उद्यमशील महिलाशक्तीची ओळख बनललेले सारूळ

सारूळ गावातील महिलांनी एकीतून प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे.
सारूळ गावातील महिलांनी एकीतून प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे.

उद्यमशीलतेचं बीजारोपण करणाऱ्या प्रयोगशील महिलांचं गाव अशी नाशिक जिल्ह्यातील सारूळ गावची ओळख बनली आहे. गटांच्या माध्यमातून एकत्र येत महिलांनी हिमतीने चालविलेल्या व्यवसायासाठीच हे गाव ओळखलं जाऊ लागलं आहे. येथील महिलांनी गटशेतीसह भात, टोमॅटो, सोयाबीन आदी पिकांवर प्रक्रिया करून त्या उत्पादनांची राज्यभरातील प्रदर्शनांमध्ये ओळख निर्माण केली आहे. अनेक कारणांमुळे शेती अडचणीतून जात असताना, या महिलांनी त्यातूनच संधी शोधत आपल्या घरादाराला सावरले आहे.   नाशिक जिल्ह्यातील सारूळ हे सह्याद्रीच्या पश्‍चिम पर्वत रांगांलगतचं पाचशे उंबऱ्यांचं आणि दोनेक हजार लोकसंख्येचं गाव. शेती हाच मुख्य व्यवसाय. खरिपात भात, पुढे टोमॅटो या पिकांवर मुख्य अर्थकारण. गावालगत असलेल्या दगडाच्या खाणीही रोजगार देतात. नाशिक-मुंबई महामार्ग पाच-सहा किलोमीटरवरून गेलेला. गोंद्याची औद्योगिक वसाहतही जवळ. तरीही गाव विकासापासून कोसो दूर. पण याच गावातील महिला एकत्र येऊन उद्योग करतात, उत्पादनांना बाजारपेठ मिळवतात व परिस्थिती बदलवतात हे आश्‍चर्य आहे. महिलांनी शोधलं आपलं क्षितिज शेतीत नाना अडचणी, घरच्यांचा म्हणावा असा ‘सपोर्ट’, भांडवल नाही. या असंख्य अडथळ्यांना दूर सारीत गावातील ४२ रणरागिणींनी स्वत:चं क्षितिज शोधण्याचा प्रयत्न केला. गावात महिलांचे "माउली, जिजाऊ आणि साई महिला' हे तीन गट कार्यरत आहेत. माउली गटात १०, जिजाऊ गटात १०, तर साई गटात १२ महिला कार्यरत आहेत. गेल्या दहा वर्षांत नाशिक, नगरसह राज्यभरातील विविध प्रदर्शनांमध्ये या उत्पादनांची विक्री करीत आपल्या गटांची ओळख त्यांनी निर्माण केली आहे. महिलांना एकत्र जोडणाऱ्या मीनाताई गावातील महिलांना एकत्र जोडून ठेवणारं नाव म्हणजे मीनाताई ढगे. कटुंबाची दोन एकर कोरडवाहू शेती. भात, गहू, हरभरा, टोमॅटो ही पिके त्या घेतात. पती, दोन मुले हे कुटुंबातील सदस्य. ग्रामसभेत प्रश्‍न विचारण्यात मीनाताई पुढे असायच्या. गावातील कृषी सहायक पूनम पाटील यांनी महिलांचा गट स्थापन करण्याबाबत मीनाताईंना सुचविले. त्यानुसार २१ मे, २००८ मध्ये "माउली महिला स्वयंसाह्यता बचत गट' स्थापन झाला. सुरवातीला १० महिला एकत्र आल्या. त्यांच्यासोबत आलेल्या बिजलाबाई नवले, पूजा ढगे, सविता ढगे, लक्ष्मी ढगे, मुक्ता ढगे, ज्योती नवले, मनीषा नवले, अनिता डगले, उज्ज्वला पोटींदे यांची उत्तम साथ लाभली. व्यवसायात आघाडी गट तयार करताना सुरवातीला केवळ दारिद्र्य रेषेखालील महिलांचाच समावेश असावा, असा नियम पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. खुल्या संवर्गातल्या असल्याने मीनाताईंना गटात सहभाग घेणे अशक्‍य होते. त्यांनी नियमात बदल करण्यासाठी खूप पाठपुरावा केला. अखेर त्यांना मान्यता मिळाली. गटातील प्रत्येकीने महिन्याला ५० रुपये रक्कम काढायची ठरले. लवकरच पंचवीस हजार रुपयांचं भांडवल तयार झालं. त्यातून बॅंकेत पत तयार झाली. मग भाजीपाला विक्री, बोंबील ढोमिले विक्री, गाई, म्हैस, शेळीपालन असे व्यवसाय करण्यास सुरवात केली. सर्वांनी एकत्रित व्यवसाय का करू नये? असा विचार समोर आला. त्याच वेळी इंडियन बॅंकेचे कर्ज मिळवून गटाने ४० शेळ्या व दोन बोकड खरेदी केले. शिवाय "जिजाऊ' आणि "साई महिला' हे दोन गटही तयार करण्यात आले. ते कृषी विभाग, आत्मा, पणन विभाग यांच्याशी जोडण्यात आले. शेतीतील तंत्रसुधार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्राने या महिलांच्या गटासोबत प्रयोग केले. त्यातून मागील वर्षी रब्बीत गटांना सुधारित हरभरा बियाणे दिले. केंद्राने पेरणीपासून ते काढणीपर्यंतचं साह्य केलं. गटातील २० महिलांनी पहिल्यांदा टोकण पद्धतीने लागवड केली. केंद्रामार्फत भुईमूग शेंगा तोडणी-फोडणीसाठीही यंत्र मिळाले. त्यामुळे वेळ व श्रमातही बचत झाली. इंद्रायणी, १००८ दफ्तरी या वाणांची लागवड उत्पादन आणि उत्पन्नात वाढ देणारी ठरली. प्रक्रिया प्रशिक्षणातून उभारी सारूळच्या महिलांची तळमळ, ध्यास, चिकाटी पाहून नाशिकच्या कृषी विज्ञान केंद्राने अधिक साह्य करण्याचे ठरविले. केंद्रातील विशेषज्ज्ञ प्रा. अर्चना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी फळे व शेतमाल प्रक्रियायुक्त पदार्थनिर्मितीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर केंद्रामार्फत रोपवाटिका, भात लागवड तंत्रज्ञान अशीही प्रशिक्षणे घेत त्यावर आधारित व्यवसाय सुरू केले. केंद्रप्रमुख प्रा. रावसाहेब पाटील, उद्यानविद्या विशेषज्ज्ञ प्रा. राजाराम पाटील, प्रा. हेमराज राजपूत, डॉ. नितीन ठोके यांचा प्रशिक्षणात महत्त्वाचा सहभाग राहिला. त्यातूनच पुढे महिलांनी आवळा कॅंडी, सोयाबीन चिवडा, नाचणी लाडू, सोया पनीर, सोया दूध यांची निर्मिती केली. विड्याचं पान आणि कढीपत्ता यांचा वापर करून तयार केलेल्या "मुखवास' (माउथ फ्रेशनर) उत्पादनाला प्रत्येक प्रदर्शनात मागणी होते. थेट विक्रीवर भर

