त्याच्याकडून सुमारे सहा ते सात ट्रॉली एवढे हे गोळे घेतले जातात. भाताची चिखलणी करताना हे गोळे त्यात घातले जातात. यामुळे जमीन कसदार होते. भाजीपाला पिकांच्या शेतीतही शेणाच्या गोळ्यांचा वापर केला जातो. रोप लावण करताना खड्डा काढायचा. त्यात शेणाचा गोळा ठेवायचा अशी पद्धत आहे. यामुळे उगवण चांगली होते असा त्यांचा अनुभव आहे. भात काढणीनंतर पालेभाज्या भाताचे उत्पादन काढल्यानंतर रब्बी हंगामात मेथी, पालक, कोथिंबीर घेतली जाते. यासाठी सुमारे दहा ते पंधरा गुंठे क्षेत्र वापरले जाते. दहा गुंठ्यांत एक- दोन गुंठ्यांचे तुकडे करून त्यात कोणती ना कोणती भाजी दररोज काढणीस येईल या पद्धतीने लागवडीचे नियोजन केले जाते. पालेभाज्या काढणीस तयार झाल्यानंतर पुढील खरीप हंगामापर्यंत अव्याहतपणे त्याचे उत्पादन सुरू राहाते. दररोज कोणत्याही परिस्थितीत शंभर पेंढी पालेभाज्या काढायच्याच असेच नियोजन असते.

स्वतः हातविक्री साळवडीच्या जवळच असणाऱ्या वारनूळ या छेट्याशा गावात जाऊन नितीन पालेभाज्यांची हातविक्री करतात. संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन असल्याने पालेभाज्या खरेदीसाठी दररोज झुंबड उडते. सेंद्रिय दर्जा असल्याने आपल्या भाजीपाल्यांचा ब्रॅंड तयार झाल्याचे नितीन यांनी सांगितले. खरं तर सेंद्रिय मालाला जादा दर मिळायला हवा. पण ग्रामीण भागात जादा दर देऊन भाजीपाला विकत घ्यायला फारसे कुणी इच्छुक नसते. सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने अर्क तयार करून फवारणी केली जाते. अर्थकारण सक्षम केले नितीन यांनी वर्षभरात पिकांचे ढोबळ वेळापत्रकच तयार केले आहे. पीक पद्धतीच्या कामात पत्नी, आई यांची मोठी मदत त्यांना होते. सात ते आठ महिने टप्प्याटप्प्याने पालेभाज्यांचे उत्पादन निघत असते. त्यामुळे ताजा पैसा हाती राहात असतो. सर्व खर्च वजा जाता या कालावधीत सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. शिवाय उर्वरित तीस गुंठ्यांत गहू, गवारी, दोडका, हरभरा, बटाटे ही पिकेही थोड्या थोड्या प्रमाणात घेतली जातात. घरच्या पुरता हा भाजीपाला ठेवून त्याचीही विक्री केली जाते. यामुळे यातूनही काही रक्कम मिळते तुकड्यातील शेतीचे आव्हान नितीन यांची शेती ओबडधोबड स्वरूपाची आहे. वाटणी झाल्यानंतर सात ठिकाणी विचित्र पद्धतीने तिची विभागणी झाली आहे. दोन, तीन गुंठ्यांपासून ते सात, वीस गुंठ्यांपर्यंत असे शेतीचे तुकडे आहेत. यामुळे प्रत्येक तुकड्यात वेगवेगळी शेती करावी लागते. विहीर अाहे. मात्र ठिबक सिंचन यंत्रणाही बसविली आहे. इतरांच्या शेतातील रासायनिक निविष्ठांचा अंश आपल्या शेतात येऊ नये म्हणून सात तुकड्यांत सात वेगळे पाण्याचे चेंबर बसविले आहेत. दुसऱ्याच्या शेतातून पाट पाण्याने पाणी न घेण्याचाच कटाक्ष असतो. नितीन यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • ऊस शेतीला बगल देऊन नफा देणाऱ्या पिकांचा शोध
  • अल्पभूधारक असूनही विविध प्रयोगांची आस
  • सेंद्रिय शेतीला प्राधान्य
  • खरीप व रब्बी हंगामाचा मेळ घालून वर्षभर उत्पन्न देणारी पीकपद्धती निवडली
  • पालेभाज्यांतून हमखास व ताजे उत्पन्न. स्वतः हातविक्री.
  • घरच्यापुरते ठेऊन उर्वरित भाताचे बियाणे करण्याकडे कल
  • मुबलक पाणी असूनही ठिबक सिंचनाचा वापर
  • शेताभोवतीच्या झाडपाल्यांचा किंवा पीक अवशेषांचा जैविक मल्चिंग म्हणून वापर
  • संपर्क- नितीनकुमार काजवे- ९७६६६४४२२७  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com