राहुल जगताप यांनी उभारलेल्या कृषी पर्यटन केंद्राचा परिसर
राहुल जगताप यांनी उभारलेल्या कृषी पर्यटन केंद्राचा परिसर

निसर्गाच्या कुशीत सामावलेले अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र

पर्यटकांना खुणावणारी शेती ओढ्यालगतच्या शेतात भातपिकांसोबत भाजीपाला, फळझाडांची लागवड, काढणी या प्रक्रियेत पर्यटकांना सहभागी करून घेण्यात येते. यंदाच्या वर्षी अंजनवेल कृषी पर्यटन केंद्रात जुलैमध्ये भात लावणीचा सुमारे तीनशे जणांनी आनंद घेतला.

पुणे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर राहुल जगताप यांनी निसर्गाच्या सान्निध्यात वसवलेले अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र पर्यटकांना चांगलेच खुणावत आहे. शहरी लोकांना हवे असलेले निसर्ग सान्निध्य, शांतता, अस्सल गावरान जेवण, शेतात भातलावणीचा प्रत्यक्ष अनुभव, पर्यावरणपूरक बाबी आदी विविध वैशिष्ट्यांनी या केंद्राचा विकास व त्या अनुषंगाने व्यवसायवृद्धी जगताप यांनी साधली आहे. पुणे जिल्ह्यात पवना डॅमच्या उत्तर पूर्व भागात असलेले शिळीम डोंगराळ गाव म्हणून ओळखले जाते. याच डोंगराळ भागात रमेश खंडेराव जगताप यांची शेती आहे. ही भौगौलिक परिस्थिती समस्या म्हणून न समजता त्याचे कृषी पर्यटन केंद्रात रूपांतर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. खरं तर पूर्वी ही जागा इतकी दुर्गम होती, की तिकडे जायलासुद्धा लोक घाबरत. मात्र एक तपाहून अधिक खडतर प्रयत्न करून या जागेचा विकास रमेश यांनी केला. त्यातूनच पुढे अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र उभारण्यात यश मिळाले. या ठिकाणाच्या एका बाजूस ओढा, तर दुसऱ्या बाजूस रस्ता अशा नैसर्गिक सीमा असलेल्या दहा एकरांत अंजनवेलीचा विस्तार होत आहे. रमेश यांच्या मातोश्री अंजनाबाई यांच्या नावावरून केंद्राचे अंजनवेल असे नामकरण करण्यात आले. टप्प्याटप्प्याने उभारणी वडिलोपार्जित जमिनीचे वाटप झाले. त्यानंतर बारा वर्षांपूर्वी वरकस माळरान जमीन रमेश यांच्या वाट्यास आली. साधारणपणे २००८ मध्ये त्यांनी पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू केला. चार वर्षांनी तो बंद करावा लागला. कृषी पर्यटन हा पर्यायी व्यवसाय समोर आला. मात्र टप्प्याटप्प्याने हे काम करावे लागणार होते. पोल्ट्रीचे शेड तयार होते. पाईन वूडच्या वापरातून सौंदर्य खुलवत त्याचे हॉलमध्ये रूपांतर केले. सन २०१२ मध्ये दगडी पिंचिंगची कामे केली. तर, २०१५ मध्ये पर्यटकांसाठी चार खोल्यांचे बांधकाम केले. असे करीत सुमारे पावणेतीन वर्षांपूर्वी व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. आज व्यवसायाची सर्व जबाबदारी रमेश यांचा मुलगा राहुल समर्थपणे सांभाळत आहे. राहुल बीएस्सी (केमिस्ट्री) एमएसडब्ल्यू झाले आहेत. चार वर्षे नोकरी केल्यानंतर ते पूर्णवेळ शेती करीत आहेत. भांडवल उभारणी राहुल, त्यांचे बंधू यांनी नोकरीत कमावलेले उत्पन्न, तसेच पंधरा लाखांचे कर्ज पर्यटन केंद्राला निसर्गाचे वरदान