  • काही वर्षांपासून राज्यभरातील अनेक प्रदर्शनात सारूळमधील महिला ठळकपणे दिसतात.
  • मालाच्या उत्पादनाबरोबरच विक्रीचाही अनुभव. नाशिक, नगर, पुणे, मुंबई यांसह अन्य प्रदर्शनात सहभाग. यातून उत्पादनांचे ब्रॅंडिंग
  • घरची कामे, कुटुंब सांभाळून उद्योग करणे ही तारेवरची कसरत त्यांनी सर केली.
  • एकीमुळे दृष्टिकोन बदलला मीनाताई म्हणाल्या की एकत्र येणं सोपं नव्हतं. अनेकींना घरून उद्योगासाठी होकार मिळत नव्हता. मात्र आम्ही चिकाटी सोडली नाही. त्याचे फायदे दिसू लागले तेव्हा कुटुंबाकडून प्रोत्साहन मिळालं. अडचणी खूप आहेत. पण एकत्र आल्याने दृष्टिकोन व्यापक झालाय. पुढचे प्रश्‍न सोडवू हा आत्मविश्‍वास आहे.   दिस जातील... भोग सरल... रणरणती दुपार... चार मजूर रोज टोमॅटोची खुडणी करताहेत... मालाची निवड करून पती क्रेट भरताहेत... बाजारात टोमॅटोचे भाव पार ५० रुपयांपर्यंत कोसळलेले... बिजलाबाई नवले अस्वस्थ आहेत. त्याच वेळी गटाच्या तातडीच्या बैठकीचा फोन येतो. बिजलाबाई हातातलं काम टाकून तिकडं निघाल्या. तासाभरात ती आटोपून पुन्हा कामाला भिडल्या... कुटुंब, शेती इतकंच गटाचं कामही महत्त्वाचं आहे. दिस जातील... दिस येतील... भोग सरल... सुख येतील... असा आशावाद बिजलाबाई टोमॅटोचे क्रेट भरताना व्यक्त करीत होत्या. अशा असंख्य बिजलाबाईंच्या वेळ, कष्ट आणि त्यागाच्या सिंचनामुळेच ग्रामव्यवस्था टिकून आहे..      जिणं फाटतंया तिथंच ओवावा धागा गं बाई दु:खाच्या कष्टानं लिपाव्या भेगा... कधी उन्हाला द्यावा आधार गाव बुडणारा सोसावा पूर काटे पायात खुडून ऊनवाऱ्यात झडून बोरी बाभळीच्या होती बागा गं.. बाई दु:खाच्या कष्टानं लिपाव्या भेगा.. -प्रशांत मोरे

    संपर्क : मीनाताई ढगे :८७९६२०१५२४  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com