  • सह्याद्रीच्या रांगांमध्ये पवना धरणाच्या रमणीय परिसरात ठिकाण.
  • पुणे शहरातील चांदणी चौकापासून सुमारे ४५ किलोमीटरवर. शहरापासून जवळ तरीही तेथील धकाधकीपासून शांत, प्रदूषणमुक्त. उंचच उंच डोंगर, दऱ्याखोऱ्यांतून वाहणारे निर्मळ झरे, पक्ष्यांचा मुक्त विहार, शेतात डोलणारी पिके. ग्रामीण जीवनाचा अनुभव.
  • हाॅलसाठी गोणपाट, पाईनवूड या नैसर्गिक साधनांचा वापर.
  • बऱ्यापैकी उंचावर नैसर्गिकरीत्या तयार झालेले रांजणखळगे (सुमारे दहा ते बारा)
  • इको हाउस - माती, दगड व कुडाच्या भिंती. विजेसाठी सौरऊर्जा.
  • सुमारे दोन हजार फूट लांबीचा नैसर्गिक ओढा. राहुल यांचे मित्र व पर्यावरण जाणकार नरेंद्र पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सौंदर्यस्थळांची रचना.
  • इथल्या खडकांवर निवांत पहुडावं आणि आकाशाच्या असीम अथांगतेचं दर्शन डोळ्यात साठवावं असं वातावरण.
  • जेवणासाठी सुपारीच्या काथ्यापासून तयार केलेल्या इको प्लेट्सचा वापर.
  • पर्यटनस्थळावरील सुविधा

  • एकूण १२ एकर क्षेत्र, पैकी चार एकरांवर पर्यटन प्रकल्प
  • सुमारे दोन ते तीन एकरांवर सेंद्रिय शेती
  • इंद्रायणी भात हे मुख्य आकर्षण
  • टाकाऊ टायरपासून बनवलेल्या बैठका
  • जंगलातली भटकंती विलक्षण अनुभव देणारी, त्याचा आनंद घ्यायचा तर ती व्यवस्थाही.
  • पश्चिम घाटातील वनवैभव इथं अजूनही शाबूत आहे, त्यामुळे पक्षिनिरीक्षणासाठी अंजनवेल हे महत्त्वाचं केंद्र आहे. पावसाच्या सुरवातीला काजव्यांच्या लखलखत्या प्रकाशात अंजनवेलचा परिसर दिपून गेल्यासारखा होतो. या परिसराजवळ तुंग, तिकोणा, कोरीगड, मोरगिरी असे महत्त्वाचे एेतिहासिक किल्ले आहेत, त्यामुळे ट्रेकिंगसाठीही अनुकूल.
  • जीवामृत प्रात्यक्षिक
  • कचऱ्यापासून खतनिर्मिती
  • रोपवाटिका
  • पर्मनंट ॲग्रिकल्चरचा (परमाकल्चर) प्रयत्न
  • टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती
  • वर्षाला पाचशे- सातशे, तर केंद्र सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत तीन हजार पर्यटकांची भेट.
  • विविध कार्यक्रमांचे आयोजन

  •  पावसाळ्यात पर्यटकांसाठी भात लावणी महोत्सवाचे खास आयोजन
  •  इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनविण्यासाठी कार्यशाळा
  • रानभाज्या महोत्सवाचा यंदा छोटा प्रयत्न
  • अशी केली व्यवसायवृद्धी कौटुंबिक सहली, स्नेहसंमेलन, मेळावे, शाळा- महाविद्यालय सहली, योगा कार्यशाळा, संस्था- कंपन्यांची प्रशिक्षणे, उन्हाळी, हिवाळी शिबिरे, छोटे वाढदिवस, संगीत रियाज, वाचन, साहित्यिकांसाठी अशा विविध कारणांच्या अनुषंगाने. चुलीवरचे रुचकर जेवण

  • चुलीवरील शाकाहारी, मांसाहारी भोजन,
  • नाश्त्यासाठी खास घावन, थालीपीठ, मिसळ असा बेत
  • जेवणात पोळी, भाकरी, सोबत भरलं वांगं, मटकी उसळ, रानभाज्या, अळू, कोंथिबीरवडी, कढी खिचडी, वरणभात आदी पदार्थ
  • जवळची आकर्षक पर्यटनस्थळे पवना बॅकवाॅटर, अंजिवली देवराई, सत्यसाई मंदिर, लायन्स पाॅइंट (लोणावळा) संपर्क-  राहुल जगताप ९९२२१८३८९८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com